तोपर्यंत साने गुरुजी नव्या पिढीच्या पालक आणि शिक्षकांना हाकारत राहतीलच
ग्रंथनामा - झलक
हेरंब कुलकर्णी
  • ‘शिक्षकांसाठी साने गुरुजी’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 05 January 2018
  • ग्रंथनामा Granthanama झलक शिक्षकांसाठी साने गुरुजी Shikshakansathi Sane Guruji हेरंब कुलकर्णी Heramb Kulkarni मनोविकास प्रकाशन Manovikas Prakashan

‘शिक्षकांसाठी साने गुरुजी’ हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आणि मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच गुरुजींनी शिक्षक म्हणून जेथे काम केले, त्या अमळनेरमध्ये, गुरुजींच्या कर्मभूमीत झाले. साने गुरुजी व आजचे शिक्षणक्षेत्र अशी मध्यवर्ती कल्पना असलेल्या या पुस्तकातील लेखकाच्या मनोगताचा संपादित अंश...   

.............................................................................................................................................

गुरुजींचा नव्यानं शोध घ्यावासा वाटला, याचं कारण शिक्षक बदलण्यासाठी गुरुजी हे मला खूपच महत्त्वाचे वाटू लागले. शेवटी शिक्षक हुशार असण्यापेक्षा संवेदनशील आणि उत्तरदायी असणंच जास्त महत्त्वाचं वाटायला लागलं. आज ज्या शिक्षकांचे नंबर मेडिकल इंजिनरिंगला लागू शकले असते, अशी मुलं प्राथमिक शिक्षक ते प्राध्यापक झाली आहेत. पण तरीही लिहिता-वाचता न येणार्‍या मुला-मुलींची संख्या वाढते आहे. याउलट मागच्या पिढीत शिक्षक अतिशय कमी शिकलेले होते. ते शिक्षक इंग्रजीही शिकलेले नसत पण धोतर, कोट, टोपी घालणारे ते शिक्षक ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’ ही प्रार्थना म्हणत दिवस सुरू करत आणि हातात घड्याळ नसलेली ती माणसं रात्री मुलं झोपेपर्यंत काम करत राहत. कुटुंबासाठी गैरसोयी झेलत ते त्या खेड्यात राहत. ती तळमळ ही आजच्या या हुशार मुलांमध्ये कशी आणायची? कशी संक्रमित करायची? पण त्यांच्या हाताखालील मुलं खर्‍या अर्थानं घडली. ही विसंगती कशी समजून घ्यायची? याचं उत्तर शोधायला गुरुजींकडे जावं लागेल. शिक्षक हा जितका स्वप्नाळू आणि भावुक, तितका तो अधिक चांगला शिक्षक होण्याची शक्यता जास्त, हे लक्षात येत गेलं. इथं बुद्धिमत्तेपेक्षाही मुलांविषयी कणव वाटणं सर्वोच्च महत्त्वाचं आहे, हे समजल्यावर साने गुरुजी हीच लस पुन्हा एकदा शिक्षणक्षेत्राला द्यावी लागेल याची खात्री पटली. रजनिश म्हणाले होते की, शिक्षण क्षेत्रातून पुरुष हटवा आणि फक्त महिलाच फक्त राहू द्या. कारण हे प्रेमाचं, हळुवरतेचं क्षेत्र आहे. ओशोंना हे गुरुजींकडे बघून तर सुचलं नसेल ना?                       

साने गुरुजींचं इतकं टोकाचं आकर्षण महाराष्ट्राला असण्याचं एक कारण मला त्यांच्या निरागस आणि लहान मूल असण्यात वाटतं... आपल्याला घरात लहान मूल का आवडतं याचं उत्तर आणि महाराष्ट्राला साने गुरुजी का आवडले याचं उत्तर एकच आहे. आपण निरागस नाही. आपण भाबडे नाहीत, आपण स्वप्नाळू नाहीत, आपण बनेल आहोत, व्यवहारानं आपण कोरडेठाक झालेलो आहोत, ही भावना आपल्याला सतत टोचत असते. आपण मोठे होत असताना आपल्यातलं लहान मूल मरत जातं यानं आपण अस्वस्थ असतो. आणि साने गुरुजी वयाच्या ५१ वर्षी आजोबा होण्याच्या वयातही लहान बाळ राहिले. त्यांच्यातली निरागसता त्यांच्यातली कोमलता, संवेदनशीलता आहे तशीच राहिली. काळाच्या कठोर नृशंस नियमाला त्यांच्या भावविश्वावर ओरखडाही ओढता आला नाही, याचं अप्रूप आपल्यात असतं... लहान मुलाला जपून ठेवण्याची समाज म्हणून धडपड असते...    

मला गुरुजी शिक्षकांसाठी खूप महत्त्वाचे वाटतात. आज प्रशासन नावाची गोष्ट शिक्षकांना प्रेरणा देण्यात पूर्णत: अयशस्वी ठरली आहे. तेव्हा शिक्षकात ही स्वयंप्रेरणा कशी जागवता येईल? प्रशासन म्हणून या हुशार शिक्षकांतील हुशारी, चिकाटी आपण टिकवू शकलो नाहीत, त्यांच्या स्वयंप्रेरणेला आपण जागवू शकलो नाही, कागदात बुडालेल्या प्रशासनात अनागोंदीत या तरुण मुलांना आपण स्वप्नाळू ठेवू शकलो नाहीत, तर नोकरीचा उत्साह जशीजशी वर्षं वाढत जातात, तसातसा मावळत जातो...आणि दुसरीकडे समाजजीवनावर शिक्षकाची प्रतिमा समाज नेतृत्व करणारी उरली नाही.

पूर्वी महाराष्ट्रातल्या राजकीय-सामाजिक चळवळींचं शिक्षक नेतृत्व करत होते. आज शिक्षकांचं ते स्थान उरलं नाही. सरकार आणि संस्थाचालकांचे ते सेवक असल्याचाही तो परिणाम असेल. पण शिक्षक समुदायानं आपली भूमिका राजकीय-सामाजिक जीवनातून अधिक मर्यादित केली.

पुन्हा शिक्षणाचा विस्तार करतानाही काही मर्यादा येतात. विस्ताराचा आणि गुणवत्तेचा अनेकदा विषम सहसंबंध असतो. त्याचाही परिणाम होतो. आपल्या राज्यातही साने गुरुजींनंतर त्यांच्या प्रेरणेतून आणि स्वातंत्र्य आंदोलनातील मूल्यांचा परिणाम, ध्येयवाद, राष्ट्रीय शाळा, गांधींच्या बुनियादी शिक्षणाचा प्रभाव यातून एक ध्येयवादी कार्यकर्ते असलेली पिढी शिक्षक झाली. त्यात शाळांची संख्या कमी असल्यानं गरजेइतके शिक्षक नक्कीच मिळत गेले. पण नंतरच्या काळात विस्तार वेगानं झाला. तेव्हा व्यावसायिक कौशल्यं प्राप्त पदवी एवढाच निकष बघणं शक्य होतं. बहुतेक शिक्षक अध्यापन उत्कृष्ट करणारे या पद्धतीत मिळतात, पण अशा पद्धतीत त्या अपेक्षित ध्येयवादी पद्धतीचे शिक्षक येतीलच असं नाही. पुन्हा शिक्षकांना अशा जाणीव जागृतीचे धडे देण्यात त्यांच्यावर नियंत्रण करणारी शासकीय अधिकारी आणि संस्थाचालक ही फळी अपवाद वगळता सक्षम नव्हती. नोकर भरतीत होणारा भ्रष्टाचार, शिक्षक मान्यता, बदली यांत सुरू झालेल्या आर्थिक भ्रष्टाचारानं शिक्षणक्षेत्राचा प्रवास उलट्या दिशेनं सुरू झाला. ध्येयवाद अधिक केविलवाणा झाला. त्यातून शिक्षक सेवापूर्व प्रशिक्षण महाविद्यालयांचा बाजार सुरू झाला. शिक्षक व्हायचं असेल तर त्याच्यासाठीच पैसे मोजायचे? ‘नाणे गुरुजीं’ची गाठ पडल्यावर साने गुरुजींची आठवण या मुलांनी का ठेवायची? शिक्षक प्रशिक्षण घ्यायला पैसे, नोकरीला, मान्यतेला, बदलीला पैसे, डोळ्यासमोर अधिकार्‍यांचा भ्रष्टाचार, यांतून ध्येयवाद हा थट्टेचा विषय झाला. अनेक शाळा या राजकीय नेत्यांनी काढल्या. या नेत्यांनी शिक्षक भरती राजकीय नजरेतून केली. त्यात ध्येयवाद सोडाच, पण गुणवत्तेच्याही समस्या निर्माण झाल्या.

कोणतीही शिक्षणव्यवस्था ही तेथील अर्थव्यवस्थेला आणि राजव्यवस्थेला पूरक ठरणारी पिढी निर्माण करत असते. ज्या वेगानं आपली अर्थव्यवस्था उद्योगप्रधान आणि आता सेवाक्षेत्राला प्राधान्य देणारी बनली, त्यातून तर शिक्षणाचा आशयच तंत्रप्रधान बनला. व्यावसायिक कोर्सेस वाढत गेले. त्यातून भावनांक विकसन ही गोष्ट खूप दुय्यम बनली. त्याच वेळी समाजव्यवस्था ही अर्थव्यवस्था प्रधान बनली. पैसा कमावणं, आपल्या कुटुंबाचा विचार करणं, लौकिक यश मिळवणं याला महत्त्व आलं. सुखासीनता येत गेली. शिक्षणक्षेत्र हे समाजाचं प्रतिबिंब असल्यामुळे त्या मूल्यांचं प्रतिबिंब शिक्षणक्षेत्रात पडत गेलं. त्यामुळे नकळत शिक्षणव्यवस्था ही केवळ अर्थव्यवस्थेला गती देणारं साधन बनत गेली. त्यात इंग्रजी शाळा वाढत गेल्या. व्यावसायिक नजरेनं चालवल्या जाणाऱ्या या शाळेतली मूल्यं पुन्हा वेगळीच झाली. अशा वेगवान बदलांच्या काळात शिक्षणात ध्येयवाद आणि भावनांक विकसन या गोष्टी खूप दूर गेल्या.

या व्यवस्थेविषयी शिक्षक, शाळा, संस्था यांविषयी असं विश्लेषण अनेक प्रकारे करता येईल. पण मुख्य प्रश्न हे सारं बदलायचं कसं हा आहे. शिक्षणक्षेत्रात ध्येयवाद आणायचा कसा? मुलांचा भावनांक कसा वाढवायचा? या नव्या पिढीला संवेदनशील कसं बनवायचं? हे कळीचे प्रश्न आहेत. हे होण्यासाठी शिक्षणाच्या रचनेत मूलगामी बदल करावे लागतील. शिक्षकांचं सेवापूर्व व सेवांतर्गत प्रशिक्षण यात बदल करावे लागतील. त्यासाठी संघर्ष सुरू ठेवताना दुसरीकडे शिक्षणक्षेत्रातील महत्त्वाचा घटक शिक्षक हा डोळ्यासमोर ठेवून आपल्याला शिक्षक व्यक्ती म्हणून त्याला घडवावं लागेल. प्रेरणा द्यावी लागेल.

शेवटी व्यवस्थेचा आकार बदलायचा की, त्या व्यवस्थेतील माणसं बदलायची यावर चर्चा करायला हवी. व्यवस्था बदलण्यातल्या मर्यादा स्पष्ट आहेत. तेव्हा त्यासाठी लढाई करताना व्यक्ती बदलण्याची प्रक्रिया ही सुरू ठेवावी लागेल. त्यासाठी शिक्षक आणि अधिकार्‍यांना प्रेरणा देणारं साने गुरुजींसारखं जगणं शिक्षकांना परिचित करून द्यावं लागेल. या अर्थानं मी साने गुरुजींच्या जगण्याकडे बघतो. त्यांच्या शिक्षक असण्याकडे बघतो. पण केवळ साने गुरुजींची महानता शिक्षकांना जवळची वाटणार नाही. तर त्यांचं जगणं शिक्षकांना आपलं वाटायला त्यांच्यातील शिक्षक उलगडून दाखवला पाहिजे. जर आपण हे केलं नाही तर असे महापुरुष केवळ आदरणीय वाटत राहतात, अनुकरणीय वाटत नाही. अनेकदा महापुरुषांचं मोठेपण अंगावर येतं आणि त्या ओझ्याखाली दाबून देवत्व दिलं जातं.

साने गुरुजींचं वैशिष्ट्य आणि लोकप्रियतेचं लक्षण हे आहे की, ते आपल्यासारखे साधे माणूस वाटतात. त्यांचा साधेपणा खूप जवळचा वाटतो. त्यांनी जे काही शिक्षक म्हणून केलं ते कुणीही शिक्षक अमलात आणू शकतो.  

आज प्रेम हरवलेल्या समाजात आपल्याला शिक्षणातूनच प्रेम संक्रमित करावं लागेल. आजच्या वाढत्या असंवेदनशीलता वाढत चाललेल्या समाजात पुन्हा प्रेम हाच जगण्याचा आधार बनवावा लागेल. यासाठी मला साने गुरुजी हेच उत्तर वाटतं. शिक्षक म्हणून, माणूस म्हणून या माणसानं जे प्रेम केलं, ते अविश्वसनीय वाटावं इतकं टोकाचं आहे. या माणसाच्या आठवणी वाचताना आपण इतकं प्रेमानं वागत नाही यानं लज्जित होतो.  गुरुजींनी वसतिगृहातील मुलांवर शिक्षा न करता, न रागावता प्रेम केलं. मुलांची विष्ठा साफ केली, आजारी मुलांची सुश्रुषा केली. मुलांना रोज नवी माहिती वाचायला मिळावी म्हणून हा माणूस रोज पहाटे चार वाजता उठून दोन तास एक आठ पानांचं भित्तिपत्रक लिहून सकाळी सहा वाजता वसतिगृहात सलग तीन वर्षं लावत होता. तेव्हा गुरुजी हे ज्ञाननिष्ठेचं, विद्यार्थिप्रेमाचं, समर्पणाचं, त्यागाचं, सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलतेचं प्रतीक असल्यानं तेच रोल मॉडेल म्हणून आज पुन्हा एकदा शिक्षणक्षेत्रासमोर आणले पाहिजेत, असं वाटल्यानंच गुरुजींवर लिहावंसं वाटलं.    

गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत, पण हेतुत: गुरुजींच्या शिक्षक असण्याचा, विद्यार्थी असण्याचा, गोष्टी सांगण्याचा पैलू ठळकपणे घेऊन पुस्तक लिहिलं. शिक्षक व पालक हा घटक डोळ्यासमोर ठेवून लिहिलं, जेणेकरून आज शिक्षक त्यांचं काम, त्यांच्यासमोरील प्रश्न गुरुजींच्या जीवनदर्शनाच्या उजेडात बघू शकतील. त्यामुळे अगदी गुरुजी शिकवायचे कसे? कोणते उपक्रम राबवायचे? मुलांशी कसं वागायचे हे सारे तपशील मांडले. गुरुजींचे विद्यार्थी असणंही तितकंच प्रेरक आहे. त्यांची ज्ञाननिष्ठा आणि कष्ट हे पालकांना माहीत व्हायला हवं.

या पुस्तकात सुरुवातीला पहिल्या भागात साने गुरुजींनी शिक्षक म्हणून कसं काम केलं? गुरुजी कसे शिकवायचे? वसतिगृहातील मुलांवर त्यांनी कसं प्रेम केलं? त्यांची विद्यार्थी म्हणून जडणघडण वाचन, अमळनेरचे दिवस याची तपशीलवार माहिती आहे. त्याचबरोबर गुरुजी विद्यार्थी म्हणून कसे होते, साहित्यिक म्हणून त्यांचं योगदान काय, त्यांची आंतरभारतीची कल्पना काय होती? अशी मांडणी आहे.

पुस्तकाच्या दुसऱ्या भागात आज शिक्षक म्हणून मी गुरुजींच्या प्रेरणेनं काय करू शकतो, असे शिक्षकांसाठी नेमकेपणाने मुद्दे दिले आहेत. त्यात शिक्षकांच्या रोजच्या कामात गुरुजींचा दृष्टिकोन कसा आणता येईल? शिक्षकांनी लेखन करणं, गोष्टी सांगणं, वंचित मुलांची जाणीव, शिक्षकांचा सामाजिक सहभाग असे अनेक मुद्दे आहेत. त्यातून आज साने गुरुजींची प्रेरणा कशी शिक्षणक्षेत्रात जिवंत होईल याची चर्चा केली आहे. साने गुरुजी हेच आजच्या निराशाजनक स्थितीत शिक्षकांना पुन्हा प्रेरणा देऊ शकतात, ही या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना आहे.                                                                       

मला वाटायचं की जुन्या पिढीचे काही शिक्षक, पालक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी गुरुजी एक हळवी जागा असतील, पण प्रत्यक्षात गुरुजी हे सर्वच थरांतल्या आणि सर्व वयोगटातील लोकांसाठी अजूनही आकर्षणाचा विषय आहेत. अगदी वृद्धाश्रमातील वृद्धेपासून तर थेट अमळनेरच्या तरुण शिक्षकांपर्यंत गुरुजी मनामनांत अजूनही तसेच आहेत. गुरुजी अगदी काल गेले, इतकी त्यांच्याविषयीची हुरहूर आणि ओढ अजून कायम आहे. गुरुजी हे इथून पुढच्याही पिढ्यांना जवळचे वाटतील, हे मला वाटतं हे त्यामुळेच. आज काळ तंत्रज्ञानाचा आहे. मग साने गुरुजी या पिढीला आपले वाटतील का? असं अनेक जण विचारतात. शाळा डिजिटल होताहेत. पण तरीही ‘मुलांवर प्रेम करण्याचं’ कोणतंही सॉफ्टवेअर येत नाही व ‘करुणा’ हे मूल्य अजूनही कोणत्याही वेबसाइटवरून डाउनलोड करता येत नाही. तोपर्यंत साने गुरुजी नव्या पिढीच्या पालक आणि शिक्षकांना हाकारत राहतीलच.

.............................................................................................................................................

शिक्षकांसाठी साने गुरुजी- हेरंब कुलकर्णी, ​मनोविकास प्रकाशन​, पुणे​
मूल्य​ -​ १६० रुपये​.​

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा - 

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4341

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......