‘महानगर’चे दिवस
ग्रंथनामा - आगामी
सुनील कर्णिक
  • सुनील कर्णिक आणि त्यांची सहा पुस्तके
  • Fri , 02 February 2018
  • ग्रंथनामा Granthnama आगामी सुनील कर्णिक Sunil Karnik डिंपल पब्लिकेशन्स Dimple Publication

ज्येष्ठ पत्रकार सुनील कर्णिक यांची सहा पुस्तके ९ फेब्रुवारी रोजी डिंपल पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित होत आहेत. हा प्रकाशन सोहळा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर, मुंबई इथे होत आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही पुस्तके प्रकाशित होत आहेत, ही विशेष आनंदाची बाब आहे. यातील ‘न छापण्याजोग्या गोष्टी’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती असून बाकीच्या ‘‘महानगर’चे दिवस’, ‘सोनं आणि माती : म्हणजे गुणवंतांच्या गोष्टी’, ‘मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे’, ‘महाराष्ट्रातील साहित्यिक संस्थानं’, ‘म्हाताऱ्या बायका काय कामाच्या’ या पाच पुस्तकांची पहिली आवृत्ती आहे. या सर्व पुस्तकातील लेख वेळोवेळी वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. या पुस्तकांपैकी ‘‘महानगर’चे दिवस’ या पुस्तकातील हे एक प्रकरण संपादित स्वरूपात.

.............................................................................................................................................

आचार्य अत्र्यांनंतर निखिल वागळे यांच्यासारखा झुंझार पत्रकार महाराष्ट्राने पाहिला नाही हे तर खरंच आहे.

पण आता वागळे हे प्रस्थापित पत्रकार आहेत की प्रस्थापितविरोधी?

ते दोन आहेत.

ते बंडखोर आहेत आणि नाहीत.

ते मध्यमवर्गातून आले.

ररस्त्यावर उतरले.

त्यांनी ‘महानगर’चा पसारा मांडला.

किती किती कामं!

‘अक्षर’ दिवाळी अंक. ‘षट्कार’ आणि ‘चंदेरी’ पाक्षिकं. ‘आपलं महानगर’ आणि ‘हमारा महानगर’ दैनिकं. अक्षर प्रकाशन. प्रकाशन समायंभ. वार्षिकोत्सव आणि पुरस्कार. चर्चासत्रं आणि भाषणं. रोजाचा अग्रलेख आणि इतर लेखन. पत्रकार, स्तंभलेखक आणि ग्रंथथकार. वाचक आणि प्रेक्षक. मनुष्यबळ आणि व्यवस्थापन. उलाढाल आणि भांडवल. थकबाकी आणि नफेखोरी आणि बुडितखाती. कर आणि कर्ज. हिशेब आणि बेहिशेब. मिटवामिटवी आणि मांडवली. आंदोलनं आणि उपोषणं. भांडणं आणि बखेडे. शिव्रागाळी आणि हणामारी. सन्मान आणि अपमान. शत्रू आणि मित्र. गुंड आणि विचारवंत. सत्ताधारी आणि विरोधक. कंगाल आणि धनवान. आंबेडकर आणि अंबानी. एन. राम आणि राजदीप. गल्ली आणि दिल्ली. देश आणि विदेश. धर्म आणि अधर्म. पुरुष, स्त्रिया आणि तृतीयपंथीय. कला आणि क्रीडा. साहित्य आणि संस्कृती. निवडणुका आणि घराणेशाही. चहापान आणि मद्यपान. घर आणि कचेरी. वाहन आणि प्रवास. ग्लॅमर आणि टेन्शन. कॉलेज, कॅन्टीन आणि क्लास...कॉकॅक्ला!

हजारों ‘वाईशें ऐसी, के हर ‘वाईश पे दम निकले! खरंच.

हा पसारा पेलवला नाही तेव्हा वागळ्यांनी तो स्वत:पुरता संपवला.    

त्यांनी शिवसेनेशी झुंज दिली आणि तिच्या फुग्याला ठोसा लगावून त्याच्यातली हवा घालवली.

त्यांनी ‘निर्भय बनो’ आंदोलन छेडलं...आणि मग ते गुंडाळून ठेवलं.

ते सुटाबुटात टीव्हीवर येतात आणि आवाज चढवतात.

तो सूटबूट हे प्रस्थापितपणाचं प्रतीक आहे, तर समोरच्या नेत्याला आक्रमकपणे कोंडीत पकडणं हे प्रस्थापित-विरोधाचं लक्षण आहे!

ते ज्यांची ‘ग्रेट भेट’ घडवतात, ती माणसं सहसा ‘ग्रेट’ वाटतच नाहीत.

आणि या ‘ग्रेट भेटी’चं पुस्तक निघतं, त्यात इतरांऐवजी त्यांचे स्वत:चेच फोटो डोळ्यांवर येतात.

त्यांच्या विचारांना खोली नाही.

त्यांच्या दृष्टीला दूरचं दिसत नाही.

त्यांना अत्र्यांची उंची आणि वजन नाही.

हे सर्व खरं आहे. पण ‘महानगर’वरच्या या लेखात, त्यांच्यासाठी हे नमनाला घडाभर तेल कशासाठी?

याच्यासाठी, की वागळे म्हणजे ‘महानगर’ आणि ‘महानगर’ म्हणजे वागळे होत.

‘महानगर’चं कर्तृत्व आणि अकर्तृत्व, सकसपणा आणि हिणकसपणा, कागद, कात्रणं आणि कचरा, हे सगळंच त्यांच्या पदरात टाकलेलं बरं.

इथे आपण ‘महानगर’ला दोन अंगांनी न्याहाळणार आहोत...मुख्यत: माझ्या अनुभवाच्या जोरावर.

१. दूरचं दर्शन

१९९७ ते २००४ या काळात मी ‘महानगर’मध्ये होतो.

१९९३ ते ९६ मध्ये ‘आज दिनांक’/‘रविवार दिनांक’मध्ये होतो.

१९९० ते ९२ : दै. नवशक्ती

१९८७ ते ९० : ग्रंथनिर्मिती विभाग, मुक्त विद्यापीठ, नाशिक.

 

‘नवशक्ती’चे कार्यकारी संपादक भाऊ जोशी एकदा मला म्हणाले, ‘सध्या सायंदैनिकं बरीच जोरात चालताहेत. (‘महानगर’, ‘सांज लोकसत्ता’, ‘संध्याकाळ’, ‘आज दिनांक’...) तू त्यांचा आढावा घे आणि संबंधितांशी बोलून वृत्तान्त तयार कर.’

मग मी ‘संध्याकाळ’च्या निळूभाऊ खाडिलकरांना भेटलो.

ते म्हणाले, ‘महानगर तर शब्दकोड्यावर चालतोय. त्यांना म्हणावं, एक महिना शब्दकोडं बंद ठेवा आणि पेपर चालवून दाखवा!’         

मी हे वागळ्यांना सांगितलं.

त्यांनी प्रत्युत्तर दिलं : ‘त्यांच्या ‘संध्याकाळ’मध्ये तर तोही गुण नाही...आणि तरी ते तो कचरा पेपर चालवताहेत!’

कुमार केतकरांना भेटलो. (ते ‘नवशक्ती’च्या अलिकडच्या एका इमारतीत, ‘ऑब्झर्वर’नामक अंबानींच्या इंग्रजी दैनिकात वरिष्ठ पदावर होते.)

ते म्हणाले : ‘आपण उघडपणे तसं म्हणायचं नाही, पण मला तर निखिल वागळे हा क्रांतिकारकच वाटतो.’

करता करता सायंदैनिकांवरचा माझा वृत्तान्त तयार झाला. तो मी भाऊ जोशींच्या हातांवर ठेवला.

तसे ते माझे जानी दोस्त होते. पण अचूक वेळी ते मला दोन हात दूर ठेवायचे.

त्यांनी विचारलं, ‘निष्कर्ष काय आहे?’

मी म्हणालो, ‘वागळ्यांनी बाजी मारलीय! सगळे त्यांचीच चर्चा करताहेत!’

ते म्हणाले, ‘हा वृत्तान्त छापू नकोस. बोगस माणूस आहे तो.’

तात्पर्य : आमचा वृत्तान्त छापला गेला नाही.

सगळे आमच्या वाइटावर.

           

१९९६ मध्ये शिवा घुगे यांनी ‘समकालीन संस्कृती’ मासिक सुरू केलं.

मी त्याचा सल्लागार संपादक होतो.

त्याच्या पहिल्या अंकात संजीव साबडे यांनी घेतलेली निखिल वागळे यांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती.

शीर्षक होतं, ‘हवेहवेसे, नकोनकोसे...निखिल वागळे’.

अंक हाती पडताच ते शीर्षक वाचून वागळे म्हणाले, ‘ते तुम्ही काहीही म्हणा!’

या मुलाखतीत एक प्रश्न होता, ‘मृणाल गोरे यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल तुम्हांला काय वाटतं?’

वागळे गप्प राहिले.

अंकामध्ये या प्रश्नाखाली आम्ही कंसात लिहिलं : ‘(उत्तर दिलं नाही.)’

काही जणांच्या मते, ते या मुलाखतीतलं सर्वांत चांगलं प्रश्नोत्तर होतं.

           

याच्या आधी एकदा ‘महानगर’ने मुंबई विद्यापीठाचे तेव्हाचे कुलगुरू शशिकांत कर्णिक यांच्या विरोधात मोहीम चालवली होती.

वागळ्यांनी त्यांच्या ‘कॅलिडोस्कोप’ सदरात त्याविषयी लिहिलं. त्या विद्यापीठातल्या इतर कर्णिकांची नावं देऊन, तेही भ्रष्ट आहेत असं म्हटलं होतं.

त्यांत माझ्या एका नातेवाइकाचाही समावेश होता.

त्याच्या शिपायाने तो अंक त्याला दाखवला.

‘सर, हे बघा - तुमचंही नाव आलंय यात.’

नातेवाईक तावातावाने उठला आणि ‘महानगर’च्या कचेरीत आला.

त्याने वागळ्यांना जाब विचारला.

वागळ्यांनी अद्वातद्वा बोलून त्याला बाहेर घालवलं.

मग तो माझ्याकडे ‘नवशक्ती’त आला.

‘आता मी यावर काय करू शकतो?’ त्याने विचारलं.

‘तू दिनू रणदिवे यांच्याकडे जा. त्यांना वागळे गुरुसमान मानतात.’

त्याप्रमाणे तो रणदिव्यांकडे गेला.

त्यांनी सगळं ऐकून घेतलं. मग विचारलं, ‘तुम्ही माझ्याकडे कसे आलात?’

तात्पर्य : या बाबतीत पुढे फारसं काही घडलं नाही.

 

१९९० मध्ये मी नाशिकच्या मुक्त विद्यापीठाची नोकरी सोडून ठाण्यात परतलो होतो.

त्या वेळी एका रविवारी संध्याकाळी ठाण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जाहीर सभा होती. सभेसाठी निमित्त कोणतं होतं हे आता आठवत नाही. पण अध्यक्षस्थानी सदानंद वर्दे होते. या सभेत वागळे बोलणार होते, म्हणून मी मुद्दाम गेलो होतो.

वागळ्यांनी बोलताना नथुराम गोडशांवर टीका केली. ठाण्याचे शिवसेना नगरसेवक श्रीधर खोपकर यांची हत्या झाली होती; त्याविरोधातही ते जोरदार बोलले.

लगेच वातावरण तापलं. हिंदुत्ववाद्यांनी आणि शिवसैनिकांनी वागळ्यांच्या विरोधात चढ्या सुरात घोषणा द्यायला सुरुवात केली.

त्यांना न जुमानता वागळे बोलतच राहिले.

ते बघून एक पोलीस इन्स्पेक्टर सभागृहाच्या दारातून तावातावाने आत आला. वागळ्यांना म्हणाला,

 ‘ए, तू खाली बस चल! गप बस!’

वागळे उत्तरले, ‘मला अरेतुरे करू नका. आणि मी इथे काय करायचं ते तुम्ही सांगू नका. या सभेला अध्यक्ष आहेत. सभा कशी चालवायची हे ते ठरवतील.’

इन्स्पेक्टर चरफडत मागे गेला.

सभा संपताच मी वागळ्यांकडे गेलो आणि त्यांचं अभिनंदन केलं.

नंतरच्या आठवड्यात ‘कॅलिडोस्कोप’ सदरात त्यांनी या सभेच्या निमित्ताने लिहिलं. शीर्षक होतं,

‘नथुरामच्या मित्रांनो -’

वागळे मला अधिकाधिक आवडू लागले होते.

 

त्याआधी ते ‘आज दिनांक’ साप्ताहिकाचे संपादक असताना वडाळ्याच्या अक्षर प्रतिरूप मुद्रणालयात त्यांचं ओझरतं दर्शन होत असे. (मी चंद्रकांत खोतांच्या ‘अबकडई’ दिवाळी अंकाचं काम पाहण्यासाठी तिथे जात असे.) कोवळ्या वयातली किरकोळ अंगरष्टी, चेहऱ्याभोवती दाढीची महिरप, पायांत रबरी स्लिपर्स, हे त्यांचं रूप जसं माझ्या लक्षात आहे, तसंच ‘मी कोणाची पर्वा करणार नाही हं,’ असे त्यांचे मित्रांमधले धारदार उद्गारही अजून लक्षात राहिले आहेत.

पुढे शेकडो वेळा मी त्यांना जवळून पाहिलं. त्यांचा देखणा चेहरा पाहून अनेकदा माझ्या मनात येत असे : हे कदाचित अभिनयाच्या क्षेत्रातही चमकू शकतील.

याच्याच आगेमागे, १९९२ साली मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयातील समांतर साहित्य संमेलनात मी मौज प्रकाशन गृहाचा स्टॉल सांभाळण्याची ड्यूटी करत होतो, तेव्हा वागळे चारसहा मित्रांसह फेरफटका मारायला आले होते. आमच्या स्टॉलजवळ येताच, ‘मौज? नको, नको!’ असे उद्गार काढत ते सगळे हसत हसत घाईघाईने दूर गेल्याचं आठवतं.           

त्यांचा मेव्हणा हेमंत कर्णिक एकदा मला म्हणाला,

 ‘अरे, या माणसाला भीती नावाचा अवयवच नाही. तुला सांगतो, एकदा मी शिवाजी पार्कला गेलो होतो. ठाकऱ्यांची सभा सुरू होती. व्यासपीठावर ठाकरे बोलताहेत, आणि व्यासपीठाला अगदी चिकटून उभा राहून निखिल ठाकरेंकडे बघतोय! बापरे, मी घाबरलोच. तिकडे गेलो आणि निखिलला ओढत लांब घेऊन आलो. पण त्याला त्याचं काहीच विशेष वाटलं नाही.’           

त्यांची पत्नी मीना कर्णिकही एकदा मला म्हणाली,

 ‘अरे, पहिल्या पहिल्यांदा पोलीस वॉरंट घेऊन घरी यायचे, तेव्हा मी हादरून जायचे. पण याला काहीच वाटायचं नाही. हा उलट बेफिकिरीत पोलिसांना म्हणायचा, ‘हां - काय आणलंय? ठीक आहे. द्या इकडे.’           

मी ‘आज दिनांक’मध्ये असताना माझ्या स्तंभात एकदा गमतीने लिहिलं होतं,

‘...आजकाल वर्तमानपत्रांमध्ये या कर्णिकांचा फारच सुळसुळाट दिसतोय. द्वा. भ. कर्णिक, मधु मंगेश कर्णिक, मीना कर्णिक, हेमंत कर्णिक, मुकुंद कर्णिक, प्रदीप कर्णिक, सुनील कर्णिक... छ्या! एक पान उघडायची सोय राहिलेली नाही!’

हा ‘सुळसुळाट’ वाचून वागळ्यांनी मनापासून दाद दिल्याचं माझ्या कानांवर आलं होतं.   

     

राज्याचे माजी शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे यांनी २००२ साली महाराष्ट्रात पहिल्या यत्तेपासून इंग्रजी भाषा शिकवण्याचं धोरण जाहीर केलं, तेव्हा वागळे यांनी त्याविरोधात भूमिका घेतली. ते केवळ लेख आणि अग्रलेख लिहूनच थांबले नाहीत, तर पाच-पंचवीस साथीदारांना बरोबर घेऊन मोर्चेही काढू लागले. अशाच एका संध्याकाळी शिवाजी पार्कभोवती हा किरकोळ मोर्चा फिरत असताना, तिथल्या छोट्याशा पोलीस चौकीसमोर यांनी असं वातावरण निर्माण केलं की, पोलीस इन्स्पेक्टरला चौकीबाहेर येऊन यांना अडवावं लागलं. त्या मोर्चात सामील असलेल्या एकाने नंतर मला सांगितलं की, ररस्त्यावर वागळे अशा खुबीने त्या इन्स्पेक्टरच्या अंगावर गेले की, त्यांच्यासह काही जणांना ताब्यात घेऊन चौकीत नेणं त्याला भागच पडलं. तिथे इंग्रजी फॉर्म भरताना राजीव नाईक आणि वागळे यांनी ‘आम्हाला इंग्रजी येत नाही’ असा कांगावा करून मराठी फॉर्मची मागणी केली! इन्स्पेक्टर बुचकळ्यात पडला. काही वेळाने त्याने यांना सोडून दिलं.

तात्पर्य : वागळे यांनी आपल्या पोलीस अटकेची बातमी शिताफीने घडवली होती!         

या रामकृष्ण मोरे प्रकरणाचा कळस झाला तो २००२ सालच्या पुणे साहित्य संमेलनात.

तिथे पहिल्या दिवशी संध्याकाळी, सर्व मुलांना पहिल्या यत्तेपासून इंग्रजी शिकवण्याच्या नव्या सरकारी धोरणावर परिसंवाद रोजला होता. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरोजिनी वैद्य होत्या आणि शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे कार्यक्रमात सर्वांत शेवटी बोलणार होते.

कार्यक्रमाच्या आधी वागळे सरोजिनी वैद्यांना भेटले. ‘मला या परिसंवादात बोलू द्या,’ अशी विनंती त्यांनी केली. वैद्य बाईंनी त्यांना बोलू देण्याचं मान्य केलं, पण आपल्याला ‘अखेरीस बोलू देण्या’चा वागळे यांचा आग्रह त्यांनी अमान्य केला.

संध्याकाळी कार्यक्रम सुरू झाला. वागळे खादीचा झब्बा घालून आले होते. (या झब्ब्यावरून ‘ते आंदोलन करणार’ अशी खूणगाठ जवळच्यांनी बांधली होती.) रामकृष्ण मोऱ्यांनी बोलायला सुरुवात करताच वागळे श्रोत्यांमधून उठले आणि तारस्वरात मोऱ्यांना विरोध करू लागले. ते आक्रमकपणे व्यासपीठाच्या पायऱ्यांकडे जाऊ लागले, तशा संमेलनाच्या कार्यकर्त्यांनी घाईघाईने त्या पायऱ्या काढून घेतल्या! श्रोत्यांमधून मोऱ्यांचे समर्थक उभे राहून ‘ए दाढीवाल्या, गप्प बस!’ वगैरे ओरड करू लागले. लगेच दुसऱ्या बाजूला वागळ्यांचा गट उठला आणि ‘निखिल वागळे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं!’ अशा घोषणा देऊ लागला. संमेलनात अचानक गडबड उडाली. पोलीस व्यासपीठासमोरून वागळ्यांना ओढत नेऊ लागले. त्या खेचाखेचीत वागळ्यांना भोवळ आली आणि ते पडले. पोलिसांनी त्यांना उचलून चौकीत नेलं. आमच्यापैकी फक्त नारायण बांदेकर तेवढे वागळ्यांच्या मदतीला धावले आणि त्यांच्या पाठीशी उभे राहिले. (त्याबद्दल बांदेकरांचा कृतज्ञ उल्लेख वागळे आवर्जून करतात.) त्या रात्री मराठी दूरवाहिन्यांनी ही सर्व दृश्यं बरीच तपशीलवार दाखवली.

           

२००४ सालानंतर मात्र ‘महानगर’ची स्थिती बरीच डबघाईला आली.

आम्हाला महिनोमहिने पगार मिळत नसत.

वागळे स्वत: अनेक दिवस कचेरीत पार ठेवत नसत.

पेपर कसाबसा निघे.

त्यांनी वाचकांकडून देणग्या मागितल्या. सुभाष भेंडे, शांताराम शिंदे वगैरे काही जणांनी त्या दिल्याही. पण त्यामुळे परिस्थितीत फरक पडला नाही.

अखेरीस त्यांनी वाचकांना निर्वाणीचा जाहीर इशारा दिला : तुम्ही जर आम्हाला मदत केली नाहीत, तर आम्ही ज्यांच्याकडून मदत घेऊ त्याबद्दल नंतर बोलू नका.

मग निवडणुकीत नारायण राणे यांच्या विरोधात भाषणं देण्याच्या बोलीवर राज ठाकरे यांनी त्यांना कर्जातून बाहेर काढलं म्हणतात.

ज्या ‘सामना’ दैनिकातून वागळे यांच्या विरोधात पूर्वी अर्वाच्य मजकूर छापून येई, तिथे आता त्यांच्या भाषणांचे वृत्तान्त ‘निखिल सर’ अशा संबोधनाने येऊ लागले.

‘महानगर’ची मालकीही त्यांना सोडावी लागली.

त्यांच्या पूर्वपुण्याईने ‘आयबीएन-लोकमत’ वाहिनीचं काम त्यांच्याकडे चालून आलं, आणि त्यांनी ते गाजवलंही.

हे सगळं घडून आलं नसतं तर २००७-२००८ सालीच वागळ्यांनी आत्महत्या केली असती असं मला वाटतं.           

२. समीप दर्शन

१९९६ साली मी ‘आज दिनांक’ सोडलं.

वागळ्यांनी मला बोलवून घेतलं.

मी रुजू झालो.

‘तू इथे जास्तीत जास्त लिहीत राहा,’ असं ते म्हणाले.

माझ्या बऱ्याचशा अटी त्यांनी मान्य केल्या.

‘तू एक दिवसाआड आलास तरी चालेल. सकाळीच येऊन गेलास तरी चालेल. तू फक्त फीचर्स बघ...’

माझं स्तंभलेखन त्यांना आवडत असे.

‘सत्तेचे गुलाम’ ही अरुण टिकेकर, विजया राजाध्यक्ष आणि भालचंद्र मुणगेकर यांच्यावरची माझी टीका, ‘एका पुस्तकासाठी तीन वर्षं’ हा सरोजिनी वैद्य यांच्या कामावरचा कठोर लेख, आणि ‘भरताड पत्रांचं बिनडोक संपादन’ या श्री. पु. भागवत आणि इतरांनी संपादित केलेल्या जीएंच्या पत्रसंग्रहाचे वाभाडे काढणारं परीक्षण त्यांना पसंत पडलं होतं. ‘त्यांच्या अपयशाचं रहस्य’ आणि ‘आडगावच्या गोष्टी’ या ‘अक्षर’ दिवाळी अंकांमध्ये मी योजलेल्या लेखमालांची त्यांनी वाहवा केली होती.

एकदा ‘महानगर’च्या वार्षिक सोहोळ्यात माझा जाहीर उल्लेख करून ‘काही वेळा मलाही कर्णिकांचा धाक वाटतो,’ असे उद्गार त्यांनी काढले.

यानंतर ‘कार्यकारी संपादक’ म्हणून माझं नाव ‘महानगर’वर येऊ लागलं.

वागळे मला त्यांचं संपादकपदही देऊ इच्छित होते.

पण मला माझी जागा ठाऊक होती.

मी म्हणालो, ‘मी दोन नंबरवरच ठीक आहे. एक नंबरवर रेण्याची माझी योग्यता नाही. मी जर संपादक झालो, तर आपले सहकारी मला एका दिवसात वरून खाली फेकून देतील, हे मला ठाऊक आहे.’

जाहीर कार्यक्रमात बोलण्याचीही संधी ते मला देत. पण मी बुजरा आणि मुखदुर्बळ होतो, त्यामुळे माघार घेत असे.

त्यांच्या अक्षर प्रकाशनाला वि. पु. भागवत स्मृती पुरस्कार मिळाला, तेव्हा साहित्य संघात झालेल्या सोहळ्यात ‘या पुरस्काराचं मुख्य श्रेय कर्णिकांना आहे,’ असे मोकळे उद्गार त्यांनी काढले होते.

थोडक्रात, वागळ्यांनी माझे बरेच लाड केले. म्हणून तर मी तिथे सर्वाधिक काळ - सात वर्षं-टिकलो.

एवढंच नव्हे तर ‘न छापण्याजोग्या गोष्टी’ हे माझं पुस्तक त्यांना (आणि अंबरीश मिश्र यांना) अर्पण केलं.

           

पण नाही म्हटलं तरी, मी ‘महानगर’मध्ये आलो त्या वेळी या संस्थेचा पडता काळ सुरू झालेला होता.

माझ्या पहिल्याच महिन्याचा पगाराचा चेक न वटता परत आला.

मी व्यवस्थापन विभागातले अरविंद जोशी यांना सांगितलं.

त्यांनी धावाधाव करून लगेच रोख रक्कम आणून दिली.

पण दिवसेंदिवस असे प्रकार वाढतच गेले. कधी योग्य कागद आणता न आल्यामुळे अंकाचा आकार घाईघाईने बदलावा लागे, कधी अंकाच्या शाईमध्ये रॉकेल मिसळल्याचं जाणवत असे, तर कधी देणेकरी येऊन गडबड करत.

ज्येष्ठ विचारवंत वसंतराव पळशीकर यांचे चिरंजीव माधव पळशीकर नाशिकहून ‘महानगर’मध्ये माहिती-तंत्रज्ञानावर स्तंभलेखन करत. त्यांनी मानधनाची मागणी अनेकदा केली, स्मरणपत्रं पाठवली, फोन केले...मग शेवटी वैतागून ते स्वत:च ‘महानगर’ कचेरीत येऊन थडकले. ‘माझं मानधन देता येत नसेल तर निदान तेवढ्या रकमेची अक्षर प्रकाशनाची पुस्तकं तरी द्या,’ असं त्यांचं म्हणणं होतं. आम्हाला तशी पुस्तकं त्यांना द्यावीच लागली.

‘महानगर’च्या अवतार-समाप्तीची घटका जवळ येत होती.

त्याची परोपरीची रूपं मी जवळून पाहिली.

           

लेखक-संपादक म्हणून वागळे यांचं काम प्रभावी असे. दैनिकाचे मथळे ते छान काढत. (‘बाळासाहेब, तुमचं आव्हान स्वीकारलं!’ हा एक गाजलेला मथळा.) त्यांचं ‘कॅलिडोस्कोप’ हे सदर प्रदीर्घ काळ वाचकप्रिय होतं. ‘निरोगी जसा जगला तसाच गेला...’ (१० डिसें. ९१), ‘दोन चारित्र्यवान प्रादी’(३१ ऑक्टो. ९०), ‘ठाकरे, महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाज आणू नका’ (७ मे ९३), ‘उपेक्षित सत्यशोधक’ (११ फेब्रु. ९४), ‘तळवलकरांचा तुच्छतावाद’(२६ एप्रिल ९६), असे त्यांचे गाजलेले लेख अनेकांना अजून आठवतात.

त्यांनी केलेली पानांची मांडणी देखणी असे. एका शनिवारच्या पुरवणीत अभिनेते प्रशांत दामले यांच्या मुलाखतीला ‘गिनीज’मध्ये जाईन म्हणतो!’ असं झकास शीर्षक त्यांनी काढलं होतं. त्यासोबत वर्तुळाकार स्क्रीन पॅटर्नमधला दामल्यांचा क्लोज-अपही फार सुंदर रचला होता...

ते पहाटे उठून स्वत:च्या मजकुराचं डिक्टेशन फोनवरून डीटीपी ऑपरेटरला देत. (याला कौतुकाने ‘पहाटपाळी’ म्हटलं जाई.) एखाद्या कच्च्या ऑपरेटरला ‘शेपूटवाला ऊ’ असं शुद्धलेखन ते सांगत असत...

कथाकार सतीश तांबे, नाटककार संजर पवार, स्तंभलेखक अनंत भावे, निळू दामले आणि अमरेंद्र धनेश्वर, ग्रंथकार अतुल देऊळगावकर, अनुवादक हेमंत कर्णिक, कार्यकारी संपादक संजय कऱ्हाडे, चित्रकार पुंडलीक वझे, व्रंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी, ग्राफिक डिझारनर सुबोध पाध्ये, असे अनेक गुणवंत त्यांच्या संस्थेतून विकसित झाले आहेत...

           

‘महानगर’च्या सहकाऱ्यांबरोबर वागळ्यांच्या साप्ताहिक बैठका होत.

बरेचसे सहकारी नवखे किंवा अर्धकच्चे असत. यांतल्या अनेकांना बैठकीत शिव्या खाव्या लागत. नंतर ते आपल्या कामात तयार झाले की, चांगल्या पगाराची दुसरी नोकरी धरत.

वागळ्यांच्या घरापासून कचेरीपर्रंत फोनची ‘हॉट लाईन’ होती.

त्यातूनही सहकाऱ्यांवर शिव्यांचा भडिमार होई. त्यामुळे या हॉट लाईनला ते सगळे गंमतीने ‘गरम फोन’ म्हणत.           

अशाच एका साप्ताहिक बैठकीत एक गंमत झाली.

सुनील शिंदे या पत्रकाराला त्याच्या मर्जीविरुद्ध मुद्रितशोधन करावं लागत होतं. ते त्याला जमत नव्हतं, आवडत नव्हतं, आणि त्यामुळे त्यावरून शिव्या खाण्याचीही त्याची तयारी नव्हती.

बैठक सुरू होताच वागळ्यांनी त्याच्या मुद्रितशोधनातल्या चुकांवरून बोलायला सुरुवात केली.

सुनील ताडकन म्हणाला, ‘मला हे काम नको. मी राजीनामा घेऊन आलो आहे.’

त्याने तो कागद वागळ्यांकडे दिला.

वागळ्यांचा आवाज पडला. ते हलक्या सुरात म्हणाले,

‘मग तू आता इथे थांबला नाहीस तरी चालेल.’

पुढचे काही दिवस सुनीलने परत यावं म्हणून वागळ्यांनी त्याची मनधरणी केली. पण तो बधला नाही.      

 

हे विविध सहकारी अधूनमधून एकमेकांवर कुरघोड्या करत. कोणी पैसे घेऊन बातम्या दिल्याची कुजबूज ऐकू रेई. मग तिसऱ्या माणसाकरवी वागळ्यांना फोन जाई. वागळे कचेरीत येताच आवाज चढवून कचेरी दणाणून सोडत. सगळीकडे चिडीचूप होई.  

एकदा मी वागळ्यांना म्हटलं, ‘आपल्या शुद्धलेखनाच्या बाबतीत आणखी सोपेपणा आणण्यासाठी आपण काही तरी करायला हवं. त्यातले अनेक बारकावे नवसाक्षरांना अखेरपर्रंत आत्मसात करता येत नाहीत, त्यामुळे ते उगाचच न्यूनगंडाने पछाडल्यासारखे होतात.’

वागळ्यांनी थोडा वेळ विचार केला. मग ते म्हणाले, ‘आपण सगळ्या वेलांट्या आणि उकार दीर्घ केले तर?’

‘मलाही तसंच वाटतं.’

‘ठीक आहे. आपण प्रयोग करून पाहू या... वाचकांना कसं वाटतं ते.’

मग थोडा वेळ थांबून वागळे म्हणाले, ‘अरे, पण मग निखिलमधल्या दोन्ही वेलांट्या दीर्घ लिहाव्या लागतील -’

मी म्हणालो, ‘हो.’

‘छे छे. नकोच ते.’

मी गालातल्या गालात हसलो. स्वत:वर प्रसंग येताच सर्वांची परिमाणं बदलतात, हे मला अनुभवाने ठाऊक झालं होतं!

           

काही वेळा मी वागळ्यांची परवानगी घेऊन एखादा मजकूर छापत असे. दुसऱ्या दिवशी त्यावरून हलकल्लोळ होई. कचेरीवर हल्लासुद्धा होई. नेमकी त्या दिवशी माझी सुटी असे! हल्ला शिवसेनेचा असला तर सहकारी मला हटकून म्हणत,

‘ठाकरे तुझे जातवाले असल्याने, नेमका तू नसतानाच ते हल्ला करतात!’

‘पण ठाकरे तर सवर्ण आहेत, आणि मी अवर्ण आहे!’ अशी काही तरी टवाळकी मी करत असे.

 

जळगावचे प्रसिद्ध शिक्षक चंद्रकांत भंडारी यांचा एक लेख मी शनिवार पुरवणीत छापला.

काही वारकरी मंडळी पंढरपूरच्या यात्रेला जाताना वाटेतल्या शहरांमधल्या वेश्यावस्तीत जातात. तिथे त्यांना एड्सची लागण होते. त्यामुळे ते स्वत: आणि त्यांचे कुटुंबीय बरबाद होतात, अशी माहिती त्या लेखात दिली होती.

वागळे म्हणाले, ‘जरूर छाप हा लेख.’

मी छापण्याआधी त्या लेखाचं शीर्षक बदलून ‘वेश्यागमनी वारकरी’ असं केलं.

त्यामुळे भडका उडाला.

मुंबईतल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या दिवशी दुपारी वारकऱ्यांचा वेष पांघरून अचानक आमच्या कचेरीवर हल्ला केला.

क्षणार्धात कचेरीची मोडतोड करून ते पसार झाले.

पोलिसांनी कानांवर हात ठेवले.

‘हल्लेखोरांचे फोटो आम्हाला द्या. मग आम्ही काय ते बघतो,’ म्हणाले.

मग रात्री बारा वाजता एका मोठ्या दैनिकाच्या कचेरीतून आमच्याकडे फोन आला.

‘आमच्याकडे आले आहेत ते फोटो. तुम्हाला पाहिजे असले तर घेऊन जा.’

आमचा माणूस तात्काळ गेला.

दुसऱ्या दिवशी ‘महानगर’च्या पहिल्या पानावर टिळामाळावाले भाजपचे लोक उघडे पडले होते.       

(पूर्वप्रसिद्धी - श्रीदीपलक्ष्मी’, दिवाळी)

.............................................................................................................................................

‘महानगर’चे दिवस ​- सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - १५० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4348

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......