अजूनकाही
किशोर रक्ताटे आणि राजा कांदळकर यांनी शक्य तितक्या खुल्या मनाने त्या वास्तवाचा शोध घेत गुजरातच्या २०१७च्या विधानसभेची निवडणूक ‘अक्षरनामा’साठी कव्हर केली. त्या त्यांच्या वृत्तांतलेखांचे ‘गुजरात २०१७ : चित्र, चरित्र, चारित्र्य’ हे छोटेखानी पुस्तक नुकतेच डायमंड पब्लिकेशन्सच्या वतीने प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ संपादक-पत्रकार कुमार केतकर यांनी लिहिलेली प्रस्तावना
.............................................................................................................................................
प्रत्येक राज्याला आणि त्या राज्यातील प्रत्येक प्रांताला एक प्रतिमा असते. त्या प्रतिमेतून एक व्यक्तिमत्त्व साकारले जाते. ते नेमके अचूक वा हुबेहूब असते असे नाही. पण ती प्रतिमा बहुतेक लोकांच्या मनात ठसलेली असते. कित्येकदा त्या भागातील लोकांनाही ती प्रतिमा हेच वास्तव वाटते. मीडियामुळे, विशेषतः टीव्ही चॅनेल्समुळे आणि त्यावर चालणाऱ्या (निष्फळ व अवास्तव) चर्चांमुळे त्या प्रतिमा अधोरेखित होत असतात. कुणीही वार्ताहर, विशेषतः एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणारा, त्या प्रतिमाच बरोबर घेऊन जात असतो. वार्ताहर जर खुल्या मनाने लोकांमध्ये वावरला, तर त्या प्रतिमांमधील फोलपणा त्याच्या लक्षात येऊ लागतो. प्रतिमांचा पडदा दूर होऊ लागल्यावर वास्तव दिसू लागते.
किशोर रक्ताटे आणि राजा कांदळकर या दोघांनी त्या वास्तवाचा शोध शक्य तितक्या खुल्या मनाने केलेला आहे. ‘गुजरात २०१७ : चित्र, चरित्र, चारित्र्य’ हे छोटेखानी पुस्तक म्हणजे जवळजवळ एक महिनाभर गुजरातच्या विविध प्रांतांमध्ये फिरून, लोकांशी संवाद साधून लिहिलेला वृत्तांतपट आहे. वाचणाराही त्यांच्या त्या दौऱ्यात सहज सामील होतो.
गुजरात निवडणुकीला विलक्षण महत्त्व प्राप्त झाले होते. त्याचे मुख्य कारण अर्थातच त्या राजकीय नाटकाचे नायक आणि खलनायकही खुद नरेंद्र मोदी होते. त्यांचे सेनापती अमित शहा म्हणजे हिटलरचे एक सेनापती, रोमेल होते, त्या कुळातले! दोघेही अस्सल गुजराती- अगदी २४ कॅरेटचे. मोदी गुजरातमध्ये १२ वर्षे मुख्यमंत्री- २००२ ते २०१४. त्यानंतर साडेतीन वर्षे देशाचे पंतप्रधान. शहा पक्षाचे अध्यक्ष. दिल्लीचे सरकार आणि अवघा भाजप या दोघांच्या पूर्णपणे कह्यात. शहा हे मोदींची सावली म्हणून ओळखले जात असले तरी ही सावली स्वतःचे शरीर असलेली अनोखी सावली आहे!
गेल्या तीन वर्षांत शहांनी एक बलाढ्य, लढाऊ निवडणूक यंत्रणा उभी केली आहे. एखाद्या महाकाय कॉर्पोरेट कंपनीच्या व्यवस्थापनाप्रमाणे ही यंत्रणा ते चालवतात. या कंपनीचे ते सीईओ. देशाचे सीईओ मोदी. या दोन्ही महाव्यवस्थापकांचा आत्मविश्वास दांडगा आणि आक्रमक. आत्मविश्वास जेव्हा आत्मप्रेमात रूपांतरित होतो, तेव्हा त्यातून निर्माण होते एक आत्मनिर्मित आभासचित्र.
या दोन्ही महाव्यवस्थापकांना या आभासचित्राने इतके मश्गूल केले होते की, आपल्याला कुणी आव्हान देऊ शकेल असे त्यांना यत्किंचितही वाटत नव्हते. आपण अजिंक्य आहोत आणि ‘आम्ही कोण म्हणूनी काय पुससी, आम्ही असू लाडके देवाचे’ अशा तोऱ्यात गेली तीन वर्षे ते देशावर अधिराज्य करत होते. दिल्ली आणि बिहार या दोन्ही राज्यांत त्यांच्या अजिंक्यतारा किल्ल्याला खिंडार पडूनही त्यांचा तोरा तसाच राहिला होता. उत्तर प्रदेशातील ४०२ जागांपैकी ३२५ जागा आठच महिन्यांपूर्वी जिंकल्यामुळे त्यांचा आत्मगंड आकाशाला भिडत होता.
