विशाल भारद्वाज : सिनेमाचा पूर्णपुरुष (भाग २)
दिवाळी २०१७ - व्यक्तिचित्रे
चंचला पिसाळ
  • विशाल भारद्वाज यांची एक भावमुद्रा
  • Sun , 30 October 2016
  • विशाल भारद्वाज चंचला पिसाळ

तथाकथित फिल्मी दुनियेचा भाग असूनही विशाल भारद्वाज एकदम साधा. शिस्तीचं आयुष्य जगणारा. पहाटे उठणं. तासभर योगा. दोनेक तास वाचन, तासभर लिखाण, मग टेनिस, संगीत या सगळ्याची शिस्त सहसा मोडत नाही. त्याला ओळखणारे सांगतात की, आजही तो संगीताची व्यावसायिक कामं घेतो. आजही ते मुंबईत भाड्याच्या घरात राहतात. हातात पैसा आल्यावर त्याने घर नाही, तर स्वत:चा स्टुडिओ उभा केला. (मसूरीला मात्र त्यांनी प्रसिद्ध लेखक रस्किन बॉण्डच्या शेजारीच घर घेतलं आहे. आणि त्या घरात राहून लिखाण करायला त्याला फार आवडतं. तिथंच स्थायिक व्हायचं ही त्याची मनापासूनची इच्छा आहे.) सिनेमा करायचा असतो, तेव्हा तो एकाच वेळी दिग्दर्शक, पटकथा लेखक, संवाद लेखक, संगीतकार, निर्माते असं सगळं असतो. पण सेटवर यायच्या त्याच्या वेळा चुकत नाहीत. या सगळ्या भूमिका एकाच वेळी निभवायच्या असतात, त्यासाठी त्याच्या भोवती सतत गर्दी, गोंधळ असतो. पण तो स्वत: अत्यंत शांत असतो. तो कधीही फिल्मी पार्ट्या, पुरस्कार सोहळे अशा कार्यक्रमांममध्ये नसतो. सिनेमा येणार असल्यावर टीव्ही माध्यमाच्या सर्व वाहिन्यांवरून त्याचे ढोल वाजवणाऱ्या ज्या मार्केटिंगसदृश मुलाखती वाजायला लागतात, अशा मुलाखतींमध्ये विशाल नसतो. ‘सिनेमा काढणं हे माझं काम. ते मी केलंय, आता त्याचं काय करायचं ते प्रेक्षकांनी बघावं’ असं म्हणून तो टेनिस कोर्टावर निघून जातो.

सिनेमा काढणाऱ्या, संगीताची विलक्षण ओढ असणाऱ्या, एकेकाळी क्रिकेट हेच जीव की प्राण असणाऱ्या विशालचं टेनिसप्रेम हीपण एक गमतीशीरच गोष्ट आहे. आपला राग, लोभ, इगो तो नेहमी टेनिसमध्ये काढतो. त्यासाठी रोज नियमित टेनिस खेळतो. शूटिंगच्या काळात तर आवर्जून सलग दोन दोन तास टेनिस सुरू असतं. सेटवर काही गडबड झाली की, तो तिथं शांत असतो, पण टेनिस कोर्टावरचा वेळ मात्र वाढतो. ‘ओमकारा’च्या सेटवरची त्याच्या या टेनिसबाबतची एक आठवण सांगितली जाते. कामाच्या वेळी काम, नो नॉन्सेन्स ही त्याची शिस्त असे. त्यामुळे सेटवर वातावरण एकदम गंभीर असे. होळीचे दिवस होते. अभिनेता अजय देवगणने वातावरण थोडं हलकं करायला ‘ओमकारा’च्या सेटवर मिठाईत भांग मिसळून ती सगळ्यांना दिली. ती मिठाई खाल्ल्यावर विशालना एकदम विचित्र फिलिंग आलं. अर्थातच इतरांनाही ते आलं. नेमकं काय झालंय ते जाणकारांमार्फफ विशालला समजलं. दुसऱ्या क्षणी  तो पॅक अप करून सेटवरून निघून गेला. तीन दिवस शूटिंग बंद राहिलं. विशाल हे तीन दिवस सतत सलग तीन-चार तास टेनिस खेळत होता. अजय देवगणने जाऊन त्याची माफी मागितली, पण प्रतिसाद शून्य. कुणीही गेलं तरी उत्तर एकच- थांबा, माझा खेळ संपू दे. प्रोड्यूसर टेनिस कोर्टबाहेर खुर्ची टाकून वाट बघत बसलाय आणि विशाल सांगायचा- ‘थांब, माझा खेळ संपवतो. मग बोलू.’

अर्थात पार्ट्या, पुरस्कार सोहळे यांना जात नाहीत, म्हणजे विशाल एकदम नीरस आहे, असं नाही. तो सांगतो, ‘‘मी दारू पितो, सिगरेटी ओढतो, पार्ट्या करतो, भंकस करतो. मी देशभर, देशाबाहेर भरपूर फिरतो, पण हे सगळं मला हव्या असलेल्या, माझ्या माणसांबरोबर. अगदी गेल्या चारपाच वर्षांपर्यंत तर मी रेल्वेनेही फिरायचो. प्रवासात भरपूर माणसांना भेटायचो, त्यांच्याशी भरपूर गप्पा मारायचो, आता लोक मला ओळखायला लागल्यापासून असं फिरणं बंद होत गेलं आहे.” मित्र हा त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत, पण हे मित्र आणि व्यावसायिक आयुष्य या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दिल्लीत धडपड सुरू होती, तेव्हा मुंबईतल्या संघर्षात मित्रांनी त्यांना मोलाची साथ दिली आहे. ‘मकडी’ सिनेमा चिल्ड्रन्स सोसायटीने नाकारला, तेव्हा तो त्यांनेच सोसायटीकडून विकत घ्यावा, असं मित्रांनी सुचवलं आणि तेव्हा विशाल भारद्वाज हा माणूस अजूनही कुणीही नव्हता तेव्हा २४ लाख रुपये उभे करून दिले होते. ‘माचिस’नंतर चार-पाच वर्षं संघर्ष सुरू होता, तेव्हा तर आशीष विद्यार्थी, मनोज वाजपेयी, पीयुष मिश्रा ही सगळी जुनी मित्रमंडळी बरोबरच असायची.

या सगळ्याबरोबरच त्याची आणखी एका माणसाची नकळत मैत्री झाली. त्याच्या शाळेतल्या मित्रांसाठी तर ही मैत्री धक्कादायकच होती. तो माणूस म्हणजे शेक्सपिअर. विशालने शेक्सपिअरचं केलेलं भारतीयीकरण ही त्याची खास ओळख आहे. पण तो गमतीने म्हणतो की, ‘या शेक्सपिअरने शाळेत असताना ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’च्या माध्यमातून फार त्रास दिलाय. त्यामुळे परत मी त्याच्या वाटेला गेलो हे माझ्या तेव्हाच्या मित्रांसाठी जेवढं धक्कादायक होतं, तेवढंच माझ्यासाठीही धक्कादायक होतं. पण झालं असं की टोरँटिनो, किझलोव्हस्की यांचे सिनेमे बघून मला हिंसेचं आकर्षण निर्माण झालं होतं. हिंसा अशा पद्धतीने मनोरंजन करू शकते, करते हेच मला कमालीचं वाटलं होतं.’ त्यात गुलजारांनी तू दिग्दर्शन चांगलं करशील असं म्हणून खतपाणी घातलं होत. ‘मकडी’ने आत्मविश्वास दिला आणि असं वाटायला लागलं की ‘गँगस्टर’ या विषयावर सिनेमा काढावा. अशातच एका रेल्वे प्रवासात शेक्सपिअरच्या ‘मॅकबेथ’ची कुठली तरी झेड दर्जाची आवृत्ती त्यांना वाचायला मिळाली. त्यातूनच प्रेरणा घेऊन त्याने ‘मकबूल’ लिहिला. आपण शेक्सपिअरला हात घातला आहे, हे इतर कुणाला कळणार नाही असंच त्याला त्यावेळी वाटत होतं. ‘मॅकबेथ’चं मूळ कथानक आपल्याला हवं तसं फिरवताना आपण शेक्सपिअरला हात घालतोय याचंही त्याला फारसं गांभीर्य वाटलं नव्हतं. पण त्याने एक केलं होतं, कथानकाच्या मूळ गाभ्याला कुठे धक्का लावला नाही. मग ‘ओंकारा’ आला. त्यात त्याला शेक्सपिअरचं ओझं झालं नाही. उलट तो त्याचा अदृश्य को-रायटर झाला. ‘माझ्या शेजारी उभं राहून मला हवं तसं काम करून दिलं त्याने. शिवाय त्याच्या मानधनाचा, कॉपीराईटचाही प्रश्न नव्हता,’ असं विशाल गमतीने सांगतो. त्याच्या या शेक्सपिअर ट्रायालॉजीबद्दल गुलजारांनी दिलेली प्रतिक्रिया एकदम मार्मिक आहे.  गुलजार त्याला म्हणाले होते, ‘तू शेक्सपिअरच्या जमिनीवर तुझी इमारत उभी केली आहेस.’

न्यू यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये विशालला ‘सतराव्या शतकातला शेक्सपिअर तुम्ही आताच्या काळातल्या काश्मीर प्रश्नाशी कसा जोडलात?’, असा प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्यांचं उत्तर होतं, ‘४०० वर्षांनंतरही शेक्सपिअर लोकांना ताजा वाटतो हा त्याचा ग्रेटनेस आहे. तो माणसाच्या मानसिकतेशी चक्क खेळतो. माणसाच्या भावना, वेदना यातला संघर्ष आणि त्यातलं राजकारण मांडतो. हा संघर्ष शतकानुशतकं कायम आहे. मला खूप दिवसांपासून काश्मीरमधल्या दहशतवादाच्या पाश्वभूमीवर ‘हैदर’ करायचा होता. त्यासाठी मग हॅम्लेटच्या वेगवेगळ्या रूपांतरांचा अभ्यास केला. अकिरा कुरोसावा, मेल गिब्सन, रशियन लेखकग्रिगोरी कोझीन्त्सेव या सगळ्यांनी शेक्सपिअरचं रूपांतर करताना आजच्या काळातही शेक्सपिअरचीच पल्लेदार भाषा वापरली आहे, याचं कारण लोक आजही त्याच्या प्रभावातून बाहेर आलेले नाहीत. मला मात्र तसली ओझी नव्हती. त्यामुळे मी त्याला भारतीय मातीत रुजवू शकलो.’ (‘ओंकारा’मधली ‘आधा बम्मन’सारखी संकल्पना ऐकताना किंवा ‘मकबूल’मधल्या अब्बाजींच्या तोंडून ‘ये इश्क बहुत ही बुरी बिमारी है... पुरी कायनात हमारी मुठ्ठीमे है, लेकिन ये रत्तीभर औरत संभाली नहीं जाती,’  हा कारमध्ये बसून पंकज कपूर यांनी म्हटलेला डायलॉग ऐकताना हे पुरेपूर पटतं.)

विशालला काश्मीर प्रश्नावर सिनेमा तर करायचा होता, पण तो काश्मिरी नाही, तोवर तिथं गेलाही नव्हता. फिल्म-टीव्हीतून पाहिलं तेवढंच काश्मीर, काश्मीर प्रश्न त्याला माहीत होता, पण ते सिनेमा बनवायला पुरेसं नव्हतं. त्या दरम्यान त्याची पत्नी, रेखाने बशरत पीरचं ‘कर्फ्युड नाईट्स’ वाचलं होतं. ते तिला फार आवडलं. बशरत पीर काश्मीरमध्ये वाढला. काश्मिरी लोकांप्रमाणेच त्याच्या आई-वडिलांनी त्यालाही शिक्षणासाठी अलीगढ विद्यापीठात पाठवून दिलं होतं. दहशतवादापासून दूर राहण्यासाठी. मग विशालला त्यातून हवी ती लिंक मिळाली. सिनेमात ते सगळे बारकावे यावेत यासाठी विशालने बशरत पीरलाच या सिनेमाचा को-ऑथर म्हणून बोलावलं गेलं.

‘हॅम्लेट’मध्ये शेक्सपीअरने माऊसट्रॅप घडवला आहे. म्हणजे नाटकातलं नाटक. त्या माध्यमातून पात्रांच्या तोंडून सत्य वदवून घेतलं गेलं आहे. त्याचं विशालने काही प्रमाणात रूपांतर केलंय. तो म्हणतो,  ‘माझा हैदर चांगला डान्सर. मग मी त्यालाच नाचायला लावलं. मी स्वत: संगीतकार असल्यामुळे मला ती जागा शोधता आली. लोक एक वेळ सिनेमा विसरतात. पण गाणं विसरत नाहीत हे मला माहीत आहे. भांड पथेर ही काश्मीरमधली २०० वर्षे जुनी लोकसंगीताची परंपरा आहे. त्यात नृत्य-गाण्यातून गोष्ट सांगितली जाते. हा सगळा योग जुळून आला. ते १४०० वर्षे जुनं मंदिरही आम्हाला मिळालं.’

‘हैदर’ विरुद्ध निदर्शनं झाली. ‘अँटी आर्मी’, ‘अँटी नॅशनलिस्ट’ असल्याचे आरोपही झाले. विशालला पोलीस संरक्षण घ्यावं लागलं. पण ‘काश्मीर संघर्षानं मला ‘हैदर’ काढायला उद्युक्त केलं. ‘हैदर’ करणं हे माझं कर्तव्यच होतं. त्यात मी कोणाचीही बाजू घेतली नाही. पण मी जे पाहिलं ते पडद्यावर आणणं हे माझं काम होतं. ते मी तटस्थपणे केलं. काश्मीर प्रश्नातली मानवी वेदना मी शोधत होतो. त्यामुळे त्यात सामान्य माणूस कसा अडकत गेला हे मला मांडता आलं,’ असं तो सांगतो. या सिनेमावर टिप्पणी करताना तो म्हणतो की, ‘काश्मीर प्रश्न युरोपात असता तर त्यावर आजवर २०० तरी सिनेमे निघाले असते. हॉलिवूड अजून नाझी, पहिलं-दुसरं महायुद्ध यावर सिनेमे काढतं. इराकवर सिनेमे काढतं. टीव्हीवर होमलॅण्डसारखी मालिका निघते इराण प्रश्नावर. मानवी संघर्षाला ते स्थान देतात. पण आम्ही फक्त चोऱ्या करत बसतो.’

शेक्सपीअरइतकाच किंवा त्याच्याहूनही जास्त महत्त्वाचा त्याच्या आयुष्यातला माणूस म्हणजे गुलज़ार. ते आपले मेंटॉर असल्याचं विशाल कबूल करतो. तसं ते नातं लहानपासूनच होतं, पण ते एकतर्फी होतं. त्याला गुलज़ारांच्या कविता, गीतं अतिशय आवडत. पण विशालचे वडील त्या गीतांची चिरफाड करत. ‘इन आँखो की महकती खूशबू’ हे गाणं घेऊन ते विशालला ऐकवत की, ‘डोळ्यांना कुठे खूशबू असते. काहीही लिहितो हा माणूस.’ मग सोळा-सतरा वर्षांचा विशाल वडिलांशी वाद घालायचा. तर गुलज़ार यांच्याशी तेव्हापासून जुळलेलं नातं ‘माचिस’नंतर दृढ होत गेलं. वास्तविक लहानपणापासून कविता-गीतं यांची आवड असणाऱ्या विशालला चित्रपटाची गीतं लिहिणंही आवडेल असंच काम आहे, पण गुलज़ार यांच्यासारखा गीतकार बरोबर असताना कोण कशाला ते करेल? त्यामुळे त्याच्या सिनेमात सहसा संगीत त्याचं आणि गीतं गुलज़ारांची हे समीकरण ठरलेलंच असतं. अर्थात गुलज़ार भेटण्याआधी त्याच्या भावजीवनावर परिणाम करणारा कवी होता, डॉ. बशीर. मीरतला त्यांच्या घराजवळच राहणाऱ्या बशीरचं घर दंगलीत जळलं. त्यात त्यांची डायरीही जळली. पण बशीर यांच्या तोंडून ऐकलेल्या त्यांच्या सगळ्या कविता विशालने त्यांना पुन्हा लिहून दिल्या, अशी आठवण गुलज़ार सांगतात. ‘आजही डिप्रेशनच्या कुठल्याही क्षणी मी त्यांच्या कवितासंग्रहाचं कुठलंही पान उघडतो आणि वाचायला सुरुवात करतो’ असं विशाल म्हणतो.

स्वत: विशाल यांनी स्लो पेसची गाणी आवडतात. त्यामुळे ‘बीडी’सारखं गाणं द्यायला आपल्याला त्रास झाला, हेही तो कबूल करतो. पण सिनेमा चालायला हवा असेल तर डान्स नंबर द्यायलाच हवेत. मग द्यायचंच आहे तर ‘झुमका गिरा रे’सारखं आणि लोकांना आवडेल असं गाणं द्यायचं असं ठरलं. ‘ओंकारा’मधली बिल्लोची व्यक्तिरेखा जाणीवपूर्वक घेतली गेली आणि त्यात ते गाण पेरलं गेलं. नुसतं डान्स नंबर म्हणून ते आलं असतं तर ते स्टोरीला हानीकारक झालं असतं. विशालने गुलज़ारांना ‘पान खायो’, ‘झुमका गिरा रे’चा संदर्भ दिला होता. त्या दरम्यान त्यांना युपीच्या लोकसंगीतात ‘तुम सिगरेट का छोडो खयाल बाबू होठ जलेंगे’ अशी ओळ असलेलं गाणं मिळालं. ते ऐकवल्यावर गुलज़ार म्हणाले, ‘मी याहून चांगलं काहीतरी देतो.’ मग काही दिवसांनी त्यांनी फोन करून विशालला ‘बीडी जलायले’ ऐकवलं. त्याने ते गाणं ऐकून टुणकन उडीच मारली. त्यात बिपाशाच्या पर्सनॅलिटीला काहीसा हमिंग वाटणारा रेखा भारद्वाज यांचा आवाज एकदम चपखल बसला आहे. शिवाय ‘ठंडी हवा भी’ नंतर ‘ससुरी’सारखी विशालने केलेली अडिशन सॉलिड मजा आणते.

वास्तविक विशालने ‘यार कसम’च म्युझिक केलं तेव्हा म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी संगीताचं शिक्षण घेतलेलं नव्हतं. मग तो स्वत:च शिकला. पत्नी, रेखा ही आपली शास्त्रीय संगीतातली गुरू आहे, असं तो आवर्जून सांगतो. तरुणपणी त्याच्यावर जगजीतसिंग, मेहंदी हसन, आरडी, मदनमोहन, सलील चौधरी, एसडी या सगळ्यांचा प्रभाव होता. पण त्यातून त्यानं त्याचं संगीत शोधलं. अलीकडच्या काळात त्याने एन. के. रामानुजन या कन्नड गीतकाराने लिहिलेल्या भारतीय लोककथेवर ‘अ फ्लॉवरिंग ट्री’ हा ऑर्केस्ट्रा केला. पॅरिसच्या ले चेटेलेट थिएटरमध्ये त्याचं सादरीकरण झालं. पण विशालला त्याच्याही पुढे जायचं आहे. ‘मला एक दिवस संगीतातच असं काहीतरी करायचं आहे की, ते शब्दातीत असेल,’ असं तो सांगतो.

(समाप्त)

Post Comment

Anu S

Thu , 14 September 2017

"त्यात बिपाशाच्या पर्सनॅलिटीला काहीसा हमिंग वाटणारा रेखा भारद्वाज यांचा आवाज एकदम चपखल बसला आहे." "Beedi" chi gayika rekha bhardwaj nahi Sunidhi Chauhan aahe! :( (Rekha Bhardwaj ne "Lakad" ani "Namak" gayali aahet)


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख