‘चित्रभास्कर’ : चंदावरकरांच्या लेखनाचं भाषांतर करताना
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
आनंद थत्ते
  • ‘चित्रभास्कर’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 20 April 2018
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस चित्रभास्कर Chitrabhaskar भास्कर चंदावरकर Bhaskar Chandawarkar

‘चित्रभास्कर’ या पं. भास्कर चंदावरकरांनी लिहिलेल्या आणि अरुण खोपकरांनी संपादित केलेल्या ग्रंथाच्या ३ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या प्रकाशन समारंभात  अनुवादक आनंद थत्ते यांनी केलेल्या भाषणाचा संपादित गोषवारा. प्रस्तुत भाषण प्रथम ‘मायमावशी’ या त्रैमासिकाच्या मार्च २०१८च्या अंकात प्रकाशित झालं आहे.

.............................................................................................................................................

साधारण २०११-२०१२ च्या सुमारास जयप्रकाश सावंत यांनी भास्कर चंदावरकरांच्या लेखांचा अनुवाद करणार का, अशी विचारणा केली होती. पंडितजींनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचं संकलन आणि संपादन करून पुस्तक करण्याची कल्पना होती. मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. कारण हे सर्व लेख सिनेमा, नाटक आणि त्यातलं संगीत या विषयीचे होते. या तीनही कलांविषयी मला आत्मीयता आहे आणि त्यात रसही आहे. पंडितजींचा या तीनही कलांमधला व्यासंग आणि सखोल अभ्यास याची कल्पना होतीच. त्यांच्यासारख्या ज्ञानी व्यक्तीचं मराठीत केवळ एकच पुस्तक असावं ही काही चांगली गोष्ट नव्हती. पंडितजी परफॉर्मिंग आणि प्रॅक्टिसिंग कलावंत होते. शिवार त्यांचा तात्त्विकविचारही पक्का होता. प्रत्यक्ष कार्यरत राहिलेल्या कलावंताने संगीताविषयी तात्त्विक विचार मांडणं हे फारच महत्त्वाचं आहे. कारण प्रत्यक्ष कार्यरत राहिलेले असे कलावंत फारच कमी आहेत, जे संगीतीविषयी तात्त्विक मांडणी करू शकतात. संगीतात तर अशा लेखनाची वानवाच आहे. म्हणून मी अनुवाद करण्यास आनंदाने होकार दिला.

माझाकडे लेख आले आणि मी काम सुरू केलं. हे काम करताना दोन गोष्टीचं भान राखणं महत्त्वाचं होतं. एक म्हणजे पंडितजींच्या लेखनशैलीच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करणं आणि दुसरं म्हणजे सांगीतिक आणि तात्त्विक संज्ञा काटेकोरपणे वापरणं. ‘वाद्यवेध’मधलं त्यांचं लेखन आपण पाहिलं तर हे लक्षात येतं की, पंडितजींची भाषा ओघवती आहे. त्यात लालित्य आहे आणि पांडित्यदेखील आहे. त्यातला तात्त्विकभाग देखील अतिशय सहजतेनं आणि सुलभतेनं येतो. शास्त्रचर्चा या नावाखाली, केवळ अकादेमिक पंडितांनी केलेलं सांगीतिक लेखन किती रटाळ आणि क्लिष्ट असतं हे मी नव्यानं सांगायची गरज नाही. म्हणून पंडितजीसारख्या प्रत्यक्ष कार्यरत राहिलेल्या कलावंतानं केलेल्या संगीत विषयक लेखनाला विशेष महत्त्व येतं. कारण त्यांना त्या कलेचं मर्म कळलेलं असतं. या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून ‘चित्रभास्कर’मधल्या लेखांचं भाषांतर करताना त्यांच्या लेखनाला आणि शैलीला न्याय देण्याचा मी प्रयत्न केला आहे.

संगीताचा मी विद्यार्थी आहे. त्यामुळे अनुवाद करत असताना त्याचा मला खूप फायदा झाला. मला स्वतःला अनेक गोष्टी शिकता आल्या. माझ्या काही सांगीतिक धारणांना बळकटी मिळाली. काही गोष्टी नव्या परिप्रेक्ष्यात बघता आल्या. सिनेसंगीताची माझी जाण आणि कल्पना यांचं क्षितिज विस्तारत गेलं. याचं कारण म्हणजे या गोष्टीचं पंडितजींनी केलेलं विवेचन एकरेषीय नाहीये. ते अनेक सामाजिक-सांस्कृतिक संदर्भांसकट येतं. आणि हे संदर्भ पडताळून बघताना त्या संदर्भांच्या प्रकाशात माझ्या डोळ्यावर असलेली अनेक झापडं गळून पडली. माझी बघण्याची दृष्टी आणि ऐकण्याचा कान दोन्ही समृद्ध होत गेले. भाषांतर करताना कित्येक वेळा चमकून थबकायला व्हायचं. लिहिलेला विचार नीट समजून घेताना असं लक्षात यायचं की, अरे, अशा दृष्टीनं आपण कधी विचार केला नव्हता. एखाद्या विषयाची नवीनच बाजू प्रकट व्हायची. कधी ऐतिहासिक माहिती मिळायची. कधी सामाजिक संदर्भात नवा पैलू समजायचा.

या संदर्भातली काही उदाहरणं सांगायची तर ‘मूकपटांच्या जमान्यातील नाद’ या लेखात ते लिहितात, व्यावहारिक गरजेचं अनौरस अपत्य म्हणून सिनेगीतांचा जन्म झाला. याची पार्श्वभूमी म्हणजे मूकचित्रपटांच्या जमान्यातले वादक/ गायक हे पहिले संगीत दिग्दर्शक, संवाद लेखक आणि उसना आवाज देणारे (प्लेबॅक सिंगर्स) होते. स्टॉक म्युझिक आणि कॅन्ड म्युझिकचं हेच उगमस्थान होतं.

‘सिनेगीताचा मोठा वाद’ या लेखात तर अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यांचं निरीक्षण आहे की, देशातलं उच्चभ्रू संगीत हे त्या देशातील आम जनतेचं संगीत असेलच असं म्हणता येणार नाही. देशातील उच्चभ्रू संगीत आणि आम जनतेचं संगीत, हे दोन संगीतप्रकार दोन संपूर्ण वेगवेगळ्या संगीत परंपरांचे घटक असणं अशक्य आहे. कारण कुठलीही सांगीतिक संस्कृती आज आपली मूळ वैशिष्ट्यं जशीच्या तशी टिकवून ठेवली आहेत असा दावा करू शकत नाही.

५०-६० च्या दशकात सिनेगीतात ऑर्केस्ट्रा खूप मोठा झाला. अनेक वेगवेगळी वाद्यं वापरली जाऊ लागली. त्यासंबंधीचं मर्म उलगडून दाखवताना ते लिहितात- कमी वेळात जास्त परिणाम, अशी श्रोत्यांची आणि ध्वनिमुद्रण सुविधेची मागणी असते, तेव्हा वादक, संगीतकार यांना अनेक आवाज, अनेक वाद्य वापरण्याकडे वळावं लागतं. ५०-६० च्या दशकात हेच झालं.

‘वाद्यांचं गायन’ या लेखातील त्यांची निरीक्षणेही अशीच मनोज्ञ आहेत. ते म्हणतात, वाद्य आपलं भौगोलिक ठिकाण आणि संस्कृती यात अडकून पडत नाहीत. नव्या घराला म्हणजेच नव्या देशाला आणि तिथल्या संस्कृतीला अनुकूल असे अनेक बदल, सुधारणा त्या वाद्यात घडून येतात. एखादं हवाई किंवा आफ्रिकन वाद्य भारतीय संगीतात जितक्या सहजपणे स्वीकारलं जाईल, तितका त्या संस्कृतीतील एखाद्या गायकाचा आवाज स्वीकारला जाणार नाही.

भारतीय सिनेमातील शास्त्रीय संगीत किती शास्त्रीय आहे याविषयी त्यांचा स्वतंत्र लेखच आहे. या लेखात ते लिहितात, तुम्ही निसर्गवाद, वास्तववाद, नववास्तववाद, अतिवास्तववाद घ्या किंवा तुम्हाला हवा तो वाद घ्या, यातल्या प्रत्येक प्रकारच्या सिनेमाचं चित्रण कॅमेऱ्यानं होतं हा प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेलेला एक पायाभूत संकेत आहे. सिनेमा बघताना असं कुणीही विचारत नाही की, अरे बाबा, हा कॅमेरा कुठून आला? तसंच विशिष्ट उद्देशानं रचलेल्या ध्वनिरचनेच्या बाबतीत देखील हे कुठून आलं, कसं आलं असं कोणी विचारत नाही. सिनेमाचा साऊंड ट्रॅकसंगीत म्हणून ऐकणं हा देखील एकसंकेत आहे.

ऐतिहासिक/पौराणिक चित्रपटातील कोणत्या गोष्टी आपण स्वीकारतो आणि कोणत्या स्वीकारू शकत नाही याचा ऊहापोह करताना ते एक निकष देतात, मोजमाप देतात. ते म्हणजे स्वीकृतीची सामाजिक सांस्कृतिक मर्यादा. या ज्या मर्यादा आपण घालतो, त्यामुळे सिनेमातली कुठली दृक, श्राव्य आणि कालिक अंगं आपण स्वीकारू शकतो हे कळतं. साहजिकच ही मर्यादा जितकी व्यापक तितकी आपली स्वीकृती अधिक खुली होणार. यावरून अलीकडचे काही वाद बघता ते किती भेदक समकालीन भाष्य करतात, हे आपल्या लक्षात येईल.

हे भाषांतर करतांना एक विलक्षण गोष्ट माझ्या लक्षात आली. मी लहान असतानाची गोष्ट. माझे वडील पंडित अण्णासाहेब थत्ते हे माझे तबल्याचे गुरू. त्यांचे गुरू उस्ताद अमीर हुसेन खांसाहेब. माझे वडील खांसाहेबांचे ज्येष्ठतम शागीर्द होते. आमच्या घरी खांसाहेब यायचे तेव्हा कधी कधी ते मला मांडीवर बसवून शिकवत असत. म्हणायचे, ‘बेटा ऐसे बजाव, ऐसे मत बजाव.’ अरुण खोपकरांनी मला शिकवलं आणि त्यांना भास्कर चंदावरकरांनी. भाषांतर करताना मला असं वाटत होतं की, पंडितजी मला शिकवताहेत. म्हणताहेत हे असं बघ, हे असंही बघता येतं. असा विचार करून बघ, जमतंय का.

भास्कर चंदावरकरांना मी कधी भेटलो नाही. मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं देखील नव्हतं. पण हे भाषांतर करत असतानाच्या दीड-दोन वर्षांच्या काळात मला त्यांचा स्नेहल सहवास लाभला. त्यांच्या निकटच्या सहवासात हे दिवस आनंदात गेले.

.............................................................................................................................................

लेखक आनंद थत्ते मराठी-इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि अनुवादक आहेत.

thatte.anand7@gmail.com

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4288

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......