जादुई वास्तववादी शैलीतल्या अदभुत, उत्कंठावर्धक कथा
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
आनंद थत्ते
  • ‘तथाकथित’ या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Fri , 21 July 2017
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस Shifaras तथाकथित विजय तांबे आनंद थत्ते मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

विजय तांबे यांचे ‘सहजतेच्या त्रासाची सुरवात’ आणि ‘ज्याचा त्याचा’ हे दोन कथासंग्रह यापूर्वी प्रकाशित झाले आहेत. ‘तथाकथित’ हा त्यांचा तिसरा कथासंग्रह.

विजय तांबे हे गेली २०-२५ वर्षे सातत्याने आणि निष्ठेने कथालेखन करत आहेत. ते बहुप्रसवा लेखक नाहीत. त्यांच्या कथा चोखंदळ वाचकांच्या आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या आहेत. २००७ ते २०१२ या काळातल्या पाच दीर्घकथा या संग्रहात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या सर्व कथा ‘नवअनुष्टुभ’, ‘मिळून आपण सारे’ आणि ‘चौफेर समाचार’ या नियतकालिकांतून पूर्वप्रसिद्ध झाल्या आहेत. 

या सर्व कथांची रचना सर्वसाधारण कथांप्रमाणेच आहे. म्हणजे आरंभ, मध्य, उत्कर्ष, कळस आणि शेवटी त्याचे यथायोग्य विसर्जन. एखाद ठिकाणी केलेला फ्लॅशबॅक तंत्राचा वापर सोडला तर कालाची गुंतागुंतीची रचना, सरमिसळ दिसून येत नाही. आणि तरीही या कथा प्रयोगशील आहेत. मग या कुठल्या पातळीवर प्रयोगशील आहेत असा प्रश्न साहजिकच पडतो.

तांबे यांच्या आधीच्या दोन्ही संग्रहांतील कथा वास्तववादी शैलीत आहेत. या संग्रहात मात्र त्यांनी त्याच्याशी फारकत घेतली आहे. ‘भीतीचा मॉल’ ही कथा सोडली तर इतर कथांमध्ये ‘जादुई वास्तववाद’ (Magical Realism) या तंत्राचा/शैलीचा वापर करण्यात आला आहे. ‘जादुई वास्तववाद’ म्हणजे काय? तर कथेत एखादी घटना किंवा कृती ही वास्तव नसते. ती त्याच्या पल्याड जाते. ती विलक्षण असते, चमत्कृतीपूर्ण असते. यातुशक्तीने भारलेली असते. कल्पक असते. पण या घटनेमुळे होणारे बदल, क्रिया-प्रतिक्रिया या वास्तवातील इतक्या बारकाव्यानिशी येतात की, तो सर्व पट वास्तव जगातील आहे असे वाचकाला वाटायला लागते. आणि त्या संपूर्ण काल्पनिक, जादुई, अदभुत, ज्ञात वास्तवाबाहेरील घटनेचा वाचक एक वास्तव घटना म्हणून स्वीकार करतो. या जादुई वास्तववादी तंत्राचा/शैलीचा वापर अतिशय प्रभावीपणे या कथांमध्ये केला आहे.

वास्तववादाने मराठी साहित्यसृष्टीत गेल्या काही दशकांत अशी एक दहशत माजवली आहे की, चांगल्या साहित्याचा ‘वास्तववादी असणे’ हा (च) जवळजवळ एकमेव निकष होऊन बसला होता. या समजुतीला या कथा जबरदस्त हादरा देतात आणि कल्पिताचे/जादुई गोष्टींचे कथनात्मक साहित्यातील महत्त्व खणखणीतपणे अधोरेखित करतात. याबद्दल विजय तांबे यांचे अभिनंदन.

या सर्वच कथांमधला आणखी एक गुणविशेष म्हणजे त्यांची वाचनीयता. आता पुढे काय, ही ओढ लागून राहते. कथा वाचत असताना आपली उत्कंठा सतत वाढत जाते. ती एका परमोच्च बिंदूपर्यंत वाढत जाऊन अखेर विसर्जित होते. यामुळे कथांची वाचनीयता वाढते.

वर्णन, निवेदन, संवाद आणि भाष्य या निवेदनाच्या चारही पद्धतींचा यथायोग्य वापर करण्यात आला आहे. ‘उठ मुली, दार उघड’ या कथेची मागणी वर्णन या कथन प्रकाराची आहे. वर्णनात्मक कथनपद्धतीची एक मर्यादा म्हणजे ती सहजपणे पाल्हाळिक होऊ शकते.  आणि कथा रेंगाळू शकते. पण या कथेत तसे होत नाही. वर्णने जेवढी आवश्यक तेवढीच येतात. अत्यंत नेमक्या शब्दात आणि ताकदीने येतात. आणि म्हणून कथानकाच्या गतीला खीळ बसत नाही.

या कथांची कथाबीजे कशी वेगळी आहेत हे देखील पाहण्यासारखे आहे. एखादी विलक्षण न पेलवणारी विद्या एखाद्याला दान म्हणून मिळाली तर तिचे ओझे त्याला सहन होत नाही. त्या विद्येच्या विलक्षणपणामुळे, त्या असह्य भारामुळे त्याचे सगळे आयुष्यच कसे भरकटते याचे यथार्थ चित्रण ‘अखून’ या कथेत येते. ही कथा  अखेरीस इच्छा-मरणाच्या मुद्द्यापर्यंत आणून सोडते.

जारणमारण विद्या, करणी, मूठ मारणे इत्यादी काळ्या जादूच्या कृतींचा वापर  आपल्याला त्रास देणाऱ्या, आपले वाईट करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी, त्याचे नुकसान करण्यासाठी, त्याला वेदना देण्यासाठी, तळपट करण्यासाठी केला जातो हे सर्वश्रुत आहे. ‘तिठ्यावरचा तोडगा’ या कथेत एखादा सहृदयी माणूस या विद्येचा उपयोग करताना जे करतो त्याने आपण आश्चर्याने थक्क होतो. या कथेत आणखी एका तंत्राचा वापर केला आहे. कथेतला निवेदक कथा सांगता सांगता मधेच कथेची रचना, कथेचे रूप यावर भाष्य करतो. या तंत्रामुळे वाचक कथेच्या संमोहातून, त्यातल्या ताणतणावाच्या वातावरणातून बाहेर येतो आणि अलिप्तपणे विचार करू लागतो. एलिएनेशनचे तंत्र या कथेत चांगले वापरले आहे.

‘तथाकथित’ ही एक समर्थ, प्रदीर्घ रूपककथा आहे. आपल्या समाजाचा एक उभा छेद घेतला तर त्याला प्रतिरूप असे समांतर प्राणी /जंगल विश्व या कथेतउभे केले आहे. सामान्य माणूस, नेता, पुढारी होण्याची आणि सत्तेची  आकांक्षा असणारी दुसऱ्या फळीतली माणसे, कुठल्याही गोष्टीचे विक्रीयोग्य मालात रूपांतर करून पैसा कमावण्याची हाव असणारी माणसे, ही सगळी रूपे आपल्याला या कथेत बघायला मिळतात. उत्तम रीतीने रचलेली ही कथा अतिशय सूक्ष्म बारकाव्यानिशी निवेदकाने उभी केली आहे.

‘भीतीचा मॉल’ ही या संग्रहातील एकच कथा वास्तववादी शैलीत आहे. प्रत्येक बाबतीत मूल्यवर्धन (Value Addition) शोधणे, त्याचा हव्यास करणे, अगदी सामान्य बाबतीतदेखील स्वतःचे काहीतरी वेगळेपण असावे यासाठी आटापिटा करणे अशी वृत्ती मॉलसंस्कृतीने निर्माण केली आहे. त्याचे अगदी टोकाचे रूप आपल्याला या कथेत दिसते. इतके की इतर वेळी  बुद्धिवादी असणारी माणसे कुठल्या थरापर्यंत अंधश्रद्ध होतात याचे प्रभावी दर्शन या कथेत होते. अडचणी येऊन आपले दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ नये, भविष्यातील अनिश्चितता यांनी घाबरूनच तर माणसे अंधश्रद्ध होतात. आपले सगळे नीट व्हावे, त्रास होऊ नये यासाठी माणसे कशी टोकाची कृती करतात याचे दर्शन या कथेत होते.

‘उठ मुली , दार उघड’ या कथेचे कथाबीज गुंतागुंतीचे आहे. स्त्रीप्रधान व्यवस्थेतील पुरुषाचे वागणे पुरुषप्रधान व्यवस्थेतील पुरुषापेक्षा वेगळे असणार. त्या व्यवस्थेत ते नॉर्मल असते. पण पुरुषप्रधान संस्कृतीचे संस्कार असल्याने त्यातील पात्रांना ते समजून घेणे कठीण जाते. वाचकालाही हा धक्का आहे. स्त्रीवादी भूमिका हा कथाबीजाचा एक प्रमुख भाग आहे. अस्पर्श जंगलात माणसाने प्रवेश/अतिक्रमण करून त्याची वाताहात करू नये. पर्यावरणाचा समतोल बिघडवू नये. माणूस स्वतःच्या घमेंडीत निसर्गाला आव्हान देतो, तेव्हा निसर्ग त्याला प्रतिसाद देत नाही, पण जेव्हा ईर्ष्या नसते तेव्हा तो प्रतिसाद देतो. हा या कथाबीजाचा दुसरा महत्त्वाचा भाग. गूढरम्य निसर्गवर्णन आणि चमत्कृतीपूर्ण घटनांची रेलचेल असलेली ही कथा शेवटी ज्या वास्तवाचे भान देऊन जाते, ते फारच परिणामकारक आहे.

या कथांमधला निवेदक वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो अत्यंत संवेदनशील आहे. आधुनिक विचारसरणीचा आहे. त्याचे सामाजिक भान सजग आणि तीव्र आहे. तो विज्ञानवादी आहे, तरीही त्याला अदभुताची ओढ आहे. इतकेच नव्हे तर तो अदभुतात रमणारा आहे. तो सामान्य माणसांच्या दुःखांकडे सहृदयतेने बघतो. समाजातील आक्षेपार्ह गोष्टींबद्दल तीव्र नापसंती असलेला आहे आणि या गोष्टी तो अतिशय बारकाव्यांनिशी नोंदवतो. स्त्री-पुरुष संबंधांची जाण आधुनिक आहे. मनोव्यापारांचे सखोल आकलन आहे. कल्पित आणि वास्तव यांची बेमालूम सरमिसळ करून जादुई वास्तववादाची शैली तो अनुसरतो.

अशा तऱ्हेच्या निवेदकाची निर्मिती हे विजय तांबे यांचे योगदान आहे. असा समर्थ कथासंग्रह दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

जाता जाता : विजय तांबे यांच्याकडून आता मी (आणि सगळे वाचक) कादंबरीची अपेक्षा करतोय! त्याबद्दल आगाऊ शुभेच्छा!

तथाकथित – विजय तांबे

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे
पाने - १९२ , मूल्य – २२० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3737

.............................................................................................................................................

लेखक मराठी-इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि अनुवादक आहेत.

thatte.anand7@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......