‘हळक्षज्ञ’चा श्रीगणेशा!
ग्रंथनामा - झलक
सतीश तांबे
  • सतीश तांबे यांचा ‘हळक्षज्ञ’ हा लेखसंग्रह
  • Fri , 23 February 2018
  • ग्रंथनामा. Granthanama Pnk सतीश तांबे Satishs Tambe हळक्षज्ञ Halkshadnya

प्रसिद्ध कथाकार सतीश तांबे यांचा ‘हळक्षज्ञ’ हा लेखसंग्रह नुकताच सदामंगल पब्लिकेशन्सने प्रकाशित केला आहे. त्यातील हा पहिला लेख मूळ सदराचं आणि आता पुस्तकाचं स्वरूप स्पष्ट करणारा...

.............................................................................................................................................

‘हळक्षज्ञ’.

कसं काय वाटलं आपल्या या नव्या सदराचं शीर्षक? चटकन् काही बोध होत नाही ना? साहजिकच आहे. ‘हळक्षज्ञ’ हा शब्द कुठे आहे, राजरोस अर्थ असायला? तो एक अक्षरगट आहे.

तरीही संदर्भाने काही अक्षरगटांना अर्थ प्राप्त होतोच की! जसं की ‘अ ते ज्ञ’ वा ‘ए टू झेड’ म्हटलं की, ‘अथपासून इतिपर्यंत’ हे कुणालाही कळतं. किंवा ‘श्रीगणेशा’ घ्या. त्याचा शुभारंभ हा अर्थ सर्वत्र रूढ झाला आहे. तसंच ‘गमभन’ म्हटलं की काही तरी बाळबोध असल्याची कुणकुण लागतेच. ‘हळक्षज्ञ’लाही वर्णमालेतील त्याच्या स्थानामुळे असाच एक संकल्पनात्मक अर्थ आहे. तो आपल्याला फक्त रुळवावा लागणार आहे एवढंच.

नवीन शिक्षण पद्धतीमध्ये वर्णमाला शिकवायची पद्धत काहीशी बदलली आहे. पूर्वीच्या काळी मात्र पाटी-पेन्सिल हाती दिल्यावर सर्वप्रथम शिकवली जायची ती श्री, ग, णे, शा, य, न, म: ही सात अक्षरं. शिक्षणाची ही सुरुवात असल्याने शब्दस्वरूपात ती एकसाथ शिकवणं काही शक्य नसायचं. अर्थातच ती सुटीसुटी शिकवली जायची. परिणामी या अक्षरगटाचा अर्थ ‘गणपतीबाप्पा मोरया’ असा आहे, हे अनेकांना पोट सुटल्यावर कळायचं.

श्रीगणेशानंतर शिकवली जायची ती ‘अ ते अ:’ ही स्वरांची बाराखडी. पुढील प्रत्येक अक्षराची अशीच बाराखडी बनत असल्याने ही बाराखडी काही तरी विलंबितासारखी वाटायची. या बाराखडीपाठोपाठ यायची ऋ, ॠ, लृ, ही अक्षरं. काळाच्या प्रवाहात ती कुठे तरी लोप पावली. आणि व्यवहारातही ‘ऋषी’सारखे शब्द वापरायची वेळही तशी क्वचितच येते की!

वर्णमालेमध्ये स्थान आहे आणि भाषेत ज्यांचा मागमूस नाही अशा अक्षरांच्या नशिबी अशी हकालपट्टीच येते. पाच अनुनासिकांचं पहा ना - ण न, म हे भाषेतील सर्रास वापरामुळे टिकून आहेत. ‘ङ’ मात्र वाङ्मयासारख्या मूलभूत शब्दामध्ये स्थान असल्याने जेमतेम तग धरून आहे एवढंच. पण ‘ञ’चं काय? बहुतेकांना हे अक्षर ठाऊकच नाही.

हां, तर स्वरांच्या बाराखडीनंतर येतात ‘क ते ज्ञ’ ही ३६ अक्षरं. वरवर पाहता हा जथा एकसंध वाटतो. परंतु निरखून पाहता त्यात दोन गट दिसतात. कसं ते पहा  - ‘क’, ‘च’,  ‘ट’, ‘त’, ‘प’ या पाच अक्षरांनी सुरू होणाऱ्या पाच-पाच अक्षरांच्या गटांमध्ये जे साधर्म्य दिसतं, ते ‘य’ आणि ‘ष’पासून सुरू होणाऱ्या गटांमध्ये दिसत नाही. परिणामी ‘य ते ज्ञ’ हा एक वेगळा गट वाटतो.

वरील विधान अधिक स्पष्ट करून सांगायचं तर क-ख, क-ग, ग-घ, ख-घ या अक्षरांमध्ये उच्चारदृष्ट्या जे नातं आहे, तेच नातं थेट प-फ, प-ब, ब-भ, फ-भ मध्ये आहे. य-र, य-ल, ल-व, र-व मध्ये मात्र हे नातं दिसत नाही. शिवाय ‘क ते प’ने सुरू होणारे पाचही अक्षरगट ङ, ञ, ण, न, म, या अनुनासिकांनी संपतात. या गटातील शेवटचा मालुसरा म्हणजेच शहामृगातील ‘श’ हा अनुनासिक नाहीच नाही.

बरं, त्यापुढे सुरू होणारा ‘ष ते ज्ञ’ हा अक्षरगट चक्क सहा अक्षरांचा आहे. त्यामुळे त्यामध्ये हे साधर्म्य शोधायचा संबंधच येत नाही.

लहानपणी शिकलेली वर्णमाला मला आज चार टप्प्यांमध्ये विभागलेली दिसते. १) श्रीगणेशाय नम: ही प्रार्थनावजा ओळ, २) अ ते अ: ही स्वरांची बाराखडी, ३) क ते म - ही परस्परसंगत पंचवीस व्यंजनं, ४) य ते ज्ञ - हा अकरा अक्षरांचा गट. मला व्यक्तिश: यातील य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ या अक्षरांमध्ये नेहमीच रमायला होतं. एखादा भाषातज्ज्ञ या व्यंजनांच्या स्वरूपाची वा उगमाची उकल करून दाखवेलही. परंतु मला मात्र त्यामध्ये स्वारस्य वाटत नाही. या अकरा अक्षरांचा विचार माझा मी करणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं, कारण या प्रक्रियेत जे प्रश्न पडतात, जे शोध लागतात, ज्या उपमा सुचतात ते सारं मला अत्यंत आनंददायक वाटतं. आणि ‘भाषा ही एक अशी सामग्री आहे की, जी प्रत्येकाला बसल्या जागी संशोधनाचा आनंद मिळवायला वाव देते,’ या माझ्या धारणेला यामुळे थेट वर्णमालेपासूनच पुष्टी मिळते आणि यामध्ये ‘ओंकारा’ (ॐ)सारखा भाषिक, धार्मिक धागा सुतराम नाही!

‘य ते ज्ञ’ वरून सुचणाऱ्या काही साध्या साध्या गमती वानगीदाखल पाहू... ‘य ते ज्ञ’ ही अक्षरं पाच आणि सहा अक्षरांचे दोन गट न वाटता एकांडे शिलेदार वाटतात. अपक्ष उमेदवारांसारखे. म्हणजे असं बघा की निवडणुकीमध्ये काही उमेदवारांना पक्ष असल्याने उरतात ते अपक्ष. मात्र निवडणुकांचे निकाल जाहीर होताना काँग्रेस, भाजप, जनता, दल, शिवसेना यांच्या जोडीने अपक्ष इतके इतके असं म्हणताना त्यांना ‘एका माळेचे मणी’ करून टाकण्यात येतं. वास्तविक त्यातील प्रत्येक जण हा ‘स्वतंत्र’ असतो. (पुन्हा या नावाचा एक इतिहासजमा पक्ष आहेच) तर ‘य ते ज्ञ’ या अक्षरांचा  गट मला अपक्ष उमेदवारांसारखा दिसतो.

त्यांच्या अकरा या संख्येमुळे काही वेळा मला ही अक्षरं किक्रेटचा संघ असल्यासारखी वाटतात. आपल्या मनाचा एक धर्म असा असतो की, सुचलेली उपमा त्याला ताणावीशी वाटते आणि ती जेवढी लागू पडेल, तेवढा त्याचा आनंद वाढतच जातो. आता इथेच बघा ना. ज्या त्या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द हे त्या अक्षराच्या धावा मानल्या तर ‘य’, ‘र’, ‘ल’, ‘व’, ‘श’ने सुरू होणारे शब्द हे ‘ष’, ‘स’, ‘ह’, ‘ळ’, ‘क्ष’, ‘ज्ञ’ने सुरू होणाऱ्या शब्दांपेक्षा किती तरी अधिक आहेत. त्यामुळे ‘य’, ‘र’, ‘ल’, ‘व’, ‘श’ हे वाटतात फलंदाजासारखे तर ‘ष’ ते ‘ज्ञ’ हे आहेत गोलंदाज आणि यष्टीरक्षक. त्यातील ‘स’ आणि ‘ह’च्या नावावर थोड्या अधिक धावा आहेत खऱ्या. मग वाटू लागतं की हेदेखील बरोबरच आहे. यातील ‘स’ असणार कपिल, मनोज, इम्रान असा कुणी तरी अष्टपैलू, तर ‘ह’ असणार यष्टीरक्षक, आणि धावा काढणाऱ्या यष्टीरक्षकांची परंपरा जगभर आहेच. आपल्या भारतीय संघातही इंजिनीयर, कुंदरन, किरमाणी, मोरे, चंदू पंडित ते थेट नयन मोंगिया ही धावाकुटू यष्टीरक्षकांची परंपरा आहेच की! तेव्हा उपमा किती दूरवर सविस्तर पोहोचली बघा!

उद्या एखाद्याने या वर्णमालेकडे चातुर्वर्ण्याच्या दृष्टीने पाहिल्यास ‘हळक्षज्ञ’ हे त्याला/तिला तळागाळातील जातीजमातीतलेही भासू शकतील. कुणाला आणखीही काही! तर सांगायचा मुद्दा असा की स्थानमाहात्म्यामुळे ‘हळक्षज्ञ’ ही एक रोखठोक संकल्पना आहे. साहजिकच त्यांना अर्थ असणं हे ओघानेच येतं. ‘क, ख, ग, घ, ङ’ या पहिल्या गटापासून सुरू होणारी उच्चारण लय थेट यरलवशपर्यंत चालते. ‘ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ’ ही सहा अक्षरं असल्याने इथे मात्र ही लय बदलते आणि त्यातूनच उदयाला येतो ‘हळक्षज्ञ’ हा अक्षरगट.

मला बऱ्याचदा वाटतं की यामध्ये ‘ष’ आणि ‘ह’ हे जर एकमेकांच्या जागी असते तर अधिक बरं झालं असतं. अर्थात या वाटण्याची कारणंही मी शोधली आहेत. एक नाही चांगली दोन!

एक तर ‘श’, ‘ष’, ‘स’ ही अक्षरं उच्चारदृष्ट्या एवढी जवळची आहेत की, ती एकापाठोपाठ एक म्हणताना, ‘जनगणमन’मधील शेवटचे ‘जयजयजय’ म्हणताना होतो तसा काहीसा गडबडगुंडा होतो. दुसरं म्हणजे ‘हळक्षज्ञ’ या चार अक्षरांपैकी ‘ळ’ने सुरू होणारे शब्द मराठीत नाहीत आणि ‘क्ष’ तसंच ‘श’ने सुरू होणारे शब्दही तसे नगण्यच आहेत. तुलनेत ‘ह’ने सुरू होणारे शब्द बरेच आहेत. त्यामुळे ‘ह’ची स्थिती ही काहीशी गरीब चाळीतील श्रीमंत शेजाऱ्यासारखी झाली आहे. परंतु तिथे जर का ‘ष’ आणला ना तर सारे कसे गुण्यागोविंदाने राहू लागतील. शिवाय ‘श’, ‘ह’, ‘स’ हा क्रम उच्चारासाठीही सोयीचा ठरेल.

मुळात एक गंमत कळत नाही ती अशी की, ‘क्ष’ आणि ‘ज्ञ’ ही जोडाक्षरांची दुक्कल या मुळाक्षरांमध्ये घुसली कशी? मुळाक्षरांनी तसं त्यांना टोकाशी रोखून धरलंय हे खरं. परंतु त्यांनी वर्णमालेत शिरकाव करून मुक्कामही ठोकला हेही खरंच आहे. एखादा भाषापंडित यावरही प्रकाश टाकेल. परंतु मला आवडते ती माझी गोष्ट.

मला काय वाटतं ठाऊक आहे? की ही वर्णमाला मुळात कुणी तरी ब्राह्मणाने तयार करून क्षत्रिय राजाला दाखवली असणार. ती ऐकून राजाने विचारलं असणार की यामध्ये क्षत्रियातला ‘क्ष’ कुठे आहे? त्यावर भीतीने गाळण उडून ब्राह्मणाने ‘ब्र’ न उच्चारताच गपगुमान ‘क्ष’ तेथे घुसडला असणार. काय करणार? अहो सत्तेपुढे शहाणपण नाही. केली भेसळ, केला भ्रष्टाचार, अब्रह्मण्यम अब्रह्मण्यम!

आणि नंतर हे अनवधानाने घडलेलं नाही तर जाणूनबुजून केलेलं आहे असा कबुलीजबाब देण्यासाठी ‘ज्ञ’ हे जोडाक्षर. ‘जाणतो’ या अर्थी शांतम् पापम् !!

या बाबत आणखीही एक विचार येतो. समजा जर का ही वर्णमाला ‘क्ष’ वरच संपवली असती तर ‘ष’, ‘स’, ‘ह’, ‘ळ’, ‘क्ष’ने पाच अक्षरांची पंरपरा कायम असती खरी. परंतु पुस्तकी पंडितांच्या हाती आयतं कोलीत गेलं असतं. त्यांनी मग, वर्णमाला म्हणजेच ‘अ ते क्ष’ म्हणजेच ‘अक्ष’ म्हणजेच जगाकडे पाहायची दृष्टी अशी सांगड घालून पुस्तकी ज्ञान तुम्हाला जगाकडे पाहायची दृष्टी देतं असा डांगोरा पिटला असता. आधीच डोईजड असलेले ब्राह्मण मग बहुधा महाब्राह्मण वा उपदेवच होऊन बसले असते. ‘ज्ञ’ टाकल्यामुळे झालं काय तर वर्णमाला ‘अ ते ज्ञ’ म्हणजेच ‘अज्ञ’ म्हणायची सोय निर्माण झाली आणि त्यामुळे पुस्तकी पंडित होऊनही एखादा माणूस अज्ञ म्हणजे अडाणी राहू शकतो असं म्हणायला आधार निर्माण झाला. तेव्हा आता कळली ना ‘हळक्षज्ञ’ची मजा! आपल्या आसपास अनेक क्षेत्रांमध्ये असंख्य घडामोडी घडत असतात. त्यांचे पडसाद सर्वत्र सर्रास उमटतात. त्यातील बहुसंख्य मतं ही जरी भिन्न वाटली, तरी खरं तर ‘क’ ते ‘प’ या वर्गवारीतील अक्षरांप्रमाणे चाकोरीबद्ध असतात. अशा वेळी मजा येते ती ‘य’ ते ‘ज्ञ’ अशा एकांड्या शिलेदारांसारखे विचार करायला! त्यातही ‘हळक्षज्ञ’ ही चौकडी तर पार टोकाची.

पठडीबाह्य विचार हे नेहमीच योग्य, उपयुक्त वा कामाचे असतात असं नाही. त्यामध्ये गफलतीही असू शकतात. मात्र विचारांच्या क्षेत्रात त्यांचा वापर हा अत्यंत आवश्यक असतो. तावून-सुलाखून घेतल्याशिवाय शुद्ध विचार निर्माण होणं असंभव असतं. विचारसंकोचाच्या काळात तर ‘हळक्षज्ञ’ विचारांची मोठीच गरज असते.

चिकित्सा ही गोष्ट आपण यापुढे सांस्कृतिक क्षेत्रातून बादच करायची आहे का? ‘हळक्षज्ञ’ विचार मेंदूवळणी न पडल्याचा हा परिणाम आहे. दुसरं काय?

या सदरातून तो तर रुजवायचा विचार आहे.

‘हळक्षज्ञ’ म्हणजेच मुळाक्षरांचा जोडाक्षरांशी झालेला मेळ.

‘हळक्षज्ञ’ म्हणजेच शेपटाचा तडाखा.

‘हळक्षज्ञ’ म्हणजेच शेवटच्या बाकावरील नाठाळ चौकडी.

‘हळक्षज्ञ’ म्हणजेच शब्दांच्या घबाडाचा हव्यास न बाळगणारे चार निसिंग.

‘हळक्षज्ञ’ म्हणजे श्रीगणेशांचं उलटं टोक.

‘हळक्षज्ञ’ म्हणजे ‘हळक्षज्ञच’!

सदराचं शीर्षक शोधणं हा एक मोठाच खटाटोप असतो आणि नंतर शीर्षकाशी सुसंगत असा प्रत्येक लेख लिहिणं हा पुन्हा एक व्याप, ताप, उपद्व्याप होऊन बसतो. ‘हळक्षज्ञ’ या अतरंगी शीर्षकाने हे काम थोडं सोपं होईलसं वाटतं.

‘हळक्षज्ञ’चा श्री गणेशा करताना मला अशी उमेद वाटते की आपल्या सांस्कृतिकतेत ‘श्रीगणेशा’ला जसं मानाचं पान आहे, तद्वतच ‘हळक्षज्ञ’ अक्षरगटाला किमान लक्षणीय स्थान तरी मिळायला हवं. त्याची पायाभरणी करण्यासाठीच तर आहे हे सदर!

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4390

.............................................................................................................................................

लेखक सतीश तांबे मराठीतील प्रसिद्ध कथाकार आहेत.

satishstambe@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......