कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘बोलावें ते आम्ही’ या कवितासंग्रहाला २०१७ सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. १२ फेब्रुवारी २०१८ रोजी दिल्लीत समारंभपूर्वक हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर देशमुख यांनी केलेलं भाषण...
.............................................................................................................................................
साहित्य अकादमीनं माझ्या कवितेचा जो सन्मान केला, त्याविषयी मी सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या कवितेचा सन्मान हा कृषीजन जाणिवेचा आणि मी ज्या कोरडवाहू शेतकरी, कष्टकरी कुटुंबातून आलो, जे कुटुंब देशातील सर्वसामान्य शेतकरी वर्गाचं प्रतिनिधित्व करतं, त्या शेतकरी, कष्टकरी समूहाचा सन्मान आहे.
कवी हा वर्तमानाचा संवेदनशील प्रतिनिधी असतो. स्वत:ला खरवडून तो आपलं नातं आपल्या सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणाशी जोडतो. त्यामुळे चांगली कविता ही सतत समकालीन असते असं मला वाटतं. कवीनं स्वत:च्या कलाकृतीचं मूल्यमापन करू नये. तसं करणं हे अनैतिक असतं असं मला वाटतं. मी फक्त माझ्या जाणिवाविषयी बोलणं त्यामुळे अधिक रास्त आहे.
मराठी भाषा, संस्कृती आणि समाज हा एक भारतीय पातळीवरील वैशिष्टपूर्ण समाज आहे. मराठी साहित्य हा मराठी संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. एवढंच काय मराठी संस्कृतीचं समग्र दर्शन घडवण्याची शक्ती मराठी भाषा, कविता, लोकपरंपरा, लोकसाहित्य आणि प्राचीन काळापासूनचं उपलब्ध संहितीकृत साहित्य यात आहे. ‘गाथासप्तशती’, ‘लीळाचरित्र’, ज्ञानेश्वर आणि त्यांचे समकालीन भक्तीसंप्रदायातले संत, मराठी मुस्लीम संत कवी, तुकोबा, शिवाजीराजांचं उपलब्ध समकालीन लेखन, महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले आणि एकोणिसाव्या शतकातील प्रबोधन परंपरेतलं लेखन, सत्यशोधक चळवळ, ही आधुनिक मराठी साहित्य आणि समाजाची वैभवशाली पार्श्वभूमी आहे. या परंपरेतच लेखन करणारा एक कवी, लेखक म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो. समग्र भारतीयत्वाशी जोडणारी ही लेखन परंपरा वैश्विक जाणिवांशीही नातं जोडणारी आहे.
चक्रधर स्वामी, तुकोबा, जोतीबा, महादेव गोविंद रानडे, लोकहितवादी, आगरकर, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे, बाबासाहेब आंबेडकर अशा थोरांचं लेखन हे केवळ लेखन नसून परिवर्तनासाठी आवश्यक असणाऱ्या कृतीशीलतेचा वारसा सांगणारं आहे. याच लेखन परंपरेतला मी स्वत:ला समजत असल्यामुळे माझ्यावरही कवी म्हणून एक मोठी सांस्कृतिक जबाबदारी आहे, याचं भान ठेवणं मला रास्त वाटतं. लेखनातून सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनासाठी आवश्यक असणारी पार्श्वभूमी तयार होऊ शकते अशी माझी धारणा आहे. या अर्थानं कविता ही देखील कृतिशील असते असं मला वाटतं.
कवी लेखक असणं ही एक प्रकारची जोखीम आहे. योग्य शब्दांची निवड करून, संपृक्त अनुभव गोळीबंद पद्धतीनं मांडणं म्हणजे कविता लिहिणं असं मला वाटत नाही. लेखन करत असताना कवी लेखकाच्या मनाच्या तळाशी जे काही ढवळून निघतं ते अधिक महत्त्वाचं असतं. व्यक्त होणं ही त्या पुढची आवश्यक क्रिया आहे, जी मनाच्या अस्वस्थतेचं प्रतिनिधित्व करत असते. माझी कवी म्हणून असणारी अस्वस्थता माझ्या भोवतालच्या जमिनीशी भिडून असणाऱ्या माणसांशी निगडित, पर्यायानं त्यांच्याविषयी बोलणारी, व्यक्त होणारी आहे. मी ज्या सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणात जन्मलो, वाढलो, त्याविषयी बोलणं, लिहिणं मला अधिक सोयीस्कर, नैतिक आणि जबाबदारीचं वाटतं. या अर्थानंच मी स्वत: माझ्यासाठी साहित्यातलं भूमितत्त्व आणि भूमिप्रतिष्ठा ही अधिक महत्त्वाची मानतो. तिला सोयीसाठी कोणत्या अर्थानं ओळखायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण शेतकरी कुळातला तुकोबा हा मराठीतला पहिला संत आणि शेतकरी कुळातला शेतकरी राजा शिवाजी आणि त्यांना असं संबोधणारा जोतीबा हे मला माझे सर्वश्रेष्ठ पूर्वज वाटतात.
ज्यांचा जीव आहे आपल्या गावावर
ते गावाबद्दल कधील बोलत नाहीत
मनातल्या मनात सांभाळत रहातात
घराची दारं, उंबरे, ओटे ओसऱ्या.
ज्यांचा जीव आहे साऱ्यांच्याच गावावर
परक्याच्या शेतालाही कुरवाळतात जे मायेनं
कोणताही बैल वाटतो त्यांना जगन्नियंता.
आपल्या भोवतालाविषयी ते कधील बोलणार नाहीत
त्यांच्यातच सामावलंय इथलं पिकपाणी, ओढेनाले
डोंगरदऱ्या, मायलेकी, बापलेक, गुरंवासरं.
आपणच आपल्याविषयी बोलण्यालं पाप
ते कधीही करणार नाहीत
जे झोपतात उशाला घेऊन मातीचा ढीग
उगवतात आणि वाढतात मातीत
माझी कविता खेडापाड्यातून, डोंगरदऱ्यातून वस्ती करणाऱ्या बिनचेहऱ्याच्या माणसांविषयी बोलणारी कविता आहे. जे लोक जगाचा चेहरा घडवतात, पण स्वत: मात्र भूमिगत असतात. कलासंस्कृतीला आकार देण्यात याच अदृश्य समूहाचा निर्णायक सहभाग असतो. माझ्यातून निरंतर वाहणारी संवेदना ही या कृषीसमूहाची संवेदना आहे. बापूजी आयुष्यभर ज्या खेड्याविषयी, ग्रामस्वराज्याविषयी बोलले त्याला भिडून पिढ्यानपिढ्या जगणारा आणि मातीवर राबताना माती होणारा हा विश्वव्यापी समूह आहे. म्हणून मला उजळ माथ्यानं कुणबीपण मिरवताना विशेष आवडतं. कुणबीपण ही कुठल्याही अर्थानं मला जात, प्रदेश, धर्म, भाषानिष्ठ संवेदना वाटत नाही. शेती करणं हे पवित्र काम आहे, असं मानणारा थोरो यासाठीच मला थोर वाटतो.
भारतीय शेती, खेडी आणि खेड्यातला माणूस हा बापूजींच्या आस्थेच्या केंद्रस्थानी होता. ‘शासक को प्रजा की भाषा सिखनी चाहिये’, असं ते म्हणायचे. भारतीय साहित्यातही भारतीय कृषक समाज, संस्कृती आपल्या व्यथा वेदनासह मोठा प्रमाणात मांडली गेली आहे. भारतीय बहुसंख्य समाजाबद्दल बोलणारं साहित्य म्हणून भारतीय कृषीजनसाहित्य ही मध्यवर्ती साहित्यधारा आहे.
शेती आणि शेतकरी हा कायम शोषण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहात आला आहे. गेल्या काही दशकांत देशभरात आणि विशेषत: महाराष्ट्रातील विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. शेतकरी आत्महत्या ही घटना एकूण शेतीव्यवस्था आणि ग्रामव्यवस्था कोणत्या अवस्थेत आहे हे दर्शवणारं एक निदर्शक आहे. जागतिकीकरणातून शेतीव्यवस्थेची अवस्था सुधारेल असं भाकीत मांडलं गेलं होतं. ते खोटं ठरलं आहे. शेतीव्यवस्थेतला एक लिहिता घटक म्हणून ही बाब मला विशेष चिंताजनक वाटते. आपली आद्य आणि विद्यमान संस्कृती कृषीबहुल असतानाही या समाजघटकाविषयी निर्माण झालेला असमतोल कोणाही संवेदनशील मनाला चिंतित करणारा आहे.
तो बोलत नाही युगांतराबद्दल
सांगतो फक्त नांगराच्या फाळाली गोष्ट.
ज्यानं भूमी पेरून आपल्या निरागस हातांनी
खावी लावून पहिल्यांदा दुधाळ कणसं
त्यानंच पेरला पहिला दाणा.
राखून ठेवलीय त्याच्यासाठी त्यानं
कपाळावरली अदृश्य रेघ
अपरंपार आभाळाखाली मनभरून माथा टेकवण्यासाठी.
तो सांगतो फक्त
बैलाच्या आभाळभिड्या खांद्याची गोष्ट
क्षितिजालाही पेलणार नाहीत असे नांगर आणि माती
खांद्यात रूजवून भूमी सावरण्याची गोष्ट
तो बोलत नाही युगांतराबद्दल.
मी स्वत:ला कुणबी कवी मानतो. हे कुणबीपण श्रमणाऱ्यांची एक विश्वव्यापी जीवनशैली आहे. श्रमानं तिला भाषा दिली, गाणी, चित्र दिलं. लोकसंचितातून ती निर्माण झाली. त्यामुळेच जागतिकीकरणातही ती आपल्या आदिभावाचे नैतिक उच्चारण करताना दिसते. भारतीय देशीयतेचा शोध या परंपरेला वगळून घेता येणार नाही. ती घडवण्यात जसा हजारो लाखो अज्ञात कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, स्त्रिया यांचा वाटा आहे, तेवढाच मराठी संतपरंपरेचा आणि म. जोतीबा फुलेप्रणीत सत्यशोधकी परंपरेचा आहे. या संस्कृतीतलं जे न-नैतिक होतं, ते जोतीबांनी नाकारलं आणि तिला खरा बहुजन पाया दिला. हेच काम पुढे अधिक विस्तृत स्वरूपात महर्षी वि.रा. शिंदे, आंबेडकर यांनी केलं. मराठी साहित्यावर या जाणिवेचा निर्णायक प्रभाव पडला आहे. मीही त्याला अपवाद नाही.
परंपरेचं गौरवीकरण टाळून शेतीव्यवस्था आणि शेतकरी समाज समजून घेणं कवी म्हणून मला गरजेचं वाटतं. बदलतं सामाजिक, राजकीय आणि बहुस्तरीय सांस्कृतिक परिवर्तन यात आजचा शेतकरी आणि गाव नेमका कुठे आहे, हा कलावंत म्हणून मला पडलेला प्रश्न कायम असतो. या बदलाच्या अवकाशात कुणबीपणाचा पुर्नशोध घेणारी माझी कविता आहे. आपली संवेदनशीलता भौतिकीकरणाच्या धबडग्यात नापिक होत असताना कलावंतांची जबाबदारी विशेष महत्त्वाची आहे. साहित्य हे क्रांती घडवून आणतं की, नाही यापेक्षाही समाजाली विलारशीलता आणि संवेदना टिकवून ठेवण्याचं काम ते करतं, ही बाब परिवर्तनासाठी आवश्यक भूमी निर्माण करणारी असते. संवेदना संपलेला समाज सर्वांत भयावह असतो. तो तसा होऊ न देणं ही कवी लेखकाची प्रतिज्ञा असायला हवी.
शेतकरी कष्टकऱ्यांची मुलं शिकून गावगाडाबाहेर पडायला लागली. शिक्षणातल्या बहुजन परंपरेतून दलित, ग्रामीण साहित्य निर्माण झालं. मूलत: शेतात राबणं ही बाब एका बाजूनं सृजनशील मानली तरी ती भयंकरपणे कष्टप्रद असल्यानं शेतात राबणारा लिहू शकत नाही. तो फक्त गाणं गाऊ शकतो, तोही जगण्याला आधार म्हणून. भारतीय खेडी ही तळाशी जाऊन विचार केला तर रोमँटिक कधीही नव्हती. खेडांशी भावनिक आणि जैविक संबंध नसणाऱ्यांनी ती रोमँटिक स्वरूपात उभी केली. गेल्या काही दशकांत भारतीय पातळीवर खेडातला हा तथाकथित रोमँटिसिझम लेखनाच्या पातळीवर नाहीसा होताना दिसतो. नवं लेखन अधिकाधिक वास्तववादी आणि जगण्याला भिडणारं होताना दिसतं. मीही असाच थेट वर्तमानाचे बोट हाती धरून काहीएक नोंदवणारा कवी लेखक आहे. प्रतिशोध घेण्यापेक्षा पुर्नशोध घेणं मला महत्त्वाचं वाटतं.
भूमी आणि तिला जोडून येणाऱ्या भूमिकांना नकार देणं, मला मानसिक आणि भावनिक विस्थापनांना आमंत्रित करणारं वाटतं. स्थितीवादाला नकार देऊनही ही भूमिनिष्ठा जपता येऊ शकते. जी आपल्याला प्रेमचंद, रेणू, नागार्जुन यांच्या साहित्यातून दिसते. भूमिनिष्ठा ही कलावंताला सामान्यत्वाशी जोडून विश्वात्मकतेकडे नेणारी असावी. मराठीपणाला महाराष्ट्राचं दैवत, विठ्ठल जोडलेला आहे. माझी कविताही विठ्ठल आणि पंढरपुरातल्या असंख्य प्रतिमांनी व्यापलेली आहे. विठ्ठलाकडे मी आध्यात्मिक प्रतीकापेक्षा सांस्कृतिक प्रतीक म्हणून पाहतो. अध्यात्माच्या चौकटीतही तुकोबा, ज्ञानोबासारख्या संतानी मांडलेला विद्रोह हा सांस्कृतिक विद्रोहच होता. मीही कवी म्हणून आधुनिक जाणिवांच्या पातळीवर या परंपरेला जोडून घेतलं आहे. मराठी अभंग साहित्य हे मराठी शेतकऱ्यांचं ऊर्जाकेंद्र आहे. सतत होणाऱ्या पडझडीत या साहित्यानंच त्याला जगण्याचं बळ दिलं आहे. हीच व्यापक अर्थानं आपली भारतीय परंपरा आहे.
भारतीयत्व ही संकल्पना बहुस्तरीय असून ती केवळ शेतीव्यस्थेशीच निगडीत आहे, असा माझा दुराग्रह नाही. शेती ही आपल्या जगण्याची शैली आणि मुख्य व्यवस्था असली तरी तिच्या पोटात नांदणाऱ्या अनेक उपव्यवस्था आहेत. त्यापैकी काहींचा चेहरा हा पारंपरिक, रूढीवादी आणि अनैतिक असा होता. त्याला नाकारणं हा देखील भारतीय असण्याच्या प्राचीन नैतिक आणि आधुनिक प्रक्रियेचाच भाग आहे. कलावंतानं भूमिनिष्ठतेचं पुरस्करण करताना याचाही विचार करणं आवश्यक आहे. सृजनशील लेखन करणं हे एक निखळ नैतिक कृत्य आहे असं मी मानतो. नैतिकता ही केव्हाही अभिजात मूल्यांचा पुरस्कार करणारी, अमानवी बाबींना नकार देणारी आणि विशुद्ध समाजव्यवस्थेचा आग्रह धरणारी असावी. आधुनिक मराठी साहित्याचा विचार करता मराठीतील वैचारिक लेखन हे ललित लेखनाला बळ पुरवणारं ठरलं आहे. त्यातूनच आधुनिक मराठी साहित्याचीदेखील मूल्यधारणा झाली आहे. कृषीग्राम संवेदनेचं साहित्य असो की, दलित, स्त्रीवादी, जनवादी साहित्य यांचं वैचारिक भरणपोषण फुले, आंबेडकरी विचारानं केलं आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही.
समकालीनत्व ही बाब मला विशेष महत्त्वाची वाटते. जे नैतिक आहे ते समकालीन आहे असं मी व्यापक अर्थानं मानतो. समकालीनत्वाचा कालिक अर्थ मला विशेष महत्त्वाचा वाटत नाही. जातिव्यवस्था हा घटक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मराठी साहित्यावरही निर्णायक प्रभाव पाडणारा ठरला आहे. सामाजिक स्तरीकरणातून निर्माण झालेले भेद जेव्हा मानवी संवेदनेचे भाग बनतात आणि त्यातून वर्तनप्रणाली प्रभावित करतात, तेव्हा गंभीर प्रश्न निर्माण होतात. भारतीय जातव्यवस्थेला वर्गीय संरचनेत जरी बघता आलं तरी तिचा मूळ आधार हा जातीय संवेदना आणि त्यातून आलेला नकार आणि स्वीकाराचा आहे. आंबेडकरी विचारांचं लेखन यासाठीच माझ्यासारख्या कृषीजन परंपरेच्या लेखक कवीला आपलं आणि महत्त्वाचं वाटतं.
आंबेडकरी जाणीवेचं श्रेष्ठत्व स्वीकारत असताना हेही नमूद करणं आवश्यक आहे की, दलितत्वाच्या कक्षा आता जात ओलांडून पुढे जाताना दिसतात. ही बाब एकूण अर्थानं चांगली की वाईट याचा संभ्रम पडावा अशी आहे. जोतीबांनी ब्राह्मण आणि शुद्र असे समाजाचे दोन वर्ग कल्पिले होते. तेच आता महत्त्वाचे वाटू लागले आहेत. मराठी प्रांतातील शेतीव्यवस्थेशी निगडित, फक्त शेतीवर अवलंबून असणारा समूह हा या दलितत्वाशी जोडला गेला आहे. म्हणून तो समूह आपल्या पर्यावरणासह एका विनाशाच्या कड्यावर उभा असलेला दिसतो. दलितत्वाशी बांधीलकी मांडणाऱ्या प्रवाहांना या वास्तवाची नोंद घेणं तेवढं गरजेचं वाटत नाही, याहीपेक्षा या घटनांकडे प्रतिशोधाच्या भावनेनं पाहिलं जातं ही बाब अतिशय दुर्दैवी अशी आहे.
मी कृषीग्राम संवेदनेचा लेखक असलो तरी मानवी समूहाच्या प्रत्येक संवेदनेचं व्यक्त होणं मला तितकंच महत्त्वाचं वाटतं. असहिष्णूतेचा मुद्दा खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर आज चर्चिला जाताना दिसतो. केवळ सरकारी व्यवस्थांमधून व्यक्त होणारी, असहिष्णूतेला पूरक ठरणारी व्यवस्थाच मला महत्त्वाची वाटत नाही, तर समाजव्यवस्थेच्या पातळीवर एखाद्यानं आपल्याला न आवडणारं, दुसऱ्या एखाद्याला बोलू न देणं किंवा जो कोणी आपल्या विरोधात बोलेल त्याला गोळी घालणं, ही बाब सर्वार्थानं निषेधार्य अशी आहे. अभिव्यक्ती हा कलेच्या व्यक्त होण्याचा गाभा असतो. कला ही केवळ रंगशिल्प यातूनच नाही तर विचारातूनही व्यक्त होत असते. या विचारांना नाकारणारी व्यवस्था इथं पूर्वापार असली तरी तिचं सबलीकरण आज अधिक होताना दिसतं. या सबलीकरणाला समर्थन देणारा कोणताही घटक असो, त्याला नकार देणं हा विद्रोह मला विशेष महत्त्वाचा वाटतो.
मराठी लेखकाचं मराठीपण हे एका प्रदीर्घ परंपरेचं उच्चारण आहे. या भाषेला शासकीय पातळीवर अभिजात दर्जा मिळण्याचा मुद्दा सतत चर्चेत येताना दिसतो. मुळात मराठी भाषा आणि साहित्यसंस्कृती ही अभिजात आहेच, यापुढे दर्जा मिळणं वगैरेसारख्या तांत्रिक बाबी बिनमहत्त्वाच्या मानल्या तरी तिचं अभिजात असणं कुठेतरी अधिमान्य होणं गरजेचं आहे, हे नाकारता येणार नाही. ‘गाथासप्तशती’, ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, वारकरी साहित्य, तुकोबा, शिवाजी राजांची पत्रं, जोतीबा, रानडे, लोकहितवादी, आगरकर, महर्षी शिंदे, आंबेडकर आणि त्याला जोडून येणारं बरंच काही. शिवाय त्याला जोडून असणारी लोकपरंपरा, लोकगीतं, आदिवासी कोळी गीतं एवढं अभिजातपण जगातल्या फारच कमी भाषांमध्ये आढळून येतं. आत्मगौरवाचा दोष पत्करूनही असं विधान करणं धाडसाचं ठरत नाही.
मराठी साहित्यानं मराठी समाजाला कित्येक शतकांपासून तोलून धरलं आहे. लेखक कवी जे लिहितो, ते किती लोक वाचतात हा प्रश्न सनातन असला तरी समाजासमोर लेखक कवीनं लेखक म्हणून आणि विशेषत: माणूस म्हणून नीट व्यक्त होणं मला महत्त्वाचं वाटतं. त्यासाठी कलावंत हा चांगला माणूस असणं विशेष अगत्याचं आहे. लेखन आणि वर्तन यातलं अंतर व्यावहारिकदृष्ट्या मान्य केलं तरी दोन टोकावर दोघं असू नयेत आणि या दोघातलं अंतर सुसह्य असावं ही तडजोड किमान पातळीवर स्वीकारावीच लागेल. मराठी साहित्यातील संत साहित्य आणि प्रबोधन, क्रांतिकारी परंपरेतलं साहित्य आणि कवी विचारवंत हे या संदर्भात महत्त्वाचे मानावे लागतील. जागतिकीकरणातील मराठी साहित्यालाही याच विचार परंपरेचा वारसा आहे. म्हणून एकूण भारतीय संदर्भात मराठी भाषा संस्कृतीचं असाधारणत्व मला महत्त्वाचं वाटतं आणि या भाषेला जोडून असणारा एक मराठी माणूस म्हणून मला त्याचा अभिमानही वाटतो.
.............................................................................................................................................
श्रीकांत देशमुख यांच्या ‘बोलावें ते आम्ही’ या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवितासंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4335
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत देशमुख कवी आहेत.
shrikantdeshmukh63@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Yogesh Deore
Wed , 28 February 2018
लेख खूपच हळुवारपणे मनाचा व मराठी भाषेच्या आत्माच्या ठाव घेतो. लेखातील खूप मुद्दे आणि चिंतन आजच्या वर्तमान काळाशी एकरूप होते. आणि कविता तर भन्नाट आहे. पण वास्तवाने भरलेली.