अजूनकाही
साहित्य अकादमीच्या युवा साहित्यिक पुरस्काराचे मानकरी वीरा राठोड यांचा ‘हस्तक्षेप’ हा लेखसंग्रह लवकरच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित होत आहे. या संग्रहाला प्रसिद्ध नाटककार, स्तंभलेखक संजय पवार यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तिचं हे पुनर्मुद्रण...
.............................................................................................................................................
मराठी ललित, ललितेतर, वैचारिक, संशोधनात्मक आणि समीक्षा या सगळ्या साहित्यावर असलेल्या सदाशिव पेठी व पाश्चिमात्य विचारांचा ठसा आणि पगडा साठोत्तरी साहित्य चळवळीनं बंडखोरी करून मोडून काढला. यातूनच कल्पनाविलासी आणि प्रतिभेच्या देण्याच्या जातीय मिरासदारीसही सुरुंग लागले. मराठी साहित्यावरच्या या ‘क्ष’ किरणानं संतसाहित्य निव्वळ अभंग म्हणून प्रस्थापित करणाऱ्या वृत्तीला लगाम लावून तुकाराम हा आद्य कवी अशी पुनर्मांडणीही करण्यात आली. या साठोत्तरी चळवळीच्या पोटातच पुढच्या दलित साहित्याची बीजं रोवली होती. साठोत्तरी साहित्यिक चळवळीचा सगळा दस्तऐवज आता उपलब्ध असल्यानं त्याच्या तपशिलात जात नाही.
साठोत्तरी चळवळीनं साहित्य आणि जीवन, साहित्य व समाज, साहित्य व राजकारण, कला यांचे परस्परसंबंध अधोरेखित केल्यानं या चळवळीतले लेखक हे निव्वळ लेखक नव्हते. म्हणजे सकाळी उठून शुचिर्भूत होऊन, मेजापाशी उदबत्ती लावून, दिसामाजी पांढऱ्यावर काळं करण्याचा रिवाज त्या काळात मराठी सारस्वत करत असत, पाळत असत. लिहिणारा ‘सारस्वत’ इथपासूनच भेदाची कल्पना यावी. या सगळ्याला छेद देत साठोत्तरी लेखक हे लेखक असतानाच कामगार संघटनांत होते, दलितांच्या संघटनांत सक्रिय होते, अपेक्षेप्रमाणे कम्युनिस्ट, समाजवादी राजकीय विचारधारांशी विचार व कृतीनं सक्रिय होते. ‘जगणं आणि लिवणं’ यांतलं अंतर कमी करून ते परस्परपूरक असावं, या आज स्थिर झालेल्या संज्ञेची ती सुरुवात होती.
सत्तरच्या दशकात या चळवळीनं राजकीय व सामाजिक भान यांवर अधिक लक्ष केंद्रित केलं. अपवाद वगळता लेखक कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे सक्रिय सभासदही झाले. याचाच पुढचा टप्पा हा दलित साहित्याचा होता. राजा ढाले, नामदेव ढसाळ, सतीश काळसेकर, अर्जुन डांगळे, प्रल्हाद चेंदवणकर, दया पवार, ज. वि. पवार, प्रकाश जाधव, विलास सारंग अशी कितीतरी नावं साठोत्तरी दलित साहित्याच्या केंद्रस्थानी आली. सुरुवातीचा भर हा कवितांवर होता. नामदेव ढसाळांच्या ‘गोलपिठा’नं ठिणगी टाकली आणि दलित कवितेचं केंद्र मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या पायरीवरून थेट मिलिंद महाविद्यालयाच्या आवारातून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातही पोहचलं. दलित साहित्य, निग्रो साहित्य यांच्या तुलनात्मक अभ्यासातून दलित पँथरचा जन्म झाला आणि लेखक नेते, कार्यकर्ते झाले. दलित साहित्य व दलित पँथर हे एक अद्वैत होतं. आजही आहे. सत्तरचं ते दशक जगभरातलंच घुसळणीचं, बंडखोरीचं, विद्रोहाचं आणि पुनर्मांडणीचं दशक होतं. साहित्यापासून राजकारणापर्यंत सर्वत्र हा बदल घडला. ‘घरंदाज’ काँग्रेसचं पतन आणि जनता पार्टीचा उदय व अस्त याच दशकातला.