‘काँग्रेसमुक्त भारत’ करण्याचा विडा उचललेल्या या दोन महाव्यवस्थापकांना तर असे वाटत होते की, देश खरोखरच काँग्रेसमुक्त झाला आहे. त्यातून काँग्रेसचे नेतृत्व कुणाकडे तर सोनिया आणि राहुलकडे! दोघांनाही लोकसभेत पूर्ण निष्प्रभ केल्यामुळे आता ‘आम्हाला दिधले हे जग खेळावया’ असेच त्यांना वाटत होते. शिवाय दोघेही गुजराती, आणि गुजरातमध्ये भाजपचे सलग २२ वर्षे राज्य! तमाम नोकरशाही, पोलिस यंत्रणा, जवळजवळ सर्व मीडिया-टीव्ही आणि प्रेस-हे सर्व अंकीत, किंवा लाचर वा भेदरलेले! यामुळे आपला गुजरातचा वाडा चिरेबंदी असल्याची खात्री त्या दोघांना होती.
रक्ताटे आणि कांदळकर जेव्हा या चिरेबंदी वाड्यात आले, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजे निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात, तेव्हा त्यांना लगेचच दिसू लागले की, वाडा तसा चिरेबंदी नाही! कुठे भिंत खचते आहे, खांब कलथूनी जात आहे असे त्यांना दिसू लागले. पण त्या अशा मोठ्या चिरेबंदी वाड्याची उद्ध्वस्त धर्मशाळा होईल हेही शक्य नसल्याचे त्यांना जाणवत होते. म्हणून त्यांनी त्या हवेलीच्या विविध दालनांमध्ये जाऊन पाहणी केली. व्यापारी, शेतकरी, पांढरपेशा मध्यमवर्ग, वकील, डॉक्टर व इतर व्यावसायिक, भाजप-काँग्रेस पक्षांचे कार्यकर्ते यांच्याशी बोलून वाड्याची अवस्था जाणून घेतली.
‘सुंदर मी होणार’ या नाटकात जसे त्या सरंजामी धनाढ्य माणसाला गावातून आव्हान निर्माण होते, तसेच काहीसे आव्हान मोदी-शहांच्या सरंजामशाहीला हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवानी या तिघांनी दिल्याचे रक्ताटे-कांदळकरांना दिसले. म्हणजेच निवडणुकीचे नाट्य आता रंगत जाणार, हवेलीला धक्के बसणार हे त्यांना स्पष्ट दिसू लागले.
त्यांच्या या वृत्तांतपटावर त्यांनी त्या चित्रात बंडखोरीचे रंग भरायला सुरुवात केली. प्रत्यक्ष पटेल समाज, ओबीसी विभाग, दलित यांच्या वस्त्यांवर जाऊन लोकमानसात शिरण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेस त्यांना हेसुद्धा जाणवू लागले की, ज्या राहुलची निर्भर्त्सना ‘पप्पू’ म्हणून केली जात होती, तो पप्पू या तिघांना (त्यांच्यातील अंतर्विरोध दूर करून) एकत्र आणण्यात यशस्वी झाला आहे. राहुलच्या सभांना जेव्हा तुफानी गर्दी होऊ लागली, तेव्हा प्रथम स्थानिक भाजपला जाणवू लागले की, वाड्याच्या काही भिंती खचत आहेत. पण जे शहांचे खंदे उपसेनापती होते, त्यांना मात्र १८२ पैकी १५१ जागा जिंकणार असेच अखेरपर्यंत वाटत होते. आत्मविश्वास असेच आभास निर्माण करतो!
रक्ताटे आणि कांदळकरांनी त्यांच्या वृत्तांकनात कुठेही भाकित केले नाही. पण वस्तुस्थितीच्या यथार्थ दर्शनातच भाकिताची चाहूल त्यांना लागत होती. मोदींनी निर्माण केलेले विकासाचे गारुड केव्हाच उडून गेले होते. त्यांना पुन्हा हिंदू-मुसलमान या मानसिक-राजकीय फाळणीवरच प्रचार करावा लागत होता. मोदींची इतकी दमछाक होत होती की, त्यांनी एकूण ३७ जाहीर सभा घेतल्या! (त्या जाहीर सभांच्या परिसरात सुमारे १२५ मतदारसंघांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समावेश होता.)
राहुल-काँग्रेसला ५०-६० जागांपेक्षा अधिक काही प्राप्त होणार नाही, असा ‘खात्रीलायक अंदाज’ बहुतेक टीव्ही चॅनेल्स आणि त्यांचे अँकर्स करत होते. त्यांच्यापैकी किती जण भाडोत्री होते, हे अर्थातच ज्याने त्याने ठरवायचे.
अखेरीस चिरेबंदी वाडा तसाच उभा राहिला, पण ‘तसाच’ फक्त बाहेरून! कारण भाजपला १५१ फार दूर राहिल्या, १०० ही जागा जिंकता आल्या नाहीत. काँग्रेस ८० च्या कक्षेत पोचली. हे सर्व रणकंदन कसे झाले याचा ‘आँखो देखा हाल’ म्हणजे हा वृत्तांतपट!
खरे म्हणजे या दोन्ही वार्ताहरांनी या दौऱ्यात मोदींची धर्मपत्नी जशोदाबेन हीची भेट वा मुलाखत घ्यायचा प्रयत्न करायला हवा होता. मोदी इतक्या वेळी गुजरातला गेले, पण हा कट्टर हिंदू प्रधानमंत्री आपल्या बायकोला भेटायला गेला नाही! आपल्या देशातील परित्यक्तांची दशाच त्यामुळे अधोरेखित झाली. असो. एक ‘एक्सलुसिव्ह’ स्टोरी हुकली! पण गुजरातचा हा उभा-आडवा वेध वेधक खचितच आहे!
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4383
.............................................................................................................................................
लेखक कुमार केतकर ज्येष्ठ पत्रकार-संपादक आहेत.
tusharmhatre1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment