‘मृत्युबद्दल दु:ख न बाळगता मृत्युचा उत्सव साजरा करावा’ असा संदेश देणारे आचार्य भगवान रजनीश उर्फ ओशो यांच्याच मृत्यूबद्दल शंका घ्यावी अशी परिस्थिती आहे. १९ जानेवारी १९९० रोजी ओशोंचा झालेला मृत्यू संशयास्पद मानला जातो. अमेरिका आणि युरोपियन न्यायालयात ओशोंच्या मृत्यपत्राबाबत न्यायालयीन खटला चालू आहे. २६ वर्षांनंतर या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. योगेश ठक्कर नामक एका व्यक्तीने या प्रकरणी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. आणि म्हणूनच ‘हिंदुस्थान टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक अभय वैद्य यांच्या ‘Who Killed Osho?’ या पुस्तकावर चर्चा होणे गरजेचे आहे. ओशो यांच्या मृत्यूबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. कोणी म्हणते, त्यांना घातपात करून मारण्यात आले, तर कोणी म्हणते, अमेरिकेने ओशोंवर ‘थेलीयम’ या विषाचा वापर केला. सर्वसामान्य व्यक्तीला पडणाऱ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे अभय वैद्य यांनी ‘Who Killed Osho?’ या पुस्तकामधून देण्याचा अभ्यासपूर्ण प्रयत्न केला आहे. एक सर्वसामान्य घरातील मुलगा, विद्यापीठाचा सुवर्णपदक विजेता विद्यार्थी ते जागतिक आध्यात्मिक गुरू असा ओशोंचा प्रवास या पुस्तकामध्ये दिलेला आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'साठी वार्तांकन करताना समोर आलेल्या एकेका पुराव्यांमधून अभय वैद्य यांनी केलेली शोध पत्रकारिता आपणास यामधून पाहावयास मिळते. ‘Who Killed Osho’ या पुस्तकाबद्दल अभय वैद्य यांच्याशी मारलेल्या गप्पा….
..................................................................................................................................................................
श्रीनिवास – ‘Who Killed Osho?’ या पुस्तकाच्या शीर्षकातच लेखकाला काय सांगायचे आहे ते समजते आहे. इतके चपखल शीर्षक कसे सुचले? किंवा शीर्षक निवडताना काय विचार केला?
अभय - होय, माझ्या पुस्तकाचे शीर्षक चपखल आहे. शीर्षक हे आकर्षकच असावे लागते. त्यामुळे हा हेतू आमच्यासमोर होताच, पण माझ्या पुस्तकाबद्दल बोलायाचे झाल्यास शीर्षक हे प्रकाशकांनीच ठरवले आहे. समोर असलेल्या दोन-तीन पर्यायांमधून ‘Who Killed Osho’ हे शीर्षक अंतिम करण्यात आले.
श्रीनिवास - ‘Who Killed Osho’ हे पुस्तक लिहावयाचा विचार केव्हा सुरू केला?
अभय - १९८७ पासून गेली ३० वर्षे मी ‘टाइम्स ऑफ इंडिया’साठी या विषयासाठी वार्तांकन करत होतो. आठवड्यातून एकदा, कधी दोनदा असे मी कोरेगाव पार्क पुणे आश्रमात जात असे. तेव्हापासून मी विविध कागदपत्रे गोळा करत होतो. हाती सर्व पुरावे गोळा झाल्यानंतर २०१२ साली मी पुस्तकाबद्दल विचार करू लागलो.
श्रीनिवास - ओशोंच्या मृत्यूला जवळपास २६ वर्षे पूर्ण झाली आहेत. मग आताच हे पुस्तक लिहावे असे का वाटले?
अभय - यामागे तीन कारणे आहेत. पहिले म्हणजे ‘ओशो चळवळ’ ज्याला आपण म्हणतो, त्या चळवळीला ५० वर्षे पूर्ण होत आली आहेत. आणि दुसरे म्हणजे उच्च न्यायालयात या संदर्भात दोन केस दाखल झाल्या आहेत. तसेच ओशोंचे नाकारण्यात आलेले मृत्युपत्र. या सर्व प्रकरणामुळे सत्य लोकांपुढे यावे म्हणूनच हे पुस्तक लिहिले आहे तिसरे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वर्तमानपत्रामध्ये एक पूर्ण पान भरून स्टोरी करून संपण्यासारखा हा विषय नव्हता. कारण दुसऱ्या दिवशी लोक ती स्टोरी विसरून जातात. आगामी काळात या प्रकरणाच्या अधिक महितीसाठी हे पुस्तक उच्च न्यायालयात जाणार आहे.
श्रीनिवास - अभिनंदन सर, संदर्भासाठी हे पुस्तक उच्च न्यायालयात जाणार आहे. तुमच्या या पुस्तकाला लक्षात राहण्यासारखा वाचकांचा एखादा प्रतिसाद? प्रतिक्रिया?
अभय - हे पुस्तक अमेरिका, यूरोप, नेपाळ अशा जगातील विविध भागांत पोहोचले आहे. लक्षात राहण्यासारखा वाचकांचा प्रतिसाद म्हटले तर मागच्या आठवड्यात मला नेपाळवरून आनंद अरुण या वाचकाने ‘व्हॉटसअॅप’द्वारे त्यांची प्रतिक्रिया कळवली. नेपाळमधील ओशो तपोबनमध्ये ते ओशोंची सेवा करत असत. त्यांच्या मृत्यबद्दल मी केलेल्या धाडसी लिखाणाबद्दल त्यांना कौतुक वाटते. ओशोंच्या संशयास्पद मृत्यबद्दल त्यांनी भारत सरकारकडे अनेकदा चौकशीची मागणी केली आहे. तसेच भारतातील ओशोंच्या भक्तांमध्येही या पुस्तकाची चर्चा सुरू आहे. एका पोर्तुगीज व्यक्तीने तर इंस्टाग्रामवर पुस्तकाचे मुखपृष्ठ शेअर केले आहे.
श्रीनिवास - या पुस्तकाच्या लिखाणासाठी प्रेरणा कोणाची?
अभय - प्रेरणा म्हणजे सत्य लोकांसमोर आणणे एवढीच. परंतु इथे एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे ओशोंच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुणे आश्रमातील समाधीवरून झालेला वादंग आणि नंतर ओशोंच्या मृत्युपत्रावरून उठलेला गदारोळ. जे मृत्युपत्र खोटे ठरवून न्यायालयाने नाकारले आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी ओशोंच्या निकटवर्तीयांनी केलेले कट कारस्थान हीदेखील एक प्रेरणाच म्हणावी लागेल. याबद्दलची अधिक माहिती आपणास पुस्तकामध्ये वाचायला मिळेल.
श्रीनिवास - या विषयामध्ये शोध पत्रकारिता करत असताना तुम्हाला ही ‘इंडियन एक्सप्रेस’चे संपादक प्रकाश कर्दळे यांच्याप्रमाणे ओशोंच्या ‘कम्युन’मध्ये सामील व्हावेसे वाटले नाही?
अभय - कधीच नाही, पण ओशोंच्या मेडिटेशनचा मी अनुभव घेतला आहे. १९९२-९३ साली अमेरिकेमधील ‘वर्ल्ड बँक’मध्ये ओशोंच्या अनुयायांनी मेडिटेशनचा एक डेमो दिला होता. तो मी पाहिला आहे. प्रकाश कर्दळे यांनी पुढे संन्यास घेतला. मी कधी प्रभावित नाही झालो. मी एक पत्रकार या नात्याने वार्तांकनासाठी तिकडे जात असे. घडणाऱ्या गोष्टींमध्ये न गुंतता एक तटस्थपणे त्या सगळ्याकडे बघणे हे पत्रकाराचे काम आहे.
..................................................................................................................................................................
ऑनलाईन पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3444
..................................................................................................................................................................
श्रीनिवास - तुमचा हा सल्ला तरुण पत्रकारांसाठी महत्त्वाचा आहे. तुमची ओशोंबद्दलची मते जाणून घेण्यास आवडतील
अभय - ओशोंची प्रवचने खूप प्रभावी, खोल अशा स्वरूपाची असत. त्यांचे कबीर, गोरखनाथ, उपनिषद, गीता यावरील निरूपण उत्तम असे. पण त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना जाणीवपूर्वक एकटे ठेवण्यात आले होते. प्रेस, मीडिया यांपासून त्यांना लांब ठेवण्यात आले होते. कोणी त्यांना भेटावे हे त्यांच्या ‘इनर सर्कल’मधील लोक ठरवत. ज्याचा उल्लेख पुस्तकामध्ये केलेला आहे.
श्रीनिवास - तुम्ही अमेरिकामध्ये दीड वर्षे ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. याचा उपयोग तुम्हाला या विषयासाठी कसा आणि किती झाला?
अभय - अमेरिकेमध्ये असताना मला ऑरेगॉनला जावयाचे होते. तेथे सत्यावेदांत नामक सेवक या कामी मला मदत करत. पण १९८५ साली ओशोंना अमेरिका सोडावी लागली. त्यानंतर तेथील त्याची ६४,००० एकर जमीन एका ख्रिश्चन संस्थेने ताब्यात घेतली. पण १९८५ साली ओशोंनी अमेरिका सोडली. त्यामुळे मला तसा उपयोग झाला नाही. त्यांच्या पुण्यामधील वास्तव्याचा मला अधिक उपयोग झाला. १९८७-१९९० असे त्यांच्या पुण्यातील वास्तव्याला ‘पुणे २’ असे म्हटले जाते तर ‘पुणे १’ म्हणजे १९७४-८१ असे त्यांचे पुण्यातील वास्तव्य होय. तुलनेने ‘पुणे २’ हे माझ्यासाठी महत्त्वाचे ठरले.
श्रीनिवास - तुमची आणि ओशोची प्रत्यक्ष भेट झाली होती?
अभय - ओशोंशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मला मिळाली नाही. पण त्यांना मी प्रत्यक्षात पहिले आहे. १९८७-८८ चा काळ होता. पुणे आश्रमामधील बुद्धा हॉलमध्ये मी त्यांना साधारणपणे ३०० मीटर आंतरावरून पाहिले आहे. त्या दिवशी नेहमीप्रमाणे ते त्यांच्या रोल्स रॉइसमधून आले अन आसनस्थ झाले. तो त्यांचा शेवटचा काळ होता. ते कोणाशी जास्त बोलत नसत. त्यामुळे त्याच्याशी संवाद साधता आला नाही. त्यांचा प्रवक्ता चैतन्य कीर्ती याच्यामार्फतच ते माध्यमांशी बोलत असत.
श्रीनिवास - या विषयासाठी शोध पत्रकारिता करत असताना अडचणींचा सामना करावा लागला?
अभय - ओशो १९९० ला गेले. त्यानंतर मी जवळपास दर १० दिवसांनी वार्तांकनासाठी कोरेगांव पार्क, पुणे येथील आश्रमात जात असे. प्रथम ते माझ्याशी बोलत कारण त्यांना ‘टाइम्स ऑफ इंडिया’सारख्या बड्या वृत्तपत्रांमधून प्रसिद्धी हवीहवीशी वाटत असे. परंतु त्यांना हवे तसे वार्तांकन मी न केल्यामुळे त्यांनी माझ्याशी बोलणे बंद केले. मला इंटरनेटद्वारे प्रश्न पाठवण्यास सांगत. त्याची उत्तरे मला पाठवण्यास बराच वेळ घेत. त्यातही बरीचशी उत्तरे दिशाभूल करणारी असत. ओशोंची मैत्रीण निर्वाणो यांच्या मृत्यूबद्दल माहिती गोळा करताना खूप अडचणी भेडसावल्या. ओशोंच्या आधी ४० दिवस निर्वाणो यांचा मृत्यू झाला, परंतु पोलीस रेकॉर्ड (क्रिस्टीन वूल्फ स्मिथ), मनपा मयत रेकॉर्ड (अलिशा अलेक्झांडर) आणि हॉस्पिटल मयत रेकॉर्ड (अलेकसा अलेक्झांडर) अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची वेगवेगळी नावे असल्यामुळे शोध घेण्यास अडचण येत असे.
श्रीनिवास - मग या अडचणींवर तुम्ही कशी मात केली?
अभय - मुळात जेव्हा ओशो आश्रमातील लोकांनी बोलणे टाळण्यास सुरुवात केली, तेव्हा मी ज्यांना १९ जानेवरी १९९० च्या संध्याकाळबद्दल माहिती आहे, असा लोकांचा शोध घेऊ लागलो. देशातील विविध शहरे यासाठी पालथी घातली. जेव्हा लोक बोलावयास तयार नसत, तेव्हा त्यांना सत्य समोर आणणे किती महत्त्वाचे आहे हे पटवून द्यावे लागत असे. आणि तेच काम सर्वांत जिकिरीचे होते. या सर्व कामासाठी धीर धरणे महत्त्वाचे असते. जोपर्यंत काही धागेदोरे हाती लागत नाहीत, तोपर्यंत वाट बघणे महत्त्वाचे असते.
श्रीनिवास - ही सर्व शोध पत्रकारिता करत असताना कधी भय वाटले नाही?
अभय - मुळात शोध पत्रकारिता करताना घ्यावयाची काळजी लक्षात घेऊनच मी वार्तांकन करत असे. आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’सारखा वृत्तपत्र समूह माझ्या पाठीशी उभा असल्यामुळे मला कधीच भय वाटले नाही. माझ्या लिखाणामुळे त्यांच्या करोडो रुपयांच्या साम्राज्याला धक्का लागेल, असेही त्यांना वाटत नसावे.
श्रीनिवास - वैयक्तिक काम, कौटुंबिक जबाबदारी यातून या पुस्तकासाठी कसा वेळ दिलात
अभय - आधी सांगितल्याप्रमाणे २०१२ साली मी पुस्तकाबद्दल विचार करू लागलो, पण मला जाणवले की, सर्व काम करून पुस्तकाला वेळ देणे अवघड आहे. म्हणून २०१५-२०१६ मधील पूर्ण वेळ मी पुस्तकासाठी देण्याचे ठरवले. या एक ते दीड वर्षाच्या काळामध्ये मला पुस्तकांशिवाय काहीच दिसत नव्हते. या काळात मी इतर कामे पूर्णपणे थांबवली होती.
श्रीनिवास - या पुस्तकात न आलेले पण तुम्हास उमजलेले ओशोबद्दल, कम्युनबद्दल असे काही आहे?
अभय - ओशोबद्दल आणि त्यांच्या मृत्यूबद्दल जे सांगावयाचे आहे, ते मी पुराव्यानिशी सांगितले आहे. न छापून आलेल्या भागाबद्दल बोलावयाचे झाल्यास माझ्याकडे ज्या गोष्टींचे पुरावे उपलब्ध नाहीत त्यावर लिहावयाचे मी टाळतो.
श्रीनिवास - आनंद शीला यांचे ‘डोन्ट किल हिम’ तसेच ओशोबद्दल बाजारामध्ये इतर अनेक पुस्तके उपलब्ध असताना वाचकांनी तुमचे पुस्तकच का वाचावे?
अभय - बाजारामध्ये ओशोंबद्दल दोन प्रकारची पुस्तके आहेत. एक, ओशोंच्या प्रवचनांची पुस्तके आणि दोन, ओशोंबद्दल त्यांचे भक्त, संन्याशी लोकांच्या अनुभवांची पुस्तके. आनंद शीला यांच्या ‘डोन्ट किल हिम’ पुस्तकाबद्दल बोलावयाचे झाल्यास त्या स्वतः अमेरिकेमध्ये कम्युनच्या नंबर २च्या अधिकारी होत्या. त्या स्वतः आरोपी आहेत, त्यांना कारावास झालेला असल्यामुळे त्यांच्या पुस्तकाला विश्वासहार्यता नाही. तसेच त्यांना आलेले वैयक्तिक अनुभव त्यांनी त्याच्या पुस्तकांमध्ये मांडले आहेत. माझ्या पुस्तकामध्ये प्रत्येक गोष्टीचे पुरावे छापण्यात आलेले आहेत. या पुस्तकासाठी ओशोच्या मृत्यप्रमाणपत्रावर सही करणाऱ्या डॉक्टरची इन कॅमेरा मुलाखत घेतली आहे. तसेच ओशोंचे मृत्युपत्रदेखील यामध्ये छापण्यात आले आहे. सत्यावर प्रकाश टाकणारे माझे पुस्तक वाचकांना जरूर आवडेल.
श्रीनिवास - असे म्हटले जाते की, ओशोंना अमेरिकन सरकारने थेलीयम विष देऊन मारले. हे कितपत खरे आहे ?
अभय - कोणत्याही सर्वसामान्य मनुष्यास ओशोंच्या मृत्यूबद्दल विचारले असता ते दोन पैकी एक कारण सांगतात. ती दोन कारणे म्हणजे एकतर ओशो एड्समुळे गेले किंवा त्यांना अमेरिकेने थेलीयम विष देऊन मारले. ओशो गेल्यानंतर त्यांच्या जवळ असणाऱ्यांनी जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी या गोष्टी पसरवल्या आहेत. ज्या आपल्याला त्यांच्या आत्मचरित्रामध्ये, वेबसाईटवरही दिसून येतात. याबद्दलचे खरेखुरे सत्य जाणून घेण्यासाठी वाचकांना माझे पुस्तक वाचावे लागेल.
श्रीनिवास - वृत्तपत्रीय लिखाणास ‘लिटरेचर इन हरी’ असे म्हटले जाते. ज्यामध्ये तुम्ही काम करत आहात आणि तुमचे पुस्तक तर एकदम गंभीर आणि खूप संशोधन करून लिहिले आहे. ‘लिटरेचर इन हरी’पासून सुरवात करून गंभीर लिखाण कडे जाताना प्रामुख्याने काय वेगळे जाणवले?
अभय - मुळात मी शोध पत्रकारिता करत असल्यामुळे या प्रकारच्या लिखाणाची सवय मला आहे. प्रामुख्याने काय वेगळे जाणवले असे म्हणाल तर यामध्ये संयम खूप महत्त्वाचा असतो. जोपर्यंत पुरावा हाती लागत नाही, तोपर्यंत तुम्ही काही लिहू शकत नाही.
श्रीनिवास - ‘Who Killed Osho’ हे पुस्तक सध्या तरी इंग्रजी भाषेमध्ये मध्ये उपलब्ध आहे. प्रादेशिक भाषेमध्ये हे पुस्तक भाषांतरित करण्याचा मानस आहे?
अभय - सध्या तरी हे पुस्तक फक्त इंग्रजीमध्येच उपलब्ध आहे. कारण ओशोचे भक्त हे परदेशामध्ये मुख्यतः पाश्चिमात्य देशात मोठ्या प्रमाणावर पसरले आहेत. त्यांच्यासमोर सत्य आणणे गरजेचे होते. प्रादेशिक भाषेसंदर्भात बोलायाचे झाल्यास गुजराती, हिंदी, मराठी या तीन भाषिक राज्यांमध्ये ओशोचे अनेक भक्त आहेत. त्यामुळे भविष्यात हे पुस्तक या तीन भाषांमध्ये उपलब्ध होईल.
श्रीनिवास - सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यात वाचक पुस्तकाची ई-आवृत्तीकडे वळत आहेत. ‘Who Killed Osho’ या पुस्तकाची ई-आवृत्ती उपलब्ध आहे का?
अभय – होय, या पुस्तकाची ई-आवृत्ती उपलब्ध आहे, तसेच या पुस्तकाची किंडल आवृत्तीदेखील उपलब्ध आहे.
श्रीनिवास - भविष्यात पुस्तक लिहावयाचा विचार आहे का ? कोणता विषय मनामध्ये आहे?
अभय - सध्या तरी असा कोणताच विचार मनामध्ये नाही.
श्रीनिवास - तुमचा आवडता लेखक? आवडते पुस्तक?
अभय - मला व्ही.एस. नॉयपॉल, खुशवंतसिंग हे लेखक आवडतात. शक्यतो मी नॉन फिक्शन वाचतो. आवडती म्हणाल तर ‘गांधी नेकेड अम्बिशन्स’, तसेच वॉशिंगटन पोस्ट चे माजी संपादक बेंजामिन ब्रॅडली यांचे ‘अ गुड लाईफ’ ही पुस्तके मला आवडली.
श्रीनिवास - तरुण पत्रकारांना शोध पत्रकारिता करण्यासाठी काय गुरूमंत्र द्याल?
अभय - शोध पत्रकारिता ही पत्रकारितेमधील सर्वांत अवघड आणि महत्त्वाची मानली जाते. ती करत असताना दोन प्रकार अनुभवास येतात. एक म्हणजे कोणीतरी माहिती हातात आणून देतं, तर दुसरा प्रकार म्हणजे स्वतः माहितीसाठी धडपडणे. पण या दोन्ही प्रकारांमध्ये माहितीची सत्यता हाच मूलभूत घटक मानला जातो. त्यामुळे कितीही वेळ लागला तरी चालेल, पण घटनेची सत्यता पडताळणी करणे गरजेचे असते. सगळेच प्रयत्न यशस्वी होतील असे नाही, पण म्हणून नाराज होण्याचे कारण नाही. शोध पत्रकारिता सायकलप्रमाणे हळूहळू शिकण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक जण अशा स्वरूपाची पत्रकारिता नक्कीच करू शकतो.
श्रीनिवास - धन्यवाद सर, तुम्ही एवढा वेळ दिला तुम्ही. ‘Who Killed Osho’ या पुस्तकाच्या निमित्तामुळे तुमच्याशी संवाद साधावयाची संधी मिळाली. या पुस्तकासाठी खूप शुभेच्छा.
अभय – धन्यवाद!
..................................................................................................................................................................
श्रीनिवास देशपांडे रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेचं शिक्षण घेत आहेत.
deshpandeshrinivas7@gmail.com
..................................................................................................................................................................
Who Killed Osho? हे पुस्तक ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3444
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment