कवी वर्जेश ईश्वरलाल सोलंकी यांची ‘पेरुगन मुरुगन’ ही उपहास, उपरोध आणि वास्तव यांनी खच्चून भरलेली मराठीतली एक आगळीवेगळी लघुकादंबरी आहे. लवकरच ती लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित होत आहे. या कादंबरीतला हा संपादित अंश..
.............................................................................................................................................
त्याने आपला फोन स्विच ऑफ केला. दार आतून लॉक केलं. घराच्या खिडक्या बंद केल्या. चहाला आलेली उकळी पाहून गॅस बंद केला. मोबाइल स्विच ऑफ करण्यापूर्वी सगळ्या व्हॉट्सअप ग्रूपमधून लेफ्ट केलं. फेसबुक अकाउंट लॉक केलं. सिमकार्ड बदललं. खिशात जपून ठेवलेली टेलिफोनची डायरी कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिली. जुन्या सिमकार्डातले सगळे नंबर डिलिट केले. मेमरी कार्डाचा चेंदामेंदा केला. मोबाइलचा नंबर चेंज झाल्यामुळे नवीन कॉल्स येणार नव्हते. मोबाइल ऑपरेटरचा कार्ड अॅक्टिव्ह करण्याकरता फोन घेतला गेला. मोबाइल फोन तरी कशाला हवा? आपल्यापर्यंत कोणीच पोहचू नये. स्वत:शीही बोलणं हळूहळू का होईना बंद करावं. आत्मसंवादाच्या खिडकीची झडप बंद करून टाकावी. फोन स्विच ऑफच करून ठेवू. तो चार्जच नाही झाला तर ओपन होण्याची सुतराम शक्यता नाही हे एक बरं आहे.
वाटलं आतल्याआत की दारावरची कोरलेली नावाची पाटीही काढून टाकावी म्हणजे बाहेरच्या अनाहूत माणसाला समजणार नाही की, इथे कोण नेमकं राहतं म्हणून. दरवाजावरच्या बेलचाही गळा दाबावा म्हणजे ती किलकिलणार नाही. कितिकितिकिती पटकन वाटलं. वाटलं रावणासारखे वीस हात असायला हवे होते हे सगळं करायला. मात्र आपल्या वाटण्या न वाटण्यानं काय होत नाही. आपल्याला नाही का वाटलं सरळ हात उगारावा. डोळ्यात रक्त येऊ द्यावं. चिडावं. टेबलावरला पेपरवेट सरळ समोरच्यावर भिरकवावा. तरी शरीर रागानं थरथरलं. थरथरत राहिलं. थरथरीचा एक अनामिक थर साहेबांच्या ऑफिसमध्ये फाइलींच्या ढिगासारखा वाढत राहिलेला. सगळा स्टाफ साहेबांच्या केबिनसमोर घुटमळत राहिलेला.आपलं किती पाणी झालेलं आहे हे सगळ्यांना माहीत करून घ्यायचं होतं.
साल्याला मेमो मिळायला पाहिजे चुतिया साला नेहमी सिस्टमने चालतो मादरचोद. आज आया साला उँट पहाड के नीचे. असा गलबला गेल्या काही वर्षांपासून सगळ्यांच्या आतड्यात खळबळत होता.
आपली ही पंधरा वर्षांच्या काळात विसावी बदली. कुठेच याची गांड टिकत नाही असा शेरा कम टोमणा आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मारला गेलेला. चुतियाला बोलण्याची अक्कल नाही. काम करण्याची पद्धत माहिती नाही. कायदा कानूनने चालतो म्हणजे काय? आमची व्हाऊचर रोखतो म्हणजे काय? कधीही येऊन ऑडिटच्या बहाण्यानं आमचं स्टिंग ऑपरेशन करतो म्हणजे? ऑफिस अवरनंतरपण कामाला जुंपतो म्हणजे काय? याच्या बापाचे नोकर की काय? लेटरमध्ये साला कधीही स्पेलिंग मिस्टेक काढून आम्हाला फेफरी आणतो? बरं झालं साल्याचं ‘सर्जिकल स्ट्राइक’ झालं ते.
असं आजपर्यंतच्या कारकिर्दीत काय-काय इकडून तिकडून ऐकून घेताना साहेबांच्या केबिनमधून थरथर घेऊनच आपण सुममध्ये बाहेर आलो. सुममध्ये ऑफीसच्या बाहेर पडून सुममध्ये बाइकला किक मारलेली. घर कधी आलं व घरामध्ये कधी शिरलो हेही समजलं नाही.
……………………
आपण पेरुगन मुरुगन झालेलो आहोत या जाणिवेनं त्याला तरतरी आली. मस्त वाटलं. पेरुगन मुरुगनला आजवर आपण पाहिलेलं नाही. मात्र त्याचा चेहरा व चामडी संवेदना आपल्यासारखीच असावी. आपल्यासारखंच त्याच्याजवळ धपापतं काळीज असणार. आपल्याच स्वभावधर्माचा तो असणार. काहीही फालतूगिरी त्याला चालत नसणार. टेबलावर पडलेला फाइलींचा ढीग त्याला चालत नसणार. कस्टमर लोकांचे क्लेम काहीच वैयक्तिक फायदा न उपटता तो तडीस नेत असणार. कंबर व पोट दुखतंय, जॅम पाऊस आहे. लोकल ट्रेन उशिरा धावत आहेत, म्हणून कामाला खाडा केल्याचा दिवस त्याच्या रजिस्टरमध्ये नसणार. त्यालासुद्धा आपल्यासारखाच राग आलेला असेल... समोरच्यावर मेमोच्या कागदाची सुरळी करून त्यानेही फेकलेली असेल. अख्खं टेबल घेऊन समष्टीच्या अंगावर आपटावंसं वाटलं असेल.
……………………
असो पण आपण आता पेरुगन मुरुगन झालेलो आहोत.
……………………
बर्याच दिवसांत आपल्याला चेहरा नव्हता, ओळख नव्हती. आज चेहर्यावरचा छिलका निघाला. नवीन त्वचा आली. आतड्यातून काहीतरी सळसळत गेलं. पेरुगन मुरुगन असण्याची काय तलफ असते या जाणिवेनं अख्खं शरीर कसं उद्गार व केवलवाक्य प्रयोगांनी शहारून गेलं. जे काही निसटून गेलं होतं तेच पायापाशी येऊन चाटू लागलेलं. तिची मलमल व खाजेचा नव्यानं सन्मान झालेला. कुत्र्याच्या पिल्लाला लांब सोडावं व पुन्हा ते वास घेत ओसरीवर उन्हं खाताना दिसावं अशीच आपली गत झाली आहे
हेच असावं बहुतेक आपलं मर्यादापुरुषोत्तम जग.
बरं झालं आपण पेरुगन मुरुगन झालो ते. वेळीच ज्याने निर्णय घेतला त्यानेच जगावर राज्य केलं. पेरुगन मुरुगन म्हणजे काय मस्त गोष्ट आहे. लोकशाहीत विचारांची लढाई विचारांनी लढली गेली पाहिजे असं काही नाही. बंदुकीची एक गोळी पण मस्त श्रीराम लागू होते.
असं वाटताना दारात आपल्या प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला आहे. सगळं एकदम गलेलठ्ठ झालेलं आहे म्हणजे आपल्या पगारासारखं, बँक बॅलन्ससारखं, बायको गलेलठ्ठ झालेली आहे. मुलं मित्र नातेवाईक खाऊनपिऊन गलेलठ्ठ झालेली आहेत. पोटही मस्त गलेलठ्ठ झालेलं आहे.
……………………
असे बरेच आवाज, घटनाक्रम पेरुगनच्या भवती फेर धरायला लागले. मणक्यातून वेदनेची एक सूक्ष्म कळ धावू लागलेली आहे असंही लक्षात आलं. पुन्हा आतून आवाज यायला सुरुवात झाली. म्हणजे जखम कितीही दाबली तरी तिच्यातून रक्त वाहतच राहावं अशी अवस्था पहिल्यांदाच होत होती. आवाजाच्या आतल्या वेटोळ्यात त्याला मस्त गुरफटावासं वाटलं.
कुठूनसा त्याला आवाज आला. बहुतेक बाजूच्या रूममधला असावा असं वाटलं. मात्र तो आवाज आपल्याच आतून येत आहे असं त्याला वाटलं. कधीतरी असं होतं, आपल्याला वाटतं कोणीतरी हाक मारली. मात्र आजूबाजूला कोणीच नसतं. आपण एकटेच असतो. आवाज वाढतोय असं वाटलं. कोणीतरी आपल्यालाच बोलतंय. आपल्या झिंज्या ओढल्या जाताहेत. शब्दानं फटकारलं जातोय.
तुम कोन है रे चिंगुस. बहोत बोल रहा है. तेरा भी आवाज बंद करना पडेगा. एक बार भाय बोल दिया ना चुपचाप सुननेका. भाय ही इस मुल्क का सुलतान है, शहनशाह है. परवरदिगार है.
ये हमारा मुल्क है. पराया मर्द को अपना जिस्म नहीं दिखाने का. तुम शानी है तो तेरी जगह बिस्तर में. जो भी अकल दिखाने का है बिस्तर में दिखानेका. तेरी जो भी अदा है स्टेज पे नहीं उधर पलंग पे. तेरी माका साकीनाका. मरद के सामने बुरखा पहननेका, घुंगट में रहेने का. तेरे जिस्म का अंगूर हमही चुसेंगे. चुसते रहेंगे. तेरी हड्डीयां हमही रगडेंगे. आया क्या बात समजमें. जादा उडनेका नय. पढाईबिढाई गई तेल लगाने. हमारी आंखे पढो. बच्चे निकालो. उनको संभालो. चुला फुंको.
ए लवडे के बाल. हटा सावन की घटा. तुम्ही चंद्रावर जा नायतर ढगात. स्त्री ही आमची मालमत्ता आहे. आमचा गुत्ता आहे. केसातला गुंता आहे. सकाळी चहा तिने आम्हाला बनवून द्यायचा. आमचे कपडे तिने धुवायचे, आमची भांडी तिने घासून द्यायची. आमच्या पोराटोरांचा सांभाळ करायचा. आमची लफडी सांभाळायची. रात्री तिने आमचा पेग बनवायचा. अंथरुण तिने टाकायचं. लाइट गेली तर पंखा व्हायचं. आम्ही झोपले की तिने झोपायचं. आमच्या उठण्याआधीच तिने उठायचं. आमच्या टांग्याच्या चाकाला वंगण घालायचं. घोड्याना चणे घालायचे. जंगलात जाऊन चारा आणायचा. दुष्काळबिष्काळ आम्हाला माहीत नाही. गुळण्या करायला व आंघोळीला गरम पाणी रेडी ठेवायचं. आमच्या चड्ड्याबनियन, हातरुमाल, टॉवेल, पावडर, कासकी, साबू एकदम अपटुडेट ठेवायचं. आमच्या जेवणाचा डबा पोळ्याभाजीभातलोणचं टायमात बनवायचं. आमी काय पण तिच्या हातात टेकवू तिनं अॅडजस्ट करावं. आम्ही या भोकातून दुसऱ्या भोकात गेलो तरी आमच्यावर पाळत ठेवायची नाही. फालतूचे प्रश्न विचारून हैराण करायचं नाही. प्रश्न ऐकण्याची आम्हाला आदत नाही. उत्तरं द्यायची आमची दानत नाही.
जा तुमी काय आमची उपटणार जा उपटा मग.
जा तुमी काय आमची उपटणार जा उपटा मग जा तुमी काय आमची उपटणार जा उपटा मग जा तुमी काय आमची उपटणार जा उपटा मग जा तुमी काय आमची उपटणार जा उपटा मग जा तुमी काय आमची उपटणार जा उपटा मग जा तुमी काय आमची उपटणार जा उपटा मग.
आमच्या देवादिकांची निंदानालस्ती केली, त्यावर उपरोधिकपणे व्यंगचित्रं काढलीत, कथाकादंबऱ्यांतून आमच्या धर्माची छेडछाड केलीत, सिनेमातून काही बतावणी केलीत तर याद राखा. आमचे नॉर्म्स ठरलेले आहेत. हा केवायसीचा फॉर्म भरा. तुमचे सगळे नॉर्म भरा.
या आतल्या संवादाने पेरुगनला घामघाम फुटला. इतके अंतर्ध्वनी आपल्या काळजाच्या अंतर्वस्त्रात दडी मारून बसलेत की काय की कधीकाळी आपण हे ऐकलेले असावं तेच बदाबदा पावसाचं पाणी ताडपत्रीवरून खाली येऊन खालच्या माणसाच्या अंगावर अनपेक्षितपणे पडावं तशीच आपली गत होत आहे की काय? संवादाच्या पाकळ्या मिटाव्यात व पुन्हा फुलून याव्यात असं होतं आहे की काय?
एकदम घराच्या खिडक्यादरवाजे बंद करणं काही ठीक नाही असंही वाटू लागलेलं. म्हणजे श्वासोच्छ्वासाच्या मनोरंजन खेळासाठी तरी ते उघडले गेले पाहिजेत हे त्याला जाणवलं. काही गोष्टी आपण हळूहळू बंद करायला हव्यात. हळूहळू तंबाखू सोडावा तसं. आता नवीन पुस्तकं खरेदी करायची नाहीत. वर्तमानपत्रातून किंवा न्यूज चॅनलमधून भवतालचा अंदाज घ्यायचा नाही. परीघ दोस्तीयारीदुश्मनी यात विशेष रस दाखवयाचा नाही.
एकदम नरो वा कुंजरो वा.
मुलांना शाळेत किंवा नर्सरीमध्ये किंवा खेळघरात सोडायला जायचं नाही. दळण आणणं यात कुठला सावकारपणा हे घरात निक्षून सांगायला हवं किंवा एखादा बारका लेख लिहून समष्टीला पटवून द्यायला हवं. पण आता लिहिणं ही काही आपली परंपरा राहिलेली नाही. लिहिता न येण्याची किंवा एकदम निरक्षर झाल्याच्या गोळ्या किंवा मेडिसीन वगैरे काही मिळतं का बाजारात याची चौकशी करायला हवी.
मात्र चौकशी करणं म्हणजे पुन्हा संवाद साधणं आलं. संवादाऐवजीचे पर्याय शोधायला हवेत. म्हणजे सारामागुच्या कादंबरीत एकेक पात्र जशी आंधळी होत जातात, तशी एकेक माणसं मिनिटासेकंदतासागणिक निरक्षर व्हायला हवीत. निरक्षर माणसाला कॉपी करायचं व साक्षर माणसावर त्याला पेस्ट करायचं. धम्माल. आपण उगाच साक्षर झालो याचा दोष तो त्याच्या पूवर्जांना देण्यात तो मग्न झाला.
हे एवढं सगळं ऐकून पेरुगन मुरुगनच्या या छातीत दुखत आलेलं. आपणही नकळत कुठल्यातरी फॉर्मवर सही केलेली आहे. आपण एका जाळ्यात फसले गेलेलो आहोत. ना पुढे जाऊ शकत नाही ना मागे येऊ शकत अशा एका प्रणालीत आपला प्रवेश झालेला आहे.
जिसके हात में है दम, वो बाजीराव सिंघम.
या भवतालच्या आकाशाला गवसणी घालणाऱ्या इमारती, चकचकीत मॉल्स, चकचकीत माणसं, त्यांची ने-आण करायला चकचकीत गाड्या, चकचकीत गाड्या घेण्यासाठी चकचकीत बँका, चकचकीत बँकांच्या जाहिरातीसाठी चकचकीत टायवाली माणसं, चकचकीत टायवाली माणसांकडे चकचकीत आधुनिक उपकरणं, चकचकीत आधुनिक उपकरणांतून चकचकीत आधुनिक रोग, चकचकीत आधुनिक रोगांसाठी चकचकीत आधुनिक औषधं, चकचकीत आधुनिक औषधांसाठी चकचकीत आधुनिक दवाखाने, चकचकीत आधुनिक दवाखान्यांतल्या डॉक्टरांसाठी चकचकीत आधुनिक शिक्षणकेंद्रं, चकचकीत आधुनिक शिक्षणकेंद्रांत शिक्षणासाठी चकचकीत आधुनिक जीवघेणी स्पर्धा-पैसा, चकचकीत आधुनिक जीवघेणी स्पर्धा-पैसा उपलब्ध करून देण्यासाठी चकचकीत विदेशातल्या बँका. दातातून दाताकडे. माझ्या मना बन दगड. खा माती. आता अश्मयुग संपलं.
नयी दुनिया नया दौर नया जमाना.
म्हणजे पुन्हा चिन्ह संस्कृती. देहबोलीतूनच टपटपत राहायचं. लिहिणं ही व्यवस्थाच आता मोडीत काढायला हवी. कोणी आपल्याला आता बोरुबहादार आहोत असं म्हणू नये. सगळ्या लिहितेपणाच्या खुणा सावकाश पुसून टाकायला हव्यात. मुलांनाही शाळेतून काढून टाकावं. लिहिता-वाचता न येणार्या माणसाबद्दल एकदम शेवटी शेवटी काय बोल्लं जाईल? की तो आदिम आहे, रानटी आहे. याला विश्वाचं ज्ञान नाही.
एकदम आंड्यापो आहे. चलेश. आपण आदिम आहोत या जाणिवेने त्याला गुदगुल्या व्हायला लागलेल्या वाटलं. एकदम दास्ताने सफर. शून्याचा शोध ही आपल्या भारतवर्षाचीच देणगी. आपला पेटंट. शून्याचं महात्म्य खूप मोठं. आदिम म्हणजे आपण जंगली. आपल्या पूर्वजांची हाडं व बरगड्या मोहोंजोदडोतल्या मातीत सापडलेल्या. सिंध संस्कृतीच्या भिंतीत आपल्या पूर्वजांची कलेवरं चिणून टाकलेली. आपल्या अंगाखांद्यावर केसबिस वाढलेले. आपण ओणवे चालताचालता सरळ उभे राहून चालू लागलेलो. शेपूट गांडीत घुसून गायब झालेली. चिन्हातून हातवारे करता करता भाषेचा अचानकपणे शोध लागलेला. कोणी म्हणालं भाषेआधी संगीत आलेलं. रडण्याचा किंवा केकाटण्याचा आवाज, फळ तोडल्याचा व जखमी होऊन कण्हण्याचा आवाज. एका शोधामागून मग दुसरा शोध. जगण्याची व व्यवहाराची वेगवेगळी भाषा बनत गेलेली. हुंगता हुंगता वेगवेगळ्या चवींचा शोध लागलेला. चवीच्या मागे वासना आलेली. हव्यास आलेला. हव्यासापोटी दु:ख नावाचं शुक्लकाष्ठ आलेलं. संघर्ष आलेला. त्यामागून तत्त्वज्ञान व तत्त्ववेत्ते आलेले. साहित्य आलेलं मौखिक व लिखित. विविध भाषांचे फड उगवलेले व कालानुरूपे नाहीसे झालेले. रंग आले. कलाकारी आली. संगीत आलं. नृत्य आलं. दरीखोर्यातून वाहत रागदारी आली.
कोणे एके काळी म्हणे शाईचा शोध आधी झाडातून निघणाऱ्या चिकातूनच लागला होता. भल्यामोठ्या पर्णावरच लेखबिख लिहायचे. (शाईवरून आठवलं लिहिण्याच्या उपयोगापेक्षा तिचा वापर प्राप्तकालात दुसऱ्यांच्या तोंडावर किंवा कपड्यावर फेकण्यासाठीच अधिक होऊ घातलाय. परवा आपला बुशशर्ट चांगला दिसतो म्हणून कलिगने मुद्दामून मागून शाईची पिचकारी मारली. जाब विचारायला आपण गेलो तर सॉरी म्हणला. इंग्रज सॉरी व चहा भारतात सोडून गेले असं त्याचे बाबा कोणाशीतरी तावातावानं बोलताहेत हे त्याला आठवलं. शाई फेकणाऱ्या बांडगुळाविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा. पण लक्षात कोण घेतो?)
स्वत:चं नाव लिहिता येत नाही. पुन्हा आपला अंगठा. निशाणी डावा अंगठा. त्याला त्याचा मित्र आठवला. याच नावाची त्याची कादंबरी. शिक्षण क्षेत्रातल्या घडामोडींवर प्रकाश टाकून त्याचा अकोलकर करणारी. कुणी सांगितलं सही कर तर अंगठा दाखवायचा. तोही गांड धुतल्या जाणाऱ्या हाताचा. समोरच्याला स्टॅम्पपॅड शोधायला लावायचं. शाईची बाटली शोधायला लावायची. अंगठा मस्त शाईत भिजवायचा. कापत्या हातानं अंगठा उमटवायचा. अंगठा बरोबर उमटला ना या धाकधुकीचा आनंद धुतल्या हाताच्या वासासारखाच घेत अनुभवायचा. महाभारतात पण या अंगठ्याचं महात्म्य. भीमाप्पाने म्हणे द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्यावेळी पायाचा अंगठा असाच दाबून ठेवला होता. लोकल ट्रेनमधल्या गर्दीत ओठ व दात चावून मुक्क्याचा मार सहन करावा तसं. दुसरं कुणा ऋषिमुनीने एकाचा हाताचा अंगठा दक्षिणेत मागून पत्ता कट केलेला. समोरच्यावर तर एकदम आफतअली. काय करणार सामनेवालापण आ बैल मुझे मार अशी गत. ऑलिम्पिकच्या स्पर्धेत निवड व्हावी व रक्तात बंदी घातलेल्या औषधाचे अंश सापडावेत. सालं खरंच जगण्याच्या पसाऱ्यात निरक्षर असलेलं बरं. म्हणजे शिकूनबिकून पण काही जास्त मतलब नसतो. शेवटी आपण येड्या गांडीचेच असतो. जो डॉक्टर असतो त्याला सांगितलं की चल रे पान बनव किमाम टाकून किंवा भेळेची पुडी बांध तर फाटलीच त्याची ना. मोठमोठे पूल बांधणाऱ्यांना सांगितलं चपलेचा मेठा शिवून दे तर ततपपच ना. पुढला जन्म आपला साहेबांच्या केबिनबाहेरच्या प्यूनचा असायला हवा. साब नहीं है, शामको आव. कल मिलेंगे. मीटिंग मे बिजी है. चपराशासाठी कमीत कमी शिकलेलं असावं लागतं. डोक्याचं दही नाही. इथली फाइल तिथे ठेव व तिथली फाइल इथे ठेव. त्यात काय डबोलं असतं त्याला जाणून घ्यायचं नसतं. तंबाखूचा बार तोंडात मारत मस्त दणक्यात हासता येतं. आपण ऑफिसात बसून बॉसची टांगती तलवार झेलत. कसलं लवड्याचं टारगेटबिरगेट नसतं. सुट्टीच्या दिवसात पण ऑफीसला येऊन धार मारायची नसते. कुणाच्या मय्यतला गेलो तर बॉसचा फोन. किधर हैं? मय्यत में. फिर क्या उखाड रहा हैं. पैर पडके आ जाने का. आज ऑडिटर आ रहे हैं. जल्दी आ जाओ. तर जन्मलो व मेलो एवढ्या दोनच घटना सृष्टिचक्रात आपल्या नावावर असायला हव्यात. असेना का?
टोकाच्या घेतलेल्या भूमिकेचं टोक दिवसेन् दिवस आपण धारदार करावं.
भवतालचा अंधार अधिक गडद करावा. निरक्षर लोकांची एक भव्य वसाहत उभी करावी. निरक्षर मनुष्य असलेल्यांची ही वसाहत मग कुठल्याच लिपीला जन्म देणार नाही असा घाट घालावा. लिपी म्हणजे काय, विचारसरणी म्हणजे काय, भूमिका म्हणजे काय, लवडालसूणआलंमिरच्याकोथिंबिरधनियाहळदीमिरची काय काहीच माहीत नसावं. रोटीबेटीजागेबिगेच्या व्यवहारात कज्ज्यात मौखिक दस्ताऐवज. असं त्याला काय-काय वाटत राहिलं. अशा सगळ्या विचारांनी त्याचा मेंदू दुखत राहिलेला.
बॉसला आपण ऑफीसमध्ये बॉसच समजतो
ज्युनियरना ज्युनियर
शिपायाला शिपाई
.............................................................................................................................................
नवनवीन मराठी पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
आपण एक अंतर राखून आहोत. कविताही समास सोडून लिहितो. मात्र आता ही लेनची शिस्त पाळा. सारखं समास सोडण्याची पाळी आपल्यावर येणार नाही. आपण पेरुगन आहोत. आपण एका व्यवस्थेचे व्यवस्थित बळी आहोत की आपल्या मनाचे हे भ्रम आहेत. पोटापाण्याचा प्रश्न सुटेल ह्याच अपेक्षेने आपण नोकरीकडे पाहत होतो. मात्र कधीतरी हे प्रकरण एका वेगळ्या वळणावर आपल्याला घेऊन जाईल हे माहीत नव्हतं.
म्हणजे आपल्या तोंडून जे घडलं नाही त्याची शिक्षा आपण का भोगावी. सरळ मॅनेजमेंटच्या केबिनमध्ये जावं, त्याला जाब विचारावा, त्याचं बकोट पकडावं किंवा सरळ राजीनाम्याची सुरळी करावी व बॉसच्या गांडीत घालावी किंवा युनियनकडे जाऊन दाद मागावी, एकाकी का होईना लढा द्यावा.
मी लढलो नाही अशी त्याला एका कवीची ओळ आठवली.
म्हणजे पेरुगन मुरुगन झाल्यावर कुणापुढे नतमस्तक व्हायची पाळी येणार नाही.
अशा काय-काय विचारात असताना त्याला जाणवलं की आपण अजून एक सिगारेट ओढू शकतो. सिगारेट ओढता ओढता टॉयलेटला जाऊ शकतो. टॉयलेट करता करता चहा, पुस्तक किंवा मोबाइलवर एखादा व्हिडिओ पाहू शकतो.
टॉयलेट अशी एक रम्य जागा आहे जिथे मनुष्यप्राणी चिंतन करू शकतो. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले असे म्हणू शकतो. मात्र आता चिंतनबिंतन हा काही आपला इलाखा राहिलेला नाही. उगाच कुठलीच गोष्ट मनाला लावून घ्यायची नाही. आपण आपली सिगारेट प्यायची, टॉयलेट करायचं. कुठल्या विचारात हरवायचं नाही. विचार करायला लागेल अशा गोष्टीच्या फंद्यात पडायचं नाही. अशा कुठल्या गोष्टी असतात जेणेकरून माणूस विचार करायला प्रवृत्त होतो. अशा घटनाक्रमापासून दूर राहायला हवं. निर्जंतूक खोली करावी तसं विचारांतूक हा मेंदू करायला हवा.
पेरुगन मुरुगनला वाटलं असं बिछान्यातल्या बिछान्यात लोळण घालण्यात काही मतलब नाही. किंवा कायमचं असंच पडून राहावं या फरशी कम बिछान्यावर. अंगावर धूळ कोळिष्टकं मांजर उंदीर मुंग्या धावू द्याव्यात. झाड कसं आपली मुळ्या पसरवून एकाच जागी वर्षानुवर्षं एकाच जागी उभं असतं. आपल्यातून आता काही उगवणार नाहीए, प्रसवणार नाहीए. सगळ्या निर्मितीक्षमतेच्या नाड्या आपण आपल्या बंद करून टाकलेल्या आहेत. झाड म्हटलं म्हणजे बहर, पानगळ वगैरे आली, मात्र आपलं काही खरं नाही. आपल्या बुकात यापुढे इनकमिंग व आउटगोईंगची एन्ट्री नाही. कुठलीच मखलाशी नाही. कुठलीच काळीनिळीलाल शाई नाही. शेरा नाही. खाडाखोड नाही. उचल नाही. परतफेड नाही. घेणं नाही देणं नाही. एकदम सफचपाट. आपल्या आतल्या झाडाची आता सृजनाकडे वाटचाल नाही. मुळं पाण्याच्या शोधात मातीच्या खोल तळाशी जाणार नाहीत. आपल्या फांद्या शेजारच्या इमारतीच्या खिडकीशी कसली हितगुज करणार नाहीत. कोणी डहाळीवर येऊन बसलं तरी संवादासाठी आपली पानं फडफडणार नाहीत.
पडल्या पडल्या त्याला आवाज आला. खाली पॅसेजमध्ये मुलांची क्रिकेट मॅच जोरात चालू होती. समोरचा रस्ता स्पष्ट दिसत होता. वाहनांची तुरळक वर्दळ. दुरून खोलातून पाहिल्यावर समजून आलं की असंख्य प्रमाणात माणसं येताहेत. जमाव हळूहळू आता रस्त्याच्या मध्यभागी येत आहे. या शोभायात्रेचं नियोजन काय हे समजून येत नव्हतं. कारण कुठलीच घोषणा व तसे फलकही कुणाच्या हाती नव्हते. कुठल्या पक्षाचा तर तेही समजायला जागा नव्हती, कारण कुणाच्या वेषातही कुठलीच तारतम्यता नव्हती. बायाबापडेमाणसंआबालवृद्ध इ. माणसांचा मूक जत्था पाहताना मजा आली. म्हणजे हेही सगळे आपल्यासारखे एकदम पेरुगन मुरुगन. आपले भाईबंद. विश्वाच्या एका बिंदूवर एवढे पेरुमुरु. चला आपण पण सामील होऊ या असं वाटलं. सर्रकन अंगावर शर्ट चढवावा. खालच्या मॅचचा सूर मात्र टिपेला पोहचलेला. मोर्चाची शांतता भंग करणारा. कुणीतरी बोल्लं आऊट आउट आता माझी बॅटिंग. त्यांना मोर्चाशी काही घेणं देणं नव्हतं.
तितक्यात दारावरची बेल वाजतेय हे समजलं. दरवाजा उघडला गेला तर काय साक्षात बायको कामावरून परतलेली. चेहरा शिणलेला. इतका वेळ दरवाजा खोलायला? एक तर मेल्या या मोर्चानं ट्राफिक जॅम करून ठेवलय. ना काम ना धाम ना कसला उद्योग. आपल्या जातभायबद्दलचे तिचे उद्गार त्याला स्वाभाविक वाटले.
दरवाजात शिरता शिरताच तिने प्रश्न विचारलेला,
दळण आणलं का?
पेरुगन क्लीन बोल्ड.
.............................................................................................................................................
‘पेरुगन मुरुगन’ - वर्जेश ईश्वरलाल सोलंकी
लोकवाङ्मय गृह, मुंबई, पाने - ४४ , मूल्य – ६० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4289
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment