‘लोकमान्य ते महात्मा’ हा प्रचंड मोठ्या विद्वत्तेचा विषय आहे!
ग्रंथनामा - झलक
रामचंद्र गुहा
  • ‘लोकमान्य ते महात्मा’च्या इंग्रजी अनुवादाचे मुखपृष्ठ
  • Fri , 04 May 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक लोकमान्य ते महात्मा Lokmanya Te Mahatma सदानंद मोरे Sadanand More रामचंद्र गुहा Ramchandra Guha

लोकव्यवहाराचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या ‘लोकमान्य ते महात्मा’ या बहुचर्चित पुस्तकाचा अभय दातार यांनी इंग्रजी अनुवाद केला आहे. तो नुकताच सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. या पुस्तकाला प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा मराठी अनुवाद.

.............................................................................................................................................

महाराष्ट्रानं गांधीजींना त्यांचे गुरू गोपाळ कृष्ण गोखले दिले, अत्यंत एकनिष्ठ आणि विद्वान शिष्य विनोबा भावे दिले आणि मारेकरी नथुराम गोडसेही दिला. या महान गुजराती माणसाचे त्यांच्या गुजरात राज्याशी सीमा जोडून असलेल्या या राज्यासोबत आणखीही बऱ्याच प्रकारचं नातं होतं. खरोखरच १८९६ साली त्यांनी पुण्याला प्रथम भेट दिली, तिथपासून ते अर्धशतकाने त्यांची तिथे हत्या झाली तिथपर्यंत गांधीजींचे महाराष्ट्राशी आणि मराठी माणसांशी खूप जवळचे आणि कधीकधी वादळीही संबंध होते.

गोपाळ कृष्ण गोखल्यांचे महान प्रतिस्पर्धी बाळ गंगाधर टिळक आणि गांधीजी यांच्यातील वैयक्तिक, राजकीय आणि तत्त्वज्ञानाधारित संबंध कसे होते यावर सदानंद मोरे यांनी खूप विस्ताराने आणि अधिकारवाणीने प्रकाश टाकला आहे. मोरे लेखनात सुरुवातीलाच लिहितात की, “टिळकांच्या नेतृत्वापासून गांधीजींच्या नेतृत्वापर्यंत झालेल्या परिवर्तनाची प्रक्रिया ही महाराष्ट्रासाठी धक्कादायक, दुःखद अनुभूती होती. त्यामुळे केवळ दोन वैचारिक घराण्यांतच वाद निर्माण झाले असं नाही तर ते वाद घराघरात पोचले.” ते पुढे म्हणतात की, “टिळक आणि गांधी यांच्यातील हा वाद महाराष्ट्राच्या इतिहासाच्या केंद्रभागी आढळून येतो.’’ म्हणूनच हा झगडा सगळ्या बाजूंनी समजावून घेतला नाही तर महाराष्ट्राला समजून घेणंच अवघड जाईल.

‘लोकमान्य ते महात्मा’ हा प्रचंड मोठ्या विद्वत्तेचा विषय आहे. तो गहन तर आहेच, पण त्याचा आवाकाही तेवढाच मोठा आहे. मराठीतून अभय दातार यांनी अत्यंत कौशल्यानं या दोन खंडांतील अभ्यासाचा इंग्रजीत अनुवाद केला आहे. या पुस्तकात वेगवेगळ्या पैलूंचा विस्मयचकित करणारा अभ्यास दिसून येतो. हा अभ्यास समाजशास्त्रीय आहे. कारण तो जाती, समाज आणि प्रदेश यांतील जातीय राजकारणावर संशोधन करतो. तो साहित्यिक आहे, कारण त्यात कित्येक नाटके, कविता आणि कादंबऱ्यांचे अर्थ धुंडाळले आहेत. तो बुद्धिवादी आहे, कारण त्यात महत्त्वाच्या आणि साध्या अशा सर्व राजकीय व्यक्तींच्या लेखनाचे आणि विचारांचे विश्लेषण केले आहे. तो चरित्रामक आहे कारण त्यात बऱ्याच प्रभावशाली आणि उत्कंठावर्धक व्यक्तींच्या कारकिर्दीवर लेखन केले आहे. तो राजकीय आहे, कारण त्यात टिळक आणि गांधी ज्या पक्षाचे नेते होते, त्या काँग्रेसच्याच मार्गाची केवळ चर्चा झालेली नाही, तर हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग, साम्यवादी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सर्वांच्या मार्गांचीही चर्चा झाली आहे. त्यात संपूर्ण भारताचा समावेश आहे. कारण भारतीय संस्थानांच्या इतिहासासोबत त्यात ब्रिटिशाच्या ताब्यातील इतिहासाबद्दलही लिहिलं आहे. कधीकधी हे लेखन जागतिक पातळीवरही जातं, कारण त्यात भारताबाहेरील रशियन क्रांती आणि खिलाफत चळवळीचा उदय या घटनांवरही लेखन आहे. कारण त्यांचे पडसाद भारतीय उपखंडातील राजकीय जीवनावर पडले होते.

‘लोकमान्य ते महात्मा’मध्ये या दोन वैयक्तिक राजकारण्यांमधील, त्यांच्या पक्षांमधील आणि त्यांच्या विचारसरणींमधील झगड्यांवरील आणि वादविवादांवरील समृद्ध चर्चा आहे. प्रस्तुत इतिहासकारानं एखाद्या उत्कृष्ट कलाकारासारख्या या विभिन्न भूमिका एकत्र विणल्या आहेत. या पुस्तकात अनेक उल्लेखनीय स्त्रोत वापरले असल्यामुळे याची वाचनीयता कमीच होत नाही. सदानंद मोरे यांनी लेखन करताना सरकारी दप्तरातील नोंदी, वृत्तपत्रे, माहितीपत्रिका, नाटकं, सस्मरणं, चरित्रं, दैनंदिन्या आणि अशा बऱ्याच साधनांचा संदर्भ घेतला आहे. मराठी स्त्रोतांवरील त्यांची हुकूमत तोंडात बोटं घालायला लावणारी आहेच, त्याशिवाय त्यांनी इंग्रजीतील त्या संदर्भातल्या दुय्यम साहित्याचंही वाचन केलेलं दिसून येतं.

सदानंद मोऱ्यांच्या निरीक्षणानुसार टिळक आणि गांधीजी यांच्या तोडीचे अखिल भारतीय नेते ब्रिटिश जमान्यात दुसरे कुणीही नव्हते. ते लिहितात की, “गांधीजींचे ‘मुस्लिम अनुयायी’ या वाक्प्रयोगाबद्दल कुणाला आश्चर्य वाटणार नाही, परंतु जिनांचे ‘हिंदू अनुयायी’ किंवा सावरकरांचे ‘मुस्लिम अनुयायी’ असं म्हटलं तर मात्र लोकांच्या भुवया उंचावतील किंवा त्यांना हसूही येईल.’’ टिळकांचे गांधींच्याएवढे मुसलमान अनुयायी नसले तरी त्यांचेही त्या समाजात मुहम्मद अली जिनांसारखे काही प्रभावशाली प्रशंसक होते.

या पुस्तकाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या दोन मध्यवर्ती व्यक्तिरेखांत त्यांनी केलेली सूक्ष्म तुलना होय. मोरे त्यांच्या जडणघडण करणाऱ्या प्रभावाविषयी लिहितात, “टिळक आणि गांधी दोघंही परंपरेच्या चौकटीत राहून विचार करणारे, वागणारे आणि कृती करणारे नेते होते. परंतु टिळकांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांच्या जातीची पार्श्वभूमी आणि प्रतिष्ठा, त्यांच्यावरील ब्राह्मणी प्रभाव आणि तरुण वयात त्यांच्यावर झालेले संस्कार यामुळे गांधीजींपेक्षा ते परंपरेकडे अधिक झुकलेले होते. तरुणपणाच्या काळात गांधीजींवर वैष्णव आणि जैन धार्मिक परंपरांचे संस्कार झाले, परंतु टिळकांसारखा कर्मठ हिंदू धर्मग्रंथांचा प्रभाव त्यांच्यावर नव्हता. त्याशिवाय गांधीजी कारकिर्दीच्या सुरुवातीला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत गेले आणि तिथे राहिलेसुद्धा. त्यामुळे त्यांची ख्रिस्ती, मुस्लिम आणि आधुनिक धार्मिक परंपरांशी ओळख झाली.”

त्या दोघांच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाबद्दल बोलताना मोरे लिहितात, “टिळकांनी भगवद्गीतेचा अर्थ लावण्यात स्वतःला झोकून दिलं होतं. आपण वैदिक हिंदू आहोत असा त्यांचा दावाही होता. त्यांना हेही माहिती होतं की, राजकारण हे मानवी कामकाजाचं वेगळंच क्षेत्र आहे आणि तेथील मूल्यव्यवस्थाही तितकीच वेगळी आहे. त्यांचं मत होतं की धार्मिक तत्त्वे राजकारणात आणता कामा नयेत.” तर दुसऱ्या बाजूला “गांधीजींना मानवी जीवनाचे असे वेगवेगळे कप्पे करणं मान्य नव्हतं. धर्म किंवा नीतीमूल्यांशी विसंगत असलेलं काहीही राजकारणातही असता कामा नये, अशी त्यांची तात्त्विक भूमिका होती.”

त्यांच्या एकमत नसलेल्या धार्मिक तत्त्वज्ञानाविषयी मोरे म्हणतात, “गांधीजींसाठी धर्माच्या विषयातील वादाचा खरा मुद्दा हा होता की, हिंसा आणि अहिंसा यांतील कुणाला अग्रभागी ठेवलं पाहिजे? टिळकांच्या दृष्टीनं हा लढा एकीकडे कृतिशीलता तर दुसरीकडे ह्या जगातून निवृत्ती ह्यातील होता. किवा सोप्या शब्दांत सांगायचं तर हा लढा कृती आणि विरक्ती यातील होता.”

या दोघांमधील समान गुणांबद्दल मोरे लिहितात, “ज्या अर्थी टिळक आणि गांधी दोघेही राष्ट्रीय पातळीवरील नेते बनले त्या अर्थी त्या दोघांमध्ये काही समान नेतृत्वगुण असले पाहिजेत. यातील एक गुण होता तो म्हणजे एकाच वेळी अनेक कामं करायला घेणं आणि तेवढ्याच तत्परतेनं ती पूर्णही करणं हा होता.”

त्यांच्या राजकारणाच्या भिन्न सामाजिक पायाबद्दल लिहिताना मोरे नोंदवतात, “टिळकांच्या काळात स्त्रियांमध्ये राजकीय जागृती जवळजवळ नव्हतीच. ती बरीच नंतर गांधीजींच्या कालखंडात निर्माण झाली.’’

‘लोकमान्य ते महात्मा’ या पुस्तकात दोघांनीही भोगलेल्या तुरुंगवासासंबंधीही मंत्रमुग्ध करणारी चर्चा दिसून येते. तुरुंगात असताना ते काय वाचत होते आणि काय लिहीत होते, याबद्दल मोरे आपल्याला सांगतात. ते यावर प्रकाश टाकताना म्हणतात, “स्वतः गोखले कधीही तुरुंगात गेले नसले तरी त्यांचे शिष्य गांधीजी मात्र तुरुंगात बरेचदा गेले. त्याचंच उलट परंतु साम्य दाखवणारं टिळकांच्या गोटातलं उदाहरण म्हणजे तुरुंगात जाणाऱ्या टिळकांचे अनुयायी न.चिं. केळकर हे स्वतः कधीही तुरुंगात गेले नाहीत.” मोरे मनाला भिडणाऱ्या अचूकपणे नोंदवतात की, “मनस्ताप आणि शारीरिक दुःख पेलण्याची क्षमता आणि सिद्धता हा महामानवांच्या चारित्र्याचा आवश्यक घटक असतो.’’

टिळक आणि गांधी यांच्यापलीकडे जाऊन या पुस्तकात जवळून निरीक्षण करून लिहिलेल्या अनेक व्यक्तिरेखाही दिसतात. आंबेडकर, जिना आणि सावरकर या संपूर्ण भारतभर परिचित असलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींसोबत प्र. के. अत्रे आणि विठ्ठलराव गाडगीळ यांच्यासारख्या महाराष्ट्रातील लोकांना माहिती असलेल्या परंतु अन्यत्र फारशा माहिती नसलेल्या व्यक्तीबद्दलचा ताजा दृष्टिकोन यातून पाहायला मिळतो. प्रत्येक पात्राचा ढाचा विशाल आहे आणि व्यक्तिरेखाचं लेखनही संयुक्तिक केलं आहे.   उल्लेखनीय समाजसुधारक वि.रा.शिंदे आणि साने गुरुजी यांची केलेली वर्णनं मला खास करून आवडली. खरोखर त्यांचं जीवन आणि त्यांचा वारसा याची ओळख त्यांच्या राज्याच्या बाहेरील लोकांना व्हायला हवी.

