अजूनकाही
ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांचे ‘शिष्टाईचे इंद्रधनू’ हे पुस्तक नुकतेच रोहन प्रकाशनतर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तिचे हे पुनर्मुद्रण…
.............................................................................................................................................
विजय नाईक यांच्या ‘शिष्टाईचे इंद्रधनू’ पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना मला खूप समाधान वाटत आहे. याची कारणं अनेक आहेत. मुख्य म्हणजे विजयची व माझी मैत्री गेल्या अडीच-तीन दशकांची आहे. दुसरे म्हणजे मराठीतील ते सगळ्यात जुने दिल्लीतील पत्रकार असावेत. तिसरी गोष्ट म्हणजे, शिष्टाईच्या जगतावर नियमितपणे लिहिणारे ते एकमेव पत्रकार असावेत. चौथी गोष्ट म्हणजे, या क्षेत्रात त्यांनी परराष्ट्र धोरणावर सातत्याने अध्ययन, लेखन व वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांच्या ‘इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन अफेअर्स करस्पाँडन्ट्स (आयएएफएसी)’ या संस्थेच्या प्रमुखाची (निमंत्रक पदाची) जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. आणि पाचवी या पुस्तकाशी थेट निगडित गोष्ट म्हणजे, हे पुस्तक वाचनीय तर आहेच, पण संग्राह्य झालं आहे. म्हणून सर्वप्रथम मी विजयचं मन:पूर्वक अभिनंदन करतो.
जेव्हा भारत पारतंत्र्यात होता, तेव्हा स्थानिक राजे, महाराजे, सरदार-दरकदार यांचा परकीय सत्तांशी थेट संबंध येत असे. उदा. शिवराज्याभिषेकाच्या चित्रात काही गोरे युरोपीय वकील हातात भेटवस्तू घेऊन आलेले दिसतात. राज्य सांभाळताना अरबी, फारसी, अफगाण त्याचप्रमाणे पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच इत्यादींशी या राजा-महाराजांचा संबंध येत होता. म्हणजे, तिथेही ‘शिष्टाई’ होतीच. पेशव्यांचे युद्ध असो वा वसईचा तह - शांततेसाठी व युद्ध टाळण्यासाठी, युद्धात व युद्धानंतरही शिष्टाई महत्त्वाची ठरते. अफझलखानाची आणि शिवाजी महाराजांची भेट ही शिष्टाईच्या दृष्टीने महत्त्वाची व अभ्यासनीय आहे. शिवाजी किती धोरणी होते आणि शिष्टाईची त्यांची समज किती खोलवर होती, हे त्या प्रसंगात पुरेपूर दिसतं. दोघांनी एकच अंगरक्षक घ्यायचा, दोघांनी कोणतेही शस्त्र घ्यायचे नाही, अशा अटी असूनही व त्या पूर्ण पाळूनही शेवटी धिप्पाड अफझलखान आपल्याला केवळ त्याच्या बाहूबळाने आवळून टाकेल याचा महाराजांना अंदाज होता. त्यांच्या तपशीलवार नियोजनाने प्रतापगडच्या युद्धात अफझलखानाच्या फौजेची धूळधाण उडाली.
पण दुर्दैवाने शिष्टाईच्या अंगांचा स्वतंत्र भारतात जनतेला परिचय झाला नाही. याचा एक परिपाक म्हणून प्रादेशिक भाषेत शिष्टाईच्या जगतात वापरले जाणारे पर्यायी शब्द तयारच झाले नाहीत. आपल्याकडे ‘डिप्लोमसी’ शब्दाला चांगला पर्यायी मराठी शब्द आपण तयार करू शकलो नाही आणि असेल बापडा कुठे तरी, तो आपण वापरात आणला नाही. सर्वसाधारणपणे ‘मुत्सद्देगिरी’ या शब्दाचाही वापर केला जातो. माझ्या महाराष्ट्रातील अनेक भेटीगाठीत मला हे जाणवले की, भल्याभल्यांना उच्चायुक्त आणि राजदूत यांच्यातला फरक माहीत नसतो, मग ‘कौन्सेलर,’ ‘डीसीएम,’ ‘सीडीए’ असे शब्द समजणं अजूनच कठीण आहे.
विजय नाईक यांच्या याआधीच्या ‘साउथ ब्लॉक, दिल्ली- शिष्टाईचे अंतरंग’ या लोकप्रिय पुस्तकानंतर ते ‘शिष्टाईचे इंद्रधनू’ घेऊन मराठी वाचकांना भेटायला येत आहेत, हे आपल्या मराठीचं भाग्य आहे. यामुळे मराठी माणसाला एका अपरिचित विश्वातील कंगोरे तर कळतीलच, पण अशा पुस्तकांमुळे भाषेलाही श्रीमंती येते हे विसरता कामा नये.
दोन देशांतील किंवा अनेक देशांतील (सार्क, युनायटेड नेशन्स, ब्रिक्स) संबंधाचे आयाम असंख्य असतात. कारण हे शेवटी आपल्या मानवी जीवन व मानवी व्यवहारांशी संबंधित असतात. क्लायमेट चेंजचा या हवापाण्याशी संबंध आहे, मुंबईच्या हल्ल्यांशी आतंकवादाचा, पर्यायाने पाकिस्तानशी संबंध आहे. अन्नाच्या प्रश्नांसाठी ‘फूड अँड अॅग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन’ (एफएओ) आहे, तर दिवाळीतल्या फटाक्यांचा संबंध चीनशी असलेल्या व्यापारी संबंधांशी आहे. पाण्याचा आणि नद्यांचा प्रश्न बांगलादेशच्या संबंधात महत्त्वाचा, तर कोळ्यांच्या जीविकेचा संबंध श्रीलंकेशी आहे. थोडक्यात कोणत्या न कोणत्या रीतीने आपण जगाशी जोडले गेलेले आहोत. या संबंधातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीच्या परराष्ट्र नात्याला आपण ढोबळमानाने ‘शिष्टाई’ म्हणतो. अशा या शिष्टाईच्या जगाचे अंतरंग या ठिकाणी आपल्यासमोर ठेवून विजय नाईक यांनी उलगडून मराठी भाषेची सेवा केली आहे.
हे पुस्तक म्हणजे जणू शिष्टाईचा विविधरंगी, विविधढंगी कॅलिडोस्कोपच आहे.
पुस्तकातील विविध विषय याची प्रचीती देतात. ‘वेळेचं भान’मध्ये राजदूतांना बोलण्याची हौस किती असते, यावर छान टिपणी आहे. राजदूतांच्या जीवनात वाणीला अत्यंत महत्त्व आहे. पण वाणी म्हणजे भाषणकौशल्य नव्हे. त्यात जीवनकौशल्य असावे. राजदूताला सतत वाटाघाटी कराव्या लागतात, करार, उच्चस्तरीय भेटी, भोजन समारंभ, प्रतिनिधी मंडळांचे स्वागत अशा सगळीकडे त्याला वत्तृत्वकलेची गरज असते. पण काही वेळा त्याचा अतिरेक होतो. मी जपानमध्ये असताना संयुक्त राष्ट्रसंघात काम करणाऱ्या एका जपानी डिप्लोमॅटने जपानी आणि भारतीय परराष्ट्र वकिलांमधला फरक विनोदी पद्धतीने सांगितला- संयुक्त राष्ट्रसंघात जपानी वकिलाला बोलते करणे, हे आव्हान असते आणि याउलट भारतीय प्रतिनिधीला ‘आता बोलणं थांबवा’ असे सांगावे लागते.
परराष्ट्र वकिलाच्या जीवनात अनेक जीवघेणे प्रसंग येतात. मसूद खलिली यांच्यावरच्या टिपणात अफगाणिस्तानच्या विदेश सेवेतील प्रमुख व्यक्तीचे चित्तथरारक जीवन चित्रित करण्यात आले आहे. ते रशियाच्या अफगाणिस्तानवरील आक्रमणापासून तालिबान आणि अल काईदा यांना नॉर्दर्न अलायन्सने दिलेल्या झुंजीपर्यंत अनेक घटनांचे साक्षीदार होते. त्यांचे शिक्षण दिल्लीत झाले होते आणि अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. तालिबानच्या हल्ल्यात ते जखमी झाले. त्यांचा एक डोळाही गेला. डिप्लोमसी अशा घटनांनी भरलेली आहे. रवींद्र म्हात्रे या भारताच्या बर्मिंगहॅमधल्या कौन्सुल जनरलची काश्मिरी अतिरेक्यांनी हत्या केली. काबूलमधल्या भारतीय दूतावासावरच्या हल्ल्यात आपले अधिकारीही ठार झाले. विदेशी सेवा म्हणजे फक्त पार्ट्या, भोजन समारंभ आणि फोटो नाहीत. ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार होण्याचा मान जसा मिळतो, तसाच, जिवावरचा धोकाही संभवतो. मालदीवमध्ये मला इंटरनेटच्या माध्यमातून धमक्या मिळायच्या. एकदा तर तिथले माजी राष्ट्रपती उच्चायुक्त कार्यालयात आश्रयाला आले, तर त्यांच्या विरोधकांनी संपूर्ण भारतीय उच्चायुक्ताच्या कार्यालयाला घेरा टाकला.
विदेशी संबंधांच्या विश्वात परिषदांचे महत्त्व खूप असते. या परिषदांना प्रतिष्ठा असते, तशीच त्यांच्यामुळे त्या शहराच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो. न्यू यॉर्क शहरात दरवर्षी सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची सर्वसाधारण परिषद भरते. तेव्हा या शहराच्या अर्थव्यवस्थेत एक अब्ज डॉलर्सची भर पडते. त्या बदल्यात नागरिकांना व्हीव्हीआयपी उपस्थितीचा त्रासही सहन करावा लागतो. पण ज्या शहरात दरवर्षी दीडशेच्या वर राष्ट्रप्रमुख उपस्थित असतात, असे जगात फक्त न्यू यॉर्क शहरच आहे. त्यामुळे त्याची प्रतिष्ठा अनन्यासाधारण आहे.
‘बिनबुलाये मेहमान’ या टिपणात भारत-आफ्रिका फोरमची तिसरी परिषद २०१५मध्ये दिल्लीत झाली, तेव्हा मोरोक्कोहून आलेल्या पाहुण्यांच्या संदर्भातले वर्णन आहे. आंतरराष्ट्रीय संबंध किती गुंतागुंतीचे असतात आणि त्यात वकिलांना कसे मार्ग काढावे लागतात, ते या लेखात बिंबित झाले आहे. त्या आमंत्रणाविषयी शंका घेणारी राष्ट्रे एका बाजूला, तर दुसरीकडे भारताचे त्या देशावरील रॉक फॉस्फेटच्या आयातीतले अवलंबित्व, या दोन्ही बाजू विचारात घेऊन मोरक्कोला परिषदेत भाग घेणे भारताला आवश्यक वाटले. शेवटी देशहित हा परराष्ट्र संबंधातला महत्त्वाचा निकष असतो.
पुस्तकात टागोर आणि मुसोलिनी यांचा इटलीतील भेटीचा वृत्तान्त आहे. शिष्टाई म्हणजे फक्त परराष्ट्र वकिलांचे कार्यक्षेत्र नसून त्यात इतर प्रमुख व्यक्तींची भूमिका असते, ही बाब अनेकांना ठाऊक नसते. टागोर, विवेकानंदांपासून रविशंकर आणि ए.आर. रेहमानपर्यंत विचारवंत, लेखक, तत्त्वज्ञानी, पत्रकार एवढेच काय सिनेनायक व नायिका सर्वच त्या देशाचे राजदूत असतात. इजिप्तमध्ये अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान यांना ओळखत नाही, अशी व्यक्ती मिळणे दुर्मीळ. भारतीय लेखकांमध्ये पारतंत्र्यात असतानासुद्धा भारताची ख्याती जगभर पसरवणाऱ्यांमध्ये टागोरांचा पहिला क्रमांक ठरावा. त्या काळात लॅटिन अमेरिकेपर्यंत जाणारा हा एकमेव भारतीय कवी. प्रस्तुत टिपणात टागोर आणि मुसोलिनीच्या संवादामुळे टागोर यांच्या बरोबरच मुसोलिनीच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश पडतो. पूर्व आणि पश्चिम यांच्या विचारसरणीतील फरक आणि दोघांना एकत्र आणण्याचा टागोरांचा प्रयत्न इथे छान चित्रित झाला आहे.
राजनीती हा कठीण विषय होऊ शकतो. बुश व पुतिन या दोन नेत्यांमधल्या संबंधांचे कडुगोड वर्णन पुस्तकाच्या टिपणात वर्णन आहे. एकमेकांच्या हेरांना हद्दपार करण्यापासून दोन महासत्तांच्या स्पर्धेतील अनेक कठोर वास्तवावर हा लेख प्रकाश टाकतो. याशिवाय, सर्वोच्च नेत्यांच्या एकमेकांबरोबरच्या संबंधांचा त्या दोन देशांच्या संबंधांवर चांगला-वाईट परिणाम होतो, हा मुद्दा या टिपणात प्रभावीपणे आला आहे. आजचे भारताचे संबंध अमेरिका-जपान इ. देशांबरोबर अतिशय चांगले असल्याचे एक कारण म्हणजे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व त्यानंतर मोदी यांनी त्या देशांच्या नेत्यांबरोबर प्रस्थापित केलेली वैयक्तिक पातळीवरील मैत्री होय. मोदींनी पाकिस्तानचे नवाझ शरीफ व चीनचे शी जिंनपिंग यांच्याशीही मैत्रीचा प्रयत्न केला, पण त्यात विवाहाची उपस्थिती आणि मोदींच्या आईंना मिळालेली साडीची भेट, यापलीकडे फारशी प्रगती झाली नाही. पण अशा प्रयत्नांना खूप महत्त्व आहे, हे निश्चित.
‘पण लक्षात कोण घेतो’ या टिपणात वेगळ्या कारणासाठी महत्त्वाचे आहे. त्यात राजधानी दिल्लीत व्हीआयपींमुळे होणारा वाहतुकीचा खोळंबा, जसवंत सिंग या माजी परराष्ट्र मंत्र्यांच्या अनुभवाचा संदर्भ देऊन केला आहे. सुरक्षेच्या नावाखाली केवढी असुरक्षितता निर्माण केली जाते, ते वाचनीय आहे. याशिवाय अमेरिकन राजकारणातील समलैंगिकतेचा उल्लेख व त्यानंतर महत्त्वाच्या नेत्यांचे लैंगिक जीवन व त्याबाबतचे किस्से हे इतरत्र भारतीय लिखाणात न येणारे मुद्देही आले आहेत. भारतीय नेत्यांच्या कामजीवनाविषयी अशी चर्चा होत नाही, अशी खंतही या लेखात आहे.
अशा प्रकारच्या बहुरंगी, बहुढंगी उदाहरणांतून मराठी वाचकासमोर शिष्टाईचे जग खुले करण्याचे काम लेखक, पत्रकार विजय नाईक यांनी केले आहे. मुळातच मराठीत परराष्ट्र संबंधांवरचे लिखाण फार कमी. खरे तर अप्पासाहेब पंत सोडल्यास हे काम हे फार कमी अधिकाऱ्यांनी केले आहे. पण, या विषयांचे महत्त्व खूप मोठे आहे. विजय नाईकांनी या विश्वाचे दर्शन अगदी जवळून घेतले आहे. त्यात नेहरूंपासून मोदींपर्यंत सर्व भारतीय नेत्यांच्या कामासंदर्भातील उदाहरणे व किस्से आहेत, विनोद आहे, संवाद आहेत, घटना आहेत, देशोदेशांमधल्या बैठका आहेत. विदेशनीतीचे गुंतागुंतीचे विश्व विजय नाईक यांनी सामान्य वाचकाला समजेल, अशा पद्धतीने मांडले आहे. माझ्यासारख्या विदेश सेवेत ३३ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या व्यक्तीला हे पुस्तक रोचक, माहितीपूर्ण व वाचनीय वाटले, तर ज्यांना विदेशनीती अपरिचित आहे, त्यांच्या दृष्टीने हा माहितीचा खजिनाच ठरावा.
विजय नाईक यांच्या या साहित्यसेवेविषयी त्यांचे आभार मानावेत तितके कमीच आहेत. या वेगळ्या क्षेत्राचा परिचय मराठी वाचकांना करून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4400
.............................................................................................................................................
लेखक ज्ञानेश्वर मुळे भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव आहेत. आणि कवी, लेखकही.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment