तरंग अंतरंग - पर्यावरणाच्या प्रश्नांचं अचूक भान जागवणारं पुस्तक
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
वर्षा गजेन्द्रगडकर
  • ‘तरंग-अंतरंग’चं मुखपृष्ठ
  • Fri , 25 May 2018
  • ग्रंथनामा शिफारस तरंग-अंतरंग Tarang Antarang संतोष शिंत्रे Santosh Shintre

पत्रकार संतोष शिंत्रे यांचं ‘तरंग-अंतरंग’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. देशातील आणि जागतिक पातळीवरील पर्यावरणाची रोखठोक चिकित्सा करणाऱ्या या पुस्तकाचे परीक्षण

.............................................................................................................................................

भारतासह सगळ्याच विकसनशील देशांमधलं पर्यावरणीय वास्तव गेल्या अडीच-तीन दशकांपासून फार वेगानं बिघडत चाललं आहे. जागतिक आणि स्थानिक अशा दोन्ही पातळ्यांवरच्या प्रश्नांची गुंतागुंत आणि गांभीर्य जसजसं वाढत चाललं आहे, तशी भारतातली पर्यावरणाच्या प्रश्नांविषयीची राजकीय अनास्था आणि सर्वसामान्य नागरिकांची उदासीनताही वाढत चालली आहे. मात्र ही कोंडी फोडण्यासाठी जे मोजके मराठी अभ्यासक सातत्यानं आणि पोटतिडकीनं लिहीत राहिले आहेत, लेखनातून सामान्य माणसापर्यंत पर्यावरणाच्या प्रश्नांचं नेमकं स्वरूप पोचवत आले आहेत त्यापैकी संतोष शिंत्रे एक आहेत. ‘तरंग-अंतरंग’ हे त्यांचं नुकतंच प्रसिद्ध झालेलं पुस्तकही समकालीन पर्यावरणाची चिकित्सा करताना तुमच्या-माझ्या रोजच्या जगण्यातले अग्रक्रम अधिक निसर्गस्नेही करणारं आहे.

कोणे एकेकाळी मुख्यत: मानवी जीवनशैलीशी निगडीत असलेल्या निसर्ग-पर्यावरण या विषयाची व्याप्ती आता कित्येक पटींनी वाढली आहे. शास्त्र म्हणून अनेक विद्याशाखांना कवेत घेणारे या विषयाचे स्पष्ट आणि अस्पष्ट असे अनेक पदर आपल्या रोजच्या जगण्याला थेट छेद देत नसले तरी अप्रत्यक्षपणे ते माणूस आणि निसर्ग यांच्यातल्या नात्यावर घाला घालताहेत. या असमतोलाची किंमत आपण अनेक प्रकारे मोजतो आहोत. आरोग्यापासून उपजीविकेपर्यंत अनेक बाबींना निर्माण झालेले धोके याचेच निदर्शक आहेत. मात्र सामान्य माणसाची या बाबतीतली प्रवाहपतित अवस्था, उदासीनता आणि निष्क्रियता अधिक चिंताजनक आहे. ‘तरंग-अंतरंग’नं पर्यावरणाच्या अनेक समकालीन प्रश्नांचा वेध घेताना भारतातली निसर्ग-पर्यावरणविषयक राजकीय अनास्था आणि सर्वसामान्य नागरिकांची अलिप्तता यावरही बोट ठेवलं आहे.

या पुस्तकाचे एकूण चार विभाग आहेत. पहिल्या ‘तरंग’ या विभागात मुख्यतः भारतीय पर्यावरणविषयक घटना, निर्णय, प्रक्रिया यांच्याविषयीचं चिकित्सक भाष्य आहे. अर्थसंकल्पातल्या पर्यावरणासाठीच्या तरतुदींपासून व्याघ्रगणनेमागचं वास्तव, पर्यावरणविषयक जागतिक परिषदांचं फलित, जागतिक पर्यावरण निर्देशांकातल्या भारताच्या स्थानाची चिकित्सा, एन्व्हिरॉनमेंटल अमेंडमेंड बिलाचा भारतीय निसर्ग-पर्यावरणावर होणारा परिणाम अशा अनेक विषयांची परखड मांडणी या विभागात केली आहे. ‘अंतरंग’ या दुसऱ्या विभागात हरित राजकारणासारखी एखादी संकल्पना, तथाकथित व्यवसायसुलभतेचा निसर्गस्रोतांवर होणारा परिणाम, पुस्तकं आणि इ पुस्तकं यांचं पर्यावरणाच्या दृष्टीनं तौलनिक मूल्यमापन, पुणे शहरातली पर्यावरणीय कृतिशीलता अशा एरवी ढोबळमानाने माहीत असणाऱ्या विषयांचं सखोल विवेचन समाविष्ट आहे. तिसऱ्या ‘परिचय’ विभागात निसर्ग-पर्यावरणाच्या क्षेत्रात आश्वासक काम करणाऱ्या काही व्यक्ती, संस्था आणि समूह यांचा परिचय आहे. निसर्ग रक्षण-संवर्धनासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल आणि आज या क्षेत्रावर आलेलं मळभ दूर होऊ शकतं, असा विश्वास त्यांच्या मनात जागवायला मदत होईल, अशी अपेक्षा आहे. चौथ्या ‘चिंतन’ विभागात मराठी साहित्य आणि पर्यावरण, पर्यावरण अभ्यासक दिलिप कुलकर्णी यांच्या लेखनातली वैचारिक मांडणी यांसह लेखकाची पर्यावरण पत्रकारितेची दोन दशकांची वाटचालही उमटली आहे.

या पुस्तकाचा मुख्य भर भारतीय उपखंडावर असला तरी जागतिक पातळीवरच्या पर्यावरणीय वास्तवाचं भान लेखकाच्या मनात सतत जागं असलेलं दिसतं. शिवाय पर्यावरण हा केवळ चर्चा-परिसंवादापुरता मर्यादित विषय नाही, हे लक्षात घेऊन भारतीय निसर्ग-पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी व्यापक जनाधार उभा करण्याची गरजही लेखकानं अधोरेखित केली आहे. पर्यावरणाच्या जागतिक प्रश्नांची झळ स्थानिक लोकसमूहांना कशी बसते आणि त्यांच्यापुढे अस्तित्वाचाच प्रश्न कसा उभा राहतो, हेही ‘तरंग-अंतरंग’नं स्पष्ट केलं आहे. निसर्गाचं शोषण करून केला जाणारा विकास हा निसर्ग आणि माणूस या दोहोंच्या भविष्यासाठी लाभदायक नाही, हे बजावून सांगताना पर्यावरण रक्षणाचं नाव पुढे करून आखलेली सरकारी धोरणं, कायदे प्रत्यक्षात अनेकदा निसर्ग-पर्यावरणाचा घास कसा घेतात, राजकारणी आणि धनदांडगे यांच्या युती निसर्ग ओरबाडून स्वतःचे खिसे कसे गबर करतात, चोरटा व्यापार, शिकारी यामुळे वन्यजीवांच्या हत्या कशा होतात, आणि विकासाच्या नावाखाली भारतीय निसर्गावर सातत्यानं घाले कसे घातले जातात, प्रभावी असलेले कायदे कडक अम्म्मल्बजव्नीच्य अभावी कसे निष्प्रभ होतात, याचाही उहापोह पुस्तकात अनेक ठिकाणी आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे आवश्यक आकडेवारी आणि पुरेशा संदर्भांची जोड देत लेखकानं आपली भूमिका मांडली आहे. वरवर पर्यावरणपूरक वाटणाऱ्या कायद्यातल्या तरतुदी किंवा धोरणं शाश्वत विकासाला कशी मारक आहेत, याकडे लक्ष वेधण्याचं काम ‘तरंग अंतरंग’नं केलं आहे आणि प्रस्थापित व्यवस्थांना जाबही विचारला आहे.

‘तरंग-अंतरंग’मधले बहुतेक सगळे लेख पूर्वप्रकाशित आणि वृत्तपत्रीय असले तरीही त्यात तात्कालिकता नावापुरती आहे. शिवाय आवश्यक तिथे लेखनोत्तर काळातल्या घटना/ बदल/ कृती लेखकानं आवर्जून नोंदवल्या आहेत. पर्यावरणाच्या प्रश्नांची साक्षेपी जाण, निसर्गविषयक संवेदनशीलता असूनही त्याच्या रक्षणासाठी समाजमन जागविण्याची गरज ओळखून वापरलेली रोखठोक, निर्भीड शैली आणि कृतिशीलतेचा आग्रह ही ‘तरंग अंतरंग’ मधल्या लेखनाची वैशिष्ट्यं आहेत.

प्रातिनिधिक मराठी साहित्यात आजवर उमटलेले पर्यावरण हा विवेचक लेख ही या पुस्तकाची विशेष जमेची बाजू म्हणावी लागेल. इंग्रजी राजवट भारतात स्थिरावल्यापासून म्हणजे अठराव्या शतकाच्या अखेरीपासून २०१७ पर्यंतच्या म्हणजे जवळजवळ १५० वर्षांच्या कालखंडातल्या मराठी साहित्याचा लेखकानं निसर्ग-पर्यावरणाच्या संदर्भात धांडोळा घेतला आहे. कथा, कादंबरी, कविता यासारख्या लोकप्रिय साहित्य प्रकारांपासून पासून कोश आणि निसर्ग-पर्यावरणालाच वाहिलेल्या अलीकडच्या गंभीर लेखनापर्यंतचा मराठी साहित्याचा प्रवास निसर्ग-पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांनी उलगडून दाखवला आहे.

समकालीन पर्यावरणाची चिकित्सा करणारं हे पुस्तक पर्यावरण अभ्यासक आणि विद्यार्थी, निसर्गप्रेमी, माध्यम प्रतिनिधी, या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक या सगळ्यांच्याच दृष्टीनं महत्वाचं आहे. उत्तम आशयाला मिळालेली उत्तम निर्मितीमूल्याची जोड लक्षात घेण्याजोगी आहे. त्यामुळे मुखपृष्ठ आणि मांडणी करणारे राजू देशपांडे आणि शेखर गोडबोले यांनाही श्रेय द्यायला हवं. वाचनाबरोबर कृतीला प्रेरणा देणाऱ्या या पुस्तकाला सुजाण मराठी वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असं वाटतं.

............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4414

............................................................................................................................................

लेखिका वर्षा गजेन्द्रगडकर पुणेस्थित असून सामाजिक, पर्यावरणविषयक आणि ललित लेखन करतात.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

vishal pawar

Fri , 25 May 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......