‘निवडक नरहर कुरुंदकर : खंड - तीन’ हा प्रसिद्ध विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या लेखनाचा नवा खंड नुकताच देशमुख आणि कंपनीतर्फे प्रकाशित झाला आहे. साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी हा खंड संपादित केला आहे. त्यांनी या खंडाला लिहिलेल्या संपादकीय मनोगताचा हा संपादित अंश.
.............................................................................................................................................
१.
पाच वर्षांपूर्वी देशमुख आणि कंपनी प्रकाशन संस्थेचे संचालक रवींद्र गोडबोले आणि नरहर कुरुंदकरांचे चिरंजीव विश्वास यांनी माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला- ‘निवडक नरहर कुरुंदकर’ या प्रकल्पाचे चार-पाच खंडांत संपादन करण्याचा. तो प्रस्ताव ठेवताना गोडबोले आणि विश्वास यांनी सुरुवातीलाच हे स्पष्ट केले की, नव्या पिढीला व नव्या वाचकांना आवडेल अशा पद्धतीने ‘निवडक कुरुंदकर’चे संपादन व्हावे, यासाठी नव्या पिढीचा प्रतिनिधी असलेली व्यक्ती म्हणून आम्ही तुझ्याकडे हे काम सोपवू इच्छितो. त्यांचा तो प्रस्ताव मी आनंदाने स्वीकारला, याची तीन कारणे होती. एक- कुरुंदकरांचे कोणते लेखन लोकांनी वाचले पाहिजे आणि का वाचले पाहिजे, याबाबतच्या कल्पना तोपर्यंत माझ्या मनात स्पष्टपणे आकाराला आल्या होत्या; किंबहुना, काही बाबतींत तर मी विशेष आग्रही झालो होतो. त्यामुळे सर्वोत्तम, सार्वकालिन व समकालीन कुरुंदकर निवडून वाचकांसमोर ठेवण्याची उत्तम संधी म्हणून मी त्या प्रस्तावाकडे पाहत होतो. दुसरे कारण- कुरुंदकरांचे पुस्तकरूपाने आलेले बहुतांश लेखन मी किमान एकदा आणि काही तर दोनदा-तीनदा वाचलेले असल्याने, ‘निवडक कुरुंदकर’ या प्रकल्पासाठी लेखांची निवड करण्याचे काम माझ्यासाठी खूपच सोपे असणार होते. तिसरे कारण- तोपर्यंत मी या मतावर पोहोचलो होतो की, लेखक व विचारवंतांचा एक दुर्मिळ वर्ग असा असतो, ज्यांचे लेखन निवडून वाचकांसमोर ‘आहे तसे ठेवणे’ पुरेसे असते; म्हणजे त्यांच्या लेखनाचे महत्त्व पटवून देण्याची आवश्यकता नसते. या दुर्मिळ वर्गात मराठीतून कुरुंदकरांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागते.
२.
वर्षभराच्या आत पहिला खंड तयार झाला आणि जुलै २०१३ मध्ये तो छापूनही आला. ज्या दिवशी ‘व्यक्तिवेध’ छापाला गेला; त्याच दिवशी दुसरा खंड ‘ग्रंथवेध’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करायचा, ही कल्पना माझ्या मनात डोकावली. पण माझ्या व्यग्रतेमुळे तो खंड रखडत गेला. दरम्यान, दुसऱ्या खंडाची वाट पाहतोय असे सांगणारे, त्याची मागणी करणारे लोक सातत्याने त्यांना व मलाही भेटत राहिले. त्यामुळे काही वर्षे आधीपासून विश्वास दांडेकर यांनी संपादनासाठी हाती घेतलेले, कुरुंदकरांनी लिहिलेल्या आठ दीर्घ प्रस्तावनांचे पुस्तक ‘ग्रंथवेध : भाग १’ या नावाने देशमुख आणि कंपनीने प्रकाशित केले. त्यालाही दीड वर्ष होऊन गेले आणि आता ‘ग्रंथवेध : भाग २’ या नावाने ‘निवडक कुरुंदकर’चा तिसरा (मी संपादित केलेला दुसरा) खंड (पहिला आल्यानंतर तब्बल चार वर्षांनी) येत आहे.
३.
मात्र ‘ग्रंथवेध : भाग २’ या खंडाच्या वैशिष्ट्यपूर्ण निवडीविषयी व रचनेविषयी थोडक्यात सांगतो. कोणत्याही व्यक्तीचा वेध घेताना कुरुंदकर ज्या बहुविध पद्धतीने त्या व्यक्तीकडे पाहतात, तशाच प्रकारे ग्रंथांकडे पाहतात; एवढेच नाही तर ग्रंथही जिवंत माणसांप्रमाणे असतात, असा काहीसा भाव त्यांच्या विवेचनात आढळतो. म्हणजे एकाच ग्रंथाकडे वेगवेगळे वाचक वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून पाहतात, हे आपण गृहीत धरलेले असते. पण एकाच ग्रंथाकडे एकच वाचक वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या पद्धतीने पाहत असतो, याचे भान कुरुंदकरांकडून कधीही सुटत नाही. एवढेच नाही तर, काळ पुढे सरकतो तेव्हा अख्खा समाजच त्या ग्रंथाकडे बऱ्यापैकी एकसंध पद्धतीने बघायला लागतो आणि बरीच वर्षे उलटल्यानंतर सार्वकालीन दृष्टीने त्या ग्रंथाचे महत्त्व किंवा योगदान काय आहे, हे समाजमनाला कळू शकते/पटवून देता येते, अशी कुरुंदकरांची धारणा असल्याचे पानोपानी जाणवते. या ठिकाणी कुरुंदकरांचा राजकीय-सामाजिक दृष्टिकोन स्पष्टपणे प्रतिबिंबित होतो.
दुसऱ्या बाजूला, ग्रंथांचा वेध घेताना कुरुंदकर कितीही त्रोटक किंवा कितीही विस्ताराने लिहीत असले तरी त्यांचा साहित्य व संस्कृतिविषक दृष्टिकोनही दिसतोच दिसतो. म्हणजे साहित्याचा प्रकार म्हणून त्या ग्रंथाची योग्य-अयोग्यता ते नजरेआड करीत नाहीत आणि अंतिमत: साहित्य हा संस्कृतीचा एक भाग आहे, हे वाचकांच्या मनावर ठसवणे त्यांना आवश्यच वाटते. मात्र कथा, कादंबरी, कविता, नाटक हे ललित साहित्याचे मुख्य‘ प्रकार येतात; तेव्हाच ते वाङ्मयीन निकषांवर मूल्यमापन करतात आणि परिभाषाही त्या प्रकारची वापरू लागतात. अन् साहित्यप्रकारांना हे नियम ते शिथिल करतात. म्हणजे वाङ्मयाचा समीक्षक किंवा ग्रंथपरीक्षक या भूमिकेत ते प्रत्येक पुस्तकावर लिहिताना वावरत नाहीत. त्यांनी केलेल निखळ वाङ्मयीनन समीक्षेची उदाहरणे म्हणून ‘धार आणि काठ’, ‘रूपवेध’ इत्यादी पुस्तकांची नावे घ्यावी लागतील. विश्वास दांडेकर यांनी निवड करून दिलेल्या ‘ग्रंथवेध : भाग १मधील लेखही काहीअंशी या प्रकारचे म्हणता येतील.
प्रस्तुत (ग्रंथवेध : भाग २) खंडात निवड केलेल्या १४ लेखांबाबत सांगायचे तर, ही वाङ्मयसमीक्षा किंवा ग्रंथसमीक्षा नाही. मग का आहे? तर, यातील पाच विभागांना दिलेल शीर्षकांच्या मूळ अर्थापर्यंत जाता आले, तर त्याचे उत्तर सहज मिळेल आणि त सर्वांचा ‘मसावि’ काढला, तर या ना त्या प्रकारे घेतलेला ‘वेध’ असाच निघेल.
पहिला विभाग ‘आस्वाद’ या शीर्षकाखाली आहे. बाबा आमटे यांचा काव्यसंग्रह, अल्बर्ट श्वाइट्झर यांचे चरित्र आणि साने गुरुजींचे एकूण लेखन यांच्यावरील ते तीन लेख आहेत. ‘ज्वाला आणि फुले’ या काव्यसंग्रहावर लिहिताना कुरुंदकरांनी ‘बाबा आमटे नावाच्या कर्मयोग्याच्या आड एक महाकवी दडलेला आहे’ असे सांगून ‘वाङ्मयीन निकषावर या कवितांकडे पाहणे योग्य नाही’ असे स्पष्टपणे नोंदवले आहे. त्यातून त्यांनी बाबा आमटे यांची आणि साहित्य-समीक्षकांचीही सुटका केली आहे.
दुसरा लेख सुमती देवस्थळेलिखित अल्बर्ट श्वाइट्झरचे चरित्र वाचून लिहिलेला आहे. परंतु हा लेख पुस्तकाबाबत ‘ब्र’ही काढत नाही, किंबहुना त्या पुस्तकावर लेख लिहिलेलाच नाही. ते पुस्तक वाचत असताना कुरुंदकरांचे आंतर्मन बाबा आमटे यांच्या कार्याची रचना व वेगळेपण न्याहाळण्यात सतत मग्न असावे. त्यामुळे पुस्तक वाचून बाजूला ठेवल्यावर त्यांचे विचारचक्र जोराने फिरू लागले. त्यातून ‘ख्रिस्ती धर्मात समाजसेवेची परंपरा मोठी आहे, हिंदू धर्मात ती नाही... धर्मश्रद्ध श्वाइट्झर, आध्यात्मिक आमटे... राष्ट्रवादाच्या सीमा ओलांडणारा श्वाइट्झर, राष्ट्रवादाच्या चौकटीत कामाची निकड जाणवणारे बाबा... करुणेला आवाहन करणारा श्वाइट्झर, निर्मितीला आवाहन करणारे बाबा’ असा तुलनात्मक विचार त्यांच्या मनात सुरू झाला. आणि मग ‘करुणेचे दोन अर्थ’ हा लेख जन्माला आला.
याच विभागातील तिसरा लेख साने गुरुजींच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ‘साधना’त लिहिलेला आहे. गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचा व साहित्याचा गाभा कुशलतेने पकडणारा हा लेख आहे. ‘गुरुजींनी १४ ते १८ वर्षे वयोगटासाठी लिहिले, खालच्या वयोगटासाठी त्यांना लिहिता येत नाही... गुरुजींचे सर्व वाङ्मय भावनाप्रधान आहे, पण गुरुजींनी अनुवाद केले ती सर्व पुस्तके हार्ड रिअॅलिझम सांगणारी आहेत… गुरुजींना जीवनाची आसक्ती होती, मृत्यूची नाही… त्यांचे रडणे दुर्बलाचे नाही, समर्थाचे आहे,’ या व अशा अनेक लयबद्ध रेषांमधून गुरुजींचे वाङ्मयीन चित्र कुरुंदकरांनी रेखाटले आहे. साने गुरुजींवर लिहिल्या गेलेल्या सर्वोत्तम पाच-दहा लेखांमध्ये या लेखाचा समावेश करावा लागेल. साने गुरुजींशी घनिष्ठ नाते असणाऱ्या राष्ट्र सेवा दल, साधना साप्ताहिक आणि अन्य लहान-मोठ्या व्यक्ती-संस्था-संघटना यांच्यात कुरुंदर गुरुजींचा वावर दीर्घ काळ राहिला; म्हणूनच कदाचित साने गुरुजींचे वाङ्मयीन चित्र इतके रेखीव उतरले आहे.
४.
दुसऱ्या विभागातील तीन लेखांमध्ये ‘शांतिदूत नेहरू’, ‘बहिष्कृत भारतातील अग्रलेख’, ‘गंगाजल’ या तीन ग्रंथांची ‘चिकित्सा’ केलेली आहे. या तीनही लेखांतील चिकित्सेची पद्धत वेगवेगळी आहे. त्या काळातील ज्येष्ठ पत्रकार-संपादक पां.वा.गाडगीळ हे नेहरूभक्त किंवा नेहरूंच्या राजनीतीचे खंदे समर्थक होते. कुरुंदकर स्वत:ला कम्युनिस्ट नाही, पण मार्क्सवादी म्हणवून घेत; ‘मी समाजवादी आहे, पण माझा समाजवाद रूढ समाजवादापेक्षा निराळा आहे’ असे म्हणत असत. आणि व्यक्ती व विचार या दृष्टीने बोलत, तेव्हा ते स्वत:ला ‘नेहरूवादी’ म्हणवून घेत. अशा पार्श्वभूमीवर, एका नेहरूवाद्याने दुसऱ्या नेहरूवाद्याच्या (नेहरूंवरील) पुस्तकाची केलेली समीक्षा म्हणजे हा लेख आहे. आपल्याच बिरादरीतील एका लेखक-विचारवंताची किती कुशलतेने चिकित्सा केली जाऊ शकते, याचा उत्तम नमुना म्हणून या लेखाचा उल्लेख करता येईल. पां.वा. गाडगीळांनी रंगवलेले नेहरू स्वप्नाळू, भाबडे व आदर्शवादी या प्रकारचे वाटतात; तर कुरुंदकरांनी रेखाटलेले नेहरू मुत्सद्दी, वास्तववादी आणि परिस्थितीच्या रेट्यामुळे मर्यादाशील असे भासतात. गाडगीळ व कुरुंदकर या दोघांनाही नेहरूंमधील ‘लोकशाहीवादी’ नेत्याचे विशेष आकर्षण आहे, पण तरीही त्या दोघांची कारणमीमांसा किती वेगवेगळी आहे!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक’ व ‘बहिष्कृत भारत’ ही दोन नियतकालिके सुरुवातीच्या काळात चालवली. त्यापैकी ‘बहिष्कृत भारत’मध्ये मोठ्या व दीर्घकालीन लढ्यासाठी तयार होत असलेल्या आंबेडकरांच्या बौद्धिक वा वैचारिक आवाक्याचे दर्शन घडते. वयाच्या पस्तिशीच्या टप्प्यावरील प्रज्ञावंत आंबेडकर बहिष्कृत भारतात दिसतात, त्यातील अग्रलेखांचा संग्रह वाचून कुरुंदकरांनी हा लेख लिहिला आहे. येथेही कुरुंदकर चिकित्साच करतात; परंतु ‘आंबेडकरांना केवळ दलितांचे नेते या चौकटीत पाहताच येणार नाही’, हा मुद्दा ठळकपणे अधोरेखित करतात. दलितांचे हित आणि राष्ट्रीय हित असा प्रश्न जेव्हा जेव्हा उभा राहिला, तेव्हा तेव्हा डॉ.आंबेडकरांनी राष्ट्रीय हिताचीच निवड केली आणि त्यांच्या या वृत्तीचे बीजारोपण ‘बहिष्कृत भारत’मध्येच दिसले होते, हे कुरुंदकर नोंदवतात. त्यामुळे, डॉ. आंबेडकरांकडे भारताच्या संविधानाची जबाबदारी अपघाताने आली आणि तरीही त्यांनी ती उत्तम प्रकारे निभावली, असे घडलेले नसून; त्यामागेही कार्यकराणभाव आहे, असे या लेखातून ध्वनित होते आहे.
वरील दोन्ही लेख पं. नेहरू व डॉ. आंबेडकर या दोन नेत्यांची जोरदार पाठराखण करणारे आणि त्यांची खरी महानता समजून घेण्यासाठी विशेष उपयुक्त ठरणारे आहेत. अर्थातच आज-उद्याच्या आधुनिक व लोकशाहीवादी भारतासाठी हे दोघे सर्वाधिक महत्त्वाचे आहेत.
या विभागातील तिसरा लेख मात्र पूर्णत: वेगळ्या विषयावरील व वेगळ्या धाटणीचा आहे. ‘विदुषी’ हे विशेषण गांभीर्याने लावावे, अशा इरावती कर्वे यांच्या ललित लेखसंग्रहाची प्रस्तावना म्हणून तो लिहिला गेला आहे. इरावतीबाईंच्या मृत्यूनंतर आलेला तिसरा व अखेरचा ललित लेखसंग्रह म्हणजे ‘गंगाजल’. देशमुख आणि कंपनीचे प्रकाशक रा.ज.देशमुख व सुलोचना देशमुख यांच्या आग्रहामुळे कुरुंदकरांनी हा लेख लिहिला असावा. त्या दोघांमुळेच इरावतीबाईंशी कुरुंदकरांचे घनिष्ठ संबंध आले. इरावतींचे ‘भोवरा’ व ‘परिपूर्ति’ हे दोन ललित लेखसंग्रह त्याआधी देशमुख आणि कंपनीनेच काढले होते. त्यामुळे त्या तिन्ही पुस्तकांची चिकित्सा करताना कुरुंदकरांच्या मनात जे काही आकाराला आले, ते सर्व ‘गंगाजल’च्या प्रस्तावनेत उतरले आहे. आणि म्हणूनच कदाचित ही प्रस्तावना त्या पुस्तकाच्या प्रारंभी नाही, तर शेवटी छापलेली आहे. या प्रस्तावनेत कुरुंदकर दोन स्तरांवर विचार करताना दिसतात. एक- प्रख्यातत समाजशास्त्रज्ञ असलेल्या आधुनिक विचारांच्या इरावतीबाईंनी केलेले हे आत्मपर व ललित लेखन आहे. आणि दुसरा स्तर- मराठीत फडके, खांडेकर ते पाडगांवकर-करंदीकर, व्हाया काणेकर अशी लघुनिबंधकारांची परंपरा आहे; तर त्या परंपरेत इरावतीबाईंचे लेखन कुठे बसते आणि किती वेगळे ठरते, या चिकित्सक आढाव्यासाठी मराठीतील लघुनिबंधाच्या प्रवाहावर कुरुंदकरांनी ओझरता दृष्टिक्षेप टाकला आहे. त्या प्रवाहाच्या जवळील, पण स्वतंत्र बेट म्हणजे इरावतीबाईंचे ललित निबंध आहेत, असा निष्कर्ष या लेखातून काढता येतो.
५.
तिसऱ्या विभागातील तीन लेखांमध्ये तीन कवींच्या काव्याची ‘मीमांसा’ केलेली आहे. ‘आधुनिक मराठी कवितेचे जनक’ असे संबोधले जाते, ते केशवसुत आणि आधुनिक मराठीतील बंडखोर व विद्रोही म्हणता येतील असे नारायण सुर्वे व यशवंत मनोहर. केशवसुतांची कविता एकोणिसाव्या व विसाव्या शतकाच्या संधिकाळातील, तर नारायण सुर्वे व यशवंत मनोहर यांची कविता स्वातंत्र्योत्तर काळातील आहे.
केशवसुतांची जन्मशताब्दी आली, तेव्हा (१९६७ मध्ये) त्यांच्या कवितेचे आकलन करून घेणारा लेख लिहिताना, कुरुंदकरांनी आधुनिक काळातील मराठी कवितेवर दृष्टिक्षेप टाकणे साहजिक होते. आणि नारायण सुर्वेंची कविता हा लेख पुढच्या वर्षी (१९६८ मध्ये) लिहिला गेला आहे. म्हणजे सुर्वेंची कविता लिहिताना केशवसुतांच्या कवितांवरील लेख ताजा होता. परिणामी, कुरुंदकरांचे मराठी कवितेविषयीचे चिंतन समजून घेण्यासाठी ते दोन लेख पूर्वार्ध व उत्तरार्ध अशा पद्धतीने वाचता येतील. त्यानंतर दहा वर्षांनी (१९७७ मध्ये) यशवंत मनोहर यांचा पहिला काव्यसंग्रह ‘उत्थानगुंफा’ या नावाने आला, त्याला कुरुंदकरांनी प्रस्तावना लिहिली आहे. या कवितांची मीमांसा करताना कुरुंदकरांनी आपली धर्मपरंपरा आणि यशवंत मनोहर सांगतात ती विद्रोहाची परंपरा, यावर अधिक भर दिलेला आहे.
केशवसुत, सुर्वे व मनोहर या तिघांवरील तीन लेख वाचताना दोन मुद्दे ध्यानात ठेवले पाहिजेत. एक- या तीन कवींनी केलेले काव्यलेखन संख्येने कमी आणि परिणामकारकतेच्या दृष्टीने किती तरी जास्त आहे. म्हणजे यांची (आशय)घनता किंवा टक्के(प्रत)वारी खूप जास्त आहे, असे गणिताच्या परिभाषेत म्हणता येईल. केशवसुतांच्या नावावर केवळ एक काव्यसंग्रह आहे, तोही त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला आहे. नारायण सुर्वे यांचे लहान-लहान असे चार काव्यसंग्रह आहेत आणि कुरुंदकरांनी हा लेख लिहिला तेव्हा तर दोनच प्रकाशित झाले होते. यशवंत मनोहर यांचा उत्थानगुंफा हा पहिलाच काव्यसंग्रह होता आणि त्यानंतरही त्यांचे केवळ तीन-चार संग्रहच प्रकाशित झाले आहेत. दुसरा मुद्दा असा की, ज्यांच्या काव्यलेखनावर कुरुंदकरांचे हे तीन लेख आहेत, ते कवी त्या त्या वेळी वयाने पस्तिशीच आत-बाहेर होते. आणि सुर्वे व केशवसुत यांच्यावरील लेख लिहिले तेव्हा कुरुंदकरही पस्तिशीच टप्प्यावर होते, ‘उत्थानगुंफा’ला प्रस्तावना लिहिली तेव्हा जेमतेम पंचेचाळिशीचे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन आणि तीनही कवी आधुनिक/पुरोगामी विचारांचे, बंडखोर/विद्रोही प्रवृत्तीचे होते याचे भान ठेवून, वरील तीन लेख वाचले तर कुरुंदकरांचे काव्यविषयक विचार अधिक चांगले समजून घेता येतील. अर्थातच, या तीनही दीर्घ लेखांमधून कुरुंदकरांमधला साहित्य-समीक्षक आणि राजकीय- सामाजिक विश्लेषक/विचारवंत यांचा मनोज्ञ संगम झालेला दिसतो.
६.
चौथ्या विभागात ‘समाचार घेणे’ या वाक्प्रचाराला पूर्णत: शोभतील असे दोन लेख आहेत. गोपाळ गोडसे यांचे ‘गांधी हत्या आणि मी’ हे आत्मचरित्र आणि ओशो रजनीश यांचे ‘संभोगातून समाधीकडे’ हे तथाकथित तात्त्विक पुस्तक. ही दोन्ही पुस्तके प्रचंड वादाचे विषय बनून गाजत होती, तेव्हा कुरुंदकरांनी हे दोन लेख लिहिले आहेत. हे दोनही लेख लिहिताना कुरुंदकरांचा जो व ज्या प्रकारचा आवेश आहे, तितका व त्या प्रकारचा आवेश त्यांच्या अन्य कोणत्याही लेखनात दिसत नाही. ‘समाचार’ या विभागातही अन्य विभागांप्रमाणे तीन लेख असावेत, असा विचार मनात होता; परंतु कुरुंदकरांची सर्व पुस्तके पुन्हा नजरेखालून घातली आणि त्यांच्या संग्रहित-असंग्रहित लेखांची संपूर्ण सूची पुन:पुन्हा पाहिली तरीही या विभागात टाकता येईल, असा तिसरा लेख सापडलेला नाही.
सामान्यत: अशा पुस्तकांवर टीका करताना ‘ती किती भिकार’ आहेत, या पद्धतीने टीकालेख लिहिले जातात आणि त्यामुळे ते कमी प्रभावी ठरतात. कुरुंदकरांनी ती चूक केलेली नाही. गोपाळ गोडसे व ओशो यांच्या भाषेचे, विषय-प्रतिपादनाचे, वाचकाला आपल्या कह्यात घेण्याच्या क्षमतेचे पुरेपूर कौतुक केले आहे. ही माणसे कशी हुशार, धूर्त, चाणाक्ष आहेत, हेही अधोरेखित केले आहे. आणि मग यांची लबाडी, ढोंगीपणा, विखारी वृत्ती व देशविघातक विचार-कार्य यांची शब्दश: चिरफाड केली आहे. त्यामुळे समाजविघातक शक्तींचा बुरखा फाडण्यासाठी मोठ्या जनसमूहासमोर जाहीर वाचन करावे, या दर्जाचे हे दोन लेख झाले आहेत.
म.गांधींची हत्या झाली त्याला आता सत्तर वर्षे झाली आणि गोपाळ गोडसेंचे पुस्तक आले त्यालाही पन्नास वर्षे झाली, तरीही गांधीहत्येचे जाहीर वा छुपे समर्थन करणारे महाभाग आपल्या देशात आजही आहेत. त्याच त्या प्रकारचे खोटे आरोप व विद्वेषाची पेरणी करणारा वर्ग आणि त्या अपप्रचाराला बळी पडणारी भोळी, अडाणी वा अर्धवट समज असणारी प्रजा जोपर्यंत आहे; तोपर्यंत कुरुंदकरांचा हा लेख कालबाह्य होणार नाही.
ओशोंच्या एकूणच विचारांचा आणि त्यातही ‘संभागोतून समाधीकडे’ या पुस्तकाचा प्रभाव गेल्या काही वर्षांत कमी झाल्याचे दिसते. मात्र ओशोंपेक्षा कमी हुशार पण अधिक धूर्त व ढोंगी बाबा-बुवा, अम्मा, बापू यांचा या देशात सुळसुळाट झाला आहे. त्या काळात सुखासीन उच्चभ्रूंना जशी ओशोंची भुरळ पडली होती, तशीच किंबहुना अधिकची भुरळ आजच्या उच्चमध्यमवर्गातील लोकांना वेगवेगळे आचार्य, सद्गुरू यांची पडलेली आहे. म्हणजे वरवर पाहिले तर अंधश्रद्धा वा बुवाबाजी दिसत नाही, अशा प्रकारच्या आधुनिक अध्यात्माचे प्रभावक्षेत्र प्रचंड पसरलेले आहे. त्या सर्वांचे आंतर्बाह्य रूप उघडे करून सांगणे ही आजच काळाची प्रमुख गरज आहे. त्याळे कुरुंदकरांचा हा लेख त्या सर्वांचे खरेखुरे स्वरूप समजून घेणसाठी विशेष उपुक्त ठरणारा आहे. अर्थात, आधुनिक अध्यात्माने नंतरच काळात बुवाबाजीत इतकी प्रगती केली आहे की, कुरुंदकरांचे हे विवेचन आता अपुरेच ठरणार आहे. त्यामुळे या प्रकारचा समाचार घेण्यासाठी तरी नव्या कुरुंदकरांची गरज विशेषत्वाने जाणवते.
सारांश, भारताच लोकशाही प्रक्रियेच्या वाटचालीत अडसर किंवा धोकादायक ठरणाऱ्या दोन मोठ्या व प्रभावशाली शक्तींचे प्रतिनिधी म्हणून ओशो व गोडसे यांच्या या दोन पुस्तकांचा विचार करावा लागतो.
७.
पाचवा विभाग ‘परामर्श’ या शीर्षकाखाली आहे, त्यातील तीन लेख थेटपणे कोणत्याही ग्रंथांविषयी नाहीत; परंतु तरीही ‘ग्रंथवेध’मध्ये घेणे आवश्यक वाटले. याचे कारण- कोणत्याही ग्रंथाचा वेध घेतानाचे कुरुंदकरांचे मानस, आणि मराठीतील ग्रंथव्यवहार व महाराष्ट्रातील साहित्य परिषदांचा कारभार याकडे कुरुंदकर कसे पाहतात, हे यातून चांगल्या प्रकारे कळते.
‘महाराष्ट्रातील ग्रंथव्यवहार’ या विषयावर कुरुंदकरांनी ३५ वर्षांपूर्वी केलेले भाषण येथे घेतले आहे. कारण आपल्या ग्रंथव्यवहाराविषयी नामवंत लेखक- संपादकांनाही अगदीच जुजबी माहिती असते आणि त्यातील ताणेबाणे मुळापासून समजून घ्यावेत, असे बहुतेकांना वाटत नाही. यामुळे नवोदित लेखकांच्या साहित्यिकांच्या मनात ग्रंथव्यवहाराविषयी भीती असते किंवा अतिउत्साहाची भावना! याउलट प्रथितयश लेखक-साहित्यिकांच्या मनात त्याबाबत उदासीनता, अलिप्तता किंवा तुच्छता यांचा शिरकाव झालेला असतो. त्यामुळे ग्रंथव्यवहाराविषयीची अनभिज्ञता हे यशस्वी ग्रंथकर्त्याचे प्रधान लक्षण, अशी स्थिती मराठीत तरी (काही अपवाद वगळता) कायम राहिली आहे. अर्थात, याचे मुख्य कारण लेखक-प्रकाशक-मुद्रक-ग्रंथविक्रेता-ग्राहक ही साखळी किती विस्कळीत असते याची कल्पना लेखकांना, या प्रक्रियेच्या बऱ्यापैकी आत घुसल्याशिवाय येत नाही. या पार्श्वभूमीवर, कुरुंदकरांचे हे भाषण वाचल्यावर प्रकर्षाने लक्षात येते ते हेच की, ही विस्कळीत साखळी त्यांना चांगलीच कळलेली होती. त्या विस्कळीतपणाचा संबंध आपल शिक्षण-अर्थव्यवस्थेशी आणि समाजसंस्कृतीच्या अवस्थेशी आहे, हेसुद्धा ते पुरेपूर ओळखून होते. या भाषणात त्यांनी केलेले वर्णन-विश्लेषण आणि बांधलेले अंदाज व मांडलेले व्यावहारिक गणित यांच्यात आता तपशिलांचे काही फरक (बाह्य- प्रामुख्याने तंत्रज्ञानातील-बदलांमुळे) झालेले आहेत. पण त्यांच्या प्रतिपादनातील गाभा व आशय मात्र आजही कायम आहे.
महाराष्ट्रातील साहित्य परिषदांना आता पाऊण ते एक शतकाचा इतिहास आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर या चार ठिकाणी चार प्रादेशिक विभागांचे प्रतिनिधित्व करणार्या साहित्य परिषदा आहेत. याशिवाय, बृहन्महाराष्ट्रात बडोदा, इंदूर, हैदराबाद, भोपाळ, बेळगाव, गोवा अशा ठिकाणीही छोट्या प्रमाणात का होईना साहित्य परिषदांचे अस्तित्व टिकून आहे. कोकण मराठी साहित्य परिषद आणि अन्य काही ठिकाणीही स्वायत्तता राखणाऱ्या साहित्यसंस्था आहेत. साहित्य संमेलने भरवणे, मुखपत्रे आणि काही प्रमाणात पुस्तके प्रकाशित करणे, वाङ्मयीन पुरस्कारनिवड व व्याख्याने यांचे आयोजन करणे- या प्रमुख मार्गांनी साहित्य परिषदांचे काम चालते. अर्थातच, मराठी भाषा, मराठी साहित्य व मराठी संस्कृती यांचा प्रसार/विकास हा प्रधान हेतू समोर ठेवून या संस्था कार्यरत असतात. त्याद्वारे आपली एकूणच वाचनसंस्कृती, साहित्यनिर्मिती आणि समाजजीवन यांवर कमी-अधिक परिणाम व प्रभाव टाकण्याचे काम अशा संस्था करीत असतात. या पार्श्वभूमीवर ‘साहित्य परिषदा : एक अवलोकन’ हा कुरुंदकरांचा लेख सद्य:स्थितीवर प्रकाश टाकून, कोंडी फोडण्यासाठी वाट दाखवणारा आहे. स्वत: कुरुंदकर वयाच्या अवघ्या बत्तिसाव्या वर्षी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष झाले होते. त्यामुळे, या विषयावरील आकलन वाढण्यासाठी त्यांना तो प्रत्यक्ष अनुभव उपयोगी पडला असणार. पण मुख्य म्हणजे साहित्य- व्यवहारातील सर्व घटकांतील, सर्व स्तरांतील लोकांशी सततचा व थेट संपर्क असल्याने आणि तरीही त्या सर्वांपासून मनाने कायम अलिप्त राहिल्याने कुरुंदकरांचा हा लेख मार्मिक टोलेबाजी करत वस्तुस्थिती मांडणारा, अपेक्षित मार्ग व गती यांचे सूचन करणारा झाला आहे. कुरुंदकरांनी हा लेख लिहिल्यानंतरच्या चार दशकांत साहित्य परिषदांमध्ये फारसे स्पृहणीय बदल झालेले नाहीत आणि एकूण चैतन्यही बरेच ओसरले आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे धडपडणार्या आताच्या साहित्य परिषदेच्या धुरीणांना हा लेख प्रेरणादायक वाटू शकेल.
शेवटचा म्हणजे ‘आजचे मराठी साहित्य पुरेसे प्रक्षोभक आहे काय?’ हा लेखही पन्नास वर्षांपूर्वी (१९६८) लिहिलेला आहे. त्या वेळी कुरुंदकरांचे वय होते ३६ वर्षे आणि मराठी साहित्यात दलित, ग्रामीण, नागरी असे साहित्यप्रवाह उगम पावलेले होते. परंतु तितकेसे नावारूपाला आलेले नव्हते, त्यांची समीक्षा करण्याचे मापदंडही तयार झालेले नव्हते. अशा काळात कुरुंदकरांनी लिहिलेला लेख ‘ओपन एन्डेड’ असणे साहजिकच होते- किंबहुना, तो त्यांच्या दूरदृष्टीचा पुरावा आहे. या लेखात त्यांनी साहित्याचा प्रवाह कसा आकाराला येतो आणि वाहतो याची मांडणी करून, हा प्रवाह पुढे कसा जाईल किंवा जायला हवा याविषयी भाकीतवजा अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांच्या या विवेचनावर मानवी संस्कृतीचा विकास कसा होतो, इतिहासाचे चक्र कसे चालते आणि सामाजिक बदलांची दिशा कशी असते, या तीन बाजूंनी विचार करण्याच्या पद्धतीचा प्रभाव जाणवतो.
पन्नास वर्षांनंतर मराठी साहित्यात अनेक स्थित्यंतरे झाली आहेत, परंतु समाजजीवनातील स्थित्यंतरे त्याहून किती तरी पटीने जास्त आहेत. त्यामुळे आजही ‘मराठी साहित्य पुरेसे प्रक्षोभक आहे का?’ या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच येते.
कुरुंदकरांच्या विचारपद्धतीचे आणि काळाच्या पलीकडे झेप घेणारे व मूलगामी चिंतन करणारे असे किती मुद्दे आणखी सांगायचे? असो.
अशा प्रकारे पाच विभागांत मिळून १४ लेख आहेत. यातील शेवटचा लेख प्रस्तावना म्हणून घेता आला असता, असे काही लोकांना वाटू शकते; पण ज्या कारणामुळे ‘गंगाजल’ची प्रस्तावना त्या पुस्तकात प्रारंभी न छापता शेवटी घेतली आहे, त्याच कारणामुळे हा लेख प्रस्तावनेऐवजी शेवटी घेतला आहे.
या खंडातील कुरुंदकरांच्या लेखांचा प्रारंभ बाबा आमटे यांच्या ‘ज्वाला आणि फुले’ या पुस्तकावरील लेखाने केला आहे. त्याच बाबांनी कुरुंदकरांच्या मृत्यूनंतर लिहिलेले ‘मुक्या अश्रूंचे अभिवादन’ हे चिंतनकाव्य पुस्तकाच्या सुरुवातीला घेणे आवश्यक वाटले. बाबा आमटे यांनी लिहिलेले अशा प्रकारचे अभिवादन मराठीत तरी फक्त हमीद दलवाईंच्या वाट्याला आले आहे. (कुरुंदकर व दलवाई यांचे वैचारिक मैत्र सर्वपरिचित आहे). ‘ग्रंथवेध’ वाचल्यावर अनेकांना कुरुंदकरांची अभ्यासपद्धती नेमकी कशी होती, असा प्रश्न पडेल. त्याचे काहीअंशी उत्तर ‘माझा ग्रंथसंग्रह नाही’ या लेखात मिळेल, तो लेख ‘व्यक्तिवेध’ या खंडात घेतला आहे.
आता पुढे काय? हा तिसरा खंड छापायला सोडताना अशी कल्पना मनात आली आहे की, चौथा खंड ‘धर्मवेध’ या शीर्षकाखाली करावा. त्या खंडात प्रामुख्याने हिंदू व मुस्लिम आणि काही अंशी बौद्ध व ख्रिश्चन या धर्मांचा आणि एकूणच माणूस व धर्मसंकल्पना यांचा वेध घेणारे लेख असतील. तो खंड मात्र जुलै २०१८मध्येच येईल, असा प्रयत्न होईल.
.............................................................................................................................................
निवडक नरहर कुरुंदकर : खंड तीन (ग्रंथवेध) – संपादन – विनोद शिरसाठ,
देशमुख आणि कंपनी, पुणे, पाने – ३२०, मूल्य – ३२५ रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4291
.............................................................................................................................................
लेखक विनोद शिरसाठ साधना साप्ताहिकाचे संपादक आहेत.
vinod.shirsath@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment