अजूनकाही
नुकताच २०१७ सालचा भारतीय पातळीवरील साहित्यिक क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी दिला जाणारा सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांना जाहीर झाला आहे. सन्मान चिन्ह, गौरव प्रमाणपत्र आणि ११ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रख्यात लेखक व समीक्षक नामवर सिंह यांनी या पुरस्काराची घोषणा करताना “हिंदी साहित्यात अनमोल योगदान देणाऱ्या, चाकोरी मोडीत काढणाऱ्या कादंबरीकार” असा कृष्णा सोबती यांचा सार्थ गौरव केला. ‘कृष्णा सोबती’ हे गेल्या चार-पाच दशकांपासून हिंदी साहित्यात अग्रस्थानी झळकत राहिलेले नाव आहे. समकालीन हिंदी साहित्यिकांमध्ये त्यांचे नाव अव्वल असून त्यांच्या ज्वलंत व स्वयंसिद्ध लेखणीने; हिंदी भाषा व साहित्य संस्कृतीत वैशिष्ट्यपूर्ण असे योगदान दिले आहे. त्यांच्या हिंदी साहित्याने उर्दू, राजस्थानी आणि पंजाबी या बोलींच्या मिश्रणातून आपली एक स्वतंत्र शैली आकारास आणली आहे. शैलीशास्त्रीयदृष्ट्या विशेष ठरलेले त्यांचे हे योगदान विस्मयकारक आहे.
त्यांच्या साहित्यकृतींनी आजवर प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार पटकावले आहेत. हिंदी अकादमी पुरस्कारांसह १९८० सालच्या केंद्रीय साहित्य अकादमीच्या पुरस्काराचाही मान त्यांच्या ‘जिंदगीनामा’ या कादंबरीने मिळविला होता. १९९६ सालची साहित्य अकादमीची फेलोशिप, पंजाबी विद्यापीठ व पटियाला अकादमीची फेलोशिप त्यांना प्रदान करण्यात आली होती. त्याचबरोबर साहित्य शिरोमणी, मैथिली शरण गुप्त, पद्मभूषण इ. पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. त्यांच्या ‘समय सरगम’ या कादंबरीची बिर्ला फौंडेशनच्या व्यास पुरस्कारासाठी निवड झाली होती.
कृष्णा सोबती या भारतीय स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळाच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक स्तरांवरून चाललेल्या प्रचंड घुसळणीच्या अवस्थांच्या स्पर्शातून घडलेल्या स्वयंसिद्ध लेखिका आहेत. जात्याच त्या ‘भाषा’ या एका वेळेला वैयक्तिक व सामाजिक घटितांच्या रसाकसाने युक्त तेजाचे नैपुण्य प्राप्त लेखिका आहेत. भारतासमोर गेल्या शतकापासून उभ्या असणाऱ्या परिवर्तनाच्या आव्हानांना प्रतिसाद देणाऱ्या त्या लेखिका आहेत. भारतीय पातळीवरून वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय जीवनमानाच्या स्पंदनाचा चिकित्सक लेखाजोखा अत्यंत अभिनव पद्धतीने आविष्कृत करणाऱ्या त्या लेखिका आहेत. लिंग, जात, धर्म, वर्ण, वर्ग, स्तर, प्रांत या घटकांमधील रचित भेदाभेदाच्या पलीकडे जाण्याच्या संवेदनांनी युक्त लेखणीचे सामर्थ्य जाणणाऱ्या त्या लेखिका आहेत.
त्यांनी लिहिले ते हिंदी भाषेमधून पण आविष्कृत केले आहे, ते सारे भारतीय जगणे. स्वतः भारतीय स्त्री जीवनाच्या मुशीतून गेल्यामुळे अर्थातच भारतीय स्त्रीच्या जाणिवा आणि नेणिवांच्या मितींना तर त्यांच्या लेखनात आगळा स्पर्श होतोच, पण त्या संदर्भातून अखंड सामाजिक अस्तित्व अधोरेखित होते. लेखकपणाचे सखोल व्यक्तिमत्त्व लाभलेल्या त्यांच्या लेखणीतून साकारणारी चित्रणे व्यक्तिगत पातळीची सामाजिकतेशी असणारी वीण उलगडून देतात, ती जगण्यातील प्रचंड उथलपुथल चित्रित करतात. त्या भालचंद्र नेमाडे यांच्याप्रमाणे प्रस्थापित वर्चस्ववादी समाज व्यवस्थेला धक्का देतात, वादग्रस्त ठरतात पण त्यातूनच हिंदी भाषा\संस्कृतीत बदल घडवणाऱ्या आणि मानवी नातेसंबंधांच्या कक्षा व्यापक करणाऱ्या ठरतात. कृष्णा सोबती यांनी प्रामुख्याने कादंबरी लेखन केले आहे, पण त्यांच्या लघुकथाही तेवढ्याच लक्षणीय असून त्यांनी कविता, स्मृतिलेख, प्रवास वर्णन व अनुवाद हे साहित्य प्रकारही सामर्थ्याने हाताळले आहेत. त्यामधून आजच्या जगात होत असलेला मूल्यऱ्हास अचूक टिपत जगण्याच्या आस्थेला हाकारले आहे.
कृष्णा सोबती यांचा जन्म फाळणीपूर्व पंजाब प्रांतात १८ फेब्रुवारी १९२५ मध्ये शेतकरी कुटुंबात झाला. शेतकऱ्याचा आपल्या भूमीशी असणारा संबंध लहानपणापासूनच त्यांच्यात भिनला. “जेहलम और चिनाव के बीच की धरती पर यही कद्दावर जन हाड, मांस और लहू के पेड बन जाते| वही उस आब भरी धरती पर हम भी खेला किया करते है |” (हम हशमत, आत्मकथन, पृ. २७१) ही त्यांची वाक्ये त्यांच्या परिसरातील माणसांचा आपल्या भूमीशी असणारा संबंध कशा प्रकारचा असतो ते स्पष्ट करते. कृष्णा सोबती यांनी मोठ्या प्रमाणात कृषीजन संस्कृती जी चित्रित केली आणि त्या संस्कृतीमधील खुलेपणाचे दर्शन जे घडवले, त्याचे मूळ त्यांच्यावर झालेल्या शेतीवाडीच्या संस्कारात दडलेले आहे.
त्यांचे जन्मगाव गुजरात हे आजच्या पाकिस्तानमध्ये आहे. फाळणी नंतर त्या आपल्या परिवारासह शिमला येथे आल्या. मूळच्या पंजाबी कृषी संस्कृतीतील खुलेपणा नेहमी त्यांच्या सोबत राहिला. संपूर्ण विश्वाशी जोडून घेताना त्यांना हा मोकळेपणाच सहाय्य करत असावा. त्यांचे बालपण पंजाबी शेतकरी कुटुंबातील कृषी संस्कृती आणि आधुनिकतेचा स्पर्श यांच्या समतोलाने युक्त होते. सुरुवातीला लाहोर आणि नंतर शिमला, दिल्ली याठिकाणी त्यांनी आपले पुढील शिक्षण घेतले. काही काळासाठी त्यांनी राजस्थानच्या युवराज तेजसिंगची खाजगी शिक्षिका म्हणून काम केले. दिल्ली विद्यापीठामध्ये काही काळासाठी हिंदीचे अध्यापन केले. पण नंतर त्यांनी पूर्णवेळ लेखनासाठी स्वतःला वाहून घेतले. १९५० पासून त्या लिहित आहेत ते आजतागायत त्यांच्या लेखणीचा टवटवीतपणा कमी झाला नाही. अगदी २०१७ मध्येही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. दिल्ली येथेच त्यांनी कायमचे वास्तव्य केले. जगभर भटकंतीही बरीच केली.
कृष्णा सोबती या संवेदनशील, निधड्या स्पष्टवक्त्या, समर्थ प्रतिभासंपन्न, प्रयोगशील लययुक्त शैलीप्रधान लेखिका आहेत. स्वतंत्र, स्वायत्त व्यक्तिमत्वाचा दाखला त्यांनी आपल्या साहित्यिक वाटचालीतून प्रस्तुत केला आहे. पंजाबी संस्कृतीच्या प्रभावाबरोबरच सूफी संत साहित्य, गांधीजींचे तत्त्वज्ञान, मार्क्स, विवेकानंद, रवींद्रनाथ यांचेही प्रभाव त्यांनी सजगतेने पचवलेले आहेत. एकूण त्यांचे अखंड जीवन साहित्याला समर्पित आहे. ‘हम हशमत’मध्ये त्यांनी स्वतःशी साधलेला संवाद वाचला की, या लेखिकेचे व्यक्तिविशेष लक्षात येतात. “..मैं एक एहसास | एक पोशाक | एक ही दरवाजा जिससे मेरी ही परछाई अंदर आती है, मेरी ही बाहर निकल जाती है | मुझसे ही सुबह शुरू होती ही| मुझसे ही शाम|” लेखकपणाचे एकाकीपण असे पुरेपूर प्रत्यक्षात अनुभवत ही लेखिका व्यक्तिरेखांच्या चित्रणांतून खुल्या संवादी भाषेचे, प्रचंड अर्थप्रवाही साहित्याचे विश्व निर्माण करते. व्यक्तिगत आणि सामाजिक वास्तवाचा वेध घेत त्यातून आपल्या कलाकृतींना साकार करते. जीवनभर लेखकाची सामाजिक बांधीलकी जागवणारी प्रस्तुत लेखिका “उसकी मंजिल इन्सान की जुर्रत और जीवन का लहू है जो निरंतर संघर्षो मे बहता है | वही सचमुच में उसका भगवान है |” (‘सोबती एक सोबत, पृ. ३९५) या दृष्टीतून लेखकपण विचारात घेते.
अत्यंत कौशल्याने बोलींचे उपयोजन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. पंजाबी, राजस्थानी आणि उर्दू वाक्प्रचारांची हिंदी भाषेत सरमिसळ करण्यातून हिंदी भाषेची वृद्धी तर त्या साधून देतातच पण त्याच बरोबर आपल्या कलाकृतीला; भाषाशैली घडविण्यातून निर्माण झालेले; अत्यंत नवे असे परिमाण प्राप्त करून देतात. त्यांच्या या भाषिक वैशिष्ट्यामुळे त्यांच्या अनुवादकांसमोर मोठी आवाहने उभी राहतात. पण उर्दू, इंग्रजी, स्वीडिश, रशियन भाषांमध्ये त्यांच्या काही साहित्यकृती अनुवादित झालेल्या आहेत. एका वेळेस भूनिष्ठ असणे आणि तरीही कुठल्याही संकुचित अस्तित्वाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणे, हे विशेष त्यांच्या लेखणीने उचलले आहेत.
कृष्णा सोबती यांच्या एकूण साहित्यिक कामगिरीसाठी ज्ञानपीठाच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. १९५० मध्ये ‘लामा’ या पहिल्या कथेपासून त्यांच्या लेखनाचा प्रारंभ होतो. अनुभव संपन्नता, अनुभवाची प्रत्ययात्मकता, सशक्त भाषिक अभिव्यक्ती, जीवनातील विविध पातळ्यांवर कराव्या लागणाऱ्या संघर्षांचे चित्रण, स्त्री-पुरुषांच्या अस्तित्वाचा खोलातून घेतलेला वेध, नव्या दिशांवर स्वार होत त्यावाटे प्रस्थापित मानसिकतेला मिळणारे आवाहन इ. वैशिष्ट्यांनी युक्त ‘डार से बिछुडी’, ‘सूरजमुखी अंधेरे के’, ‘यारों के यार’, ‘जिंदगीनामा’, ‘ऐ लडकी’, ‘मित्रो मरजानी’, ‘समय सरगम’ या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या आहेत. तसेच ‘नफिसा’, ‘सिक्का बदल गया’, ‘बादलोंके घेरे’, ‘दिलो दानिश’, ‘बदली बरस गयी’, ‘बचपन’ इ. कथाही खूपच लोकप्रिय झाल्या आहेत. ‘बुद्ध का कमंडल लद्दाक’, ‘गुजरात पाकिस्तान से गुजरात हिंदुस्तान’ या त्यांच्या अलीकडील कृतीही खूप चर्चिल्या गेल्या आहेत. ‘मित्रो मरजानी’ या कादंबरीने तर त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. या कादंबरीतून वैवाहिक स्त्रीच्या लैगिकतेचे अत्यंत धाडसी चित्र त्यांनी रेखाटलेले आहे. ‘दार से बिछुडी’मध्ये गाव पातळीवरील व्यवस्थेत अडकलेल्या परावलंबी पाशो या तरुणीची व्यथा त्या रेखाटतात. ‘सूरजमुखी अंधेरे के’मध्ये बाल्यावस्थेत बलात्कार वाट्यास आलेल्या स्त्री मानसिकतेचे चित्रण करतात. ‘जिंदगीनामा’मध्ये फाळणीपूर्व पंजाब चित्रित करतात. ‘दिलो दानिश’मधून दिल्लीचे सर्वांगीण दर्शन घडवतात, तर ‘समय सरगम’मधून रूढ स्त्री-पुरुष नातेसंबंध दूर सारणारी तसेच वयोमानाबाबतच्या सांकेतिकतेला दूर सारणारी चित्रे रेखाटतात.
.............................................................................................................................................
निद्रित निखारे - नासिरा शर्मा, अनुवाद - प्रमोद मुजुमदार
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4283
.............................................................................................................................................
भारतीय स्त्रीच्या स्वतंत्रतेचा ध्यास त्या बाळगताना दिसतात. भारतीय समाजाचे पुरुषप्रधान स्वरूप अचूक चिमटीत पकडून स्त्रीच्या स्वायत्त घडणीचे लक्ष्य राखतात. स्त्री शिक्षण व स्त्रियांची आर्थिक निर्भरता यावर भर देतात. धडधडीतपणे न्यायाच्या बाजूने उभे राहण्याचा स्थायीभाव असल्यामुळे कोणाचाही मुलाहिजा न बाळगता त्या स्पष्ट भूमिकेतून ‘मित्रो’, ‘फुलावंती’, ‘रती’, ‘बुढी अम्मू’ आदि व्यक्तिरेखांचे चित्रण करतात. स्त्रीमधील निसर्गदत्त खिलाडूवृत्ती पृष्ठभागावर आणतात. तिच्याठायी आढळणारा अल्लडपणा, सहृदयता, बोलघेवडेपणा प्रकर्षाने चित्रित करतात. दडपशाहीने केलेली तिची शोकांतिकाही चिमटीत घेतात, सबल स्त्री प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि तरीही ‘स्त्रीवादी-लेखिका’ म्हणून आपल्यावर शिक्का उमटविण्यास त्यांचा विरोध आहे. ‘स्त्रीवादी-लेखिका’ यापेक्षा ‘नवनिर्मितीक्षम लेखकपण’ या व्यापक स्तराला त्यांनी जी पसंती दर्शविली ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. लेखक या नात्याने स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही दृष्टिकोणाचे वाचन साध्य झालेच पाहिजे, हा त्यांचा आग्रह लिंगभेदाच्या पलीकडे जाण्याचे त्यांचे महत्त्वाचे सामर्थ्य प्रकट करतो. याच प्रकारे त्यांनी आपल्या कादंबऱ्या केवळ प्रादेशिक मर्यादेत जखडून पडता कामा नये हेही सतर्कतेने पाहिले आहे. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे त्यांच्या कलाकृतींना बहुआयामीपण प्राप्त झाले आहे. एकूण जगण्याच्या वर्तमान क्षणाला जे प्रस्थापित भेदात्मक वर्चस्ववादी सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, मानसिक संकेतांनी व संकल्पनांनी बाधित आहे, त्याला निखळ आवाज देणारे हे लेखकपण आहे. त्यामुळे आपली एक स्वायत्त शैली त्यांनी शोधली आहे. स्वच्छ मूल्यांनी युक्त समाजाचा संकल्प सोडणारे लेखकपण आजच्या अतिरेकी स्वकेंद्री दिवसांना मार्गदर्शक आहे.
ज्ञानपीठ पुरस्काराच्या मानकरी झाल्याबद्दल हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांचे अभिनंदन!
.............................................................................................................................................
लेखिका शोभा नाईक या समीक्षक आहेत.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment