मराठीतल्या बारा विनोदवीरांची मैफल जमवून त्यांच्या विनोदी लेखनाच्या वाचनाचा आस्वाद घेत घेत आपली जाण समृद्ध करणारं, त्यात भर टाकणारं ‘यांनी केलं विनोदविश्व समृद्ध’ हे प्रदीप कुलकर्णी यांनी लिहिलेलं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...
.............................................................................................................................................
ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो (४२८-३४८ इ.स.पू.) आणि त्याचा शिष्य अॅरिस्टॉटल (३८४-३२२ इ.स.पू.) या थोर तत्त्वज्ञांपासून ते आजच्या काळातल्या विचारवंतांपर्यंत अनेकांनी हास्यविनोदाविषयीचे सिद्धान्त मांडले आहेत. आपण त्यांपैकी काही निवडक सिद्धान्तांची ओळख जरी करून घेतली, तरी हास्यविनोदाचा विचार किती वेगवेगळ्या पद्धतीने झाला आहे याची कल्पना येईल.
थॉमस हॉब्ज (१५८८-१६७९) या इंग्रज तत्त्वज्ञाने विविध कारणांमुळे निर्माण होणाऱ्या हास्याच्या मुळाशी कोणत्या प्रेरणा असतात, याचा व्यापक पातळीवर शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सिद्धान्तानुसार माणसाला स्वत:च्या श्रेष्ठत्वाची जाणीव जेव्हा आकस्मिकपणे होते तेव्हा हास्य निर्माण होतं.
माणसाच्या मनामध्ये श्रेष्ठत्व निर्माण होण्यासाठी बऱ्याचदा इतरांमधली वैगुण्यं कारणीभूत असतात. आपण इतरांच्या मूर्खपणाला, अज्ञानाला किंवा इतर वैगुण्यांना हसतो, कारण ती वैगुण्यं निदान त्या क्षणी तरी आपल्यात नाहीत याची जाणीव होते. त्यामुळे आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत हे लक्षात येतं आणि ही जाणीव सुखद असल्यामुळे हसू येतं.
हॉब्जच्या सिद्धान्ताची प्रचीती दैनंदिन आयुष्यात आपल्याला काही वेळा येते. उदाहरणार्थ, एखादा माणूस निसरड्यावरून घसरून पडताना पाहिला की आपल्याला हसू येतं. याचं कारण तो पडला, पण आपण ताठ उभे आहोत, या विचाराने आपल्या मनात आकस्मिकपणे श्रेष्ठत्वाची (superiority) भावना उत्पन्न होते आणि हसू येतं. समजा, आपणही त्या माणसाबरोबर घसरून पडलो, तर अशा वेळी आपल्याला हसू तर येणारच नाही; उलट त्याच्याबद्दल सहानुभूती वाटेल. एखादा माणूस पूर्वकल्पना देऊन रस्त्यात घसरून पडला तर आपल्याला हसू येणार नाही, कारण या घटनेत आकस्मिक असं काही नाही. हास्यनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आकस्मिकतेला किती महत्त्व असतं हे या उदाहरणावरून लक्षात येईल.
थॉमस हॉब्जची काही निरीक्षणं पटण्यासारखी असली, तरी त्याचा सिद्धान्त सर्व प्रकारच्या विनोदांना लागू पडत नाही. स्वत:ची थट्टा करणाऱ्या विनोदामुळे, तसंच व्यंगरहित - म्हणजेच विशुद्ध विनोदामुळे ऐकणाऱ्याच्या मनात श्रेष्ठत्वाची भावना उत्पन्न होण्याचं कारण नाही. पण प्रत्यक्षात अशा तऱ्हेच्या विनोदामुळेही हास्य निर्माण होतं, हे आपल्याला ठाऊक आहे. त्यामुळे हॉब्जच्या सिद्धान्ताला मर्यादा आहेत असं म्हटलं पाहिजे.
जे.सी. ग्रेगरी यांनी हास्याची मीमांसा करताना तणावमुक्तीच्या (relief) कल्पनेला महत्त्व दिलं आहे. माणसाला तणावापासून मुक्ती मिळाली की आनंद होतो आणि या आनंदापोटी हास्य उमटतं, या ग्रेगरींनी मांडलेल्या सिद्धान्ताचा पडताळा आपल्याला अनेकदा येतो. उदाहरणार्थ, परीक्षा संपली की विद्यार्थी हसताना, खिदळताना दिसतात; फाशीची शिक्षा अचानक रद्द झाल्याचं कळताच कैद्याच्या चेहऱ्यावर हास्य झळकतं, एखादं महासंकट टळलं की माणसं जल्लोष करतात, एखादी अटीतटीची मॅच जिंकली की जेत्या टीमच्या हास्याला आणि आनंदाला उधाण येतं.
आनंदामुळे माणूस हसतो हा विचार विल्यम मॅक्डुगल (१९७१-१९३८) या मानसशास्त्रज्ञाला मान्य नव्हता. जगातली दु:खं हाच हास्यविनोदाचा विषय आहे असं त्याचं मत होतं. माणसाच्या जीवनात हास्य नसतं, तर विविध प्रकारच्या दु:खांमुळे आपण आपलं मानसिक स्वास्थ्य गमावून बसलो असतो. त्यामुळे दु:खावर उतारा म्हणून निसर्गाने हास्य निर्माण केलं असावं असं त्याने म्हटलं आहे. हास्यामुळे निराशाजनक आणि उदासवाणे विचार तात्पुरते का होईना मनातून दूर होतात. म्हणूनच, मानसिक स्वास्थ्यासाठी हास्य अनुकूल आहे हा महत्त्वाचा विचार त्याने मांडला.
विनोद हा मानवी दु:खांवर आधारलेला आहे हा विचार आचार्य अत्रेंनीसुद्धा मांडला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे - (प्रल्हाद केशव अत्रे, ‘विनोदगाथा’, पृ. २३४-२३५)
जगात नाना तऱ्हेची दु:खे आहेत.... अनंत दु:खांनी भरलेल्या या जगात असहाय माणसाने कसे जगावयाचे? ही दु:खे नाहीशी करण्याचे सामर्थ्य तर त्याच्या अंगी नाही. पण निदान या दु:खाच्या नांग्या त्याला तोडता आल्या आणि त्याच्या यातना त्याला कमी करता आल्या किंवा नष्ट करता आल्या, तरी तेवढे त्याला पुरे आहे. जगातील दु:खांकडे गांभीर्याने पाहिले तर ती वाढतात आणि खेळकरपणाने पाहिले तर ती कमी होतात हे ज्या माणसाच्या पहिल्याने लक्षात आले, तो विनोदाचा खरा जनक असे म्हणावयाला काही हरकत नाही. दु:खांना हसावयाचे, ती हसण्यावारी न्यावयाची, हसून हसून ती विसरून जावयाचे, हा विनोदाचा खरा हेतू आहे. जगातील दु:खे हाच विनोदाचा खरा विषय आहे.
हेन्री बर्गसाँ या फ्रेंच तत्त्वज्ञाने हास्यविनोदाची मीमांसा करणारा ‘Le Rire’ हा फ्रेंच भाषेत लिहिलेला ग्रंथ १९०० साली प्रसिद्ध झाला. या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद ‘Laughter’ या नावाने १९११ साली प्रसिद्ध झाला. त्यात त्याने असं म्हटलं आहे की, विनोद हे फक्त मानवाचं वैशिष्ट्य आहे. काही वेळा प्राण्यांमुळे हास्य उत्पन्न होऊ शकतं, पण तेही त्यांमध्ये जेव्हा एखादं मानवी वैशिष्ट्य आढळतं तेव्हाच! बर्गसाँच्या सिद्धान्ताची प्रचीती आपल्याला दैनंदिन आयुष्यात येते. उदाहरणार्थ, एखादं माकड केळं सोलून खाताना दिसलं किंवा आपण त्याच्यापुढे टाकलेले दाणे हाताने उचलून तोंडात टाकताना पाहिलं की आपल्याला गंमत वाटते आणि चेहऱ्यावर स्मितरेषा उमटते. त्याचप्रमाणे
सर्कशीमधले प्राणी जेव्हा दोन पायांवर चालतात किंवा स्टुलावर बसतात तेव्हाही आपल्याला हसू येतं, कारण आपल्याला प्राण्यांमध्ये मानवाची वैशिष्ट्यं पाहायला मिळतात.
बर्गसाँने हास्यविनोदाच्या संदर्भात अनेक सिद्धान्त मांडले आहेत. त्यांतला सर्वांत महत्त्वाचा सिद्धान्त माणसातल्या चैतन्यशक्तीशी संबंधित आहे. बुद्धी, भावना, अंत:प्रेरणा, उत्स्फूर्तता, प्रसंगावधान, हालचालींमधला-विचारांमधला लवचिकपणा ही चैतन्याची काही लक्षणं आहेत. पण तोचतोपणा, ठराविकपणा, बुद्धीचा - अंत:प्रेरणेचा आणि लवचिकपणाचा अभाव, त्याच त्या गोष्टींची पुनरावृत्ती, अनवधान; ही यंत्रांची लक्षणं आहेत. चैतन्याचा अभाव असलेली ही लक्षणं माणसामध्ये दिसली की विनोद निर्माण होतो, असं बर्गसाँचा सिद्धान्त सांगतो.
माणूस यंत्रासारखा वागू लागला की, विनोदनिर्मिती कशी होते याचं उत्तम उदाहरण म्हणजे चार्ली चॅप्लिनचा ‘मॉडर्न टाइम्स’ हा चित्रपट! या चित्रपटात चार्ली चॅप्लिनने एका कारखान्यातल्या ‘असेम्ब्ली लाईन’वर काम करणाऱ्या कामगाराची भूमिका केली आहे. ‘असेम्ब्ली लाईन’वर तयार होणारी वस्तू समोर आली की, तिच्यावरील स्क्रू पान्याने पिळायचे, हे एकच काम तो दिवसभर करत असतो. वर्षानुवर्षं हेच काम केल्यामुळे त्याच्या हाताला स्क्रू पिळण्याची इतकी सवय लागते की, तो काम संपवून घरी आल्यानंतरही सतत स्क्रू पिळण्याची हालचाल करत राहतो. हे दृश्य पाहिल्यानंतर चित्रपटगृहात हास्याचा स्फोट होतो, कारण प्रेक्षकांना हा कामगार एखाद्या यंत्रासारखा वाटतो.
हुबेहूब एकसारखी दिसणारी जुळी भावंडं पाहिली की, आपल्या चेहऱ्यावर स्मितरेषा का उमटते याचा उलगडा बर्गसाँच्या सिद्धान्ताने होतो. एक यंत्र हुबेहूब दुसर्या यंत्रासारखं असू शकतं, पण जगातल्या कुठल्याही एका माणसाचा चेहरा दुसऱ्या माणसासारखा नसतो, असं आपण गृहीत धरलेलं असतं. म्हणूनच जुळ्या भावंडांकडे पाहताना आपल्याला त्यांच्या चेहर्यात यंत्राची लक्षणं दिसली की हसू येतं.
विनोदामुळे हास्यनिर्मिती होण्यासाठी काही घटकांची आवश्यकता असते. विनोदामुळे हसू येतं असा आपला अनुभव असल्यामुळे आपण सांगितलेल्या विनोदाला श्रोत्यांनी हसून प्रतिसाद द्यावा अशी आपली अपेक्षा असते. पण काही वेळा असा अनुभव येतो की, श्रोते एखाद्या विनोदाला अजिबात हसत नाहीत. याचं एक कारण हे असू शकतं की, अशा विनोदात हसण्यासारखं काही नसतंच. म्हणजेच विनोदाच्या ‘मजकुरा’मध्ये (’आशया’मध्ये) हास्याची बीजं नसतात. दुसरी शक्यता अशी की, विनोद कसा सांगावा याचं तंत्र (‘अभिव्यक्ती वैशिष्ट्य’) योग्य तऱ्हेने वापरलेलं नसतं. म्हणूनच हास्यनिर्मितीसाठी विनोदाचा आशय आणि तंत्र हे दोन्ही घटक आवश्यक असतात.
विनोदाचा आशय जरी हास्य उत्पन्न करू शकणारा असला, तरी तो अशा तऱ्हेने सांगावा लागतो की, ज्यामुळे श्रोत्यांची किंवा वाचकांची अपेक्षा काही काळ ताणली जाईल आणि ती पुरेशी ताणली गेल्यावर अचानक कलाटणी मिळून हास्यनिर्मिती होईल. विनोदामध्ये कलाटणी देण्याचं काम ‘पंच लाइन’ करते. श्रोत्यांना या कलाटणीचा थोडासा जरी सुगावा लागला, तरी एखाद्या फुग्यातली हवा निघून जावी तशी विनोदातली गंमत निघून जाते. म्हणूनच हास्यनिर्मितीमध्ये अचानकपणे आणि अनपेक्षितपणे मिळालेल्या कलाटणीला महत्त्व असतं. अपेक्षा आणि त्यांना मिळालेली कलाटणी यांच्यातील दरी जेवढी मोठी, तेवढा हास्याचा स्फोट अधिक मोठा!
२.
विनोदाचं वर्गीकरण त्याच्या प्रकारांवरून केलं जातं. प्रसंगनिष्ठ, स्वभावनिष्ठ आणि शब्दनिष्ठ ही विनोदाचं वर्गीकरण करण्याची एक पद्धत; तर उपहास, उपरोध, परिहास आणि कोटी ही वर्गीकरणाची दुसरी पद्धत! उपहास या विनोदाच्या प्रकाराचं वैशिष्ट्य हे की, त्यात कुठल्या ना कुठल्या व्यंगाचं, दोषाचं किंवा विसंगतीचं दर्शन घडवून त्याची थट्टा केलेली असते. उपहासामध्ये अतिशयोक्ती आणि विडंबन या तंत्रांचा वापर प्रामुख्याने केलेला असतो. समाजात किंवा मानवी स्वभावात रोजच्या रोज विसंगती पाहण्याची इतकी सवय आपल्याला झालेली असते की, अतिपरिचयाने बऱ्याचशा विसंगती जाणवतही नाहीत. त्या ठसठशीतपणे जाणवाव्यात म्हणूनच उपहासामध्ये बऱ्याचदा अतिशयोक्तीचा वापर केलेला असतो. हेच तंत्र व्यंगचित्रांमध्येसुद्धा वापरलेलं असतं.
विशिष्ट व्यक्तीचा उपहास न करता प्रवृत्तीचा उपहास करणारा आणि उपहासाचं लक्ष्य झालेल्या विषयाबद्दल तिरस्कार उत्पन्न न करणारा विनोद चांगल्या दर्जाचा मानला जातो. मानवी स्वभावात आणि समाजात विविध प्रकारच्या विसंगती असणारच, आणि त्याकडे क्षमाशील वृत्तीने आणि खेळकरपणे पाहिलं पाहिजे असा समंजस आणि उदार दृष्टिकोन ठेवला, तर उपहासामध्ये चीड, संताप, द्वेष, आकस या भावना दिसून येणार नाहीत. त्याचप्रमाणे त्याला वैयक्तिक कुचाळकीचं स्वरूपही येणार नाही. माणसाविषयीचा जिव्हाळा, स्नेहभावना आणि प्रसन्न वृत्ती जर विनोदकाराकडे असेल, तर त्याच्या विनोदात आकस येणार नाही.
३.
उपहासाप्रमाणेच उपरोधामध्येसुद्धा दोष दाखवण्याचा हेतू असतो. पण हे साध्य करण्याची पद्धत दोन्हींमध्ये वेगवेगळी असते. उपहासामध्ये सरळ अर्थाने आणि थेट टीका केलेली असते. उपरोधामध्ये ती आडमार्गाने केलेली असते आणि त्यासाठी वक्रोक्तीचा आश्रय घेतला जातो. विनोदनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या वक्रोक्तीविषयी चिं.वि. जोशी यांनी ‘हास्य चिंतामणी’ या आपल्या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत असं म्हटलं आहे - (पृ.३६-३७)
वक्रोक्ती म्हणजे आपल्याला जे सांगायचे ते सरळपणे न सांगता आडमार्गाने सांगणे. ‘लेकी बोले सुने लागे’ या न्यायाने एखाद्या विषयाबद्दल किंवा व्यक्तीबद्दल आपण बोलत आहोत, असा भास दाखवून आपले म्हणणे श्रोत्यांच्या मनावर बिंबविणे, ही वक्रोक्ती.
उपरोध हा बऱ्याचदा वैयक्तिक पातळीवरचा असतो. अर्थात, प्रवृत्तीची निर्भर्त्सना करण्यासाठीही उपरोधाचा वापर केला जातो. त्यामागे बर्याचदा राग आणि संताप असतो. टोचून बोलून किंवा लिहून दुसऱ्याला दु:ख देणं, त्याला विद्ध करणं हा उपरोधाचा हेतू असतो. उपरोधाचं स्वरूप अशा तऱ्हेचं असल्यामुळे मनात सुखद भावना उत्पन्न होत नाही आणि त्यामुळे हास्यनिर्मितीही होत नाही. म्हणूनच ज्येष्ठ समीक्षक डॉ. गो. मा. पवार उपरोधाला विनोदाचा प्रकार मानत नाहीत.
४.
विनोदाच्या माध्यमातून समाजातल्या अनेक प्रकारच्या विसंगतींवर टीका करत येत असल्यामुळे, जगातला बराचसा विनोद विसंगतींवर आधारलेला असतो हे जरी खरं असलं, तरी विसंगतींचं किंवा व्यंगांचं दर्शन न घडवताही विनोद साधता येतो. याचं उत्तम उदाहरण डॉ. गो.मा. पवार यांच्या ‘विनोद : तत्त्व आणि स्वरूप’ या पुस्तकात आढळतं. त्यामध्ये त्यांनी वसंत कानेटकर यांच्या ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नाटकातल्या प्रो. बल्लाळ आणि त्यांची मुलगी बब्बड यांच्यामधल्या संवादाचा दाखला दिला आहे.
५.
इंग्रजीमधील ‘विट्’ (wit)) या संकल्पनेसाठी मराठीमध्ये ‘कोटी’, तर ‘ह्यूमर’ (humour) या संकल्पनेसाठी ’विनोद’ हा शब्द वापरला जातो. दोन शब्दांची किंवा कल्पनांची चमत्कृतिपूर्ण सांगड घातली की कोटी निर्माण होते. कोटीचा जीव लहान असतो आणि परिणाम क्षणिक असतो. कोटी बुद्धीला दिपवते आणि खसखस पिकवते, पण ती भावनेला स्पर्श करत नाही. म्हणूनच, शब्दनिष्ठ विनोदापेक्षा कल्पनेवर आधारलेला विनोद श्रेष्ठ मानला जातो. कोटीच्या काही मर्यादा असल्या, तरी मार्मिक कोटी करणं हे काही सोपं काम नाही. उत्तम दर्जाची कोटी करण्यासाठी भाषाप्रभुत्व, बुद्धीचं चापल्य, कल्पकता आणि तल्लख विनोदबुद्धी या गुणांची आवश्यकता असते. सहजता आणि उत्स्फूर्तता ही चांगल्या कोटीची लक्षणं असतात.
शाब्दिक कोट्यांमध्ये एकाच शब्दातून अनेक अर्थ सूचित करणं, ध्वनिसाधर्म्य असलेले शब्द वापरणं, यांसारख्या तंत्रांचा वापर केला जातो.
शाब्दिक क्रीडेतून जशी कोटी निर्माण होते, तशी कल्पनांशी क्रीडा करतानाही होते. अशा कोट्या साधण्यासाठी विनोदकार विविध तंत्रं वापरतात. त्यांतली प्रमुख तंत्रं म्हणजे स्थानांतर, तर्काला हुलकावणी देणं, कार्यकारणभाव झुगारून देणं, सत्य बोलणं, व्याजोक्ती, तसंच उदात्त आणि क्षुद्र कल्पना एकत्र आणणं.
स्थानांतर या विनोदाच्या तंत्रामध्ये अभिप्रेत गोष्टीला महत्त्वाचं स्थान न देता आपल्याला जे अभिप्रेत नाही त्या गोष्टीला महत्त्वाचं स्थान दिलं जातं. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून ज्ञान संपादन करावं हे आपल्याला अभिप्रेत असतं. पण ‘व्यंकूची शिकवणी’ या द.मा. मिरासदार यांच्या कथेतला व्यंकू शिकवणीच्या मास्तरांकडून अभ्यासाचा एकही विषय शिकत नाही. उलट तो मास्तरांनाच काही अनिष्ट गोष्टी शिकवतो. या कथेमध्ये शिक्षक व्यंकूला काय शिकवतात यापेक्षा व्यंकू शिक्षकांना काय शिकवतो याला अधिक महत्त्व दिलं आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अपेक्षित भूमिकांमध्ये स्थानांतर (अदलाबदल) झाल्यामुळे जी विसंगती निर्माण होते, ती लक्षात आली की हसू येतं.
मूळ विषयाकडे असलेला विचारांचा ओघ दुसरीकडे वळवला जाणं आणि ज्या गोष्टीला महत्त्व आहे, त्याकडे दुर्लक्ष करून भलत्याच गोष्टीला महत्त्व देणं यालाही स्थानांतर म्हणतात. (खरं तर, याला विषयांतर म्हटलं पाहिजे!) पु.ल. देशपांडे यांच्या ‘म्हैस’ या कथेत या तंत्राचा वापर करून हास्यनिर्मिती केली आहे.
६.
कोटी या विनोदाच्या प्रकाराची चर्चा करताना ‘श्लेष’ या भाषिक अलंकाराचा उल्लेख केला पाहिजे. एखादा शब्द दोन अर्थांनी वापरून जशी कोटी साधता येते, तसा श्लेषही साधता येतो. त्यामुळे कोटी आणि श्लेष यांमध्ये नेमका फरक काय असा प्रश्न कोणाच्याही मनात उद्भवू शकेल. त्याचं उत्तर हे की, कोटी करण्याचा उद्देश हास्य निर्माण करणं हाच असतो. पण श्लेषामध्ये केवळ शब्दचमत्कृती साधण्याचा हेतू असतो.
‘सुंदर चेहऱ्याचा मुका कुणाला आवडणार नाही’, हे श्लेषाचं एक उदाहरण आहे. ‘मुका’ म्हणजे ‘चुंबन’ आणि ‘बोलता न येणारा’, असे दोन अर्थ सूचित करून श्लेष साधला आहे.
श्लेषाप्रमाणे व्याजोक्ती हासुद्धा भाषेचा एक अलंकार आहे. एखाद्या गोष्टीचं खरं कारण लपवून दुसरंच कारण दिलं किंवा आपल्याला जे म्हणायचं आहे, त्याच्या विरुद्ध अर्थाचं विधान केलं की व्याजोक्ती हा अलंकार होतो.
बऱ्याचदा उदात्त आणि क्षुद्र कल्पनांचा मेळ घातला की हास्यनिर्मिती होते. उदाहरणार्थ, ‘प्लेटो गेला, अॅरिस्टॉटल गेला, न्यूटन गेला, आइनस्टाइन गेला आणि गेल्या आठवड्यापासून माझीही तब्येत ठीक नाही’, असं एखाद्या सर्वसामान्य माणसाने म्हटलं की हास्य निर्माण होतं. याचं कारण एखादा सामान्य माणूस आपलं नाव महान लोकांच्या बरोबरीने घेईल अशी आपली अपेक्षा नसते. त्यामुळे सामान्य माणसाने स्वत:ला महान लोकांच्या पंगतीत बसवलं की त्यातली विसंगती लक्षात येते आणि हसू येतं.
हास्यनिर्मितीचं हे तंत्र वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की, ज्याच्याशी तुलना करायची ती गोष्ट किंवा व्यक्ती जितकी असामान्य आणि महान, आणि ज्याची तुलना करायची ती गोष्ट किंवा व्यक्ती जितकी सामान्य आणि क्षुद्र, तितकी अपेक्षेला मिळणारी कलाटणी अधिक मोठी असते. त्यामुळेच त्यातून निर्माण होणारा हास्याचा स्फोटही मोठा असतो.
आशयाला अजिबात महत्त्व न देता तंत्राला महत्त्व देणारा एकमेव तत्त्वज्ञ म्हणजे इमॅन्युएल कांट! त्याने असा सिद्धान्त मांडला की, अपेक्षा ताणल्या जाणं आणि आणि त्यांची पूर्ती न झाल्यामुळे त्यातून काही निष्पन्न न होणं, यांमुळे अपेक्षाभंग होतो आणि हास्य उत्पन्न होतं. हा विचार मांडताना त्याने कोटी या विनोदाच्या प्रकाराचा विचार केला आहे, कारण बहुसंख्य कोट्यांमध्ये आशयाचा भाग नगण्य असतो आणि तंत्रालाच महत्त्व दिलेलं असतं.
७.
सिगमंड फ्रॉइड या मानसशास्त्रज्ञाने कोटी या विनोदाच्या प्रकाराचा विचार मनोविश्लेषकाच्या भूमिकेतून केला. त्यांनी कोटीचं मूळ अबोध (subconscious)) मनात शोधायचा प्रयत्न केला. त्याच्या मते माणसाच्या अबोध मनात ज्या अतृप्त इच्छा दडपलेल्या असतात, त्यांतून कोटीची निर्मिती होते. ही अतृप्त इच्छा लैंगिक विषयाशी संबंधित असेल, तर त्यातून अश्लील कोटीचा जन्म होतो; आणि अतृप्त इच्छा आक्रमणाची असेल, तर आक्रमणाचा आशय असलेल्या कोटीचा जन्म होतो.
विनोद आणि कोटी यांच्या निर्मितीमध्ये अतिशयोक्ती आणि विडंबन या दोन तंत्रांचा वापर बर्याचदा केलेला असतो. म्हणूनच या दोन तंत्रांची वैशिष्ट्यं समजून घेतली पाहिजेत. एखादी घटना, प्रसंग किंवा अनुभव वास्तवापेक्षा खूप फुगवून सांगणं म्हणजे अतिशयोक्ती. प्रत्येक अतिशयोक्त विधानातून हास्य निर्माण होईलच असं नाही. अतिशयोक्तीने हास्य निर्माण होण्यासाठी आपण करत असलेल्या विधानात असंभवनीयता (improbability) आणि मिश्कीलपणा या दोन्हींचं मिश्रण असावंच लागतं. आपण रोजच्या बोलण्यातसुद्धा अनेक वेळा अतिशयोक्तीचा वापर करतो. उदाहरणार्थ, ‘मी त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं’, ‘तो खोऱ्याने पैसा ओढतो’, ’त्याच्याकडे पैशांचं झाड आहे’, ‘माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली’, ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’. ही विधानं अतिशयोक्त असली, तरी त्यातून हास्य निर्माण होत नाही, कारण त्याला मिश्कीलपणाची जोड नाही.
अतिशयोक्ती आणि मिश्कीलपणा या दोन गोष्टी एकत्र आल्या की, हास्य कसं निर्माण होतं हे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या पुढच्या कोटीवरून लक्षात येईल.
एकदा ते म्हणाले की, ‘आमच्या गावातला एक रस्ता इतका वळणावळणांचा आहे की, त्या रस्त्याने चालताना मला माझीच पाठ दिसायला लागली.’
८.
अतिशयोक्तीविषयी चर्चा करताना ‘उनोक्ती’ (understatement) या विनोदनिर्मितीच्या तंत्राचाही उल्लेख केला पाहिजे. मोठ्या गोष्टीला लहान स्वरूप देणं हे उनोक्तीचं लक्षण आहे. उदाहरणार्थ, सहा फुटांहून अधिक उंची असणाऱ्या एखाद्या माणसाने ‘माझी उंची बेताचीच आहे’ असं म्हणणं ही उनोक्ती झाली. न्याहारीसाठी चार केळी, एक सफरचंद, दोन अंडी, वाटीभर शिरा आणि एक ग्लासभर दूध एवढा आहार घेतल्यानंतर ‘आज मी माफक न्याहारी केली’, असं म्हणणं हीसुद्धा उनोक्तीच आहे.
विनोदनिर्मितीचं एक महत्त्वाचं तंत्र म्हणजे विडंबन! विडंबन म्हणजे काय आणि विडंबनाची प्रेरणा कुठून मिळते, याविषयी डॉ. स.गं. मालशे यांनी असं म्हटलं आहे - (स.गं. मालशे, ‘आवड-निवड’, पृ. ४२-४३)
अनुकरण किंवा नक्कल करणे ही माणसाची जन्मजात प्रवृत्ती आहे. ‘हम्मा’ कशी हंबरते, आजोबा कसे चालतात, बाबा कसे रागावतात, आई डोळे कशी वटारते, यांसारख्या गोष्टी मुलं वयाच्या तिसऱ्अयआ-चौथ्या वर्षापासूनच हुबेहूब करून दाखवतात. विडंबनाचं मूळ या जन्मजात मानवी प्रवृत्तीत शोधता येण्यासारखं आहे.
पुष्कळ वेळा मूळ कृतीतील विक्षिप्तपणा, वेगळेपणा आणि भडकपणा नकलेला प्रेरणा देतो. मूळ कृतीतील दोषांमुळे आपल्या तारतम्याला धक्का बसला की, या दोषांची थट्टा करावीशी वाटते. थट्टा म्हटली की वेडावून दाखवणे आले. वेडावून दाखवताना मूळ लकबी वाढवून दाखवण्याची प्रवृत्ती असल्यामुळे, त्यात अतिशयोक्ती येते. इथेही अति झाले की हसू येते नि नक्कल करण्याची उबळ येते. तेच विडंबन.
विडंबनामुळे मनोरंजन तर होतंच, पण मूळ कृतीमधले दोषही पटकन डोळ्यांत भरतात. विडंबन म्हटलं की, ते एखाद्या कवितेचं किंवा गाण्याचंच असतं असं कोणाला वाटत असेल, तर तो गैरसमज आहे. जशी पद्यविडंबनं असतात, तशी गद्यविडंबनंही असतात. त्याचप्रमाणे जशी वाङ्मयीन विडंबनं असतात, तशी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतल्या अनिष्ट प्रवृत्तींना हास्यास्पद करणारी विडंबनंही असतात.
काही विडंबनांमध्ये एखाद्या कवितेचं अनुकरण करून सामाजिक दोषांची किंवा मानवी स्वभावातल्या दोषांची खिल्ली उडवली जाते. त्याचा एक नमुना म्हणून समर्थ रामदासांच्या ‘मनाच्या श्लोकां’चं अनुकरण करून मानवी स्वभावातल्या दोषांची थट्टा करणाऱ्या अत्रेंच्या विडंबनकाव्याचं उदाहरण देता येईल.
विडंबनाबद्दल अनेक जणांचे गैरसमज असतात. मूळ कलाकृतीमधल्या शब्दांमध्ये मामुली फेरफार करून काहीतरी गंमत करणं म्हणजे विडंबन अशी काही जणांची समजूत असते. मात्र अशी समजूत उथळ आहे. उत्तम गद्यविडंबन किंवा पद्यविडंबन करण्यासाठी ज्याचं विडंबन करायचं त्या विषयाची सखोल माहिती असणं, त्या विषयावर प्रभुत्व असणं, त्या विषयातल्या अभिजात परंपरांची माहिती असणं, तसंच त्या विषयातल्या बारीकसारीक दोषांची, विसंगतींची आणि लकबींची जाणीव असणं आवश्यक असतं. त्याखेरीज, खेळकर वृत्तीची आणि तरल विनोदबुद्धीचीही आवश्यकता असते.
‘मी विडंबनकार कसा झालो’ या लेखात आचार्य अत्रे यांनी विडंबनाविषयी काय म्हटलं आहे पाहा - (केशवकुमार, ’झेंडूची फुले’, पृ. १५९-१६०)
‘विडंबन’ या शब्दाचा अर्थ ‘हास्यास्पद नक्कल करणे’ किंवा ‘वेडावण्या दाखविणे’, असा होत असल्याने आणि ‘विडंबना’चे ‘विटंबने’शी अधिक साम्य असल्यामुळे सदर वाङ्मयप्रकार हा अनिष्ट आहे असा सामान्य माणसाच्या मनावर एक संस्कार होत असतो. तो मात्र बरोबर नव्हे, असे मला या ठिकाणी आग्रहाने सांगावयाचे आहे.... ज्या काव्याचे विडंबन करावयाचे किंवा ज्या कवीचे विडंबन करावयाचे ते काव्य आणि तो कवी लोकप्रिय असायला हवा. तरच त्याच्या विडंबनाचा आस्वाद वाचकांना घेता येईल. मूळ काव्य जितके प्रसिद्ध तितकी त्याच्या विडंबनाची गोडी अधिक. लुंग्यासुंग्या कवीचे किंवा काव्याचे विडंबन मुळी होऊच शकत नाही. आणि झाले तर ते वाचणार कोण? आणि समजणार कोणाला?
एखाद्या कवीचे विडंबन करणे म्हणजे त्याबद्दल अप्रत्यक्षपणे आदर व्यक्त करण्यासारखेच आहे. विडंबनकाव्याचे हे स्वरूप एकदा लक्षात आले म्हणजे विडंबनकाराबद्दल कोणाचाही गैरसमज होणार नाही.... उलट विडंबनकार हा पुष्कळांना आपला उपकारकर्ताच आहे असे वाटेल!
विनोदनिर्मितीच्या वेगवेगळ्या तंत्रांची चर्चा करताना, वाक्यातल्या विरामचिन्हांची जागा बदलूनदेखील काही वेळा विनोद कसा उत्पन्न होऊ शकतो, त्याचं एक उदाहरण आठवलं. ते असं -
रस्त्याचं खोदकाम चालू असताना ‘Go slow, work is in progress’ अशी पाटी आपण अनेकदा वाचतो. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांनी एका व्यंगचित्रात या वाक्यातल्या स्वल्पविरामाची जागा बदलून ते असं लिहिलं - Go, slow work is in progress.’
केवळ स्वल्पविरामाची जागा बदलून लक्ष्मण यांनी जो विनोद साधला आहे, तो सामान्य नाही. कारण सत्य परिस्थितीचं दर्शन घडवताना तो सरकारच्या अकार्यक्षमतेवर नेमकं बोट ठेवतो.
वाक्यातले स्वल्पविराम काढूनच टाकले तर विनोद कसा उत्पन्न होऊ शकतो, याचंही एक उदाहरण सांगता येईल. ते असं -
‘तू, माझी बायको, मी, तुझा नवरा असे आपण सिनेमाला जाऊ’ असं लिहिण्याऐवजी ‘तू माझी बायको मी तुझा नवरा असे आपण सिनेमाला जाऊ’, असं एखाद्या पुरुषाने एखाद्या विवाहित स्त्रीला लिहिलं तर वाक्याचा अर्थ बदलल्यामुळे विनोद निर्माण होतो. (हा विनोद आचार्य अत्रेंच्या नावावर सांगितला जातो. खरं-खोटं कोणास ठाऊक!)
विनोदाच्या विविध प्रकारांचा आणि विनोदनिर्मितीच्या विविध तंत्रांचा, वापर करून लेखकांनी जे लेखन केलं, त्यामुळे आधुनिक मराठी साहित्यातल्या विनोदी वाङ्मयाचं दालन समृद्ध झालं.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4371
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment