देवनागरी आणि अन्य भारतीय भाषांच्या लिप्या संगणकावर आणणाऱ्या ल. श्री. वाकणकरांची यशोगाथा
ग्रंथनामा - झलक
दीपक घारे
  • ‘लिपिकार बापू वाकणकर : व्यक्ती आणि कार्य’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 08 September 2017
  • ग्रंथनामा Granthnama झलक लिपिकार बापू वाकणकर : व्यक्ती आणि कार्य Lipikar Bapu vakankar : Vyakti ani karya मुकुंद वासुदेव गोखले Mukund Vasudev Gokhale सुमंगल प्रेस Sumangal Press दीपक घारे Deepak Ghare

देवनागरी आणि अन्य भारतीय भाषांच्या लिप्या संगणकावर आणणाऱ्या ल. श्री. वाकणकर यांच्या संशोधन कार्याची सविस्तर ओळख करून देणारे ‘लिपिकार बापू वाकणकर : व्यक्ती आणि कार्य’ हे चरित्र मुकुंद वासुदेव गोखले यांनी लिहिले आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या या महत्त्वपूर्ण पुस्तकाला कलासमीक्षक प्रा. दीपक घारे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यातून वाकणकर यांच्या संशोधनकार्याचा आवाका, त्यांची साधना आणि श्रेष्ठत्व यांची प्रचिती येते.

.............................................................................................................................................

भाषावृद्धीचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या लिपिशास्त्राकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघणारे आणि देवनागरी लिपि संगणकावर आणण्यात महत्त्वाचे योगदान असेलले लिपिकार ल. श्री. वाकणकर म्हणजे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. इतिहासाचे अभ्यासक, कलावंत, शास्त्रज्ञ आणि उद्योजक या त्यांच्यातल्या विविध गुणांना राष्ट्रभक्तीची जोड होती. वाकणकरांचे वैशिष्ट्य असे की, या विविध भूमिकांमध्ये वावरताना या भूमिकांची त्यांनी कधी गल्लत केली नाही. सत्यशोधनाच्या कामात त्यांनी राजकीय अथवा अन्य पूर्वग्रह येऊ दिले नाहीत. त्यांचे व्यक्तिमत्त्व इतके साधे होते की, त्यांच्या कामाचा आवाका प्रथमदर्शनी कुणाच्याच लक्षात येत नसे. आजही फार थोड्यांना वाकणकरांचे व्यक्तित्व आणि त्यांचे कार्य ज्ञात आहे.

मुकुंद वासुदेव गोखले यांच्या या चरित्रात्मक लिखाणामुळे वाकणकरांचे कार्य प्रथमच इतक्या तपशीलवारपणे वाचकांसमोर येत आहे. आजच्या सांस्कृतिक पर्यावरणात त्याला एक वेगळे महत्त्व आहे. आपल्या सांस्कृतिक वारशाकडे कशा दृष्टीने पाहावे, परंपरा आणि विज्ञान-तंत्रज्ञान, नवनिर्मिती आणि उद्योजकता यांचा मेळ कसा घालावा याचा वस्तुपाठ या चरित्रातून मिळतो. वाकणकरांचा माझा परिचय झाला तो मुकंद गोखले यांच्यामुळे. जे.जे.मध्ये उपयोजित कलेचे शिक्षण घेताना मी त्यांना प्रथम पाहिले ते एक व्याख्याता म्हणून. मुद्रणसंस्थेतही ते अनेकदा येत असत. त्यांचा लिपिशास्त्राचा अभ्यास, संगणकावर देवनागरी लिपि आरोहित करण्यासाठी टीआयएफआरमध्ये त्या काळात चाललेले त्यांचे प्रयोग, सिरॅमिक्ससाठी लागणाऱ्या ट्रान्सफर्सबद्दल त्यांचे संशोधन याचे संदर्भ त्यांच्या बोलण्यातून येत. त्यातून त्यांच्या शोधवृत्तीचा पसारा लक्षात येत गेला. गोखले यांच्याकडून वाकणकरांच्या मुद्रणक्षेत्रातील कार्याचे सारे तपशील कळत गेले. ‘गणेशविद्या’ पुस्तकाच्या निमित्ताने वाकणकरांशी काही प्रत्यक्ष भेटी झाल्या आणि उतारवयातही त्यांचा या विषयाबद्दल असलेला उत्साह आणि तळमळ पाहून खऱ्या ज्ञानसाधकाचे दर्शन घडले.

वाकणकरांच्या या व्यासंगपूर्ण उद्योजक व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी होत गेली ते या चरित्रात पाहायला  मिळते. वाकणकरांना त्यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीय ‘बापू’ या नावाने ओळखत. या चरित्रात या नावानेच त्यांचा उल्लेख केलेला आहे. बापूंचे मूळ घराणे प्रतिष्ठित, त्यांचे आजोबा ग्वाल्हेर येथे न्यायाधीश होते, तर वडील श्रीधरपंत सिव्हिल इंजिनीअर होते. श्रीधरपंत स्वत: उत्तम कलाकार होते आणि त्यांना अनेक विषयांत रस होता. बापूंवर बालवयातच संस्कार झाले ते शास्त्रोक्त पद्धतीने वेदपठण करण्याचे. इंदोरला बापूंच्या घरासमोर सुप्रसिद्ध चित्रकार देवळालीकर राहात असत. चित्रकार ना.सी. बेंद्रे आणि बापू दोघेही देवळालीकरांकडे चित्रकला शिकायला जात. प्रा. सोलेगावकर हेसुद्धा बापूंच्या बरोबरीचेच. बापू बनारस विश्वविद्यालयात शिकत असताना पंडित मदनमोहन मालवीय यांचे ते आवडते विद्यार्थी झाले. बापूंवरचा राजकीय विचारांचा प्रभाव पाहिला तर त्यात क्रांतिकारक, काँग्रेस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि महात्मा गांधी, हेडगेवार असे विरोधी विचारप्रवाहांचे नेते यांचा समावेश दिसतो.

आचार्य काकासाहेब कालेलकरांमुळे बापू भाषा आणि लिपिच्या अभ्यासाकडे वळले. ग. त्र्यं. माडखोलकर यांनी बापूंना राजकारण बंद करण्याचा आणि बुद्धीचा उपयोग शोधकार्यासाठी करण्याचा सल्ला दिला आणि बापूंनी तो अखेरपर्यंत पाळला. यापूर्वी धारला असताना अंतुकाकांमुळे बापूंना इतिहासाची, संशोधनाची गोडी लागली होती. चित्रकलेची आवड, संशोधनाची वृत्ती आणि विज्ञान, रसायनशास्त्र या विषयांमध्ये असलेली गती या सर्वांचा एकत्रित परिणाम बापूंनी पुढे केलेल्या संशोधनकार्यावर झाला. विज्ञानाची शिस्त आणि कलावंताची सौंदर्यदृष्टी यांचा मिलाफ बापूंच्या विचारात असल्यामुळे ते मुद्रणक्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञानात महत्त्वाचे कार्य करू शकले. प्रतिभाशक्तीचा वावर सर्वच क्षेत्रात असतो. फक्त या प्रतिभेचे रूप प्रत्येक क्षेत्रात वेगळे असते. कलेच्या क्षेत्रात कलावंताच्या प्रतिभेचा बोलबाला अधिक होतो; पण संधोनकार्यात, उद्योगक्षेत्रात काहीतरी नवे घडते तेव्हा प्रतिभेची मदत लागतेच. बापूंना ‘सा एषा गणेशविद्या’ या गणपति-अथर्वशीर्षामधल्या ओळींमध्ये लिपिशास्त्राचा अर्थ उमगला, तो साक्षात्काराचा क्षण म्हणजे प्रतिभेचाच आविष्कार होता. रसायनशास्त्रातील मेंडलीफचे रासायनिक मूलद्रव्यांचे कोष्टक (पिरिऑडिक टेबल), पाणिनीची अष्टाध्यायी आणि आस्की (ASCII-American Standard Code For Information Interchange) कोडची मर्यादा यांना ध्वनि-अणूंच्या एकसूत्रात वाकणकरांनी बांधले तो दूरगामी परिणाम करणारा नवनिर्मितीचाच क्षण होता.

संशोधन आणि उद्योजकता या वाकणकरांच्या कार्यामागच्या प्रमुख प्रेरणा होत्या. ‘आशा’ सौंदर्य प्रसाधनांपासून त्यांनी सुरुवात केली, नंतर ‘क्रोमोप्रिंटस’चा पसारा उभारला, त्यानंतर आयटीआर संस्थेच्या माध्यमातून फोटोटाइपसेटिंग, डीटीपी आणि अक्षरसंच तयार करण्याचे, आंतरराष्ट्रीय स्तरावर ही सेवा पुरवण्याचे काम पूर्णत्वास नेले. या प्रवासात उद्योजकतेपेक्षा वाकणकर संशोधनात अधिक गुंतत गेले. पण या संशोधनातही त्यांच्यातला उद्योजक सजग होता. आयटीआरमध्ये केलेल्या संशोधनाचे रूपांतर व्यावसायिक सेवेत करताना लोकांना उपयुक्त ठरेल, व्यावसायिक दृष्ट्यादेखील ते यशस्वी होईल याचे भान त्यांनी कायम ठेवले. भारतीय भाषांच्या लिप्या आणि मुद्राक्षरे याबाबतीत संगणकावर विविध मुद्राक्षरे आणि त्या टंकलिखित करण्याच्या प्रणाली याबाबत संशोधनाच्या पातळीवर काही प्रयोग होत होते. पण संशोधन आणि त्याचे उत्पादन  आणि वितरण यांची योग्य सांगड घातली ती आयटीआर संस्थेनेच.

वाकणकरांनी ‘क्रोमोप्रिंटस’मध्ये असताना ट्रान्सफर्सच्या मुद्रणप्रणालीत संशोधन करून स्वत:ची पद्धत विकसित केली. या व ते करीत असलेल्या स्क्रीन प्रिंटिंगच्या कामात कल्पकता तर होतीच, पण या काळातले त्यांचे संशोधन उपलब्ध तंत्रज्ञानाला पर्याय उपलब्ध करून देणारे होते. आयटीआरमधील मुद्राक्षर व्यवसायातले त्यांचे संशोधन मात्र पूर्णपणे नव्या स्वरूपाचे होते. भारतीय भाषांमध्ये अक्षरजुळणी ही जगातल्या सर्वच उत्पादकांपुढे एक समस्या होती. वाकणकरांनी त्याचे निराकरण केले म्हणून त्यांच्या या संशोधनाला सर्वाधिक महत्त्व आहे.

वाकणकरांनी इंग्रजी, मराठी, हिंदीतून भरपूर लेखन केले. त्यात परिचयपर लेख, शोधनिबंध, पुस्तके असा साऱ्यांचाच समावेश आहे. आयटीआरमध्ये एकीकडे विविध लिप्यांमधली अक्षरवळणे तयार करत असतानाच वाकणकर प्रसाराचा भाग म्हणून सातत्याने लिहीत होते. ‘अक्षर रचना’ या गृहपत्रिकेचे संपादन आणि त्यातले बहुतांश लेखन वाकणकरांनी केलेले आहे. अक्षरमुद्रा, भाषा, लिपि या विषयांशी संबंधित अनेक अभ्यासपूर्ण लेख ‘अक्षर रचना’मध्ये दर महिन्याला प्रकाशित होत असत. भारतात जवळपास २०,००० मुद्रक, प्रकाशक, जाहिरात संस्था, वृत्तपत्रे अशांना हे अंक पाठवले जात. त्यात स्वत:च्या उत्पादनांच्या प्रचारापेक्षा लोकशिक्षणाचा भाग अधिक होता. असाच वाकणकरांच्या प्रेरणेने साकारलेला आणखी एक उपक्रम म्हणजे ‘कॅल्टिस’ या जागतिक स्तरावरील तीन वर्षे सलगपणे आयोजित केलेले सेमिनार्स. १९८३ (पुणे), १९८४ (दिल्ली), १९८५ (कोलकाता) या तीन सेमिनारमध्ये सादर झालेले शोधनिबंध ग्रंथरूपाने प्रकाशित करण्यात आले. भाषा व तंत्रज्ञान विषयावरील तज्ज्ञ लोकांनी ते सादर केले होते. वाकणकरांनी सातत्याने संशोधनास प्राधान्य दिले. युरोपच्या दौऱ्यात लिपिविषयक अनेक संसाधने त्यांनी गोळी केली तसेच श्रीलंकेतील अभ्यासदौऱ्यात महत्त्वाचे पुरावेही गोळा केले.

वाकणकरांनी लिहिलेले ‘गणेशविद्या’ हे पुस्तक सर्वाधिक महत्त्वाचे आहे. १९६६मध्ये टाटा प्रेसने ते इंग्रजीत छापले व मराठीत ते १९९८मध्ये मानसन्मान प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले. अशोकपूर्व ब्राह्मी लिपि आणि माहेश्वरी सूत्रांवर आधारित लिपिपासून भारतीय लिप्यांचा झालेला विकास, ध्वन्यात्मक लेखनाचा त्याला असलेला आधार, जागतिक लिपिशास्त्राचे या विकासाला असलेले संदर्भ सूत्रबद्ध पद्धतीने आणि वाचकांना सहजपणे समजेल अशा चित्रमय (ग्राफिक) पद्धतीने वाकणकरांनी यात मांडले आहेत. या पुस्तकांना पूरक असलेला दुसरा ग्रंथ म्हणजे ‘टायपोग्राफी ऑफ देवनागरी’. हा त्रिखंडात्मक ग्रंथ बापूराव नाईक यांनी लिहिला असला तरी इतर अनेकांप्रमाणे वाकणकरांचा त्यात सहभाग आहे. ‘वाकणकरांचा सक्रीय सहभाग आणि पाठपुरावा नसता तर हे काम मी पूर्ण करू शकलो नसतो’ असे बापूराव नाईकांना ऋणनिर्देश करताना स्पष्टपणे नमूद केलेले आहे. ‘गणेशविद्या’ वाचल्यानंतर एखाद्या जिज्ञासू वाचक अभ्यासकाला अधिक सखोल माहिती हवी असेल तर हा ग्रंथ वाचायलाच हवा. यासोबत ‘कॅल्टिस’चे तीन अंक पाहायला हवेत. वाकणकरांनी भारतीय लिपिशास्त्राच्या इतिहासाचे, लिपिमागच्या सूत्रांचे आणि रचनेचे विविध पैलू या अंकांमधल्या लेखांमधून उलगडलेले आहेत. मग ते अ.ब. वालावलकरांचे ब्राह्मी लिपिचे संशोधन असो, पाश्चात्य अभ्यासकांच्या पूर्वग्रहदूषित आणि अज्ञानमूलक सिद्धान्तांचे पुराव्यांनिशी खंडन असो की, युरोपियन भाषांचे भारतीय भाषांमध्ये लिप्यंतर असो. ‘कॅल्टिस’मध्ये वाकणकरांचे बंधू आणि बीमबेटका गुहाचित्रांना प्रकाशात आणणारे डॉ. व्ही.एस. वाकणकर यांचेही, शिलालेख आणि देवनागरी सुलेखन व मुद्राक्षरांमध्ये शैलीच्या दृष्टीने साधर्म्य दाखवणारे लेख आहेत. अक्षरकला आणि मुद्रणक्षेत्रातील तसेच भाषाविज्ञानाच्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी या अंकांमध्ये लेख लिहिलेले आहेत ते वेगळेच. खरे तर वाकणकरांचे हे लेखन संकलित रूपात ग्रंथरूपात प्रकाशित होणे आवश्यक आहे. कारण ‘अक्षर रचना’ आणि ‘कॅल्टिस’चे अंक मुळातच मुद्रणक्षेत्रातील वाचकांपर्यंत मर्यादित होते. आता ते अंक कुठल्याही ग्रंथालयात मिळणे कठीण असल्यामुळे ते विस्मृतीत जाण्याचीच शक्यता अधिक आहे.

ल.श्री. वाकणकरांच्या संशोधनाची दखल ज्या प्रमाणात घ्यायला हवी होती, त्या प्रमाणात घेतली गेली नाही. देवनागरी आणि अन्य भारतीय भाषांच्या लिप्या संगणकावर ज्यांच्या संशोधनामुळे येऊ शकल्या, त्या वाकणकरांचे नावही सर्वसामान्यांना आज माहीत नाही. भारतीय लिप्यांबद्दलचे पाश्चात्य आणि भारतीय अभ्यासकांचे पूर्वग्रह इतके पक्के आहेत की, इंडो युरोपियन भाषाकुळातल्या संकल्पनेची वैय्यर्थता सिद्ध होऊनही ते आजही त्याचाच आधार घेतात. अ.ब. वालावलकर, ल.श्री. वाकणकर यांचे ब्राह्मी लिपीबद्दलचे संशोधन आजही त्या अर्थाने मान्यता पावलेले नाही. नाही म्हणायला इरावथम महादेवन यांचे तमिळसारख्या द्राविडी भाषा आणि उत्तरेकडच्या भाषांमधली लिपिलेखनाची देवाणघेवाण, सिंधू लिपिशी (Indus Script) असलेले साधर्म्य याबद्दलच्या संशोधनाची दखल आता घेतली गेलेली आहे.

वाकणकर हे खऱ्या अर्थाने सत्य शोधू पाहणारे अभ्यासक होते आणि या कामात पाश्चात्यांच्या मतांचे दडपण त्यांनी येऊ दिले नाही. म्हणूनच त्यांचे लेखन महत्त्वाचे ठरते. वाकणकरांच्या विचारात कला, संस्कृती, तंत्रज्ञान, इतिहास आणि वर्तमान यांची समग्रता होती. याला जोड होती ती ज्ञानसाधकाच्या विनम्रतेची. त्यामुळे वाकणकरांचे हे चरित्र सर्वांनाच प्रेरक ठरेल असा विश्वास वाटतो.

लिपिकार बापू वाकणकर : व्यक्ती आणि कार्य - लेखन-संपादन मुकुंद वासुदेव गोखले

सुमंगल प्रेस, मुंबई,

पाने – २००, मूल्य – ३०० रुपये.

 या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3995

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......