खरं सांगण्यापूर्वीचं ‘स्वगत’
ग्रंथनामा - झलक
करण जोहर
  • खरं सांगायचं तर’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 07 April 2018
  • ग्रंथनामा झलक खरं सांगायचं तर Khara Sangaycha Tar अॅन अनसुटेबल बॉय An Unsuitable Boy करण जोहर Karan Johar

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नामांकित दिग्दर्शक करण जोहर यांच्या 'An Unsuitable Boy’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘खरं सांगायचं तर’ या नावानं रोहन प्रकाशनातर्फे नुकताच प्रकाशित झाला आहे. नीता कुलकर्णी हा अनुवाद केला आहे. या पुस्तकाला करण जोहर यांनी लिहिलेलं हे प्रास्ताविक...

.............................................................................................................................................

अखेर आज मला अगदी मुक्त झाल्यासारखं वाटतंय. कोणीही व्यक्ती किंवा कोणत्याही गोष्टीला मी बेधडक सामोरा जाऊ शकेन. तत्त्वं, नैतिकता, वास्तव यांच्या चौकटीत मी स्वत:ला बंदिस्त करून टाकलेलं नाही. समाजानं आखून दिलेल्या नियमांत मी मला जखडून टाकलेलं नाही. जेव्हा मला माझ्या लैंगिकतेविषयी प्रश्न विचारले जातात, फक्त त्या वेळी मी मौन स्वीकारतो. त्याचं कारणही अगदी स्पष्ट आहे. ही अत्यंत व्यक्तिगत बाब आहे आणि मला त्याबद्दल कुणालाच सांगावंसं वाटत नाही. तरीही, जेव्हा मला त्याबद्दल बोलावंसं वाटेल तेव्हा मी बोलेनही! आज मात्र मला तशी इच्छा नाही. माझ्या व्यक्तिमत्त्वातला तेवढा एकच पैलू मी बंदिस्त कुपीत ठेवला आहे. अन्यथा मला छान मोकळं वाटतं. आज मी ४४ वर्षांचा झालोय आणि नवी आव्हानं स्वीकारण्यासाठी मी तयार आहे. नवीन लोकांशी संवाद साधण्यासाठी सज्ज आहे. माझ्या आयुष्यातली गुंतागुंत काढून टाकण्याची माझी तयारी झाली आहे.

रोज सकाळी माझ्या ऑफिसमध्ये अत्यंत उत्साहानं आणि एनर्जीनं मी जातो. एकापाठोपाठ एक अविरत काम करण्याची माझी उमेद असते. मी आयुष्य नावाच्या ट्रेड मीलवर सतत धावतो आहे. त्याचे गिअर्स माझ्या डोक्यात आहेत, तर लीव्हर्स माझ्या हातात आहेत. मी माझ्या इच्छेनुसार एक ते दहापर्यंत कितीही झेप घेऊ शकतो. अर्थात आयुष्याच्या या टप्प्यावर मी एका रात्रीत आलो नाही. यामागे माझा कित्येक वर्षांचा प्रवास आहे.

माझा सिनेमा- ‘ऐ दिल है मुश्कील’ पडद्यावर झळकला आणि मला त्याबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्या क्षणी मला वाटलं, आपण सत्य सांगायला हवं. खरं सांगायचं, तर त्या कथेला व्यक्तिगत आयुष्यातल्या काही घटनांची जोड आहे. ती माझी गोष्ट आहे. माझ्या आयुष्यात दोन वेळा प्रेम आलं. पण दोन्ही वेळा कहाणी सुफळ संपूर्ण झाली नाही. एकदा मी विशीत होतो आणि दुसऱ्या वेळी माझी तिशी उलटली होती. माझ्या मनापासून केलेल्या प्रेमाला समोरून प्रतिसाद मिळाला नाही. त्याचं दु:ख, ती वेदना काय होती, हे माझं मलाच ठाऊक! दातदुखीपेक्षा अस्वस्थ करणारी, मेंदूतल्या ट्यूमरपेक्षाही वेदनादायी आणि अक्कलदाढ उपटल्यावर जेवढं दुखतं, त्यापेक्षाही भयानक अशी ती वेदना होती. तुमचं हृदय दुखावलं जातं. काही लोक त्याला अँग्झायटी किंवा अस्वस्थता म्हणतात, काही त्याला श्वास लागणं, दम कोंडणं असंही म्हणतात. प्रेमात माझ्या वाट्याला जेव्हा दुसऱ्यांदा अपयश आलं, त्या वेळी मी वयानं जरा मोठा होतो. मला त्या वेळी मानसतज्ज्ञाकडे उपचारासाठी जावं लागलं. अनेक महिने मी औषधं घेत होतो. मला मधून मधून अँग्झायटीचे झटके येत. मला नैराश्य आलं होतं आणि ते माझ्या लक्षातच आलं नव्हतं. ही अस्वस्थता मला त्यामुळेच जाणवत होती, असं डॉक्टरांचं मत होतं.

प्रेमातल्या या दुसऱ्या अपयशाची अस्वस्थता खूप दिवस मनात घर करून राहिली होती. एकतर आयुष्याच्या मध्यावर येऊन पोचल्याची जाणीव मनात होती. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात काहीच घडत नव्हतं. व्यावसायिक प्रगती उत्तम सुरू आहे, पण या प्रगतीच्या जोडीनं अनेक प्रकारचे ताणतणाव आणि असुरक्षिततादेखील येत असतात. त्यांना सामोरं जाणं जमत नव्हतं. एकटेपणा, रिकामपण, आतून काही तरी पोकळी जाणवत राहणं, आपल्या आयुष्यात प्रेम नसल्याचं ओझं- अशी एक संमिश्र जाणीव छळत राहते. आपल्या आजूबाजूला कितीही माणसं असली तरी जोडीदाराची उणीव भासतच राहते. ज्या परिस्थितीत मी सापडलो होतो, ते पाहता मला औषधं घेण्याची गरज आहे, असं मला वाटत होतं. फक्त बोलून, चर्चा करून किंवा समुपदेशनानं फारसा फायदा होणार नाही, हे मला कळत होतं. माझ्या डॉक्टरनं मला औषधं दिली. माझ्या प्रगतीवर तिचं लक्ष होतंच. हळूहळू तिनं औषधं कमी करत आणली आणि आता मला औषधांची गरज भासत नाही.

माझ्या मते हे घडणं महत्त्वाचं होतं. आपल्याला काही त्रास होत असेल तर तो तात्पुरता असणार- असा आपण समज करून घेतलेला असतो. आजच्या काळात नैराश्य, अस्वस्थता या गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनल्या आहेत. मी त्यांना ‘मेडिकल सॅडनेस’ असं म्हणतो. त्यावर उपचार करण्याची नितांत आवश्यकता असते. त्यावर हवं तर औषधं घ्या किंवा मानसतज्ज्ञाची मदत घ्या- मुख्य म्हणजे या दोन्हीतला फरक लक्षात घ्यायला हवा. मला मानसतज्ज्ञाची गरज आहे, हे मला लक्षात आलं होतं. मी स्वत:ला व्यवस्थितपणे ओळखतो. माझ्या बाबतीत निदान होण्याची गरज आहे, चर्चेची नाही, हे मला उमगलं होतं.

सध्या मी नियमित सत्रांसाठी मानसतज्ज्ञाकडे जात नाही. पण मी तिच्या संपर्कात असतो. अधूनमधून मी तिच्याशी बोलतो. आम्ही दोघं व्हॉट्सअ‍ॅपवर संपर्कात असतोच. अर्थात, मी तिच्यावर मॅसेजचा भडिमार करत नाही. ‘ऐ दिल है मुश्कील’च्या लेखनादरम्यान मला तिची खूप मदत झाली. कारण हा सिनेमा लिहीत असताना मला माझ्या अयशस्वी प्रेमाचं ओझं जाणवू लागलं. सिनेमाचे प्रोमो झळकले आणि दुसऱ्याच दिवशी मला ‘तिचा’ मेसेज आला. ‘‘प्रोमो पाहिले. फारच भन्नाट आहेत. मीही त्या कथेतला भाग आहे, असं वाटतंय.’’ आणि खरंच ती सिनेमाच्या प्रवासातला एक घटक होतीच.

‘ऐ दिल है मुश्कील’च्या रूपानं माझ्या व्यक्तिगत आयुष्याचा काही भाग रुपेरी पडद्यावर आणला आहे. सगळाच्या सगळा सिनेमा आत्मचरित्रात्मक आहे, असं मी म्हणणार नाही. कारण त्यामध्ये कल्पित गोष्टीही बऱ्याच आहेत. पण त्यातले अनेक सीन्स आणि संवाद हे माझ्या आयुष्यात जसेच्या तसे घडले आहेत. मी खूपसा सिनेमातल्या रणबीर कपूरसारखा आहे. आणि हा त्याचा आणि त्याच्या भग्न हृदयाचाच तर सिनेमा आहे. सिनेमात एक संवाद आहे. ‘‘रिश्ते जब जिस्मानी हो जाते हैं, तो कहीं ना कहीं दोस्ती मिट जाती है । प्यार में जुनून है, और दोस्ती में सुकून है । और मैं नही चाहती की हमारे बीच का सुकून कभी चला जाये ।’’ ज्या व्यक्तीच्या प्रेमात मी होतो, त्या व्यक्तीनं मला हे सांगितलं होतं. आपल्यात शरीरसंबंध नाहीत, याबद्दल खूप बरं वाटतं असं ती व्यक्ती म्हणाली होती. पण तिनं मला हेही सांगितलं होतं की, ‘‘तू माझ्या आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची व्यक्ती आहेस. तू माझ्या कुटुंबातलाच आहेस. तू माझा फक्त प्रियकर नाहीस, तू माझं सर्वस्व आहेस.’’ हे सारं घडलं, तेव्हा मी पस्तीस वर्षांचा होतो. हे नातं सफल झालं नाही. त्या दु:खातून बाहेर यायला मला खूप दिवस लागले. पण तेव्हाच माझ्या लक्षात आलं की, प्रेमभंग ही कधी कधी चैनीची गोष्ट ठरू शकते. महिनोन्महिने तुम्ही त्या अवस्थेत राहू शकता.

‘प्रेम’ ही अशी लाडाकोडाची भावना असते. ती एका अर्थानं स्वत:चे भरपूर लाड पुरवून घेते. पण मी तिच्यातून बाहेर येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मनातल्या मनात मी तिचा तर्कसुसंगत विचार केला. माझ्या मित्र-मैत्रिणींशी त्याबाबत खूप चर्चा केली. (त्यांच्या मते तर मी फारच मूर्ख, बावळट आणि वेड्यासारखं वागत होतो.) पण शेवटी तुम्ही काय अनुभवत असता, काय सोसता, ते तुमचं तुम्हालाच माहिती असतं. माझ्या बाबतीत म्हणाल तर या सगळ्या प्रकारानं मला जिवंतपणाचा अनुभव दिला. प्रेमभंगातून मला झालेला  एकमेव फायदा! कदाचित म्हणूनच त्या अनुभवाबद्दल मला पश्चात्ताप वाटत नाही. (आणि बघा ना, त्याच्यामुळेच मी एक अख्खा सिनेमा बनवू शकलो.) या सिनेमातला हा संवाद आठवतोय का बघा- ‘‘एक तरफा प्यार की ताकत ही कुछ और होती है । और रिश्तों की तरहा ये दो लोगों में नही बँटती!’’ या गोष्टीवर माझा पूर्ण विश्‍वास आहे. प्रेमाचं सामर्थ्य माझं आहे. कुणावर तरी प्रेम करणं ही गोष्ट तुम्हाला तुमच्या सामर्थ्याची जाणीव करून देते. याचं मुख्य कारण म्हणजे तुम्हाला जरी प्रेम परत मिळालं नाही, तरी तुमच्याजवळ प्रेम असतंच. ते संपत नाही. अर्थात ते जशी तुमची ताकद आहे, तशीच ती दुर्बलताही असू शकते. तुम्ही त्याबाबत कसा विचार करता, त्यावर ते अवलंबून असतं. मी प्रेमाकडे प्रचंड सामर्थ्याचा स्रोत म्हणूनच बघतो. या भावनेच्या ताकदीवरच मी माझी कंपनी शक्य तेवढी नावारूपाला आणली. ही भावना मला एक प्रकारची ऊर्जा देते. तिनं मला दुखवलंही आहे. तिच्यामुळे माझं हृदय विदीर्णही झालं आहे. पण तरी या भावनेनं मला शक्ती दिली... मला जिवंतपणाचा रसरशीत अनुभवदेखील दिला आहे. मी एकाच गोष्टीमुळे दुखावलो गेलो. आम्हा दोघांचं हे नातं नेहमी असंच राहील, त्यात तिसरं कुणी येणार नाही, असं मला सांगण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. आमच्यात तिसरी व्यक्ती आली आणि त्या तिसऱ्या व्यक्तीमुळे सारं चित्रच बदलून गेलं. नात्यात दुरावा नेहमी तिसऱ्या व्यक्तीमुळेच येतो. कधी कधी तर भावंडांपैकी एकाचं लग्न झालं की, तीदेखील दुरावतात.

.............................................................................................................................................

‘सेपिअन्स - मानवजातीचा अनोखा इतिहास’ या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

असो. पण आता मी त्या साऱ्यातून बाहेर आलोय. मी ते नातं मागे सोडून आलोय. मी त्याच्याविषयी लिहिलं, ते नातं समरसून जगलो, मी त्याचं चित्रीकरणही केलं... पडद्यावर आणलं. सिनेमातले काही सीन्स, काही क्षण हे पूर्णत: माझे आहेत. हा सिनेमा प्रेम आणि मैत्रीच्या संकल्पनेवर आधारलेला आहे. कधी कधी तुम्ही तुमच्या घट्ट मैत्रीला प्रेमाचं रूप देऊ शकत नाही, या परिस्थितीवरचा तो सिनेमा होता. सेक्समुळे रिलेशनमधलं सारं चित्र बदलून जाऊ शकतं. ज्या दोन व्यक्तींच्या प्रेमात मी होतो, त्यांच्याबरोबर मी कधीही सेक्सचा अनुभव घेतलेला नाही. त्यांपैकी दुसरी व्यक्ती तर लग्न करून परदेशात गेली आणि आता आमचा काही संपर्कही नाही. पण मी म्हटलं तसं आमच्या त्या नात्यात किती गोष्टींचं आश्वासन मला दिलं गेलं होतं. पण मला ती मैत्रीही पूर्णपणे उपभोगता आली नाही. कारण? एकच! ती तिसरी व्यक्ती आम्हा दोघांच्यामध्ये आली! पहिल्यांदा ज्या व्यक्तीच्या मी प्रेमात पडलो होतो, ती व्यक्ती मात्र आजही माझ्या आयुष्याचा एक भाग आहे.

आज मी खूपसा अंतर्मुख झालो आहे. मनात, आतमध्ये खोलवर खूप विचार सुरू असतात. हे ऐकायला जरा विचित्रच वाटेल. खरं सांगायचं तर, मी लोकांत रमणारा माणूस होतो. पण आज मला स्वत:त रमायला जास्त आवडतं. मला आता माझ्या सभोवताली गोंगाट नको वाटतो. खच्चून गर्दी असलेल्या पार्टीला जाणंही मी टाळतो. जिथं जाणं गरजेचंच असतं, केवळ तिथंच मी जातो. आता मला सतत अवतीभवती लोकंही नको वाटतात. माझ्या घराच्या गच्चीवर एक-दोन मित्रांबरोबर, वाईन पीत त्यांच्या आणि माझ्या आयुष्याबद्दल गप्पा मारायला मला आवडतं. पार्ट्यांचा आता कंटाळा आलाय. गेली १५ वर्षं या गोष्टी मी इतक्या मोठ्या प्रमाणावर करत होतो. वयाच्या वीस वर्षापासून ते चव्वेचाळीस वर्षापर्यंत मी एकच गोष्ट केली... ती म्हणजे सतत खूप माणसांच्या गराड्यात राहिलो. आता मात्र मला ज्येष्ठ व्यक्तींशी नको इतक्या आदरानं वागणं किंवा तरुण मुलांशी नको इतकी मैत्री जोडणं, या गोष्टी नको वाटतात. आता तुम्ही याला त्रयस्थपणा किंवा एक प्रकारची मुक्तता...काही म्हणू शकता. तुम्ही आयुष्याकडे कसं पाहता, यावर ते अवलंबून आहे. माझ्या व्यावसायिक जीवनाच्या आणि माझ्या कामाच्या चौकटीत मी अतिशय खूश आहे.

जेव्हा तुमचं लग्न झालेलं नसतं, कुणी जोडीदार नसतो, मुलं नसतात, प्रियकर-प्रेयसी नसते, तेव्हाच कामाशी तुमची एवढी बांधीलकी निर्माण होऊ शकते. मला एक प्रश्न नेहमी विचारला जातो, ‘‘तुम्ही सेक्सचा पुरेसा अनुभव घेता का?’’ मनोरंजनाच्या क्षेत्रात तुम्ही असलात म्हणजे तुम्ही सेक्सचा वरचेवर अनुभव घेत असणार, असला विचित्र समज लोकांच्या मनात असतो. खरं सांगायचं तर मी या सर्वाची फारशी पर्वाच करत नाही. काहीतरी सिद्ध करण्यासाठी रोज रात्री पोर्न वगैरे बघण्याची मला गरज वाटत नाही. मी भरपूर प्रवास करतो म्हणजे मी भरपूर सेक्स करत असणार, असाही लोकांचा समज असतो. पण असं काहीही नसतं. विमानाचा बोर्डिंग पास हा काही सेक्सचा पास नसतो. सध्या मी कुणाच्याही प्रेमातदेखील नाही. तर, मी आता लव्ह-फ्री, सेक्स-फ्री म्हणजे थोडक्यात कम्प्लिटली फ्री आहे. मी कुणालाही उत्तरदायी नाही. आणि खरं सांगू, माझ्या आईनं मला इतकं खंबीर बनवलंय की तिलाही उत्तरदायी नाही, असं मोकळेपणाने म्हणू शकतो. माझी आई हीच आता माझं बाळ झाली आहे. त्यामुळे मी तिची खरोखरच लहान मुलासारखी काळजी घेतो. माझ्या घरातला आणि कंपनीतलाही मी कर्ता पुरुष आहे. मला हवं तसं मी ते चालवतो. आता मला कुणालाही खूश करण्याची गरज वाटत नाही. पूर्वीपेक्षा आता मी लोकांना सहजपणे स्पष्ट नकार देऊ शकतो. पूर्वीपेक्षा जास्ती वेळा होकारसुद्धा देतो.

माझ्या व्यक्तिमत्त्वात प्रामाणिकपणा प्रकर्षानं आला आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये तो आजच्या इतक्या तीव्रतेनं कधीच नव्हता. कारण व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात फार प्रामाणिक असायची गरज नाही, असं मला वाटायचं. पूर्वी, अशी एक वेळ होती की, इतर निर्माते-दिग्दर्शक काय करत आहेत, हे जाणून घेणं मला फार महत्त्वाचं वाटत असे. इतर दिग्दर्शक माझ्यापेक्षा खूप चांगले सिनेमे बनवत आहेत, ही भावना एकेकाळी माझ्या मनात इतकी ठाण मांडून बसली होती की, तिनं थोडंफार हेवा-द्वेष आणि स्पर्धा भावनेचंच रूप घेतलं होतं. ‘इतरांच्या चांगल्या कामाचा स्वीकार कर. त्यातूनच आपलं कामही अधिक चांगलं होईल.’ असं मी स्वत:ला नेहमी सांगायचो. पण मी तेवढा प्रामाणिक होऊ शकत नव्हतो. कुणाला न दुखवता, वाईटपणा न घेता मी गोष्टी करत राहिलो. पण खरं सांगायचं तर मला इतरांचा हेवा वाटत होता. इतका की, कधी कधी इतर दिग्दर्शकांचे सिनेमे जेवढे चालत होते, तसे चालू नयेत, यशस्वी होऊ नयेत, असा विचारही माझ्या मनात येत असे. संजय लीला भन्साळीच्या बुद्धिमत्तेमुळे मी थिजून जायचो. राजकुमार हिरानीप्रमाणे आपण सिनेमा लिहू शकत नाही, या विचारानेही मला त्रास व्हायचा. आता मात्र माझ्या मनात असे विचार येत नाहीत. आज परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. त्या दिग्दर्शकांनी एखादा उत्तम सिनेमा बनवला की, मला फार आनंद होतो. सिनेमा यशस्वी झाला की त्यांच्यासाठी छान वाटतं. त्यांना चांगले पैसे मिळाले, त्याबद्दल बरं वाटतं. ‘आगे बढो’, असं म्हणून मी कामाला लागतो.

हे कसं घडलं, याबद्दल मला आश्चर्य वाटतं. कधी कधी वाटतं, अशी काय जादू होती, जी विरून गेली? पण विचार केला, तर तेही खरं नाही. कारण माझ्या एडिटिंग रूममध्ये मी अगदी उत्साहानं काम करतोच. जेव्हा ‘ऐ दिल है मुश्कील’च्या निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात होतो, तेव्हा हे प्रकर्षानं लक्षात आलं. माझी पॅशन यत्किंचितही कमी झालेली नाही, पण आता आयुष्यातले प्राधान्यक्रम मात्र बदलले आहेत. आता माझ्या सिनेमानं १०० कोटी कमावले आहेत की, १५० कोटी याची मला फिकीर नसते. मी चांगला सिनेमा बनवलाय आणि त्याच्याशी संबंधित सर्व लोकांना व्यवस्थित पैसे मिळाले आहेत, एवढ्यावर मी खूश असतो. कारण ज्या लोकांनी माझ्यासाठी गुंतवणूक केलेली असते, त्यांच्यासाठी मी स्वत:ला उत्तरदायी मानतो. माझ्या कंपनीतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याची भावनिक, व्यक्तिगत आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून काळजी घेण्याबाबत मी दक्ष असतो. माझ्या दृष्टीनं ही गोष्ट सर्वांत महत्त्वाची आहे. इतर काहीही मला महत्त्वाचं वाटत नाही. त्यापलीकडे जगाला कोणतीही उत्तरं किंवा स्पष्टीकरण द्यायला मी बांधील नाही. मला माझं क्षितिज विस्तारायचं आहे का? असेलही कदाचित! ते कसं करायचं ते ठरवावं लागेल. मला एखाद्या स्टुडिओशी नातं जोडायचं आहे? मला माहीत नाही. मला वेबसिरीज बनवायच्या आहेत? कशासाठी? कोणत्याही कारणासाठी मी हृदयविकाराला आमंत्रण का देऊ? मला एखादी गोष्ट करावीशी वाटेल, तेव्हा मी करेनही. सिनेमा दिग्दर्शित करावासा वाटला, तर करेन. नाही वाटला तर बनवणार नाही. कधी मी चुका करेन. वाईट असेल, पण त्यासाठी मला जी किंमत मोजावी लागेल,  त्यामुळे त्या चुका मी पुन्हा नक्कीच करणार नाही.

अलीकडच्या काळात मला काही वेळा अपयश आलं, तर अनेकदा यश मिळालं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन्ही प्रसंगांत माझी प्रतिक्रिया कधीच टोकाची नव्हती. पूर्वीपेक्षा आज मी माझ्या व्यावसायिक क्षेत्रात खूप त्रयस्थपणे विचार करू लागलो आहे. याचा अर्थ माझा रस कमी झालाय असं अजिबात नाही. माझ्या कामावर माझं खूप प्रेम आहे. पण मी जी निर्मिती करतो, त्याच्या फळाची  मी फार पर्वा करत नाही. पूर्वी मी यशाला फार महत्त्व द्यायचो. आता वाटतं, एखादा सिनेमा पडला तर पडला. पुढचा चालेल. जर सिनेमा हिट झाला, तर छानच! पुढच्या कामाला सुरुवात करा. आता एका अर्थानं यश आणि अपयश या बाबतीत माझ्या भावना बधिर झाल्या आहेत, असं म्हणता येईल. आयुष्यात एकाच गोष्टीमुळे अतोनात आनंद होतो... मी ट्रीपसाठी गेलो आहे, हॉटेलमध्ये चेक-इन केलंय. आणि माझ्या स्वत:च्या दुनियेत निवांत रमून गेलो आहे!

मग आत्ता मी नेमका कुठे आहे? काय विचार करतोय? तर त्याबद्दल मी सुरुवातीलाच सांगितलं - मला एकदम मोकळं.... स्वतंत्र... मुक्त झाल्यासारखं वाटतंय. मी खूप आनंदात आहे. माझ्या उर्वरित आयुष्यासाठी मी सज्ज झालोय. आता काही विचार माझ्या मनात येतात. म्हणजे, मी लग्न करणार का? नाही. मी कधी हा देश सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होईन? कधीही नाही. या गोष्टी मला क्लिअर आहेत. मी काय करतोय, पुढे काय करणार आहे, हे मला माहीत आहे. मी एकटा राहणार का? तर.... कदाचित. या साऱ्यांबाबत खूप अस्पष्टता आहे, पण स्पष्टतासुद्धा आहे. पुढे काय होणार आहे, हे मला माहिती नाही, पण त्यामुळे उलट मला त्याबद्दल जास्त कुतूहल वाटतंय, उत्साह वाटतोय. कुणी माझ्या आयुष्यात अचानक गिरकी घेतल्यासारखं येईल? मी पुन्हा प्रेमात पडेन? मला माहिती नाही. याबाबत मला शंका वाटत असली आणि असं काही घडू शकेल, असं वाटत नसलं, तरी कुणी सांगावं, काहीही घडू शकतं. मला आता बहुतांश व्यक्ती वैतागवाण्या वाटतात. त्यामुळे कुणाहीबरोबर माझी बेडरूम शेअर करण्याची माझी इच्छा नाही. अगदी जरी मी रिलेशनशिपमध्ये असलो, तरी मी दोन स्वतंत्र बेडरूम्स ठेवेन. आम्हा दोघांना वेगवेगळं राहायला!

अजून एक, मी उठून कुणाकडे राहायला जाणार नाही. दुसऱ्या व्यक्तीला माझ्याकडे यावं लागेल, मला जसं हवं तसंच करावं आणि वागावं लागेल. मी ‘शुगर डॅडी’ होईन? त्यात मला काही गैर वाटत नाही. मी आता त्यासाठीही तयार आहे. कुणी माझ्या लहरींनुसार नाचायला तयार असेल, तर माझी त्यालाही हरकत नाही. पुन्हा प्रेम करायला मी तयार आहे? आता मी पूर्वीसारख्या तीव्रतेनं आणि झोकून देऊन प्रेम करू शकेन, असं मला वाटत नाही. दोन वेळा तुम्हाला ते जमू शकतं. पण तिसऱ्यांदा ते शक्य नाही. तिसऱ्यांदा मग तुमचं लग्नच होतं. आपल्या तरुण वयातली अशी प्रत्येकाची एक तरी प्रेमकथा असतेच. माझी जरा उशिराची आहे.

जर यांतलं काहीच घडलं नाही, तर मग तिसरा पर्याय आहेच- लग्न! किंवा कुणाबरोबर तरी एकत्र राहणं! आज बरेच लोक हेच करतात. माझ्या पहिल्या दोन कहाण्या जेवढ्या पॅशनेट होत्या, तशी तिसरी असेल, असं मला मुळीच वाटत नाही. त्यातून खरोखरच अगदी स्वाभाविकपणे माझ्या आयुष्यात कुणी आलं, तर छानच! पण मी त्यांच्याशी सतत संपर्क ठेवू शकत नाही. मला तर हल्ली मॅसेज टाईप करायचासुद्धा कंटाळा येतो. आळशी झालोय मी! पूर्वी मी फोनबाबतही अगदी तत्पर होतो. पण आता वाटतं, सरळ नवीन नंबर घ्यावा. आता मला लोकांशी संपर्कात राहायलाही कंटाळा येतो. हा स्वभाव माझ्या मध्येच असावा. कदाचित पन्नाशीला आलो की, मी अज्ञातवासातच जाईन, असं मला वाटतं. तसं झालं, तर तो माझ्यासाठीही आश्चर्याचा धक्काच असेल.

एका बाबतीत मात्र माझी पक्की खात्री पटली आहे. ‘ऐ दिल है मुश्कील’ नंतर मी दरवर्षी एक तरी सिनेमा करणं आवश्यक आहे. सिनेमावर माझं अत्यंत प्रेम आहे. सिनेमाची निर्मिती ही माझी पहिली आणि एकमेव पॅशन आहे. जेव्हा तुम्ही सिनेमा बनवत असता, तेव्हा आपण जणू काही देवच आहोत, असं तुम्हाला वाटायला लागतं. सूचना देणं, सर्व क्रूवर नियंत्रण ठेवणं या गोष्टी आता माझ्या व्यक्तिमत्त्वात भिनून गेल्या आहेत. मी दुसर्‍या कुणाच्या सेटवर असलो, तरी आपणच साऱ्या गोष्टींचा ताबा घ्यावा, असं मला वाटून जातं. मी काही सगळ्यांना मुठीत ठेवणारा माणूस नाही. पण अधिकारक्षमता मला मिळालेली निसर्गदत्त देणगी आहे. लोकांनी ज्याचं ऐकावं, असे आपण आहोत, असं मला नेहमी वाटायचं.

मी आता नवीन टप्प्यात प्रवेश करतोय. तिथला दरवाजा उघडतो आहे आणि आत पाऊल टाकणारच आहे. तिथे खूप उलथापालथ असेल, खूप नाट्य असेल. पण तिथेच नीरव शांतताही असेल. आणि मी त्याचा मनसोक्त आनंद घेईन...

.............................................................................................................................................

करण जोहर यांच्या या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4370

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......