कहाणी मानवप्राण्याची - मानवी संस्कृतीची चित्तथरारक रहस्यकथा
ग्रंथनामा - झलक
कुमार केतकर
  • ‘कहाणी मानवप्राण्याची’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 09 February 2018
  • ग्रंथनामा झलक कहाणी मानवप्राण्याची नंदा खरे कुमार केतकर मनोविकास प्रकाशन

मानवी संस्कृतीची चित्तथरारक रहस्यकथा असलेल्या ‘कहाणी मानवप्राण्याची’ या नंदा खरे लिखित आणि मनोविकास प्रकाशन प्रकाशित पुस्तकाची नवी आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकाला ज्येष्ठ संपादक-पत्रकार कुमार केतकर यांनी लिहिलेली प्रस्तावना...

.................................................................................................................................................................

‘विश्वाचा विस्तार केवढा? -- ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा’ या ओळी केशवसुतांनी सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी लिहिल्या तेव्हा अल्बर्ट आईनस्टाईनचा ‘स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी’चा प्रबंध प्रसिद्ध झालेला नव्हता. ज्या वर्षी केशवसुत वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी निधन पावले, त्याच वर्षी, म्हणजे १९०५ साली तो प्रबंध प्रकाशित झाला. ‘जे न देखें रवि तें देखें कवि’ असे म्हटले जाते. केशवसुत कवी होते. वैज्ञानिक नव्हते. त्यांना विश्वजन्माचे गूढ वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजणे अशक्य होते, कारण त्यांच्यापर्यंत तेव्हा आधुनिक मानले गेलेले विज्ञान पोचलेलेच नव्हते. रेडिओ, टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, विज्ञानविषयक लेख वा पुस्तके यांपैकी काहीही केशवसुतांना उपलब्ध होणे शक्य नव्हते. परंतु त्यांना विलक्षण कुतूहल होते आणि मूलभूत प्रश्न पडत होते, समाजस्थितीकडे पाहून अस्वस्थता वाटत होती आणि नवा माणूस- नवे जग निर्माण करता येईल असा आत्मविश्वासही वाटत होता. म्हणूनच ‘विश्वाचा विस्तार केवढा?’ या प्रश्नाचे खगोलशास्त्रीय उत्तर देण्याऐवजी त्यांनी ‘ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा’ असे फटकळ वाटणारे, पण आताच्या वैचारिक दृष्टिकोनातून नेमके उत्तर दिले.

त्यांच्या काळात, म्हणजे १८६६ ते १९०५ या काळात ‘अखिल विश्व ब्राह्मण संमेलन’, ‘मराठा महासंघाचे आंदोलन’ किंवा ‘विश्व हिंदू परिषद’ अशा गोष्टी नव्हत्या. तरीही अस्मितांची अरेरावी तेव्हाही असणारच. नाहीतर त्यांनी ‘ब्राह्मण नाहीं, हिंदुहि नाहीं, न मी एक पंथाचा’ अशा कठोर बुद्धिप्रामाण्यवादी, ‘सेक्युलर’ ओळी लिहिल्या नसत्या आणि ‘जुनें जाऊं द्या मरणालागुनी - जाळुनि किंवा पुरूनी टाका’ असेही सात्त्विक - पुरोगामी उद्वेगाने म्हटले नसते. तसे पाहिले तर मार्क्स-एंगल्स-लेनिन यांची नावेही त्यांच्यापर्यंत तेव्हा पोचण्याची शक्यता नव्हती, पण तरीही ‘नव्या युगाचा नवा शिपाई’ व्हावेसे त्यांना वाटले. त्यांच्या मृत्यूच्या वर्षी म्हणजेच १९०५ साली, रशियात पहिली लोकशाही क्रांती झाली - लेनिनप्रणीत कामगार क्रांतीच्या अगोदर बारा वर्षे. तरीही कोकणातल्या त्या निवांत पण दरिद्री गावात बसून केशवसुतांना ‘क्रांती’ची चाहूल लागली होती.

म्हणजेच त्यांना विश्वाची चिंता करतानाच समाजात असलेल्या विकृतींना जाळून नव्या युगाची तयारी करण्याचीही तितकीच तातडी वाटत होती. एक प्रकारची ‘angst’ किंवा चित्ताची अनामिक अस्वस्थता निर्माण झाल्याशिवाय असे प्रश्‍न पडत नाहीत - विश्व व्यापणारे आणि आपल्या जीवनाला चहूबाजूंनी वेढणारे प्रश्न! एकोणिसाव्या शतकापासून ते विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत जगभर इतक्या प्रचंड उलथापालथी झाल्या आहेत, इतके प्रश्न भेडसावू लागले आहेत, की त्यांचा अन्वयार्थ लावल्याशिवाय आपल्याला आजच्या जीवनाचे नीट आकलनही होणार नाही. किंबहुना असे अन्वयार्थ लावण्याचे ‘शास्त्र’ही याच काळात तयार झाले. याचा अर्थ पूर्वी वेदांनी वा ग्रीकांनी, अरबांनी वा चिन्यांनी तसे अन्वयार्थ लावायचा प्रयत्न केला नाही असे अजिबात नाही. परंतु असे प्रश्न आणि त्यांचे अन्वयार्थ हे त्या काळात विद्वत्जन, उच्चभ्रू आणि सत्ताधारी यांच्या वर्तुळांपुरतेच मर्यादित होते. गेल्या पन्नास वर्षांत, विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर, तसे कुतूहल आणि दिङ्मूढताही सर्वसामान्यांपर्यंत पोचू लागली. ‘मीडिया-इन्फर्मेशन रिव्होल्यूशन’ म्हणजेच माध्यम-माहिती क्रांतीच्या विस्तारामुळे ती ‘angst’ म्हणजे मनाची अस्वस्थता सर्वव्यापी झाली. परंतु प्रश्न अर्थातच दिङ्मूढ होण्याचा नाही तर त्या स्थितीतून बाहेर पडण्याचा आहे!

अनेकदा आजही आजूबाजूच्या अशाच असंबद्ध वाटणाऱ्या घटना पाहिल्या, गोंधळ-अराजक पाहिले, अन्याय-अत्याचार पाहिले की जीवनातल्या समष्टीवरचा, व्यवस्थेवरचा इतकेच काय परस्परांवरचा विश्वासही डळमळीत होतो. काहीजण उदास होतात तर काहीजण उदासीन! काही जण असंवेदनक्षम होतात तर काही वेदना- संवेदनांच्याही पलिकडे अमानुष स्थितीत जाऊन पोहोचतात. इराकवर वा पूर्वी व्हिएतनामवर वा त्याहीपूर्वी हिरोशिमा- नागासाकीवर बॉम्बहल्ले करून लाखो माणसे ठार मारणारी अजस्र अमेरिकन/युरोपियन युद्धयंत्रणा असो वा ‘अल कायदा’चे बेफाम उधळलेले दहशतवादी असोत, श्रीलंकेतील तामिळ वाघांचे हुकूमशहा प्रभाकरन असोत वा इस्त्रायली सैन्याने पॅलेस्टीनमध्ये चालवलेला नरसंहार असो - कोणत्याही संवेदनक्षम माणसाला या घटना मुळापासून हलवून सोडतात. बऱ्याच वेळा त्या हिंस्रतेची उग्रता पाहून काहींचा ‘सिव्हिलिझेशन’ या संकल्पनेवरचाच विश्वास उडतो! ‘सिव्हिलिझेशन’ या संज्ञेचे भाषांतर ‘सभ्यता’ असे करण्याचा प्रघात आहे. प्रत्यक्षात ‘सिव्हिलिझेशन’ ही संकल्पना त्याहून बरीच व्यापक आहे. त्यात अभिप्रेत आहे प्रगती - भौतिक, मानसिक आणि वैचारिक. त्यात अभिप्रेत आहे संस्कृती - पिरॅमिड्स्, ताजमहाल किंवा चांद्रयान. त्यात अभिप्रेत आहे कलाविष्कार - लेण्यांधील शिल्पांपासून पिकासोपर्यंत आणि कालिदास-शेक्सपियरपासून केशवसुत, सुर्वे, विजय तेंडुलकरांपर्यंत. ‘सिव्हिलिझेशन’चे एक अत्यंत व्यवच्छेदक अंग म्हणजे अर्थातच ज्ञान-विज्ञान, तत्त्वज्ञान-तंत्रज्ञान. या ज्ञान-विज्ञानाला एक सर्वंकषता आहे. ती विश्वजन्माचा शोध घेते, विश्वरचनेचा अभ्यास करते, जीवसृष्टीचे गूढ उलगडायचा प्रयत्न करते आणि रोगारोगाने वा अपघाताने (!) या भूतलावर (कदाचित इतरत्रही!) जन्माला आलेल्या माणसाच्या मनाचा, व्यवहाराचा, समाजाचाही वेध घेत राहते. हे सगळे शोध-वेध अजून तसे अपुरेच असले तरी गेल्या तीन-चार हजार वर्षांत आणि विशेषतः एकोणिसाव्या शतकापासून या ज्ञानकक्षा विलक्षण रुंदावल्या आहेत.

कोणत्याही एका ग्रंथात वा खंड-मालेत हे प्रकांड (multidimensional)) ज्ञान बसवणे अर्थातच शक्य नाही. परंतु ‘कहाणी मानवप्राण्याची’ इतकी चित्तथरारक, उत्कंठावर्धक आहे की, तिचे काहीसे संक्षिप्त रूपही आपल्याला एखाद्या रहस्यकथेप्राणे गुंतवून टाकू शकते. त्या दृष्टिकोनातून पाहिले तर नंदा खरे यांनी ही सिव्हिलिझेशनची रहस्यकथाच लिहिण्याचा घाट घातला आहे! विश्वाची, जीवसृष्टीची, माणसाची आणि सिव्हिलिझेशनची ‘मिस्टरी’ खरोखरच इतकी भन्नाट आहे की, त्या रहस्यकथेत वाचक खरोखरच शिरला तर त्याच्या संवेदना आणि माणुसकी, बुद्धी आणि नैतिकता जागृत होतात. एकदा ती जागृतावस्था आली आणि ती कुतूहलाने तशीच ठेवली, तर आपल्या जगण्यालाच अर्थ प्राप्त होतो. जगातील ‘दुरितांचे तिमिर जावो’ असे खरोखरच वाटत असेल तर ज्ञान-विज्ञानाचा प्रसार हे रामबाण औषध आहे. परंतु ज्ञान- विज्ञान म्हणजे पोथी नव्हे, ग्रंथ नव्हे, चौकट नव्हे, अंतिम सिद्धान्त नव्हे, सर्व प्रश्नांची उत्तरे नव्हेत, श्रद्धा नव्हेत, भक्ती नव्हे, पक्ष नव्हे, एकमेव विचारसरणी नव्हे, धर्म, पंथ, रुढी-परंपरा नव्हेत. खरे तर ज्ञान-विज्ञानात याही गोष्टींचा अभ्यास व शोध अभिप्रेत आहे. अगदी धर्मसंस्था, कुटुंबसंस्था, शासनसंस्था, समाज-व्यवस्था कशा जन्माला आल्या येथपासून ते जीवसृष्टीचा उगम, उत्क्रांती, विस्तार असे सर्व काही. म्हणूनच एका अर्थाने हा ग्रंथ म्हणजे ‘ट्रेलर’ आहे किंवा टीव्हीवाल्याच्या परिभाषेत ‘प्रोमो’ आहे. एक अशी झलक, की जी पाहून यातील प्रश्नांवर अधिक वाचावेसे वाटेल, चिंतन करावेसे वाटेल, चर्चा करावीशी वाटेल, वाद घालावेसे वाटतील किंवा नवे प्रश्न उपस्थित करून पर्यायी थिअरीसुद्धा द्यावीशी वाटेल. ज्ञान-विज्ञान हे तसे पक्के अहिंसक आहे. परंतु त्याच ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर मात्र महासंहारासाठी केला जाऊ शकतो. अणुविभाजनातून ऊर्जाही तयार करता येते आणि बॉम्बही. कात्री-सुरीने शस्त्रक्रिया करता येते आणि खूनही. उद्योगांमुळे जीवनमान सुधारण्याच्या वस्तू निर्माण करता येतात आणि प्रदूषणही. मीडियामधून ज्ञानकक्षा रुंदावता येतात तसेच विद्वेषही पसरवता येतो. म्हणजेच वापरणाऱ्याची ‘नैतिकता’ तितकीच महत्त्वाची!

परंतु नैतिकतेचा मुद्दा खूपच गुंतागुंतीचा आणि बरेच वेळा ‘सब्जेक्टिव्ह’ किंवा स्थल- काल-इतिहास-संस्कृती आणि व्यक्तिसापेक्ष असतो. एकूण जीवनाकडेही पाहायला दृष्टिकोन लागतो, तत्त्वज्ञानही लागते (पोथी नव्हे) आणि शुद्ध मन म्हणजेच चिकित्सक वृत्ती. त्याशिवाय त्या ज्ञान- विज्ञानाला नैतिकता प्राप्त होणार नाही. अमुक इतके ज्ञानसंपादन केले की पुरे असे तर कधीच शक्य नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक ज्ञानाची कसोटी ‘उपयुक्तता’ हीही असत नाही. गणितातील अशी कितीतरी प्रमेये आहेत की, त्यांचा तसा ऐहिक जीवनाला काहीही उपयोग नाही. अशी अनेक कूट वाटणारीही प्रमेये वा कोडी आहेत की जी गेली अडीच-तीनशे वर्षे सुटलेली नाहीत. त्यावाचून कुणाचे काही अडते आहे वा अडले असेही नाही. तरीही जगातील अनेक गणिती झपाटल्याप्राणे त्या प्रमेयांचा आणि कोड्यांचा शोध घेत आहेत. अगदी सर्वस्व झुगारून देऊन.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

माणूस सर्वस्व झुगारून द्यायला तयार होतो ते केवळ स्वार्थासाठी, लोभासाठी वा ऐहिक सुखासाठी असेही नाही. एका मुलीचे प्रेम संपादन करण्यासाठी एका सर्जनशील तरुण गणित्याने तलवारीच्या द्वंद्वाचे आव्हान स्वीकारले होते. तो फ्रेंच तरुण त्यात मरण पावला. परंतु मरण्याचा आदल्या रात्रीपर्यंत तो गणितातील कूट प्रमेये तयार करत बसला होता. आपण मरणार हे त्याला माहीतच होते. तरीही तो द्वंद्वाला तयार झाला आणि गणितेही सोडवत बसला. त्या दुर्दम्य जिद्दीचा, प्रेमाचा, मायेचा, करुणेचा, धैर्याचा, नैतिकतेचा ‘वैज्ञानिक’, ‘तर्कसंगत’ वा ‘बुद्धिप्रमाण’ शोध कदाचित लागणारही नाही. म्हणजे एखाद्या वेळेस विश्वाच्या अथांगतेचा शोध ‘डोक्यापलीकडे’ जाऊन घेता येईल; पण मनाच्या अचपळतेचा आणि अथांगतेचा शोध अपुराच राहील आणि तरीही तो शोध घेत राहणे हेच एक साहस आहे.

गौतम बुद्धाने आणि अरविंदबाबूंनी, कणादमुनींनी आणि आइनस्टाइनने, चार्ल्स डार्विन आणि कार्ल मार्क्सने, सॉक्रेटिस-प्लेटोंपासून ते बर्ट्राण्ड रसेलपर्यंत आणि अनेक चिनी व अरब विचारवंतांनी तो शोध घेतला आहे. त्या शोधांचा ‘शोध’ घ्यायचा प्रयत्न एका ग्रंथातून पुरा होणे शक्य नाही. म्हणूनच वर म्हटल्याप्राणे नंदा खरेंनी ‘प्रोमो’ तयार केला आहे.

नंदा खरे यांनी लिहिलेल्या ‘कहाणी मानवप्राण्याची’ या रहस्यकथेची अनुक्रमणिका पाहिली तरी त्यातील चित्तथरारकता समजून येऊ शकेल. खरोखरच ही जीवसृष्टी, हे विश्व, त्यात माणसाने निर्माण केलेले हे ‘सिव्हिलिझेशन’ हे एवढे मोठे चमत्कार आहेत की, ते पाहून अचंबित व्हायला हवे. परंतु हे दररोज समोर दिसणारे चमत्कार नीटपणे पाहायचे सोडून, त्यांचा अन्वयार्थ लावायचा प्रयत्न करायच्याऐवजी, अगदी भली-भली सुशिक्षित मंडळीही बाबा-बापू-गुरूंच्या भजनी का लागतात हेही एक ‘मनोवैज्ञानिक’ कोडेच आहे! अनेक शास्त्रज्ञ, विचारवंत, लेखक, कवी, पत्रकारही अंधश्रद्धाळू चमत्कारांनी भारावलेले असतात. राजकारणी मंडळींनी बाबा-बापूंशी संबंध ठेवणे एक वेळ, सध्याच्या अनिश्‍चित आणि अराजकी स्थितीत समजण्यासारखे आहे! (वस्तुतः राजकारणी हे समाजबदलाच्या प्रक्रियेतील आघाडीचे शिलेदार म्हणून असायला हवेत. असो.) म्हणूनच सध्याच्या वातावरणात या मानवाच्या कहाणीचे विशेष महत्त्व आहे.

विश्वाचा जन्म सुमारे तेरा अब्ज वर्षांपूर्वी झाला (आजच्या गणितानुसार) आणि त्यानंतर आठ अब्ज वर्षांनी सूर्याचा ‘जन्म’ झाला. पृथ्वी त्यानंतर. त्यानंतर सुमारे एक अब्ज वर्षांनी म्हणजे सुमारे साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी पहिले-वहिले जीवसृष्टीचे आविष्कार प्रकट झाले. पण त्यावेळची पृथ्वी, तेव्हाचे या ग्रहावरचे तापमान, भौगोलिकता, सूर्यमालिकेची तत्कालिन स्थिती हे सर्व वेगळे होते. हे सर्व विशिष्ट प्रकारे जुळून आले नसते तर प्रथम जीवसृष्टी आणि त्यानंतर प्राथमिक अवस्थेतला माणूस निर्माणच झाले नसते.

अर्थात, त्यानंतरही गुंतागुंत वाढतच गेली आहे. माणसाचा मेंदू कसा विकसित होत गेला, त्यात ‘मन’ कुठून आले, ‘कॉन्शयसनेस’ कसा तयार झाला, स्मृतिकोश कसे तयार झाले, प्रेरणा, संवेदना, जाणिवा, कल्पना, संकल्पना, विचार, प्रेभावना, अनुभूती, सह-अनुभूती, चिकित्सकता, शोधप्रवृत्ती हे सर्व व इतर बरेच काही अल्पायुषी शरीरयष्टीत कसे समाविष्ट झाले हे आता संशोधनाच्या आघाडीचे विषय आहेत.

नंदा खरेंनी मानवाच्या या कहाणीला भू-स्थिती आणि वातावरणापासून सुरुवात केली असली तरी वेधकपणे ते ही रहस्यकथा उत्क्रांतीच्या पहिल्या काही पायऱ्यांवर आणतात.

चार्लस् डार्विन हा महापुरुष एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकाळात जर अवतरला नसता, तर कदाचित ही उत्क्रांतीची थिअरीच पुढे काही वर्षे तरी मांडली गेली नसती. माणसाच्या कहाणीला खऱ्या अर्थाने कथानक प्राप्त झाले ते डार्विनमुळे.

आपले पूर्वज म्हणजे ‘माकड’ असे आता बहुतांश विद्वानांनी मान्य केले आहे. सुमारे पाच कोटी वर्षांपूर्वीचे माकड प्रगत होत होत ‘वा-नर’ स्थितीपर्यंत कसे आले (आणि कुठून आले) हे समजले आणि आपण खरोखरच कृतज्ञ असलो तर त्या चिंपाझी, गोरिला, ओरांग-ऊटान आणि गिबन या वानरांपुढे नतमस्तक होऊ! खरे म्हणजे अगदी शारीरिक स्तरावरसुद्धा नतमस्तक होणे, दोन पायांवर उभे राहणे, चालणे, हाताची मूठ वळविणे, अंगठ्याचा वापर करणे, आपल्या जीवाला धोका आहे हे लक्षात आल्यावर स्वसंरक्षणासाठी हालचाली करणे, आपल्या ‘नातलगांना’ त्या धोक्याची जाणीव करून देणे... हे सारे काही त्या प्राथमिक ‘कॉन्शयसनेस’चा, जिवंत राहण्याची उर्मी जपण्याचा आणि धोक्याची सूचना ‘स्मृती’ कोशाद्वारे लक्षात ठेवण्यापर्यंतचा प्रवास होता.

त्या बिचाऱ्या माकडांना मागासलेले व रानटी म्हणण्याचा ‘नैतिक अधिकार’ आपल्याला नाही. ती माकडे खूपच ‘मानवी’ होती असे सध्याच्या माणसाच्या संघटित व व्यक्तिगत हिंस्रतेकडे पाहून म्हणावेसे वाटते. एकूणच प्राणी हे त्या ‘नैतिक’ दृष्टिकोनातून अधिक प्रगल्भ, सुजाण आणि ‘मानवी’ वाटावेत! परंतु त्या प्राणिसृष्टीला-मुंगीपासून हत्तीपर्यंत आणि कँटियस माकडापासून ओरांग-ऊटानपर्यंत कुणालाही ‘सिव्हिलिझेशन’ निर्माण करता आले नाही. निसर्गाशी एकरूप झालेल्या त्या प्राण्यांना त्या निसर्गाचे नियम कार्यकारणभाव रूपाने उमजले नाहीत. त्या निसर्गाशी चार हात (किंवा चार पाय!) करतांना, त्या स्थितीवर मात करण्याची ‘आयडिया’ त्यांना सुचली नाही. ते स्वसंरक्षण करू शकले, पुनरुत्पादन करू शकले, भक्ष्य संपादन करून स्वतःचे व पिलांचे पोषण करू शकले, प्रतिकूल हवामानाशी सामना करून जगू शकले, स्वतःची घरटी, बिळे वा गुहा तयार करू शकले, कळपपद्धतीने जगताना ध्वनि-कंपाची ‘भाषा’ बनवू शकले, कान, नाक, त्वचा, डोळे, जीभ, हात-पार वापरून इंद्रियांद्वारे ‘ज्ञान’ही मिळवू शकले! परंतु त्यांच्या दुर्दैवाने या सर्व प्राणीसृष्टीतील मंडळीच्या मेंदूचा विकास मर्यादित राहिल्याने त्यापलिकडे ते जाऊ शकले नाहीत. लाखो वर्षांपूर्वीचे माकड आणि आजचे यांच्यात फारसा फरक नाही. मुंगीतही नाही, झुरळातही नाही, वाघातही नाही, हत्तीतही नाही.

माणूस मात्र ढोबळ मानाने साधारणपणे तशाच शरीरयष्टीचा राहिला असला तरी त्याने निसर्गाशी कधी संघर्ष करून आणि कधी सहकार्य करून स्वतःचे पर्यायी ‘विश्व’ निर्माण केले आहे. त्या पर्यायी विश्वाच्या निर्मितीची कहाणी म्हणजे मानवप्राण्याची कहाणी.

ही कहाणी पृथ्वीवर नक्की कुठे सुरू झाली? सुरुवातीस याबद्दलही तीव्र मतभेद होते. पण आता एक ते चार लाख वर्षांपूर्वीपासूनचे जीवाश्म आफ्रिका व आशियात सापडले आहेत. ‘होमो सेपियन्स सेपियन्स’ म्हणजे आपले अगदी थेट पूर्वज साधारणपणे एक लाख वर्षांपूर्वीचे - म्हणजे डायरेक्ट आजोळ! खापर-ढापर-सुपर हापर -ड्युपर ढापर - खापर पंजोबा - परंतु त्यांचे पूर्वज म्हणजे ‘होमो नीअ‍ॅन्डयथालस्’ आणि त्यांचेही सुपर-खापर पंजोबा म्हणजे होमो सेपियन्स (चार लाख वर्षांपूर्वीचे). प्रस्तावनेच्या निमित्ताने तो सर्व उत्क्रांतीचा इतिहास येथे मला सांगायचा नाही. वाचकांनी तो या ग्रंथात आणि नंतर अधिक उत्कंठा वाटल्यास इतर ग्रंथांमधून वाचावा. मी याबद्दल इतके लिहिले कारण मलाच जरा डार्विन आणि उत्क्रांति संकल्पनेविषयी विलक्षण आकर्षण आहे म्हणून. असो.

नंदा खरेंच्या या ग्रंथाचे वैशिष्ट्य हे की, एखादा गुंतागुंतीचा वाटणारा मुद्दा, एखादा सिद्धांत, एखादे स्पष्टीकरण देताना ते कधी आपल्या दैनंदिन जीवनातली उदाहरणे देतात तर कधी चित्रपट, कादंबऱ्यांचे संदर्भ देतात. त्यामुळे ते रुक्ष प्रवचन न होता एखाद्या रसाळ कथाकथनासारखे होते. ‘होमो सेपियन्स सेपियन्स’चा प्रवास बदलत्या भौगोलिकतेबरोबर हिमयुगापर्यंत कसा झाला आणि हवामान, जमीन, पाणी, एकूण परिस्थिती व वातावरण अनुकूल झाल्यावर माणसाचे सामूहिक- टोळीजीवन कसे सुरू झाले याचा इतिहास तर आजही अनुरूप आहे. जगात अनेक ठिकाणी (अंदमानमध्येही) त्या स्थितीतल्या माणसांचे समूह ‘मागासलेल्या’ अन्नोत्पादन अवस्थेत आहेत.

त्यानंतरच्या म्हणजे तिसऱ्या भागात अर्वाचीन इतिहासाला सुरुवात होते. येथे घटनाक्रमाइतकेच महत्त्व संकल्पनांचे आहे. मालकीची, खासगी संपत्तीची संकल्पना कशी रुजत गेली (जवळजवळ सर्व समाजांमध्ये), शेती कशी प्रगत होत गेली, व्यापार कसा सुरू झाला, बाजारपेठा कशा उदयाला आल्या, औद्योगिक क्रांती कशी निर्माण झाली, त्यातून जीवनशैली कशी बदलत गेली आणि आधुनिक ‘मॉडर्न’ संस्कृती व मूल्ये कशी रुजू लागली हा सर्व इतिहास ओळखीचा भासला तरी प्रत्यक्षात किती अनोळखी आहे हे आपल्या लक्षात येऊ लागते.

एकूण सर्व पुस्तकाचीच ही खुबी आहे. आपल्याला ज्या गोष्टी माहीत होत्या असे वाटत होते, त्याच किती अपुऱ्या होत्या किंवा त्याचे संदर्भ किती वेगळे होते हे वाचताना उलगडत जाते.

आज ज्या युगाचे वर्णन आपण ‘आधुनिक युग’ म्हणून करतो त्या आधुनिकतेची वैशिष्ट्ये ठळक होत गेली ती विज्ञानक्रांतीनंतर. या विज्ञानक्रांतीचा, त्यापूर्वीच सुरू झालेल्या ‘रेनेसाँ’शी संबंध होता. कला आणि विज्ञान यांच्याबरोबर नवसर्जनशीलता जन्माला आली. त्या अनुषंगानेच स्वातंत्र्य संकल्पना आणि मानवतावादाचा बिगर-धर्मीय विचार या बाबी याच काळात रुजू लागल्या. गेल्या काही दशकांमध्ये प्रचलित होऊ लागलेल्या ‘पोस्ट-मॉडर्निस्ट’ विचाराने अनेक गृहीतकांना आव्हान दिले गेले आहे. म्हणजेच आता वैचारिक क्षेत्रात जी अनेक वादळे चालू आहेत आणि जे अनेक संघर्ष सुरू आहेत त्यातील हा एक मुख्य वाद आहे.

प्रस्तावनेच्या मर्यादित शब्दसंख्येत खरेंनी मांडलेला जगाचा इतिहास, आर्थिक कॅनव्हास, आंतरराष्ट्रीय कलह, ग्लोबल वॉर्मिंग, भविष्याचे आव्हान या सर्वांचा आढावा घेणे म्हणजे एका षटकात चाळीस धावा काढण्यासारखे आहे. शिवाय तेही मी येथे आढावारूपाने घेत गेलो तर माझीच दमछाक होईल. त्यापुढे मी अखेरीस इतकेच म्हणू इच्छितो की, हे पुस्तक म्हणजे मानवी संस्कृतीची रहस्यकथा असली तरी ती ‘हू डन इट’ शैलीत एका रात्रीत वाचून संपवण्यासारखी नाही. मानसिक व वैचारिक रवंथ करीतच ती ‘पचवावी’ लागेल. पण तिची चव मात्र सतत चांगलीच राहील हे निश्‍चित.

.................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4357

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......