या पुस्तकाला आज जे महत्त्व मिळेल, त्यापेक्षा कैकपटीनं अधिक काही वर्षांनी येईल!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अथ‌र्व देसाई
  • ‘जन ठायीं ठायीं तुंबला’ या विनय हर्डीकरांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 18 August 2017
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस Shifaras जन ठायीं ठायीं तुंबला Jan Thayi Thayi tumbala विनय हर्डीकर Vinay Hardikar राम जगताप Ram Jagtap

‘जन ठायीं ठायीं तुंबला’ हा विनय हर्डीकरांच्या राजकीय लेखांचा नवीन संग्रह. समीक्षक, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षक अशा विविध भूमिकेतून हर्डीकर महाराष्ट्राला परिचित आहेत. साधारण १९७५च्या आणीबाणीपासूनच्या पुढच्या काळात भारत-महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात घडलेल्या बहुतांश बदलांचे ते साक्षीदार असल्याने त्यांनी त्या साऱ्या अनुभवाच्या साहाय्यानं या पुस्तकात केलेलं भाष्य हे अत्यंत मार्मिक, परखड, कोणाचाही मुलाहिजा न राखणारं आणि तरीही समतोल ढळू न देणारं आहे.

या पुस्तकावर अधिक मांडणी करण्यापूर्वी दोन-तीन गोष्टींचं स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे. पाहिलं म्हणजे हे सारं लिहिताना माझ्यासमोर प्रस्तुत पुस्तकांची ‘जनशक्ती वाचक चळवळ’ प्रकाशित पहिली आवृत्ती आहे. यामुळे पुढील लिखाणात वेळोवेळी येणारे विविध संदर्भ यातील असतील. दुसरं म्हणजे मी यापुढे ‘लेखक’ असा उल्लेख न करता ‘हर्डीकर’ असा उल्लेख केलेला आहे. हे करण्याचा उद्देश त्यांच्या अवमान करण्याचा नसून या पुस्तकातलं बहुतांश कथन हे हर्डीकरांच्या इतर पुस्तकांसारखंच ‘फर्स्ट-पर्सन’ भूमिकेतून असल्यानं आणि त्यांच्या लिखाणात ते स्वतः सर्वत्र असल्यानं हा उल्लेख केलेला आहे.

‘जन ठायीं ठायीं तुंबला’ची विभागणी चार विभागांत केलेली आहे. यातील ‘काँग्रेस आणि भाजप’ या पहिल्या विभागात प्रामुख्याने राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणाचा आलेख हर्डीकरांनी मांडला आहे. दुसरा विभाग हा शेतीप्रश्नावर आहे. शेतकरी चळवळीतील दोन तपांचा अनुभव गाठीशी असलेलं सारं लिखाण या विभागात आहे. ‘शरद पवार आणि त्यांचे राजकारण’ या तिसऱ्या विभागात त्यांनी पवारसाहेबांच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणावर मांडणी केली आहे. ४० वर्षांपेक्षा अधिक काळ सामाजिक जीवनात घालवलेल्या हर्डीकरांचा अनेक नेते मंडळींशी खाजगी संबंध आला. आणि अशा काही मंडळींच्या कार्य-कर्तृत्वाचा आढावा त्यांनी पुस्तकातील ‘व्यक्ती आणि विचार’ या चौथ्या विभागात घेतला आहे. तर शेवटच्या ‘संकीर्ण’ या विभागात सामाजिक जीवनात जगताना त्यांना आलेल्या अनुभवांच्या माध्यमातून भारतीय राज्यप्रणाली आणि समाज यावर हर्डीकरांनी केलेलं चिंतन विविध लेखांच्या माध्यमातून मांडलं आहे.

स्वतंत्र भारतात जन्माला आलेल्या पहिल्या पिढीचे हर्डीकर प्रतिनिधी. त्यामुळे अजाण वयापासून त्यांच्या आसपास नेहरूंपासूनचं राजकारण घडत गेलं. त्यामुळे राजकारणाची काँग्रेसी पद्धत हर्डीकरांना अंतर्बाह्य माहीत आहे आणि त्याचीच प्रचिती त्यांचं काँग्रेससंबंधीचं लिखाण वाचताना येते. यात सुरुवातीलाच विनोद शिरसाठ यांनी घेतलेली हर्डीकरांची एक मुलाखत आहे. “या देशात कोणत्याही राजकीय पक्षाला त्याचे काँग्रेसीकरण झाल्याशिवाय सत्ता मिळत नाही आणि मिळाली तरी टिकवता येत नाही,” हा हर्डीकरांचा सिद्धान्त. भारतातील पक्षीय राजकारणावर यापेक्षा अधिक मार्मिक टिप्पणी अद्यापपर्यंत माझ्या वाचनात आलेली नाही. विचारधारांचे विरोध, मूल्यांचे विरोध वगैरे भारतात केवळ विरोधी पक्षाच्या राजकारणात असतात, बाकी सत्ता हीच काय ती आमची एकमेव विचारधारा. आणि ती मिळवायला आवश्यक असल्याने आम्ही कोणत्याही विचारप्रणालीच्या मागे जाणार नाही, ही काँग्रेसी पद्धत जोवर आत्मसात होत नाही तोवर कोणाचंही खरं नाही, हा हर्डीकरांचा सिद्धान्त आता तर आपल्याला भाजपच्या माध्यमातून स्पष्टच दिसायला लागलेला आहे. हे सारं वाचताना राहून राहून मला वाटतं की, त्यांचे हे विचार बाकी कोणी वाचो अथवा न वाचो, पण निदान काँग्रेसजनांनी तरी वाचले पाहिजेत. म्हणजे बाकी काही नाही तरी ज्या मूल्य(?)व्यवस्थेनं त्यांना तग धरून टिकवलं होतं, ती तरी त्यांना पुन्हा उमजेल. हे लिखाण वाचताना काही प्रसंगी आपल्याला हर्डीकरांच्या दूरदृष्टीचा अनुभव येतो. त्यांनी २०१० सालच्या लेखांत मांडलेली भाष्यं आज प्रत्यक्षात खरी उतरताना आपल्याला दिसतात.

हर्डीकरांच्या बाबतीत महत्त्वाचं म्हणजे ते उगीच कुठली तरी भुक्कड वैचारिक बांधीलकी मानत नाहीत. नजरेला जे सत्य दिसेल ते बिनधास्त परिणामांची तमा न बाळगता मांडणार हा त्यांचा खाक्या. त्यामुळे काँग्रेसवर सडकून टीका करणारे हर्डीकर मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने चालवलेल्या उन्मादाचेही तेवढेच वाभाडे काढतात. म्हणजे मोदी सरकारच्या काळात होणारी संसदेची पायमल्ली असो किंवा भाजपची इंटेलेक्चुल शोकांतिका असो, हर्डीकरांची लेखणी तेवढ्याच सफाईने चालते. खरं तर अगदी आणीबाणीच्या काळापासून हर्डीकर काँग्रेसचे कट्टर विरोधक. त्यामुळे २०१४ मध्ये जेव्हा मोदींच्या रूपाने काँग्रेसला पर्याय उभा राहिला, तेव्हा दगडापेक्षा वीट मऊ या नात्याने त्यांनी त्याचं स्वागत केलं, पण असं असूनही मोदींच्या रूपानं पुन्हा आपल्या वाट्याला व्यक्तिकेंद्रीत राजकारणच आलं, ही खंतदेखील ते तितक्याच तळमळीनं मांडतात.

हे सारं जरी असलं तरी हर्डीकरांनी केलेलं नेहरूंच्या उदयाचं विवेचन थोडं एकांगी वाटतं. नेहरू उदयासाठी हर्डीकरांनी दिलेली कारणं पूरक असली तरी ती सर्वथैव नाहीत. शेवटी आपण लोकशाही प्रजासत्ताकाची कितीही भाषा केली तरी सत्ता ही अंतिमतः एका नेत्याच्या माध्यमातूनच प्रतीत होत असते, हा जगभरचा अनुभब आहे. नेहरू काय किंवा मोदी काय हे दोन्ही त्याचेच प्रतीक आहे. दुसरं म्हणजे हर्डीकरांच्या नेहरू-मोदी यांच्या मूल्यमापनाबाबत एक साम्य सापडतं. ते म्हणजे या दोघांनाही मिळालेली सत्ता ही मुख्यत्वे देश-काल-वर्तमानाच्या अपरिहार्यतेतून मिळालेली आहे, अशा स्वरूपाची मांडणी ते करतात. म्हणजे नेहरूंच्या बाबतीत काँग्रेसचा स्वातंत्र्यातील वाटा आणि मोदींच्या बाबतीत लोकांचा काँग्रेसवरचा राग! तिसरा मुद्दा म्हणजे किमान प्रस्तुत लेखांचा संग्रह डोळ्यासमोर ठेवता आपल्याला असं जाणवतं की, हर्डीकरांनीसुद्धा मोदींच्या उदयाची शक्यता फार आधी मांडून ठेवलेली नव्हती.

राष्ट्रीय राजकारणाबाबतचा विचार करताना या पुस्तकाबाबत मांडायची अजून एक बाब म्हणजे या पुस्तकात भारतातील जातीयवाद किंवा धार्मिक ताणतणाव यांचा पुरेसा आढावा घेतलेला दिसत नाही. दुर्दैवानं धर्म आणि जात ही आपल्या जीवनाची अडगळ आपल्या राजकारणावरही प्रभाव पाडते आणि आजही तो भारतीय राजकारणाचा एक डिफायनिंग फॅक्टर आहे. त्यावर या पुस्तकात पुरेसं लिहिलं गेलेलं नाही. याच सोबत शेती व्यतिरिक्तच्या अर्थकारणावर थेट भाष्य करणारा लेख या पुस्तकात नाही. हे दोन विषय यात हाताळले गेले असते तर भारतीय सामाजिक जीवनात आंतरदृष्टी मिळण्याच्या दृष्टीनं परिपूर्ण अशा स्वरूपाचं हे पुस्तक झालं असतं. मात्र जे आहे तेदेखील तेवढंच इनसाईटफूल आहे.        

शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शेतकरी चळवळ या दोन्ही गोष्टींशी हर्डीकरांइतका जवळून संबंध आलेला मराठी विचारवंत सापडणं दुर्मीळ आहे. दोन तपांपेक्षा अधिक काळ हर्डीकर या विषयाशी संबंधित कार्य करत आहेत. शरद जोशींच्या अत्यंत जवळच्या आणि विश्वासू सहकाऱ्यांच्या पहिल्या फळीतील ते एक बिल्लेवाला नेता, कार्यकर्ता. मात्र मूळचा पिंड अभ्यासकाचा असल्यानं या शेतीप्रश्नांची मुळातून जाण असतानाच इतर अर्थकारणावर आणि राजकारणावर असणारी त्यांची पकड आणि यासाऱ्याच्या मिश्रणातून पुढे येणारी शेतीप्रश्नाची मूलभूत व साक्षेपी मांडणी, हे या पुस्तकाचं प्रमुख आकर्षण ठरू शकेल.

हर्डीकरांनी केलेलं शेतीप्रश्नाचं विवेचन वाचताना शेतीविषयीचं एकूणच आपल्या शहरी मध्यमवर्गाचे आणि स्वतःला अतिशहाणे समजणाऱ्या आपल्यासारख्या अभ्यासकांचे/विद्यार्थ्यांचे विचार(भ्रम) सटासट नाहीसे होऊ शकतात. कदाचित आपल्याला ते पटणार नाहीत, मात्र या कार्यातलं हर्डीकरांचं योगदान लक्षात घेता, ते जे मांडतायत ते नाकारणं अथवा दुर्लक्षित करणं शक्य नाही.

“तुम्ही जर औद्योगिक उत्पादनाच्या बाबतीत कच्चा माल, श्रम, भांडवल, व्यवस्थापन आणि मार्केटिंग या पाचही ठिकाणी त्या त्या लोकांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, असं म्हणता तर मग तो नियम तुम्ही शेतीला का लागू करत नाही?” हा साधा प्रश्न ते आपल्या समाजरूपी व्यवस्थेला विचारतात. आज शेतकऱ्यांची आपण जी एक लार्जर दॅन लाईफ अशी प्रतिमा आपण करून ठेवली आहे, तीच प्रतिमा त्याच्या विकासाला अधिक मारक आहे, हे हर्डीकरांच्या विवेचनातून जाणवं. आपल्या क्षुद्र राजकीय स्वार्थापायी भारतात ज्या निर्दयपणे शेतीप्रश्नाचं घोंगडं भिजवत ठेवलं आहे, त्या साऱ्या राजकारणावर हे लेख एक इन्सायडर व्ह्यू आपल्याला देतात. 

या लेखांतल्या एका परिच्छेदकडे मी विशेष लक्ष वेधू इच्छितो. हा आहे ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि समाज’  या लेखातला पान क्रमांक १४८ वरला शेवटचा परिच्छेद. (तो मोठा असल्याने मी इथं देत नाही.) यामध्ये हर्डीकरांनी शरद जोशींच्या या चळवळीतील योगदानावर लिहिलं आहे. शरद जोशींशी त्यांची असणारी जवळीक सर्वश्रुत आहे. किंबहुना आजही जोशींच्या पश्चात शेतकरी संघटनेचे काम ते करतायत आणि हे सारं असताना त्यांनी त्या लेखात मांडलेली मतं आपण वाचतो, तेव्हा आपल्याला निःपक्षपाती लिखाणाचा मूर्तीमंत नमुना अनुभवायला मिळतो. आज आपल्याकडे दुर्दैवाने काय लिहिलंय याच्यापेक्षा, ते कोणी लिहिलंय हे जास्त करून बघितलं जातं. यातील आडनावाचा महिमा दूर सारणं तसं आपल्या हातात फारसं नाही. तेव्हा हे सारं वाचताना जर कोणी कोणत्याही प्रकारची वैचारिक अथवा राजकीय बांधिलकी डोक्यात ठेवून हे वाचलं तर त्यांच्या माथी प्रकाश पडायची शक्यता कमीच!

‘शरद पवार आणि त्यांचे राजकारण’ या विभागातील लेख वाचताना हर्डीकर ज्या शिताफीनं आणि हिरीरीनं पवारसाहेबांवर टीका करतात, ती पाहून अद्याप हा माणूस धडधाकट जिवंत कसा, असा प्रश्न पडेपर्यंत मजल जाते! खरं म्हणजे यामध्येच आपल्या, हर्डीकरांच्या आणि पवारांच्या लोकशाही वृत्तीचा साज आपल्याला दिसतो. पवारांवर यापेक्षा अधिक स्पष्ट स्वरूपातील लिखाण उपलब्ध असल्यास मी ते वाचायला उत्सुक आहे. सडकून टीका करत असतानासुद्धा पवार हे काय चीज आहेत, याचा अंदाज देणारं एकाहून एक सरस असं विवेचन आपल्याला या पुस्तकात सापडतं.

व्यक्तीविशेष लेख लिहिणं यात तर हर्डीकरांचा हातखंडा आहे. त्यांचं ‘श्रद्धांजली’ हे पुस्तक याचं उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे त्यांनी शरद पवार, प्रमोद महाजन, जॉर्ज फर्नांडिस, कनू सन्याल, नितीश कुमार यांच्यावर लिहिलेले या पुस्तकातील लेख अत्यंत मार्मिक, चपखल आणि मित्रांवर लिहिलं असल्यानं काहीशा अनौपचारिक स्वरूपातील आहेत.

शरद पवार, प्रमोद महाजन आणि जॉर्ज फर्नांडिस हे तिघेही काहीसे समकालीन, मात्र परस्परांपेक्षा वेगळी व्यक्तिमत्त्वं. या तिघांचं जे मूल्यमापन हर्डीकरांनी केलं आहे, त्याचं चिंतन केल्यास भारतीय राजकारणाच्या आणि राजकीय नेतेमंडळींच्या प्रवृत्तीधर्माची आपल्याला जाणीव होते. तिघंही पक्षीय राजकारणी, तिघांच्याही मागे कोणत्या ना कोणत्या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. तिघंही कधी ना कधी सत्तेच्या पदावर विराजमान होते आणि तरीही तिघांत खूप फरक आहेत. पैकी पवारांच्या राजकारणाचा नद हा सतत सत्तेच्या घाटांवरूनच वाहिला आणि कदाचित स्वतःच्या महत्त्वाकांक्षेइतकी नसली तरी सत्ता त्यांनी पुरेपूर उपभोगली. आणि या सर्व काळात त्यांचा मासबेस मात्र कायम राहिला. सत्तेच्या परिघात अधिकाधिक वेळ घालवल्यानं असेल, मात्र त्यांची एका विचाराप्रतीची निष्ठा सतत कायम राहिली. (भलेही त्यांनी पक्ष बदलला तरी नावाशिवाय राजकीय संस्कृती म्हणून त्यात काहीही वेगळं नव्हतं, हे स्वतः शरद पवारांनीच नुकत्याच निखिल वागळेंना दिलेल्या मुलाखतीत मान्य केलंय!) 

दुसरे प्रमोद महाजन. सत्तेची आकांक्षा असली तरी प्रत्यक्ष सत्तेचे भोग त्यांच्या वाट्याला कमी आले आणि कसलाही मासबेस नसताना सुद्धा डावपेचांवर असणाऱ्या प्रभुत्वातून त्यांनी थेट राष्ट्रीय राजकारणात बस्तान बसवलं. बहुतांश काळ विरोधकांत घालवला आणि अखेरपर्यंत त्यांची एका विचाराशी आणि एका पक्षाशी निष्ठा कायम राहिली.

जॉर्जची तऱ्हा मात्र या दोघांपेक्षा निराळी! एका आवाजावर मुंबई बंद पडणाऱ्या या मुंबईच्या अनभिषिक्त सम्राटाला मासबेस मिळाला, सत्ताही मिळाली, मात्र शेवटपर्यंत त्यांना हक्काचा मतदारसंघ राखता आला नाही. एकेकाळी थेट सर्वोच्चपदी आपला दावा सांगू पाहणारा हा एकेकाळचा आदर्श नेता हर्डीकरांच्या भाषेत सांगायचं तर अखेरपर्यँत भारतीय राजकारणात भटका आणि विमुक्तच राहिला. राजकारणाला लागणार प्रॅगमॅटिझम आयुष्यभर दाखवूनही सरतेशेवटी कोणतीच एक निष्ठा न राखलेले जॉर्ज आज विस्मृतीत गेले आहेत.

हर्डीकरांनी या तिघांचं केलेलं विश्लेषण वाचताना आपल्याला जाणवतं की, अगदी नेहरूंपासून मोदींपर्यंत आपला कोणताही राजकारणी यापैकीच कोणत्या तरी एका प्रवृत्तीधर्माची कमी-अधिक  तीव्र आवृत्ती असतो. दुसरं म्हणजे या तिघांचाही राजकीय आलेख हा भारतीय राजकारणाच्या नैतिक अधःपतनाचाही आलेख आहे, हेही आपल्या लक्षात येतं.

या पुस्तकाच्या शेवटच्या ‘संकीर्ण’ विभागातलं लिखाण मला सर्वांत जास्त भावलं. यातील बहुतांश लेख हे आत्मनिरीक्षणपर आहेत. यात हर्डीकरांनी त्यांच्या सार्वजनिक आयुष्याचा मांडलेला लेखाजोखा नितांत विलोभनीय आहे. पक्षीय राजकारणात अगदी राष्ट्रीय पातळीवरच्या संधी उपलब्ध असताना देशात एक समांतर चळवळ उभी करण्याच्या ध्येयानं भारून जाऊन त्या संधी वेळोवेळी नाकारण्याची कथा उत्कंठावर्धक  आहे. त्यापैकी ‘बहुत पाया, कुछ खोया’ हा या पुस्तकातील शेवटचा लेख ललित लिखाणाचाही उत्तम नमुना आहे.

पुस्तक वाचताना हर्डीकरांचं राकट, कणखर आणि तितकंच लाघवी व्यक्तिमत्त्व आपल्याला भुरळ पाडतं. आणि म्हणून या शेवटच्या भागाकडे येताना आपण एकाच वेळी समाधानीही होतो आणि आपल्याला रुखरुखही लागते. हर्डीकर शेवटाकडे ‘खरी सत्ता संसदेतच असते’ असा प्रांजळ निर्वाळा देऊन नाकारलेल्या संधींविषयी थोडी खंत व्यक्त करतात. ते वाचताना सतत मनात येत राहतं की, समजा जर ते राजकारणात गेले असते, तर त्यांना मूल्यांशी तडजोड न करता तिथं टिकता आलं असतं का? की त्यांचाही ‘जॉर्ज फर्नांडिस’ झाला असता? की आपल्या स्वतंत्र बाण्यामुळेच  ते या राजकीय प्रवाहापासून दूर राहिले अथवा ठेवले गेले? असे अनेक प्रश्न हे पुस्तक आपल्यासमोर शेवटाकडे उभं करतं. एका संपादित स्वरूपाच्या पुस्तकांतूनही हा भाव निर्माण होणं, हेच माझ्या मते या पुस्तकाचं यश आहे.

क्वचित प्रसंगी लिहिण्याच्या अथवा बोलण्याच्या ओघात हर्डीकर काही ढोबळ विधानं करून मोकळे होतात. उदाहरणार्थ- पान ७७ वर इतिहास परिषदांवरच्या सुमार घटनांवर भाष्य करताना ते म्हणतात की, “आपल्याला खरंच इतका इतिहास हवा आहे का?” पैकी यातील त्यांची भावना समजून घेतली तरी मूळ उरणारा प्रश्न म्हणजे आपल्याकडे काही पर्याय आहे का? इतिहास हा कोणत्याही समाजजीवनाचा अंगभूत घटक असल्याने तो नाकारून वा त्याला बगल देऊन पुढे जाणं, हे व्यवहारत: अशक्य आहे. आज आपले असणारे बरे-वाईट असे कोणतेही भोग, हे त्या इतिहासाची देण असेल तर तो इतिहास हवाय अथवा नकोय, हा पर्याय आपल्याकडे उपलब्ध नाही.  असंच पुढच्या एका लेखात ते म्हणतात की, बुद्धिजीवी अथवा विचारवंत हा डावा किंवा उजवा कसा असू शकतो? त्यानं सत्य निरपेक्षपणे मांडलं पाहिजे. यातील दुसऱ्या भागाशी दुमत असण्याचं काहीच कारण नाही. मात्र घटनांचा अन्वयार्थ हा घटनेतील ग्रे एरियामधून अधिक जोरकसपणे लागत असल्यानं, त्या घटनांकडे पाहण्याची दृष्टी इथं अधिक महत्त्वाची ठरते. आणि म्हणून लोक विचारधारेच्या आधारे विचार मांडू पाहतात. आणि विचारवंतांच्या अशा प्रकारच्या परस्पर विरोधी भूमिकेतून विचार पुढे सरकत असतात. तर अशी काही ढोबळ विधानं या लिखाणात आपल्याला सापडू शकतात. मात्र त्यामुळे या लिखाणाच्या मूल्यात काहीही फरक पडत नाही.

आणखी एक म्हणजे हर्डीकर म्हणतात त्या प्रमाणे ‘आशावादी असणं ही त्यांची जित्याची खोड आहे’. सकारात्मकता हा आशावादाचा मूलभूत भाग आहे, हे लक्षात घेतलं तर आपल्याला जाणवेल की, राजकारण-समाजकारणातल्या व्यक्तिमत्त्वाचं मूल्यमापन करताना त्यांच्याकडून घडलेल्या घटनांच्या प्रेरणा हर्डीकर बहुतांश वेळा नकारात्मकच समजतात. भाविष्यविषयी कमालीचे आशावादी असणारे हर्डीकर वर्तमान आणि इतिहासाबाबत मात्र काहीसे उदासीन जाणवतात.

घटनांचा प्रथमदर्शी आणि प्रथमसाक्षी वृतान्त आणि विश्लेषण हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. शिवाय हर्डीकर त्यांच्या मांडणीत उगीच अघळपघळ लावत नाहीत. अत्यंत मोजक्या शब्दांत, चपखल प्रसंगांच्या माध्यमातून आणि तरीही क्लिष्ट न होणारं हे विवेचन, आपल्या राजकीय आणि सामाजिक जाणिवा समृद्ध करणारं आहे.

.............................................................................................................................................

हर्डीकरांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/search/?search=Vinay+hardikar&search_type=Authors&doSearch=1

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या प्रस्तावनेत संपादक राम जगताप यांनी नोंदवल्याप्रमाणे हर्डीकरांच्या लिखाणात सतत असणारा ‘मी’ हा काही लोकांच्या लेखी आक्षेपाचा विषय आहे, मात्र त्यांचा ‘मी’ हा आत्मसमर्थनात्मक नसून घटनेचा साक्षीदार या नात्यानं आलेला असतो. जगतापांचं हे निरीक्षण खरं आहे. हर्डीकरांच्या याच प्रकारच्या लेखनामुळे त्यांचं हे पुस्तक केवळ तात्कालिक राजकीय विवेचन न राहता, ते एक प्रकारचं ‘क्रॉनिकल’ बनून राहील. आणि या पुस्तकाला आज जे काही महत्त्व आहे अथवा येईल, त्यापेक्षा कैकपटीनं अधिक महत्त्व काही वर्षांनी या साऱ्या काळाचं डॉक्युमेंटेशन करताना येईल, हे नक्की!

atharvpeace@gmail.com          

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

mahendra shinde

Fri , 25 August 2017

"या देशात कोणत्याही राजकीय पक्षाला त्याचे काँग्रेसीकरण झाल्याशिवाय सत्ता मिळत नाही आणि मिळाली तरी टिकवता येत नाही,” हा हर्डीकरांचा सिद्धान्त"- असे लेखात म्हटले आहे. हर्डिकरांसारख्या वरवरची समज असलेल्या व्यक्तींना अवाजवी महत्त्व मिळालेले असताना 'सिद्धान्त' या शब्दाचे इतके अवमूल्यन झाले, हे साहजिकच म्हणायला हवे. धन्य आहे. समकालीन राजकारणाविषयीचे सर्वसामान्य व इतरांनी आधीच नोंदवलेले निरीक्षण पुन्हा नोंदवणे म्हणजे 'सिद्धान्त' म्हणायचे असेल तर मार्क्सपासून आंबेडकरांपर्यंत आणि इतरही अनेक विचारवंतांनी केलेले लेखन काय म्हणायचे? असो. हर्डिकरांच्या लेखनातील 'मी' हा आत्मसमर्थकच असतो. अनेकदा विषयाशी संबंधही नसताना सुरुवात स्वतःच्या संदर्भातच करणे, आपले कमअस्सल अनुभवही नोंदवून बढाई मारणे, याला आत्मसमर्थन म्हणायचे नसेल तर धन्य आहे!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......