षांताराम पवार यांची कविता : चैत्रिक संवेदनशीलतेचा भाषिक उमाळा (पूर्वार्ध)
ग्रंथनामा - झलक
सतीश तांबे
  • षांताराम पवार आणि त्यांच्या ‘कळावे’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Fri , 22 September 2017
  • ग्रंथनामा Granthanama झलक षांताराम पवार शांताराम पवार Shantaram Pawar कळावे Kalave सतीश तांबे Satish Tambe मौज प्रकाशन गृह Mouj Prakashan Gruh

चित्रकार षांताराम पवार यांचा ‘कळावे’ हा कवितासंग्रह नुकताच मौज प्रकाशन गृहाने प्रकाशित केला आहे. या कवितासंग्रहाला कथाकार सतीश तांबे यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा पूर्वार्ध.

.............................................................................................................................................

शांताराम पवार हे नाव मराठी कलाक्षेत्राशी संबंधित असलेल्या मंडळींना चांगलंच परिचयाचं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मराठीतील अनेक पुस्तकांच्या त्यांनी चितारलेल्या मुखपृष्ठांनी त्यांच्या खास ‘शांताराम टच’मुळे जाणकारांचं लक्ष वेधून घेतलं. साहजिकच त्यांची ओळख बव्हंशानं आहे ती चित्रकार म्हणून. मात्र शांताराम जसं कुंचल्यानं व्यक्त होतात, तसंच लेखणीनंही व्यक्त होऊ शकतात, हे सुमारे दहा वर्षांपूर्वी त्यांचा ‘कळावे लोभ असावा ही विनंती’ नावाचा एक कवितासंग्रह प्रकाशित होऊनही तुलनेत कमी मंडळींना ठाऊक आहे. त्यानंतरही त्यांच्या कविता अधनंमधनं इथंतिथं प्रकाशित होतच असतात, जसं की गेल्या अनेक वर्षांपासून ‘अक्षर’ दिवाळी अंकाची सजावट जशी ते करतात, तशीच त्यांची एक कविताही बहुतांश अक्षर दिवाळी अंकांत प्रसिद्ध होत असते. २००९ सालात तर त्यांच्या कवितांचं एक साप्ताहिक सदरच ‘आपलं महानगर’मध्ये चालू होतं. असो.

शांताराम पवारांच्या कवितेच्या खाली त्यांचं नाव लिहिलेलं असतं ते ‘षांताराम’ असं. शांताराम पवारांना जे ओळखतात त्यांना त्यांचा हा अपभ्रंशच योग्य वाटेल. याचं कारण असं की, शांताराम या शब्दात जो ‘शांत आणि आराम’ या शब्दांचा संधी आहे, त्यातील ‘शांत’ हा शब्द त्यांना त्यांच्या प्रकृतीशी मिळताजुळता वाटत नसावा. शांताराम पवारांच्या आचारविचारात एक रसरशीतपणा आहे. त्यामुळे ‘शांत’ या शब्दातून ध्वनित होणारा मिळमिळीतपणा त्यांना मान्य नसावा. शिवाय त्यांना सतत काहीतरी करावंसं वाटतं. त्यामुळे ‘आराम’देखील त्यांच्या प्रकृतीला साजेसा नव्हे. तेव्हा आपल्या नावावरून आपल्यावर काहीतरी भलतं बालंट येऊ नये म्हणून त्यांनी आपलं आपणच ‘षांताराम’ असं नामांतर केलं असावं.

या संग्रहाच्या मुखपृष्ठावरही त्यांनी ‘इति षांताराम’ असं लिहिलं आहे. षांताराम यांचं कवित्व  मुखपृष्ठापासूनच आपलं वेगळेपण दर्शवतं. एरवी सर्वसाधारणपणे ‘पांढऱ्यावर काळे’ हा शब्दप्रयोग रूढ आहे, परंतु षांतारामांनी आपल्या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठासाठी कुळकुळीत काळा रंग रोजला आहे आणि त्यावर ’कळावे‘ ही अक्षरं पांढऱ्याशुभ्र रंगात ठसठशीतपणे लिहिली आहेत. त्यात पुन्हा शीर्षक सर्वसाधारणपणे जसं आडवं लिहिलं जातं आणि त्याखाली लेखक/कवीचं नाव; तशी पारंपरिक मांडणी इथं करण्यात आलेली नाही. तर ‘क ळा वे’ ही तीन अक्षरं उभी लिहिण्यात आली आहेत. त्यातही ‘वे’ हे शेवटचं अक्षर ‘क’ आणि ‘ळा’ सारखे सरळसोट न लिहिता ते घड्याळ्याच्या काट्यांच्या भ्रमणाच्या उलट्या दिशेनं कलंडवण्यात आलं आहे. आता आपली नजर सर्वसाधारणपणे सरावलेली असते ती घड्याळ्याच्या काट्यांच्या भ्रमणाच्या दिशेला, ज्यामुळे ‘कळावे’ हे शीर्षक पाहताक्षणीच काहीतरी तिरपागडेपणाची चाहूल दृक्-संवेदनेतून लागते. पुन्हा कवीचं नाव ‘शांताराम/षांताराम पवार’ असं न लिहिता ‘षांताराम’ एवढंच लिहिलं आहे. त्याला पुन्हा ‘इति’ या संस्कृत शब्दाची जोड देऊन त्यांनी आपल्या म्हणण्याला जो भारदस्तपणा आणला आहे तो वेगळाच!

‘कळावे लोभ असावा ही विनंती’ या पहिल्या संग्रहानंतर षांतारामांनी या संग्रहाचं शीर्षक ठरवताना कोणतीही विनंतीच केलेली नाही. वाचणाऱ्याचा लोभ असेल/ नसेल, त्याची फारशी तमा न बाळगता त्यांना काहीतरी सांगायचं आहे आणि त्यांचं ते सांगणं ‘हट के’ असल्याची जाणीव ते करून देतात ‘कळावे’ या शीर्षकाच्या शेजारी ‘इति षांताराम’ हे शीर्षासनात मांडून! एरवी कवीचं नाव हे आडवं सरळसोट लिहिलेलं असतं. पण षांतारामांचा खाक्याच वेगळा आहे. हा कवी काहीतरी वेगळे ‘कळवू’ इच्छितो, हे मुखपृष्ठ पहाताक्षणीच मनावर कोरलं जातं.

कोणतंही पुस्तक -विशेषत: कवितांचं पुस्तक- हाती आलं की आपण तडक पहिल्या पानापासून वाचायला घेत नाही तर आधी ते सहजपणे पुढेपाठी चाळतो. त्या चाळण्यात ‘काही पानं/ ओळी’ आपल्या नजरेत भरतात. ‘कळावे’चं याबाबतीतलं वैशिष्ट्य असं की, या पहिल्याच फेरीत वाचकाची नजर दर पाच-सात पानानंतर आपसूकच थबकते ती मांडणीच्या दृष्टीने वेगळ्या असलेल्या कविता पाहून, ज्यामध्ये अक्षरलेखनाचे अत्यंत विचारपूर्वक प्रयोग केलेले आहेत. या कवितांमध्ये जी मांडणी आहे त्यात एक ‘उभट आयताकृती चौकट’ योजलेली आहे, जी ‘कळावे’ या मुखपृष्ठावरील अक्षरलेखनातूनही जाणवते. एरवीच्या अक्षरांपेक्षा बऱ्याच मोठ्या आकाराची ठसठशीत अक्षरे आणि साधलेला लक्षवेधक आकृतिबंध यामुळे वाचक या कविता वाचायला आपोआपच सुरुवात करतो.

या सर्व कविता एकपानी आहेत, मात्र त्यामध्ये असे काही खटके आहेत की, वाचणाऱ्याने थक्कच व्हावं. वानगीदाखल एकाच कवितेतील शब्दयोजना वाचा. ती अशी आहे :

‘ये रे ये रे माणसा

तुला देतो पैसा,

माणूस आला खोटा

पैसा झाला मोठा’

साहजिकच चाळताचाळता वाचल्या गेलेल्या या मेन कोर्सआधीच्या स्टार्टर कविता वाचून वाचकाला षांतारामांच्या ‘चैत्रिक’ संवेदनशीलतेची आपोआपच तोंडओळख होते. 

कवितेचा क्रमांक न देता पानपूरकासारख्रा वा सजावट स्वरूपात योजलेल्या या कवितांमुळे षांताराम यांचा ‘कळावे’ हा संग्रह मराठीतील एक प्रायोगिक संग्रह ठरतो, हे निश्चित. किंबहुना या कवितांना षांतारामांनी ज्याअर्थी क्रमांक दिलेले नाहीत त्याअर्थी एक तर ते या कवितांना कवितांमध्ये गिनत नसावेत, तर त्या त्यांना अर्धनारीनटेश्वराप्रमाणे ‘अर्धचित्री कविता’ वाटत असाव्यात. पण या ‘चीजा’ हे षांतारामांचं मराठी कवितेला मोलाचं योगदान ठरणार आहे, कारण अक्षरलेखनातून कवितेचं अवकाश विस्तारण्याचे वा सुस्पष्ट करण्याचे प्रयत्न मराठीत आजवर क्वचित कधी झालेले असले तरी ते तुरळकच होते. एवढ्या ठसठशीतपणे व ठळकपणे हे प्रथमच घडत आहे.

अर्थात या कवितांना क्रमांक न देण्यामागे अशीही एक शक्यता संभवते, ती अशी की या कवितांच्या आयोजनातून ‘षांताराम’ आपली स्वत:ची चित्रकार ही मूळ जातकुळी आपल्याला जास्त महत्त्वाची असल्याचं अधोरेखित करत असावेत. तसं असेल तर ठीकच आहे. याचं कारण असं की कवितेतील अक्षरलेखनाचा हा प्रयोग केवळ चित्रकारच करू जाणोत! ‘कळावे’ या संग्रहातून षांतारामांच्या अक्षरकविता एवढ्या संख्येनं आणि विविधतेनं वाचकांच्या व पर्यायानं कवींच्याही सामोऱ्या आल्या आहेत की, कवितेच्या ‘रूप’ जाणिवेवर त्यांचे संस्कार होणं अपरिहार्यच आहे. या कविता हा षांतारामांचा सवतासुभा असल्यानं काही जाणकारांना तर षांतारामांच्या कवितांच्या पिकातील ही नैसर्गिक उगवणच अधिक लक्षवेधी वाटण्याची शक्यता आहे. आणि यापैकी बहुतांश कविता या त्यातून व्यक्त होणारे जाणवून घेण्याच्या दृष्टीनं एवढ्या संपन्न आहेत की, ‘कळावे’ हाती आल्यानंतर हे होणं अपरिहार्यच आहे. उभा आयताकार सोडला तर यातील प्रत्येक कविता ही मांडणीच्या दृष्टीनं स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची आहे आणि भाषा व चित्र या दोन्हींची सांगड घालत षांतारामांची जीवनाकडे पाहण्याची कलाजाणीव कशी घडली असावी ते या कवितांमधून नीटपणे जाणवते.

या सर्वच कविता कमी शब्दांच्या आहेत, मात्र त्यांची अशी वेगळी मांडणी करताना केवळ त्यांचा आटोपशीरपणा हाच निकष नाही हे ‘कळावे’मध्ये सुमारे तेवढ्याच कमी आटोपशीर आकारांच्या, संख्येनं साधारणपणे तेवढ्याच असलेल्या कविता वाचून कळतं. या कवितांचं वेगळेपण असं आहे की, त्या ‘कळावे’तील अन्य कवितांसारख्या कुणा विशिष्टाला संबोधणाऱ्या नाहीत तर ‘to whom so ever it may concern’ प्रकारचे जीवनानुभव मांडणाऱ्या आहेत. या कवितांमध्ये जे शब्दांतून व्यक्त होतं त्याला षांताराम मांडणीतून अधिक ठाशीव स्वरूपात सामोरं ठेवतात. जसं की, तुमच्याआमच्या बहुतेकांच्या वागण्याबोलण्यात असलेला आणि तरीही इतरांच्या बाबतीत मात्र तुम्हाआम्हाला खटकणारा असा जो ‘मी’पणा आहे त्यासंबंधी असलेली ही कविता वानगीदाखल पहा :

‘स्वत:भोवती फिरतो मी

भोवरा मी

गहिरा मी

गिरवतो मला मी

गढून जातो माझ्यात मी’

ही शब्दयोजना मांडताना त्यांनी ‘मी’ या शब्दाचा आकार तुलनेत बराच मोठा योजून आणि प्रत्येक ओळीतील अन्य शब्दांचा ‘मी’ शब्दाभोवती वेढा घालून या कवितेला जे रंगरूप बहाल केलं आहे, ते ‘मी’पणाच्या वर्मावर अधिक नेमकं बोट ठेवतं. तसंच कवितेला अधिक अर्थघनता बहाल करतं. वाचकाला अंतर्मुख बनवतं.

असंच आणखी एक उदाहरण द्यावंसं वाटतं ते या कवितेचं :

‘मी तुला    

आंथरले

तू मला

पांघरले

अंगांग

बिथरले

एकमेका

नांगरले

अवघे सारे मंतरले’

वास्तविक पाहता ही शब्दकळा संभोगाच्या क्रियेचं मिताक्षरी वर्णन आहे, एवढंच. शब्दकळेचा विचार करता यातील कवितापण तसं जेमतेमच आहे, पण षांताराम या शब्दांना मांडणीची जी जोड देतात त्यामुळे ही कविता केवळ संभोगाच्या क्रियेचं वर्णन करण्याएवढी सीमित राहात नाही, तर ‘संभोगत्व’ टिपण्यापर्यंत उंच भरारी घेते. षांताराम यात करतात काय तर ‘आंथरले, पांघरले, बिथरले, नांगरले’ हे कृतिदर्शक शब्द आकारानं मोठे करून कर्त्यांपेक्षा क्रियेचं असलेलं ठळकपण मुळात अधोरेखित करतात आणि जोडीला या चार क्रियावाचक शब्दांवरची शीर्षकरेषाही ते उडवून टाकतात. त्यामुळे ते ‘वस्त्र’ हा शब्द कुठेही न आणताच या क्रियेतील कर्त्यांचं विवस्त्रपण सूचित करतात. आणि मग जाणवतं की ‘एरवी कपड्यांनी झाकलेले देह विवस्त्र होतात’ हाच संभोगातील महत्त्वाचा भाग असल्याचं कवी आपल्याला दर्शवून देतो आहे. ज्याचं आपल्याला ती क्रिया परिचयाची असूनही भान असतंच असं नाही! या चार शब्दांचा फाँटसाइज जर अन्य शब्दांएवढाच असता आणि या चारही शब्दांवर जर शीर्षकरेषा असत्या तर ही कविता कदाचित कविता म्हणून गणलीही गेली नसती. याउलट ‘अवघे सारे मंतरले’ या शेवटच्या ओळीत षांताराम या तीनही शब्दांवर -एरवी शब्दागणिक असते तशी वेगळी रेषा न देता- एकच अखंड रेषा देऊन संभोगानंतर येणारी म्लानता सूचित करतात. शिवार ‘मंतरले’ हे क्रियापद ते आधीच्या चार क्रियापदांसारखं मोठं करून मांडत नाहीत. संभोगानंतरच्या थकव्यामुळे म्हणा किंवा तृप्तीमुळे म्हणा, पण हे क्रियापदही आता शांत झालं आहे जणू काही!

षांतारामांच्या या सर्वच ‘अर्धचित्री कवितांच्या’ खजिन्यात त्यांच्या चित्रजाणिवेतून शब्दांना अर्थाची जोड आणि आशयाला वेगळी परिमाणं बहाल करणारं खूप काही दडलेलं आहे. कवितेची मांडणी करताना शब्दांची आकारमानं, वळणं, स्थानं यांचा सर्वांगीण विचार करून त्यांनी आपला अवकाश खूपच समृद्ध केला आहे. या कविता वाचल्यानंतर कळतं की, षांतारामांचं चित्रनिगडित भान हे सर्वसाधारणपणे ज्याला दृक्-संवेदना असं म्हटलं जातं त्यापेक्षा काहीसं वेगळं आहे. तो वेगळेपणा लक्षात घेऊनच त्यांच्या संवेदनेसाठी मी ‘चैत्रिक’ हा शब्द योजला आहे. ही संवेदनशीलता कवितेच्या प्रांतात तशी विरळा आहे.

‘कळावे’मध्ये काही कविता या निखळपणे चैत्रिक संवेदनशीलतेच्या म्हणाव्या अशा आहेत. जसं की ‘हरण’, ‘देहावसान,’ ‘दिवस’ वगैरे कविता. ‘कळावे’तील अनेक कवितांमध्ये आरशांचा उल्लेख येतो तेदेखील चैत्रिक संवेदनशीलतेचीच प्रचिती देणारं आहे.

यासंदर्भात लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट ही आहे की, शांताराम हे मूलत: जरी चित्रकार असले तरी सुरुवातीला ते पेशाने कला-अध्यापक होते, तसेच उमेदीची काही वर्षं त्यांनी जाहिरातक्षेत्रातही आपल्या अंगची कला पणाला लावली होती. अध्यापन आणि विशेषत : जाहिरात क्षेत्रामध्ये केवळ स्वान्त:सुखाय कलानिर्मिती करता येत नसते, तर तिथं लोकांना मनवणं हे महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी लोकांशी संवाद साधणं ही मूलभूत गरजच ठरते. षांतारामांच्या कवितेत हा लोकांशी चाललेला संवाद सतत जाणवतो. षांतारामांची कविता ही सतत कुणाला तरी संबोधून असते.

षांतारामांची कविता ही मूलत: एक उत्स्फूर्त उदगार आहे, ज्यात ‘ऐशी कळवळ्याची जाती’ म्हणतात, त्याच धर्तीवर ‘ऐशा उमाळ्याच्या पंक्ती’ आपल्याला कवितेगणिक सापडतात. ते कधी एखाद्या स्त्रीला उद्देशून काही बोलतात, कधी परमेश्वराला, सूर्यदेवांना, कधी आम जनतेला तर एखाद्या कवितेत चक्क सचिन तेंडुलकरला किंवा लीना या आपल्या दिवंगत पत्नीलाही! ते जवळपास प्रत्येकच कवितेत आपल्या ‘कळावे’ ब्रीदाला जागलेले आहेत. या संग्रहात संख्येच्या दृष्टीनं सुमारे एक-तृतीयांश असणाऱ्या प्रेमकवितांमध्ये तर हे विशेषत्वानं जाणवतं. त्यातील काही कवितांमध्ये चक्क ‘गोरीसखी!’ असं थेट संबोधनच अवतरतं.

षांताराम हे आपल्या चैत्रिक संवेदनशीलतेतून आपल्या आसपासची जगरहाटी न्याहाळतात आणि त्यातील काही व्यवहार पाहून उमाळ्यानं त्यांच्या तोंडून जे भाषिक उदगार बाहेर पडतात त्यातून त्यांची कविता आकार घेते. यामुळेच त्यांच्या बऱ्याचशा कविता या आकारानं आटोपशीर असतात. क्वचित एखादी कविता भले तीन-चार पानांची असली तर शंकर महादेवनच्या सुप्रसिद्ध ब्रेथलेस गाण्यासारखे ते एकापुढे एक अथकपणे विराम न घेता ओळी लिहीत जातात. आणि एका दमात गाणं हा शंकरसाठी एक प्रयोग असतो, षांतारामांची मात्र ती प्रवृत्ती आहे. त्यामुळेच ‘कळावे’तील कवितांमध्ये आपल्याला जाणवतं की ‘ऋतुसंहार’सारखी एखाददुसरी पारंपरिक वृत्तस्वरूपात लिहिलेली कविता सोडली तर त्यात ओळींचे गट/परिच्छेद सहसा नसतात.

याचा एक परिणाम असाही होतो की, कवितांमधील प्रतिमांच्या पखरणीमुळे कवितेचा आणि चित्राचा काहीतरी संबंध असतो असा ग्रह करून घेतलेले रूपवादी कवी जसे कवितेतील ‘वरलिया रंगा’मध्ये चित्राचं भान बाळगून ज्याप्रमाणे लय, ओळींची मांडणी यामध्ये काहीतरी सौंदर्यनिर्मितीचा प्रयत्न करणारा आकृतिबंध साधताना दिसतात, तसा प्रकार षांतारामांची चैत्रिक संवेदनशीलता करताना दिसत नाही. तसंच षांतारामांच्या कवितेत वेगळ्याच प्रतिमा जरी येत असल्या तरी प्रतिमांचा वापर यथातथाच दिसतो आणि त्यात दिपवण्यापेक्षा व्यक्त होण्याचा हेतू जाणवतो. ते मूलत: चित्रकार असल्यानं त्यांच्याकडे दृश्यचमत्कृतीची उपजत प्रवृत्ती असली तरी तिचा हव्यास क्वचितच कधी दिसतो. पण मुक्तछंदातील कवितांमध्ये ओळींची ठेवण ही जशी हेतुपुरस्सर दिसते, तसं ‘कळावे’मधील कवितांच्या बाबतीत जाणवत नाही. त्यांच्या उजव्या पानावरच्या ओळी उजव्या बाजूला तर डाव्या पानावरच्या ओळी डाव्या बाजूला अलाइन केलेल्या दिसतात. त्यामुळे एकाच कवितेत काही भाग हा ‘ओळी समान पातळीवर सुरू होणारा’ तर काही भाग हा ‘ओळी असमान पातळीवर संपणारा’ दिसतो. असा प्रकार आणखीही काही कवींच्या कवितांमध्ये क्वचित दिसून येत असला तरी षांताराम यांच्यासारख्रा मूलत: चित्रकार असलेल्या कवीनं असं करणं हे कविता आणि चित्र यांचं नातं असतं असं मानणाऱ्या भूमिकेला खचितच फेरविचारात घ्यावं असं घटित ठरतं.

कळावे​ - षांताराम पवार

मौज प्रकाशन गृह, मुंबई

पाने - १४०, मूल्य - २०० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4051

.............................................................................................................................................

लेखक सतीश तांबे मराठीतील प्रसिद्ध कथाकार आहेत.

satishstambe@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......