यानंतर दया पवार यांचं ‘बलुतं’ आलं आणि पुन्हा एकदा साहित्य विश्व ढवळून निघालं. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पुल यांनी तळवलकरांच्या ‘मटा’त लेख लिहून कौतुक केल्यानं अभिजनांना त्याची दखल घ्यावी लागली. या बहिष्कृत जीवनाचा झटका जसा मध्यमवर्गीय अभिजनांना बसला, तसाच ‘जात’ काढल्यानं दलितांनाही बसला. लक्तरं वेशीवर टांगल्याबद्दल दया पवारांना समाजाकडूनही शाब्दिक दगडफेक सहन करावी लागली. तरीही ‘बलुतं’नं मराठी आत्मकथनात मैलाचा दगड उभा केला. त्यानंतर दलित आत्मकथनांची लाटच आली. यात जसे हवशेनवशे होते, तसेच गांभीर्यपूर्वक जातिव्यवस्थेनं निर्माण केलेल्या विषमतेनं पोळलेल्या आयुष्याचं चित्रण करणारेही अनेक होते.
आणि त्याच सुमारास दलित साहित्यातील आणखी एक अप्रकाशित कोपरा प्रकाशात आला तो लक्ष्मण मानेंच्या ‘उपरा’नं. आजवर गावकुसाबाहेरचं जगणं परिचित होऊ लागलेलं असताना, गाढवाच्या पाठीवर संसार घेऊन भटकणाऱ्या कैकाडी या भटक्या जमातीचं आयुष्य ‘उपरा’नं दाखवलं आणि लक्षात आलं, की दलित, अस्पृश्यांना गावकूस तरी आहे. पण या भटक्यांना ना गाव, ना वेस, ना नागरिकत्व आणि असलंच तर ते जन्मजात गुन्हेगारीचा थेट पोलिसी शिक्का असलेलं. ‘उपरा’नं हा भूकंप केला. त्यानंतर मग भटक्या विमुक्तांतून ‘उचल्या’ (लक्ष्मण गायकवाड), ‘आभरान’ (पार्थ पोळके) अशी एकमागून एक आत्मकथनं येऊ लागली आणि भटक्या विमुक्तांचं जीवन मराठी समाजापुढे आलं. दलित साहित्याप्रमाणे भटक्यांच्या साहित्यातूनही सामाजिक व पर्यायानं पुढे राजकीय नेतृत्व उभं राहिलं.
दौलतराव भोसले, बाळकृष्ण रेणके यांच्यानंतर लक्ष्मण माने यांनी अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं. लक्ष्मण गायकवाड, पार्थ पोळकेही त्या वाटचालीत होते.
या दलित व भटक्या विमुक्तांच्या साहित्याच्या दरम्यानच एक आदिवासी साहित्याचा क्षीणसा प्रवाह समांतर वाहत होता. वाहरू सोनवणे, मनोहर वाकोडे, पुढे भुजंग मेश्राम अशी नावं या संदर्भात पुढे आली. पण मुख्यत्वे ते कवितेपुरते सीमित राहिले.
दलित, भटक्या यांच्या साहित्याप्रमाणेच आदिवासी साहित्यामागे राजकीय विचारधारा होत्या आणि मुख्यत्वे त्या कम्युनिस्ट होत्या. दलित, भटक्यांच्या चळवळीतील पुढच्या फाटाफुटीत ‘कम्युनिस्ट’, ‘नक्षलवादी’ या विचारधारांचा आरोप-प्रत्यारोपासाठी भरपूर प्रच्छन्न वापर झाल्यानं असेल, आदिवासी साहित्याकडे तुलनेनं दुर्लक्ष झालं अथवा केलं.
हा सर्व पूर्वेतिहास धावत्या आढाव्यासारखा मांडण्याचं कारण आजचे युवा लेखक वीरा राठोड यांचा नवा लेखसंग्रह. ‘हस्तक्षेप’ शीर्षकांतर्गत या ग्रंथात वेळोवेळी लिहिलेल्या एकूण २९ लेखांचा हा संग्रह आहे. हे सर्व लेखन पूर्वप्रसिद्ध आहे. या २९ लेखांत वीरा राठोड यांनी डॉ. गणेश देवी यांची घेतलेली मुलाखत आणि त्यांनी अग्निपंख युवा साहित्य संमेलनाच्या निमित्तानं केलेल्या अध्यक्षीय भाषणाचाही समावेश आहे.
वीरा राठोड हे साहित्य अकादमीच्या युवा साहित्यिक पुरस्काराचे मानकरी जसे आहेत, तसेच याच पुरस्कार वापसीतले एक सक्रिय नावही आहे. जे अनेक अर्थांनी लक्षणीय आहे.
‘सेन सायी वेस’ या आपल्या पहिल्याच कवितासंग्रहानं वीरा राठोड यांनी दमदार पदार्पण केलं. लमाण बंजारा या भटक्या जातीतील जन्म आणि त्यानंतरचा दारिद्रयातून उर्जित अवस्थेपर्यंतचा त्यांचा प्रवास, त्यांच्यासारख्या भारतभरातील इतर लाखो भटक्या विमुक्तांसारखा शोषण, वेदना, अवहेलना यांनी भरलेला तरीही ‘अत्त दीप भव’सारखा स्वत:लाच प्रकाशमान करत नेणारा असाच आहे. परिघाबाहेर असणाऱ्या या जमातीतसुद्धा शिक्षणाशिवाय उन्नतीचा मार्ग नाही, हे तत्त्व त्यांच्याच भाषेत परंपरेनं आहे आणि वीरा यांची आई ते पाळण्यासाठी जो संघर्ष करते, तो चकचकीत जाहिरातीतल्या, सर्व शिक्षा अभियान किंवा ‘चलो स्कूल चले हम’सारखा सहज सोपा नाही.
वीरा राठोड यांच्या या लेखसंग्रहाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणता येईल ते म्हणजे, त्यांची त्यांच्या वयाला साजेल अशी तरुण, आश्वासक आणि त्याचवेळची ‘ग्लोबल’ नजर. संपूर्ण लेखसंग्रह वाचताना सतत याची जाणीव होत राहते.
त्यांची भाषा आश्वासक तर आहेच, पण ती अभिनिवेश टाळूनही व्यवस्थेला ज्या ठामपणे प्रश्न, जाब विचारते, त्यातून त्यांचा त्या प्रश्नावरचा समग्र अभ्यास आणि विचारांवरची अविचल निष्ठा दिसते. साधारणत: पहिल्या लेखनात अभिनिवेश हा एक नकळत शिरणारा अवगुण असतो. काही वेळा तो जाणतेपणी तर काही वेळा अजाणतेपणी. वीरा राठोड यांच्या लेखनात मात्र तो नैसर्गिकपणेच वगळला/गाळला गेलाय असं जाणवतं.
हे जाणवण्याचं मुख्य कारण या लेखसंग्रहात जे लेख समाविष्ट आहेत, त्यातले जवळपास सर्वच आदिवासी आणि भटक्या विमुक्तांबद्दल आहेत. त्यांचे लढे, इतिहास, वर्तमान, भविष्य या संदर्भातले आहेत.
आज महाराष्ट्राच्या राजकीय/सामाजिक जीवनात आदिवासी, वनवासी आणि आता मूलनिवासी अशा तीन चर्चा झडताना दिसतात. यांपैकी आदिवासी ही संज्ञा पूर्वापार चालत आलेली शासकीय कागदपत्रांत, दप्तरात रूढ झालेली. आदिवासींच्यात लढे उभारणाऱ्या कम्युनिस्ट, नक्षलवादी, क्वचित सर्वोदयवादी आणि समाजवादी यांनीही त्या त्या अर्थानेच वापरत आणल्यात. परंतु आदिवासींमध्ये काम करणाऱ्या मिशनरी व ते करणाऱ्या धर्मांतराविरोधात रा. स्व. सं. आणि संघ परिवार यांनी ‘वनवासी’ अशी नवी ब्राह्मणी संज्ञा तयार केली. कारण त्यांच्या हिंदू इथला ‘मूळ’, या संकल्पनेला ‘आदिवासी’नं छेद जातो. त्यामुळे वनात राहणारे ते वनवासी अशी मराठी भावगीताला साजेशी व्याख्या ते करतात.
पण गेल्या काही दशकांपासून दलितांमधल्या बामसेफसारख्या संघटना, मराठा सेवा संघासारखे ब्राह्मण्यविरोधी संघटक वैदिक परंपरेला नाकारताना आम्ही मूलनिवासी असा दावा करतात. ही मूलनिवासी चळवळ ब्राह्मण्याविरोधात अत्यंत तीव्र स्वरूपात चालवली जाते आणि त्यामुळे काही वेळा ती थेट ‘ब्राह्मण विरोधी’ होते. ‘ब्राह्मण्य’ आणि ‘ब्राह्मण’ यात फरक न करता ती प्रवृत्तीऐवजी जातविरोधी भूमिका घेते. त्यासाठी ते काही दस्तऐवज, पुरावे, साहित्यही पुढे करतात व प्रतीकांची, पर्यायी इतिहासाची पुनर्मांडणीही करताना दिसतात. त्यातल्या आक्रमकतेमुळे काही वेळा विचार मागे पडून कार्य व लिखाण शैलीचीच चर्चा जास्त होते. दलित साहित्याच्या सुरुवातीलाही हा प्रश्न होताच.
या पार्श्वभूमीवर वीरा राठोड यांचं लेखन वेगळं ठरतं. मराठी समीक्षकांना आवडणारा ‘संयत’ शब्द मी इथं वापरणार नाही. कारण कुणाला तरी संयत ठरवताना इतर सारे ‘कंठाळी’ ठरवण्याची ती संयत शैली आहे.
वीरा राठोड आदिवासी, भटके यांच्या इतिहासात शिरताना भावुकही होत नाहीत, आक्रमकही होत नाहीत. तर अभ्यासपूर्ण वस्तुस्थिती छोट्या-मोठ्या तपशिलांसह अशी मांडतात की, एखाद्या पुरातत्त्व संशोधकानं वस्तुनिष्ठपणे व काळाशी प्रामाणिक राहत, हाती लागलेल्या गोष्टींचा क्रम लावावा आणि त्याची संगती ऐतिहासिकदृष्ट्या लक्षात आणून द्यावी. ही दृष्टी, ही मांडणी नवी आहे, ताजी आहे आणि त्याचमुळे ती सहज आहे.
प्रस्तावनाकार अनेकदा लेखनातील उतारे उद्धृत करतात वैशिष्ट्यं दाखवण्यासाठी. पण त्यातून प्रस्तावनेचा आकार वाढतो आणि वाचकाला कळत-नकळत वाचनाचं दिशादिग्दर्शन मिळतं. त्यामुळे तो प्रकार मी टाळणार आहे. वाचकानं, अभ्यासकानं स्वत:ची दृष्टी घेऊन ते वाचावं. त्यामुळे लेखांच्या आशय व तपशिलात जाण्याऐवजी वीरा राठोड यांच्या लेखन वैशिष्ट्यावर, पर्यायानं त्यांच्या दृष्टीवर चार शब्द लिहिणं जास्त संयुक्तिक होईल.
ज्या विषयांवर वीरा राठोड यांनी लिखाण केलंय, ते लिखाण एकसुरी, आधीपासून प्रचलित संज्ञांच्या जंजाळात अडकण्याची शक्यता जास्त असते. ‘फुले, शाहू, आंबेडकर’, स्त्रीदास्य जातिअंतक, पुरुषसत्ताक, ब्राह्मणी, अब्राह्मणी, मार्क्स, लेनिन, माओ, फिडेल, चे गव्हेरा, भांडवलशाही, चंगळवाद, भांडवलशाही माध्यमे अशा अनेक शब्द वा शब्द समुच्चयानं युक्त आणि त्याच्या पुनरुक्तीनं भरलेलं/भारलेलं लिखाण आधीच्या लिखाणात आणखी एक ठरतं.
वीरा राठोड फुले अमुक साली हे म्हणतात, बाबासाहेबांनी अमुक साली हे भाषण केलं, मार्क्स म्हणतो, शाहू अमुक साली तमुक करतात अशी सनावळीही देत नाहीत. याऐवजी ते शिक्षण तज्ज्ञांपासून, शास्त्रज्ञांपासून, खेळाडू, कलावंत यांना उद्धृत करतात. त्यातून काही अपरिचित इतिहास, मुद्दे कळतात. हे ‘अपरिचित’ मांडून आधुनिक इतिहासात नोंद करण्याची कामगिरी ते जाता जाता करतात.
जाता जाता असं म्हणण्याचं कारण, विशिष्ट शैली नसली तरी मांडणीतलं प्रवाहीपण, ताजेपण लक्ष वेधून घेतं. संदर्भासाठी ते अनेक पाश्चिमात्य / पौर्वात्य संशोधक, शास्त्रज्ञ, कलावंत यांची नावं देतात. पण त्यात पहा माझा अभ्यास, हा भाव नसून आजच्या माध्यम स्फोटाच्या जगात हे सर्व एका Click वर उपलब्ध आहे, तुम्हीही वाचू शकता असा सहजभाव आहे.
त्याचबरोबरीनं शोषणावर लिहिणाऱ्यांना एक ठरावीक सामाजिक, राजकीय कॅनव्हॉस सोडला तर त्याच्या बाहेर पाहण्याची इच्छा नसते. ते एका चौकटीतच अडकून पडतात.
वीरा राठोड समकालीन तरुणांसारखं आजूबाजूचं सारं जग नीट पाहतात. त्यांना काहीच वर्ज्य नाही. व्यवस्थेचे ‘बळी’ म्हणून निव्वळ सहानुभूतीचे हकदार न होता ते युयुत्सु वृत्तीनं नाटक, सिनेमा, खेळ आदी क्षेत्रांकडेही निर्भेळ दृष्टीनं पाहत, तिथवर पोहचलेल्या परिचित-अपरिचित माणसांची नेमकी सामाजिक, सांस्कृतिक मांडणी करतात आणि सारचं अंधारलेलं नाही याची सजग जाणीव देतात.
वीरा राठोड यांचं लेखन वाचताना आपण नीरस आकडेवारी, सनावळ्या, गतानुगतकाच्या आरोप-प्रत्यारोपानं रंगवलेलं तेच ते नसून, आजच्या तरुण संवेदनशील मनाच्या, विचाराच्या परिप्रेक्ष्यातून ते वाचता येतं. ते अधिक आश्वासक व प्रसन्न करणारं आहे आणि त्यामुळे हा ‘हस्तक्षेप’ आवश्यक वाटतो.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4399
.............................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment