जेएनयूमधले जगणं समृद्ध करणारे दिवस!
ग्रंथनामा - झलक
कन्हैया कुमार
  • ‘बिहार ते तिहार’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sun , 02 April 2017
  • ग्रंथनामा Booksnama बिहार ते तिहार From Bihar to Tihar कन्हैया कुमार Kanhaiya Kumar जवाहरलाल नेहरू विद्यापीठ जेएनयू Jawaharlal Nehru University सुधाकर शेंडगे लोकवाङ्मय गृह Lokvangmaya Griha

कन्हैया कुमार या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्याच्या From Bihar to Tihar या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘बिहार ते तिहार’ या नावाने सुधाकर शेंडगे यांनी नुकताच केला आहे. हा अनुवाद लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला आहे. या पुस्तकातील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या वेगळेपणाविषयी कन्हैया कुमारने सांगितलेल्या रम्य आठवणींचा संपादित अंश...

.............................................................................................................................................

१.

जेएनयूशी आपली पहिली भेट आपण जीवनभर विसरू शकत नाही. पण मला हे सांगितलं पाहिजे की, माझ्या पहिल्या भेटीत मुख्य प्रवेशद्वार, नॉर्थ गेटने मला निराश केलं होतं. ते इतकं साधं होतं की, ते पाहिल्यावर हे एवढं मोठं विद्यापीठ आहे, असं वाटतच नव्हतं. मला ब्रह्मपुत्र हॉस्टेलमध्ये जायचं होतं. माझे काही मित्र तिथे राहत असत. एम. फिल. होण्यासाठी त्यांच्याकडून मला मदत घ्यायची होती. नॉर्थ गेटवर तैनात असलेल्या गार्डने मला सांगितलं की, ब्रह्मपुत्र हॉस्टेल सगळ्यात शेवटी आहे. त्याने मला बसने जाण्याचा सल्ला दिला, पण मी पायीच निघालो.

नॉर्थ गेटपासून ब्रह्मपुत्र हॉस्टेल जवळपास दोन कि.मी. दूर आहे; पण मला हे माहीत नव्हतं की, ही यात्रा माझ्यासाठी महत्त्वाची ठरणार होती. मी प्रत्येक पावलागणिक माझं जुनं आयुष्य मागे टाकत चाललो होतो.

मुख्य द्वार बघून जी निराशा आली होती, ती कॅम्पसमध्ये दाखल होताच दूर झाली. आत गेल्यावर या गोष्टीवर विश्वासच बसेना की, ही जागा दिल्लीतलीच होती. पावसाळ्याचे दिवस होते. दूरपर्यंत हिरवळ पसरली होती. पर्वत मला नेहमी सुंदर दिसतात. खाच-खळग्यांचे रस्ते, नीलगाय आणि मोर. ही सगळीच मनमोहक दुनिया होती.

त्या दिवशी जेएनयूच्या संदर्भात आणखी एक अनुभव आला. एका मोटारसायकलवाल्याला एका बसने धडक दिली. तसं फार नुकसान झालं नव्हतं, पण युवकांची गर्दी जमा झाली होती. साहजिकच ते दोन गटांमध्ये विभागले गेले. त्यातला एक गट कॅम्पसमध्ये निष्काळजीपणे बस चालवल्याबद्दल ड्रायव्हरला दोष देत होता. ते ड्रायव्हरला मारहाण करू इच्छित होते. दुसरा गट मात्र त्यांच्याशी सहमत नव्हता. त्यांचं म्हणणं होतं की, जर ड्रायव्हरची चूक असेल, तर आपण त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं पाहिजे. आपण त्याला शिक्षा देणारे कोण?

 

मी चकित झालो. हे कसलं विद्यापीठ आहे की, जिथे युवकाला धडक मारणाऱ्या त्या ड्रायव्हरचा समाचार घेण्याऐवजी त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्याचं समर्थन केलं जात होतं! तोपर्यंत मी हेच पाहत आलो होतो की, अशा घटना घडतात तेव्हा लोक स्वतःच्या ताकदीचा उपयोग करतात, डोक्याचा नाही, पण इथे डोक्याचा उपयोग केला जात होता. त्या रात्री मी जेएनयूमध्येच थांबलो. ज्या मित्राकडे आलो होतो, त्याच्याकडे जागा नव्हती म्हणून त्याने माझी व्यवस्था झेलम हॉस्टेलमध्ये केली. हॉस्टेलचं वातावरण मला खूप आवडलं.

खूप पुस्तकं, एका वेळी तीन-चार लोकांना झोपता येईल, असा बिछाना. मुला-मुलींचं हॉस्टेल किंवा एकाच हॉस्टेलमध्ये राहण्याच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या, पण मुली मुलांच्या हॉस्टेलवर मुक्तपणे जात-येत होत्या. सुरुवातीला मला चकित करणारी ही गोष्ट नंतर स्वाभाविक, बरोबर आणि चांगली वाटली. तो प्रवेशासाठी मुलाखतीचा काळ होता. अनेक लोक तयारीसाठी आपल्या परिचितांकडे येऊन थांबले होते. साहजिकच जितक्या मुलांना रूम वाटप करण्यात आल्या होत्या, त्यापेक्षा किती तरी जास्त मुलं तिथं राहत होती. इथलं हॉस्टेल बघून वाटलं की, जे लोक या विद्यापीठाचे आहेत, तेच नव्हे, तर ज्या लोकांना दिल्लीत राहण्यासाठी जागा नाही आणि जे जेएनयूमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना प्रवेश घेण्याआधीच जेएनयूमध्ये जागा मिळते. पहिल्यांदा मी एका विद्यापीठात असल्याचा अनुभव घेत होतो. मी विचार केला की, सर्व शिक्षण संस्था अशाच असल्या पाहिजेत.

एखाद्या अनोळखी माणसासाठी रात्रीच्या वेळी जेएनयूमध्ये जाणं म्हणजे चकवा लागण्यासारखं होतं. रात्रीच्या वेळी मेसमध्ये जेवण केल्यानंतर मी जेएनयूमध्ये फिरायचो, तेव्हा रस्ता चुकला तरी मला बरं वाटायचं. एका गोष्टीमुळे मी आश्चर्यचकित झालो. रात्रीचे दोन वाजलेले असताना मुली कॅम्पसमध्ये एकट्याच फिरत होत्या. मला वाटलं, इथे जंगल, डोंगर असल्याने या मुलींचं फिरणं कितपत सुरक्षित असेल?

त्या रात्री कसा तरी मी झोपायला गेलो, पण अचानक झोपेतून जागा झालो. एक विमान हॉस्टेलच्या वरून अगदी जवळून गेल्यानं त्याचा मोठा आवाज आला आणि मी खडबडून जागा झालो. मी ज्यांच्या रूममध्ये होतो त्यांना विचारलं की, ते रोज कसे झोपतात? तेव्हा त्यांनी सांगितलं ‘‘इंटरव्यूहची चांगली तयारी करा, तुम्हाला उत्तर आपोआप मिळेल.’’ असं म्हणून ते पुन्हा झोपी गेले.

मुलाखतीच्या दिवशी मी व्यवस्थित तयार होऊन आलो होतो. तिथे आलेल्या काही विद्यार्थ्यांना बघून मला आश्चर्य वाटलं. ते इंटरव्यूहला आले होते, असं त्यांच्याकडे बघून वाटत नव्हतं. मुलाखतीला आलेल्या विद्यार्थ्यांचे दोन स्तर होते. काहींनी माझ्यासारखेच बेल्ट आणि बूट दुसऱ्याकडून मागून आणलेले होते, तर काहींच्या खांद्याला एक पिशवी अडकवलेली होती. ते कसे दिसत होते, या गोष्टीची त्यांना पर्वा नव्हती. स्वतःच्या पायात बूट आहेत की चपला, दाढी केलेली आहे की नाही, या विषयी जणू ते अनभिज्ञ होते. बोलवल्यानंतर मी भीत-भीतच आत गेलो, पण शिक्षकांचा व्यवहार बघून माझी भीती दूर झाली. मी मुलाखत हिंदीतून देणार की इंग्रजीतून, असा मला पहिला प्रश्न विचारण्यात आला. मी म्हणालो, ‘‘हिंदीत’’ आणि सर्व प्रश्न मला हिंदीतूनच विचारण्यात आले.

२.

निकाल लागला आणि माझी एम.फिल.साठी निवड झाली. मी नेहरू विहारची रूम सोडून दिली आणि एक बॅग घेऊन जेएनयूमध्ये गेलो. काही दिवसांमध्येच मला सतलज हॉस्टेलमध्ये रूम मिळाली. हे हॉस्टेल झेलम हॉस्टेलच्या शेजारीच होतं. गावापासून इतक्या दूर येऊन शहराच्या झगमगाटात राहून जेएनयूमध्ये पोहचल्यानंतर जीवनाच्या एका वेगळ्याच पैलूशी परिचय झाला, असं वाटलं. इथल्या गोष्टी आता माझ्यासाठी नवीन नव्हत्या. इथे सीनियर आणि ज्युनियर असा काही भेदभाव नव्हता. मी ज्या ब्रह्मपुत्र हॉस्टेलमध्ये थांबलो होतो, ते जेएनयूमधल्या सगळ्यात सीनियर विद्यार्थ्यांचं हॉस्टेल होतं, पण तिथल्या विद्यार्थ्यांचा माझ्याशी इतका चांगला आणि बरोबरीचा व्यवहार होता की, मी नवीन असल्याचं मला जाणवलंदेखील नाही.

एके दिवशी मी चर्चा करत होतो. मी जोर-जोरात माझ्या मुद्द्यांचं समर्थन करत होतो. एका वेळी मला असं वाटलं की, मी जरा जास्तच बोलतोय. मी माझ्या सीनियर मित्राला सांगितलं की, जर मी जास्त बोललो असेन, तर मला माफ करा. तेव्हा तो म्हणाला, ‘‘अरे, माफी मागण्याची काहीही आवश्यकता नाही.’’ बिहारमधल्या सरंजामदारीच्या वातावरणातून आलेल्या मुलाला अशा उत्तराची अपेक्षा नव्हती.

जेएनयूच्या कॅम्पसमध्ये राहणं हा एक प्रकारचा सांस्कृतिक धक्का होता. इथे लोक फार मुक्तपणे राहतात. मुलं-मुली रात्री उशिरापर्यंत एकत्र फिरू शकतात. बिहारमध्ये असं नाही. तिथल्या कॉलेजमध्ये मुला-मुलींना एकत्र बसण्याची जागा शोधून काढावी लागते. अशी कोणतीही जागा नसायची ज्या ठिकाणी ते एकत्र बसू शकतील. जर ते बसले आणि पकडले गेले, तर त्यांना दंड केला जात असे, पण जेएनयूमध्ये अशी बंधनं नाहीत.

महिलादेखील आपल्या अधिकाराविषयी सजग होत्या. कोणत्याच दृष्टीने त्या पुरुषांपेक्षा कमी नव्हत्या. घोषणा देण्यात, डफ वाजवण्यात, स्वतःच्या विचारधारेशी लोकांना जोडून घेण्यात अशा अनेक गोष्टींमध्ये त्यांची समान भागीदारी होती. मग क्लासरूम असो, निदर्शनं असोत किंवा कँटीन असो या सर्वच ठिकाणी महिलांचं नेतृत्व पुरुषांच्या बरोबरीचं होतं. काही ठिकाणी तर थोडं जास्तच असेल. जसं माझ्या वर्गात मी फक्त एकटाच मुलगा होतो आणि बाकी नऊ मुली होत्या.

क्लासरूम क्लासरूमसारखी वाटत नव्हती. गोल टेबल असल्याने ती एखाद्या संमेलन कक्षासारखी दिसत होती. पहिल्या दिवशी शिक्षक वर्गात आले तेव्हा मी सवयीप्रमाणे उठून उभा राहिलो. त्यांनी विचारलं, ‘‘का उभे राहिलात, ही काय शाळा आहे का?’’ मी म्हणालो, ‘‘शाळा तर आहे. बाहेर लिहिलेलं आहे, ‘स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’ ’’ माझ्या उत्तराला ते हसू लागले. त्यांनी मला बसायला सांगितलं. इथले शिक्षकदेखील वेगळ्या दर्जाचे होते. ते शिक्षकासारखं वागण्यापेक्षा विद्यार्थ्यांशी मित्राप्रमाणे वागत असत. फार लवकर माझ्या हे लक्षात आलं की, जेएनयूमध्ये मी कोणत्याही प्राध्यापकाला प्रश्न विचारू शकतो किंवा त्यांच्याशी असहमत होऊ शकतो. आमच्या चर्चा समानतेच्या आधारावर होत असत आणि आमच्या भाषेत होत असत.

३.

प्रत्येक दिवशी मला वाटायचं की, मी काही तरी नवीन शिकत आहे. सुरुवातीच्या काळात मी रोज काही ना काही वेगळेपण शोधून काढायचो. जेएनयूच्या आधी मी वेगवेगळ्या संस्कृती आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांना फार कमी भेटलो, पण आता मी केवळ देशातीलच नव्हे, तर जगातील लोकांना भेटत होतो. सतलज हॉस्टेलमध्ये सुरुवातीला माझ्या दोन रूममेटपैकी एक बिहारी तर दुसरा राजस्थानी होता. राजस्थानी पार्टनरबरोबर माझी चांगली मैत्री होती. त्या वेळी पहिल्यांदा मला एक मित्र मिळाला, जो बिहारच्या बाहेरचा होता.

तुम्हाला जर वेगवेगळ्या देशांतल्या लोकांना पाहायचं असेल, तर त्या देशांची यात्रा करावी लागेल, पण जेएनयूमध्ये आल्यानंतर या सर्व गोष्टी तुम्हाला इथेच मिळतील. इथे येणं सामान्य माणसासाठी सोपं आहे, पण विशिष्ट लोकांसाठी अवघड आहे, कारण त्यांना जे विशिष्ट वातावरण हवं आहे, ते जेएनयूत नाही.

जेएनयूच्या सुरक्षा गार्डचं काम लोकांना पिटाळून लावणं नव्हे, तर त्यांना मदत करणं आहे. मी इथे जे काही पाहिलं, त्यामुळे माझा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला. माझं राजकारणही अधिक धारदार झालं. म्हणजे जर तुम्ही ताजमहाल पाहिलात, तर आपल्याला आपण लहान असल्याची जाणीव होते. त्याचं सौंदर्य आणि भव्यता यांच्यासमोर आपण नतमस्तक आणि मुग्ध होतो, पण जेएनयूमध्ये राहून तुम्ही ताजमहालमध्ये गेलात तर तुम्हाला या गोष्टीची जाणीव होईल की, ‘ही तर आमच्यासारख्या लोकांचं शोषण करून उभी केलेली इमारत आहे!’

माझ्या हे लक्षात आलं की, इथे राजकारण करण्यासाठी तुम्हाला इंग्रजी भाषा चांगली आली पाहिजे. स्वच्छ पांढऱ्या कपड्यांची गरज नाही. पैशाचीदेखील आवश्यकता नाही. एवढंच काय, तर फार मोठ्या संघटनेचीदेखील गरज नाही. जर तुम्ही गरीब घरातून आलेले असाल आणि त्या विषयी बोलत असाल, तर तुमचं बोलणं गाडीवाल्यापेक्षा आणि पांढरे कपडेवाल्यापेक्षा जास्त प्रभावशाली होतं. एखादा जर गरीब नसेल आणि जर तो गरिबीचं राजकारण करत असेल, तर जेएनयूमध्ये त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही किंवा त्याच्यावर किमान शंका तरी घेतली जाईल.

सगळ्या जगात फूटपाथवर चालणारे लोकच राजकारणाचा आधार आहेत. जेएनयूमध्ये तेच लोक राजकारणाचं नेतृत्व करतात. त्यामुळे ते आपला फूटपाथ वाचवू शकले. बाहेर फूटपाथचा केवळ चालण्यासाठी नव्हे, तर राहण्यासाठीदेखील उपयोग केला जातो. हेच जेएनयूमध्ये ज्ञानाचं उत्पादन करण्यापर्यंत पोहोचतात. बाहेरच्या राजकारणात यापेक्षा उलट होतं. तिथं लोक हा विचार करतात, जो स्वत: दुर्बल आहे, तो दुसऱ्याला काय मदत करणार! म्हणून तिथे बळाचा उपयोग केला जातो. जेएनयूत मात्र सत्याची बाजू घेणं आणि ती तडीस नेणं आवश्यक मानलं जातं.

४.

राजकारण सर्वत्र आहे; वर्गात, मेसमध्ये, मीटिंगमध्ये आणि सगळ्यात जास्त कँटीनमध्ये. चहा आणि चर्चेचे हेच खरे अड्डे आहेत. सगळ्यात प्रसिद्ध ढाबा (कँटीन) म्हणजे गंगा ढाबा. मी जेएनयूच्या संदर्भात एक गीत ऐकलं होतं. त्यात असं म्हटलं होतं की, ‘छोडो मैक्डी और सीसीडी को, आओ तुमको गंगा ढाबा की चाय पिलाते हैं.’ तिथे चहापेक्षा चर्चा जास्त महत्त्वाची असते आणि जेवणापेक्षा मैत्री महत्त्वाची मानली जाते. जी चर्चा आणि मैत्री तुम्हाला गंगा ढाब्यावर मिळेल, ती अन्यत्र कुठेही मिळणार नाही.

संध्याकाळचा माझा वेळ गंगा ढाब्यावरच जात होता. २०१४मध्ये मोदीजी चहावर चर्चा करायचे. पण मोदीजींच्या आधीपासून गंगा ढाब्यावर चहासोबत ही चर्चा केली जाते की, देशाची जनता आणि त्यांचे अधिकार कसे अबाधित रहातील. आता जेएनयू प्रशासन हे ढाबे बंद करण्याचा प्रयत्न करू लागले आहे. हे एका अर्थाने विद्यापीठाच्या चर्चा आणि चर्चेची संस्कृती संपवण्याचंच षड्यंत्र आहे. इथलं मुक्त वातावरण आणि प्रश्न उपस्थित करण्याच्या संस्कृतीला ते घाबरतं, जी संस्कृती इथे फळाला आली आहे.

मी नेहमी या दुविधेत राहिलो की, राजकारण करू की पुन्हा आपल्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करू की, माझ्या भविष्याची चिंता करू. आता जेएनयूच्या रूपात मला एक जागा मिळाली होती, ज्या ठिकाणी मी शिक्षण घेत-घेत सक्रिय होऊ शकत होतो. इथल्या भिंतीवर लागलेली मोठमोठी पोस्टर्स मला आकर्षित करायची.

जेएनयूमध्ये माझ्या सक्रिय राजकारणाची सुरुवात माझ्या प्रवेश घेण्याच्या आधीच सुरू झाली होती. जेएनयूमध्ये अर्ज भरण्याच्या प्रक्रियेवेळी मदत करण्याची एक अनोखी पद्धत आहे. विद्यार्थी संघटना प्रशासनिक भवनाजवळ आपआपली मदत केंद्रं सुरू करतात आणि प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी मदत करतात.

मी अशा ठिकाणाहून आलोय, जिथे प्रवेशद्वार आणि अशा भव्य-दिव्य इमारती बघून लोक अचंबित होतात. त्या लोकांना अशा ठिकाणी प्रवेश करण्याची हिंमतदेखील होत नाही. अशा वेळी एवढे सगळे फॉर्म भरणं म्हणजे एक प्रकारची परीक्षाच. जेएनयूमध्ये येणारे बहुतेक विद्यार्थी याच सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमीतून येतात. अशांना विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांकडून मदत मिळणं म्हणजे एक सुखद अनुभव होता. यात आणखी एक अजेंडा काम करतो, तो म्हणजे राजकीय संघटना आपल्या मदत केंद्रावर विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या रंगांच्या झेंड्यांचा उपयोग करत. मी एआयएसएफच्या लाल झेंड्याकडे गेलो आणि अन्य सदस्यांना मदत करू लागलो. अशा प्रकारे मी प्रवेश घेण्यापूर्वीच राजकारणात सक्रिय झालो.

५.

शामियाना आणि टेबलची साईज बघून कोणीही हा अंदाज सहजपणे लावू शकलं असतं की, सत्ताधारी पार्टीची विद्यार्थी संघटना कोणती होती. एखाद्या संघटनेच्या मदत केंद्रावर तर उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्रीदेखील नव्हती. दोन संघटना मात्र याला अपवाद होत्या. त्या म्हणजे भाजप आणि काँग्रेसशी संबंधित विद्यार्थी संघटना, अनुक्रमे एबीव्हीपी आणि एनएसयूआय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सर्व सोयींनी युक्त असलेल्या या दोन्ही केंद्रांवर विद्यार्थ्यांची अजिबात गर्दी नव्हती, तर कम्युनिस्ट संघटनेच्या मदत केंद्रावर प्रचंड गर्दी जमा झाली होती. मला हे माहीत आहे की, हे वाचून तुम्हाला हसू येईल. कदाचित तुम्ही हा विचार करत असाल की, यूटोपियाचं (काल्पनिक आदर्शाचं) काही अस्तित्व नसतं आणि हे खरं आहे की, सुरुवातीचे काही महिने मी या विद्यापीठाच्या झगमगाटावर फिदा होतो, पण जसजसा मी राजकारणात सक्रिय होत गेलो, तसतसा या भव्य-दिव्य इमारतीला तडा गेलेलाही मला दिसू लागला.

उदाहरणार्थ, बाहेर समाजातला जातिवाद दिसतो, पण जेएनयूमधला जातिवाद दिसत नाही; पण तो असतो. जोरजोराने घोषणा देणारा त्या गोष्टींची अंमलबजावणी करतो की नाही या गोष्टीला काहीही अर्थ उरत नाही. ‘ब्राह्मणवाद मुर्दाबाद’ म्हणणाराच ब्राह्मणवादी असू शकतो.

जेव्हा मी निवडणूक लढलो, तेव्हा मी जेएनयूच्या राजकारणाचं अभद्र रूप बघितलं. उमेदवार निवडताना इथेही जातीचा विचार केला जातो. एका अर्थाने हे प्रतिनिधित्व बरोबर असलं, तरी सैद्धान्तिकदृष्ट्या ही गोष्ट मला अनुचित वाटली. चांगल्या-वाईट गोष्टी एकाच ठिकाणी असतात; इथेही त्या होत्या.

आपल्यात उणिवा असूनदेखील जेएनयूमध्ये विरोधाला नेहमी जागा असते. मग ती हॉस्टेलची समस्या असो, पाण्याची असो, वेळेवर शिष्यवृत्ती न मिळण्याची असो; एखादा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक मुद्दा असो किंवा पॅलेस्टिनवर इस्रायलद्वारा केलेल्या हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय मुद्दा असो. या सर्व प्रश्नांवर निदर्शनं होत, मोर्चे निघत, सभा होत असत. जेव्हा मी नवीन आलो होतो, तेव्हा संकुचित वृत्तीपासून दूर होतो. मी सर्व संघटना, एबीव्हीपीच्या सभेलादेखील जात असे. इतकंच काय, वक्त्यांना प्रश्नदेखील विचारत असे.

प्रश्न विचारण्याची सवय वर्गातच सुरू झाली. भारत सरकार आफ्रिकेत अनेक प्रकारच्या योजना सुरू करू लागलं होतं. दोन्ही बाजूंनी संबंध दृढ करण्याचा प्रयत्न केला जात होता. मी माझ्या फुटक्या-तुटक्या इंग्रजीत प्रश्न उपस्थित केला की, आफ्रिकेला पुन्हा एकदा वसाहतवादी देश तर बनवलं जात नाही! पूर्वी इंग्लंड आणि दुसरे युरोपीय देश साधनसामग्री लुटण्यात पुढे असायचे, आता भारतही त्यांच्यात सहभागी होणार आहे का? आफ्रिकेच्या लोकांमध्ये आणि भारताच्या लोकांमध्ये खरंच संबंध सुधारत आहेत का? भारतीय व्यापारी आफ्रिकेच्या बाजारात आपला माल विकण्याची संधी तर शोधत नाहीत ना? सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. वर्गाच्या बाहेर आतापर्यंत एक कम्युनिस्ट म्हणून माझी ओळख निर्माण झाली होती, पण वर्गात हे प्रथमच घडत होतं. वर्गातून निघाल्यानंतर लोकांनी मला विचारलं की, ‘‘तुम्ही मार्क्सिस्ट आहात का?’’ मी म्हणालो, ‘‘ते काही मला माहीत नाही, पण जे माझ्या मनात आलं ते मी विचारलं.’’

जेएनयूमध्ये ब्रॅंण्डिंग जरा लवकर होतं. कोणीही तुम्हाला सरळ तुमची विचारधारा किंवा जात विचारणार नाही, पण या गोष्टीचा गुप्तपणे शोध घेत राहील आणि तुमच्याशी चर्चा न करताच तुमच्या विषयीचं मत बनवून टाकेल. तुम्हाला नेहमी तुमच्या संघटनेशी जोडून पाहिलं जाईल आणि तुमच्या संघटनेने एखाद्या मुद्द्यावर जी काही चूक-बरोबर भूमिका घेतली असेल, तिचं तुम्ही समर्थन करावं अशी अपेक्षा ठेवली जाईल.

एबीव्हीपीच्या एका बैठकीत साधूसारखी दिसणारी एक व्यक्ती अध्यात्मावर बोलत होती. ती सांगत होती की, कर्माच्या आधारेच फळ मिळतं आणि मागच्या कर्माच्या आधारावरच आमचा पुढचा जन्म होतो. मी त्यांना विचारलं की, पहिल्यांदा जेव्हा ब्रह्माने सृष्टी निर्माण केली, तेव्हा त्यांनी योनी कशी निर्धारित केली असेल? तेव्हा तर कोणाला काही कर्म करावं लागलं नसणार! त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी माझ्या हिंदीवरच व्याख्यान सुरू केलं. ते म्हणाले की, ‘‘तुमची हिंदी भाषा खूप छान आहे, खूप गोड आहे’’ इत्यादी. त्यांच्याजवळ या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि त्यांनी ते देण्याचादेखील प्रयत्न केला नाही. काही दिवसांनी माझ्या हे हळूहळू लक्षात आलं की, एबीव्हीपीच्या मीटिंगमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही. जर तुम्ही प्रश्न विचाराल, तर एक तर तुम्हाला उत्तर मिळणार नाही किंवा तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारू दिला जाणार नाही. कम्युनिस्टांच्या मीटिंगमध्ये बऱ्याच गोष्टींची कमतरता असूनदेखील आणि तुम्हाला तुमच्या पार्टीशी जोडून पाहिलं जात असलं तरी एक गोष्ट चांगली होती, ती म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारू दिले जातात. उत्तर भलेही त्यांच्या पद्धतीने दिलं जात असेल, पण प्रश्न विचारू दिले जात होते.

६.

खूप दूरच्या प्रवासात एका अनोळखी रस्त्यावरून चालताना रस्ता चुकणं आणि शेवटी ध्येयशिखर गाठणं हा एक रोमांचकारी अनुभव असतो. पहिल्यापासून ठरवलेला सरळ रस्ता कंटाळवाणा आणि नीरस होतो. राजकारण माझ्यासाठी असंच होतं. विशेषकरून विद्यापीठातल्या सुरुवातीच्या काही महिन्यांत मी प्रत्येक गोष्ट तपासून पाहत होतो. उत्साहाने प्रश्न विचारायचो आणि प्रत्येक गोष्टीची दखल घेण्याचा प्रयत्न करायचो. जेव्हा कोणी म्हणायचं की, मी राजकारणात भरकटलोय तेव्हा ही गोष्ट मला आवडत नसे. खरं म्हणजे चुकूनच मी राजकारणात आलोय. मी राजकारणात भरकटलो नाही. जीवनात अनेक धक्के खाल्ले आणि धक्के खाऊनच राजकारणात आलो. मला वाटतं की, जे लोक धक्के खातात त्यांनीच राजकारणात यावं. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण धक्का खाणाराच धक्का देऊ शकतो. जसे प्रेमचंद म्हणतात की, तुम्ही आषाढामधलं तापतं ऊन बघितलं नसेल, तर तुम्हाला पहिल्या पावसाचा आनंद घेता येणार नाही. ज्याच्या जीवनात दु:ख नाही त्याच्या मनात सुखाविषयी आवड निर्माण होणार नाही. जरी सुख मिळालं, तरी हे लक्षात येणार नाही की, हे सुख आहे. ज्याने तीव्र भूक अनुभवली नाही, त्याला जेवणात मजा येणार नाही. आम्ही स्वादाच्या मागे तेव्हाच धावतो, जेव्हा आमचं पोट भरलेलं असतं!

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......