अजूनकाही
इतर भारतीय भाषांच्या तुलनेत मराठी आणि बंगालीत विज्ञानकथा मोठ्या संख्येनं लिहिल्या आणि वाचल्या जातात. मराठीत सुरुवातीला भा.रा. भागवतांच्या अनुवादित पुस्तकांनी खूप जणांना या साहित्याची ओळख करून दिली, तर नंतर डॉ. जयंत नारळीकरांमुळे मराठीत विज्ञानकथेला ग्लॅमर मिळालं. त्याच वेळी निरंजन घाटे, डॉ. बाळ फोंडके, सुबोध जावडेकर, लक्ष्मण लोंढे या लेखकांनी दर्जेदार लेखनानं मराठी विज्ञानकथेला सतत बहरत ठेवलं.
आता प्रश्न असा आहे की, त्यानंतरची आजची मराठी विज्ञानकथा ही कशी आहे?
गेल्या दहा वर्षांमधल्या शंभराहून अधिक चांगल्या विज्ञानकथा पाहिल्या तर त्यांच्यात सर्वांत जास्त उठून दिसणारा समान दुवा आहेत- तो म्हणजे विषयांमधली प्रचंड विविधता. विज्ञानकथांचा रोख बहुधा भविष्याकडे असतो. तरीही या विविधतेमध्ये बर्याचदा आजच्या विषयांना हात घातलेला दिसतो हे महत्त्वाचं.
आज जगातल्या कुठल्याही राजकीय घटनेपासून आपण अलिप्त राहू शकत नाही, तसंच साहित्यही त्यापासून फटकून राहू शकत नाही. डी. व्ही. कुलकर्णी यांच्या ‘अपहरण’ (मराठी विज्ञान परिषद पत्रिका दिवाळी, २०१२) कथेतलं आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा शुभदा गोगटे यांच्या ‘पाणक्ये’ (मराठी विज्ञान परिषद पत्रिका दिवाळी, २००७) मधलं स्थानिक पातळीवरचं राजकारण- दोन्ही आजचं वास्तव दाखवतात.
तसेच आजच्या काळातले विषय आहेत. ‘धनंजय’ दिवाळी २०१६ मधल्या दीपक आपटे यांच्या ‘वक्री गुरु’ (लैंगिक अत्याचार); ‘मन्वंतर’ (डायमंड प्रकाशन, २०१५) या संग्रहातल्या प्रतीक पुरी यांच्या ‘माइंड रीडर’ (जनमतावर ताबा ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर); आणि ‘धनंजय’ दिवाळी २००८ मधल्या पु. रा. रामदासी यांच्या ‘बॅक्टेरियल एस्पेरंटो’ (औषधकंपन्यांचं राजकारण) या कथांचे.
इंटरनेटमुळे एका परीने माहितीचं लोकशाहीकरण झाल्याने या कथांमध्ये माहितीचा फारसा ओव्हरडोस होत नाही आणि त्या कथा म्हणूनच समर्थपणे वाचकापुढे येतात.
अशा समकालीन विषयांचं प्रतिबिंब आजच्या विज्ञानकथांमध्ये पडत आहे हे निश्चितच स्वागतार्ह आहे.
अनोख्या विज्ञान संकल्पना
विज्ञानकथा म्हटली की, त्यात रोबॉट्स, अंतराळ प्रवास, नाहीतर एक चक्रम शास्त्रज्ञ असलाच पाहिजे अशा गृहितकांचे दिवस मागेच सरले आहेत. आजही अशा काही ठोकळेबाज कथा लिहिल्या जातात. पण त्यापेक्षा जास्त प्रमाण दिसतं ते नव्या आणि हटके विज्ञान संकल्पनेभोवती कथा गुंफण्याचं.
स्मिता पोतनीस यांच्या ‘गंध दरवळला’ (सृष्टीज्ञान, दिवाळी २०१३) या कथेतील वैज्ञानिक तत्त्व देखील सहसा विज्ञानकथेत न आढळणारं, गंधज्ञानाशी संबंधित आहे. तर सुबोध जावडेकर यांच्या ‘नियतीशी करार’ (दीपावली, दिवाळी २०१४) या कथेत जेनेटिकली मॉडिफाईड बियाण्यांचा संदर्भ पुढच्या भयप्रद टप्प्याशी अतिशय कल्पकतेने जोडलेला आहे.
डॉ. बाळ फोंडके यांची ‘कौन?’ (धनंजय, दिवाळी २०११) ही कथा कॉन्चोलॉजी या वैशिष्ट्यपूर्ण शास्त्रशाखेवरची पहिली आणि बहुधा एकमेव विज्ञानकथा आहे. तसंच डॉ. जयंत नारळीकर यांच्या ‘सूर्याचा प्रकोप’ (धनंजय, दिवाळी २००६) या कथेत सोलर कॉन्स्टंट ही विज्ञान संकल्पना प्रथमच वापरलेली दिसते.
डॉ द. व्यं. जहागिरदार यांची ‘अश्रू वेदनेचे’ (धनंजय, दिवाळी २०१२) ही कथा या दृष्टीने खूपच बोलकी आहे. अतीव दु:खाच्या प्रसंगात माणसाचे अश्रू थिजतात ही परिस्थिती आपणही कधी पाहिलेली असेल. त्याबाबत आश्चर्य वा शंकाही व्यक्त केलेली असेल. मात्र त्यामागचं एक वेगळं शास्त्रीय सत्य समोर येतं, तेव्हा आपण थक्क होऊन जातो. किंबहुना ही कथा वाचल्यानंतर आपला अशा प्रसंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो हे महत्त्वाचं.
सुनील सुळे यांच्या ‘सौमलकोल’ (नवल, दिवाळी 2013) कथेतल्या अनोख्या पार्श्वभूमीवर जड पाण्यासारखा न्यारा विषय विशेष उठून दिसतो. तसं क्वचित दिसणारं वाइल्डलाईफ वातावरण चन्द्रशेखर मराठे यांच्या ‘विरूद्ध’ (नवल, दिवाळी २०११) या कथेत रंगत आणतं. अशा वेगळ्या वाटा आज नवेजुने विज्ञानकथा लेखक आवर्जून चोखाळत आहेत.
विषयांचं अप्रतिम वैविध्य
गेल्या दहा वर्षांमध्ये प्रसिद्ध झालेल्या एकूणच विज्ञानकथांवर एक नजर टाकली तरी विषयांचं अप्रतिम वैविध्य पाहायला मिळतं. मानवी हायबरनेशन, खर्या अश्रूंमधली रसायनं, उल्कापात, क्लोरोफिल, ग्लायल पेशी, 3-डी प्रतिमा, ध्वनिमुद्रण करू शकतील अशी वस्त्रं, टाइम कॅप्सूल, डोपामाईन संप्रेरक, म्यूटेशन, मृत गर्भार स्त्रीच्या उदरातल्या बाळाचा जन्म, जनरेशन स्पेसशिप, उत्क्रांती, मूळ संख्या, स्वप्नांवर ताबा मिळवणारे तंत्रज्ञान, सस्पेंडेड अॅनिमेशन, स्पेस आर्किऑलॉजी, हजारो वर्षांचा गोठलेला मानवी गर्भ, समुद्राच्या पाण्याची वाढलेली पातळी, होलोग्राफिक विश्व, उच्च मिती, भविष्यात तंत्रज्ञानाचा अभाव, मेंदू चोरीला जाणे, आणि अमरत्व असे विविध विषय हाताळले जात आहेत.
ही विविधता कशी आली याचा विचार केला, तर त्यामागे मुख्य कारण आहे ते म्हणजे अलीकडे वेगवेगळ्या माध्यमांद्वारे खुला झालेला वैज्ञानिक माहितीचा विराट खजिना. त्यात विकिपिडिया, विकिहाऊसारखे ऑनलाइन माहितीस्रोत आहेत, नासा आणि पॉप्युलर सायन्स यांच्या स्वत:च्या वेबसाईट्स आहेत,यूट्यूबवर खूपसे माहितीपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत आणि नॅट-जिओ वा डिस्कवरीसारखे नावीन्यपूर्ण अनुभव देणारे चॅनेल्स आहेत.
……………………………………………………………………………………………
मराठी विज्ञानकथांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा
……………………………………………………………………………………………
दुसरीकडे संशोधकांच्या जगाने सर्वसामान्यांना विज्ञानाची तोंडओळख करून देण्यात पुढाकार घ्यायला सुरुवात केलेली आहे. वैज्ञानिक शंकानिरसन करणार्या असंख्य ऑनलाइन फोरम्स आहेत, तर बरेचसे शास्त्रज्ञ आवडीने आपल्या वेबसाईट्सवर वाचकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा उपक्रम चालवत असतात.
त्याशिवाय वर्तमानपत्रं, टीव्ही या माध्यमांतही वैज्ञानिक संशोधनाच्या बातम्यांना चांगलं स्थान दिलं जातं. काही वेळा अगम्य वाटणार्या सत्य घटनांमागचं वैज्ञानिक तत्त्व उलगडून दाखवणार्या शोधक लेखांना वा बातमीपत्रांनाही विशेष प्रसिद्धी दिली जाते. त्यामुळे विज्ञानातल्या नवनव्या घडामोडींची माहिती आपसूक आपल्यापर्यंत नियमितपणे पोहोचत असते.
माहिती सहजी मिळणे हे या विविध विषयांच्या निवडीमागचं एक तर्कसंगत स्पष्टीकरण असलं, तरी त्याहूनही महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या दहा वर्षांत विज्ञान जगतात शोधांचा अगदी विस्फोट होताना दिसत आहे. हिग्ज-बोसॉन कणांचा शोध, पृथ्वीसदृश ग्रहांचं अस्तित्व, प्रतिध्वनित ग्रॅविटि वेव्हजनी बिग बॅंग सिद्धांताला दिलेला ठोस पुरावा, स्टेम सेल ट्रान्सप्लान्ट, 3-डी प्रिंटर वापरून कृत्रिम मानवी हृदय आणि मूत्रपिंडाची निर्मिती, अंधत्वावर जीन थेरपीचा वापर, अॅस्टरॉइड पट्ट्यात आणि सौरमालेत पाण्याच्या अस्तित्वाचा आढळ असे आपलं जीवन आमूलाग्र बदलून टाकणारे अभूतपूर्व शोध अलिकडे लागत आहेत.
त्याव्यतिरिक्त प्रायोगिक तत्त्वावरच्या गोष्टी सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यार्या विज्ञानाच्या व्यावहारिक उपयोजनांनाही बहर आलेला दिसत आहे. ग्राफीनच्या संभाव्य उपयोगांबद्दल बर्याच कंपन्या पुढे येऊ पहात आहेत. खाजगी अवकाशप्रवासासाठी व्हर्जिन गॅलॅक्टिक मोर्चे बांधून तयार आहे. हायपरलूप हे वाहतुकीचं साधन प्रत्यक्षात येऊ घातलं आहे. एखाद्या व्यक्तीचा संपूर्ण जेनोम सीक्वेन्स अवघ्या एक हजार डॉलर्सच्या आत करून देण्याचा विडा काही कंपन्यांनी उचलला आहे. तर दुसरीकडे चीन-जपानमध्ये रोबॉट शेफ आणि वेटर्स असणार्या रेस्तरांना उधाण आलेलं आहे.
या सगळ्यामधून विज्ञानातला थरार उत्साही प्रयोगशील विज्ञानकथा लेखकाला सतत खुणावत असतो. आधी म्हटल्याप्रमाणे या आगळ्या विषयांची अधिक माहिती मिळवणंही सोपं झालं आहे. याचा परिपाक म्हणून आज मराठी विज्ञानकथा अभूतपूर्व अशा विषयांना हात घालताना दिसत आहेत.
वैविध्याचा विचार करताना आणखी एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा. नव्या शतकातले विज्ञानकथा लेखक अनेक वेगवेगळ्या व्यवसायात आहेत. त्यांच्यातले बरेच जण जगभरात नाना ठिकाणी फिरलेले आहेत, विविध संस्कृतींचे अनुभव घेतलेले आहेत. काही वेळा प्रत्यक्षपणे तर काही वेळा अप्रत्यक्षपणे त्यांच्या पार्श्वभूमीचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडत असतं. त्यामुळे मराठी विज्ञानकथा या आघाडीवरही समृद्ध होताना दिसत आहे.
मात्र त्याच वेळी विषयांच्या वैविध्याबाबत बोलताना असंही वाटतं की, मराठी विज्ञानकथेला याबाबतीत अजून एक पाऊल पुढे टाकणं आवश्यक आहे. विज्ञानाला वाहिलेली अनेक आंतरराष्ट्रीय नियतकालिके आहेत. त्यांच्यात निरनिराळे संशोधन निबंध आणि एखाद्या विषयावरील अनेक शोधांचा मागोवा घेणारे रिव्हयू प्रकारचे लेख नियमित प्रसिद्ध होतात. हे लेख म्हणजे नवनवीन विज्ञानकथाबीजांची खाण आहेत. ते विज्ञानकथा लेखकांनी नेमाने वाचायला हवेत, म्हणजे विषयांमधील वैविध्य आणखी वाढेल.
रूढ विषयांचा वेगळा आविष्कार
“आम्ही अमुक वैज्ञानिक माहिती सांगत आहोत, त्यातून तमुक संदेश देत आहोत,” अशी प्रचारकी थाटाची भूमिका मराठी विज्ञानकथेतून कधीच हद्दपार झालेली आहे. उलट, “विज्ञान आपल्या जगण्यावर असा प्रभाव टाकत असतं” अशा वाचकांना विश्वासात घेणार्या, रूढ विज्ञान विषयांना चाकोरीबाह्य पद्धतीने मांडणार्या भूमिकेतून आजच्या मराठी विज्ञानकथा लिहिल्या जातात.
मेंदूवरच्या संशोधनावर पुष्कळ विज्ञानकथा लिहिल्या गेल्या आहेत, मात्र ‘कलावंताचा जन्म’ (दीपावली, दिवाळी २००९) ही सुबोध जावडेकरांची एक उत्तम विज्ञानकथा मेंदू ही काय विलक्षण चीज आहे याची पुन्हा एकदा जाणीव करून देते.
मुकुंद नवरे यांची ‘ऑपरेशन रोबोक्लीन’ (धनंजय, दिवाळी २०१६) या कथेत रोबॉट जरूर आहे, पण लोकपाल म्हणून. स्वच्छ कारभाराचा या लोकपालाचा आग्रह इतरांना कसा भारी पडतो याचं यथार्थ चित्रण ही कथा करते. तर शरद पुराणिक यांची ‘तो मी नव्हेच’ (नवल, दिवाळी २०१३) ही कथा क्लोनिंग म्हणजे रोजचीच घटना झालीय अशा भूमिकेतून लिहिल्याने क्लोनिंगची गोष्ट राहत नाही तर एक छान रहस्यकथा होऊन जाते.
लक्ष्मण लोंढे यांच्या ‘तो मी नव्हेच’ (मविप पत्रिका, दिवाळी २००६) या कथेत टेलिपोर्टेशन संकल्पनेला मानवी भावभावनांची दिलेली डूब अतुलनीय आहे. तर याच अंकातल्या निरंजन घाटे यांच्या ‘प्रश्न वारसाचा’ या कथेत अवयव प्रत्यारोपण करून घेतलेल्या व्यक्तीची अजब कहाणी एका वादग्रस्त खटल्याच्या माध्यमातून मांडली आहे.
विज्ञानकथा ही भयकथा (हॉरर साय-फाय) म्हणूनही चांगली ठरते अशी उदाहरणं नारायण धारपांच्या काही कथांमध्ये मिळत होती. नव्या शतकातही अशा विज्ञानकथा जरूर दिसतात. म. वि. दिवेकर यांच्या ‘ब्लॅक विडो’ (धनंजय, दिवाळी २००६) या कथेची इथे नोंद घेणं आवश्यक आहे. भयकथेचा थरार आणि विज्ञानाची योग्य बैठक यामुळे ही कथा लक्षणीय ठरते.
प्रचलित विषय वेगळ्या प्रकारे मांडणार्या या कथांमुळे आज मराठी विज्ञानकथा अत्यंत पैलूदार होताना दिसत आहेत.
नवे फॉर्म्स
जुन्या फॉर्म्सची मोडतोड करणे आणि नवनवे फॉर्म्स हाताळून पाहणे हे मराठी साहित्यात अधूनमधून होताना दिसतं. त्यांचं स्वागतही यथोचित होत असतं. आजच्या विज्ञानकथादेखील याला अपवाद नाहीत.
डॉ. अरुण मांडे यांची ‘शेवटची कथा’ (धनंजय, दिवाळी २००८) ही एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण कथा. एका मासिकात प्रसिद्ध झालेल्या कथेवर संपादकांना आलेल्या प्रतिक्रिया यातून ती मूळची कथा अप्रत्यक्षपणे पण संपूर्णपणे इतकी अप्रतिम उभी राहते की, या वेगळ्या फॉर्मला मनापासून दाद दिल्यावाचून रहावत नाही.
काही वेळा फक्त संवाद या माध्यमातून कथा, तर कधी रोजनिशीमधून, काही वेळा वेगवेगळ्या पात्रांच्या दृष्टिकोनातून एकाच घटना, कधी स्वप्न आणि सत्य आलटून-पालटून, कधी दुभंग मनाच्या दोन प्रतिमा एकमेकांशी बोलताना, तर कधी लोककथांचा फॉर्म घेऊन, असे प्रयोग अलिकडे मराठी विज्ञानकथांमध्ये दिसायला लागले आहेत.
आज जागतिक साहित्यात छोट्या वा फ्लॅश कथांचं महत्त्व वाढताना दिसत आहे. या कथा बहुधा हजार शब्दांच्या आत असतात. विशेषत: ऑनलाइन साहित्यात फ्लॅश कथा आवडीने लिहिल्या आणि वाचल्या जातात. मराठीत देखील अशा कथा अधूनमधून दिसायला लागल्या आहेत. लोकसत्ताने २०१५ मध्ये वर्षभर अशा फ्लॅश विज्ञानकथांचं सदर चालवलं होतं आणि त्याला लेखक-वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
या सगळ्या आयामांकडे नजर टाकली तर मराठी विज्ञानकथाखरोखरीच आजची आणि आजच्या मुख्य साहित्यप्रवाहाशी सुसंगत अशी प्रयोगशील दिसत आहे.
मेघश्री दळवी
विज्ञानकथालेखक व समीक्षक असून आयटी उद्योगात कार्यरत आहेत.
meghashri_dalvi@hotmail.com
प्रसन्न करंदीकर
विज्ञानकथालेखक असून कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
kprasanna.mangesh@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
D V Kulkarni
Sun , 30 April 2017
अतिशय अभ्यास पूर्ण लेख.विज्ञानाच्या प्रगतीने भोवतालची परिस्थिती बदलते आहेच परंतु भाव विश्व देखील बदलत आहे. या दोन्हीचे प्रतिबिंब मराठी विज्ञान कथामध्ये कसे पडते ,याचे अचूक विश्लेषण या लेखात आहे.