‘लोकमान्य ते महात्मा’ या पुस्तकाच्या लेखनाचा भर १९२० साली टिळकांचा मृत्यू झाल्यावर गांधीजी, त्यांचे समर्थक आणि विरोधक यांच्या दिशेने वळतो. सदानंद मोरे लिहितात, “गांधीजी त्यांच्या समकालीनांसाठी एखाद्या कोड्यासारखे होते. कुठल्याही जुन्या अथवा नव्या मोजपट्टीनं त्यांना मोजता येत नव्हतं. त्यामुळे त्यांना कुणी ‘संत’ म्हटलं तर कुणी ‘ढोंगी’ म्हटलं, तर कुणी ‘बनिया’ म्हटलं. ‘ब्रिटिशांचा हेर’, ‘अडाणी माणूस’ आणि ‘धूर्त राजकारणी’ म्हणूनही त्यांची संभावना केली गेली.’’ हा भाग खूपच छान लिहिला गेला आहे. महाराष्ट्रात गांधीजींबद्दल लोकांच्या मनात काय समज होते? त्यांच्याबद्दल मनावर काय ठसे उमटले होते? काय आकलने होती? काय मतं आणि गैरसमजुती होत्या याविषयी हे पुस्तक खोलात जाते. विशेषतः महाराष्ट्रातील ‘चले जाव चळवळ’ आणि तिला लागलेलं ‘गांधीमार्गाला न शोभेसं’ हिंसेचं वळण याबद्दलचं मोऱ्यांचं विश्लेषण तर अप्रतिमच आहे.

सदानंद मोरे यांचा अभ्यास वाचताना मला बरेचदा जाणवलं की, असंच एक पुस्तक गांधीजी आणि बंगाल या विषयावरही लिहिलं जायला हवं. कारण बंगाल हा असा एक प्रांत होता, ज्याच्याशी गांधीजींचे गुंतागुंतीचे आणि संघर्षयुक्त संबंध होते. त्यामुळे मोरे जेव्हा लिहितात की, ‘‘गांधीजींचे सर्व मराठी विरोधक म्हणतात की गांधीजींकडे विवेकी समंजसपणाचा अभाव होता.” तर तसं आपण गांधीजींच्या बंगाली विरोधकांबाबतही म्हणू शकतो. १९२० च्या कालखंडाबद्दलच्या प्रकरणाचं नाव आहे, ‘महाराष्ट्राला कोपऱ्यात ढकललं गेलं.’ त्याच दशकातील बंगाली लोकही तक्रार करू लागले होते की, आमच पूर्वीचं राजकीय वर्चस्व या गांधीजींनी गिळलं आहे. खरोखर गांधीजींबद्दलची शत्रुत्वभावना बंगालमध्ये अधिक होती. विशेषतः सुभाषचंद्र बोस काँग्रेसचे १९३० च्या अखेरीस अध्यक्ष बनले, तेव्हा त्यांच्याविरुद्ध गांधीजींच्या समर्थकांनी कारस्थानं केली असंही म्हणता येईल.  

‘लोकमान्य ते महात्मा’ या पुस्तकाच्या दुसऱ्या खंडाची शेवटची काही प्रकरणं बंगालशी संबंधित आहेत, ती महाराष्ट्राकडे तुलनेच्या भिंगातून बघतात. परंतु मला वाटतं की, ‘टागोर-अरविंद-सी. आर. दास- बोस’ यांच्या राज्याशी गांधीजींचे कसे बहुपेडी, बहुपैलूंचे आणि विवादास्पद संबंध होते याबद्दलचं काम अजूनही व्हावयाचं बाकी आहे. एखादा बंगाली इतिहासकार हे काम हाती घेईल का? खरोखरच एखादा तशाच बौद्धिक क्षमतेचा, ऊर्जेचा आणि व्यासंगाचा बंगाली सदानंद मोरे निघेल का? तो निघेल तेव्हा  निघेल, परंतु तोपर्यंत आपण सर्व मराठी, बंगाली आणि अन्य जन मूळच्या सदानंद मोरे यांनी दिलेल्या या विद्वत्तापूर्ण मेजवानीचा आस्वाद घेऊ.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4415

.............................................................................................................................................

मराठी अनुवाद- सविता दामले

savitadamle@rediffmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 09 May 2018

सविताताई, अनुवाद वाटंत नाही इतका अनुवाद उत्तम जमलाय. माझी मतं सांगतो : १. >> “टिळक आणि गांधी यांच्यातील हा वाद महाराष्ट्राच्या इतिहासाच्या केंद्रभागी आढळून येतो.’’ -इति सदानंद मोरे. >> टिळक आणि गांधी यांच्यात गांधींचा १९१६ चं भारतातलं आगमन ते १९२० चा टिळकांचा मृत्यू इतकीच ४ वर्षं सामायिक होती. त्यामुळे टिळक व गांधी यांच्यातला वाद खरंतर टिळकांची विचारसरणी व खुद्द गांधी यांच्यातला वाद म्हणायला हवा. २. >> “परंतु टिळकांसारखा कर्मठ हिंदू धर्मग्रंथांचा प्रभाव त्यांच्यावर नव्हता.’’- इति श्री. मोरे >> टिळकांवर कुठल्या कर्मठ हिंदू ग्रंथाचा प्रभाव होता? एखाद्या कर्मठ हिंदू ग्रंथाचं नाव मिळेल काय? ३. >> त्यांच्या राजकारणाच्या भिन्न सामाजिक पायाबद्दल लिहिताना मोरे नोंदवतात, “टिळकांच्या काळात स्त्रियांमध्ये राजकीय जागृती जवळजवळ नव्हतीच. ती बरीच नंतर गांधीजींच्या कालखंडात निर्माण झाली.’’ -इति श्री. मोरे >> बंगालात स्त्री क्रांतीकारिकांची फौज गांधींच्या आधीपासूनच कार्यरत होती. चटकन आठवली ती काही नावं म्हणजे शांती घोष, शांती दत्त, सुनीती चौधरी, प्रीतीलता वड्डेदार. महाराष्ट्रात सावरकर परिवारातल्या स्त्रियासुद्धा क्रांतिकारकांना मदत करणाऱ्या होत्या. ४. >> ‘लोकमान्य ते महात्मा’ या पुस्तकात दोघांनीही भोगलेल्या तुरुंगवासासंबंधीही मंत्रमुग्ध करणारी चर्चा दिसून येते. >> गांधी कधी तुरुंगात गेले होते ? आगाखान प्यालेस आणि बिर्ला हाऊस हे काही तुरुंग नव्हेत. नाही म्हणायला नगरच्या तुरुंगात होते नाममात्र. पण टिळक वा सावरकर यांच्यासारखा तुरुंगवास गांधींना कधीच भोगावा लागला नाही. युरोपातलं सरासरी आयुर्मान ४८ असतांना मधुमेहग्रस्त टिळकांना वयाच्या ५२ व्या वर्षी ६ वर्षांच्या दीर्घ कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. टिळक काही परत येत नाहीत असंच सगळे धरून चालले. पण टिळक जगले, वाचले आणि १९१४ साली घरी परतले. याला म्हणतात खरा कारावास. बाकी, सावरकर बंधूंच्या कारावासाबद्दल बोलायलाच नको. 'काळे पाणी'! बस, दो शब्द काफी है. यापुढे गांधीनेहरूंचा पंचतारांकित तुरुंगवास झक मारतो. ४. >> विशेषतः महाराष्ट्रातील ‘चले जाव चळवळ’ आणि तिला लागलेलं ‘गांधीमार्गाला न शोभेसं’ हिंसेचं वळण याबद्दलचं मोऱ्यांचं विश्लेषण तर अप्रतिमच आहे. >> वाचायला आवडेल. विश्लेषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं चलेजाव चळवळीतलं योगदान यावर भाष्य असेल अशी आशा आहे. ५. >> १९२० च्या कालखंडाबद्दलच्या प्रकरणाचं नाव आहे, ‘महाराष्ट्राला कोपऱ्यात ढकललं गेलं.’ त्याच दशकातील बंगाली लोकही तक्रार करू लागले होते की, आमच पूर्वीचं राजकीय वर्चस्व या गांधीजींनी गिळलं आहे. >> अगदी योग्य निरीक्षण आहे. गांधीपूर्व काळात राष्ट्रीय चळवळ पेटवली ती पंजाब, महाराष्ट्र व बंगालने. लाल बाल पाल ही ती त्रयी होती. पुढे टिळक गेल्यावर बंगाली चळवळ क्रांतिकारकांच्या मागे गेली. पंजाबी व मराठी चळवळीसकट उर्वरित भारत गांधींच्या प्रभावाखाली आला. आज पंजाब व बंगाल फाळणीमुळे अर्धे कापले गेले आहेत. महाराष्ट्राच्या खांद्यावर राष्ट्रीय चळवळ धारण करायचं ऐतिहासिक ओझं आहे. ६. >> "खरोखरच एखादा तशाच बौद्धिक क्षमतेचा, ऊर्जेचा आणि व्यासंगाचा बंगाली सदानंद मोरे निघेल का?" -इति श्री. गुहा >> आम्हांस एक पंजाबी सदानंद मोरेसुद्धा हवाय. भगतसिंगांची फाशी आणि फाळणी या दोन नाजूक प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर पंजाब्यांनी केलेलं गांधींचं मूल्यमापन समजून घ्यायला आवडेल. असो. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......