‘भारतीय अॅमेझॉन’ असा लौकिक असलेली, आपल्या वस्तू, सोयीसवलती यांविषयी आग्रही असलेली ऑनलाइन वा इ-कॉमर्स क्षेत्रातली एक आघाडीची कंपनी म्हणजे ‘फ्लीपकार्ट’. सचिन व बिन्नी बन्सल या योगायोगानं एकच आडनाव असलेल्या दोन भारतीय तरुणांनी ही कंपनी सुरू केली. सुरुवातीला ते दोघेही अॅमेझॉनमध्ये नोकरी करत होते. ते सोडून त्यांनी इ-कॉमर्स कंपनी सुरू करायचं ठरवलं. आज फ्लीपकार्टविषयी कुणालाही सांगायची गरज नाही. दरम्यान इतरही ऑनलाइन शॉपिंगची सेवा पुरवणाऱ्या कंपन्या सुरू झाल्या. अॅमेझॉनसुद्धा भारतात आलं. त्यामुळे स्पर्धा वाढली, पण फ्लीपकार्ट कशावर उभं आहे, याविषयी बिन्नी बन्सल यांच्याशी मारलेल्या या गप्पा.
अर्चना शुक्ला : तुमच्या सुरुवातीच्या प्रवासाबद्दल सांगा. फ्लिपकार्टची मुहूर्तमेढ कशी रोवली गेली आणि तुमची कंपनी ‘भारताची अॅमेझॉन’ कशी बनली ?
बन्सल : मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहे. चंदीगढमध्ये लहानाचा मोठा झालो. माझे वडील राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरीला होते, तर आईची नोकरी सरकारी होती. त्यामुळे कुटुंबात उद्योजकीय वारसा असा काही नव्हता. २००५मध्ये दिल्लीच्या आयआयटीतून पदवी घेईपर्यंत स्वतःची कंपनी सुरू करण्याचा विचारही माझ्या मनाला शिवला नव्हता. भारतात काहीतरी करावं, असं मला नेहमीच वाटायचं; पण मला एमबीए करायचं नव्हतं. त्यामुळे कॅम्पसमधून चालून आलेली नोकरी मी स्वीकारली नाही. मला त्या वेळी कम्प्युटर व्हिजन आणि मशीन लर्निंगमध्ये आवडत होतं. त्यामुळे या क्षेत्राशी संबंधित असणार्या कंपनीत मी नोकरीसाठी अर्ज केला. तिथं अठरा महिने काम केल्यानंतर मला जाणवलं की, या कामातून फक्त शिक्षणक्षेत्रातच करियर घडवता येणं शक्य होतं आणि मला शिक्षणक्षेत्रात काम करायचं नव्हतं. टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातली सगळ्यात चांगली नोकरी वेब टेक्नॉलॉजीमध्ये मिळणं शक्य होतं. त्यामुळे मी अॅमेझॉनमध्ये गेले. एका मोठ्या कंपनीसाठी काम करता येऊ शकणार असल्याचा आनंद त्या वेळी माझ्या मनात होता. नोकरी मिळाल्यानंतर आता आपण पुढे काय करायचं, असा विचार माझ्या मनात सुरू झाला. टेक्नॉलॉजीशी संबंधित स्टार्ट-अप्सविषयीचे ब्लॉग वाचले. नोकरी करण्यापेक्षा कंपनी सुरू न करणं हे अधिक घातक असल्याचं मला त्या वेळी उमजलं. त्या वेळी सचिन बन्सलसुद्धा अॅमेझॉनमध्येच होते. त्यांच्या डोक्यातही अशाच प्रकारचे विचार घोळत होते. त्यांच्या घराण्याला व्यवसायाची पार्श्वभूमी आहे. मग आम्ही नोकरी सोडून फ्लिपकार्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला.
प्रीती सिंग बनिपाल (प्रथम वर्ष, पीजीपीएम) : सुरुवातीच्या काळात कुठल्या प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागला?
बन्सल : इ-कॉमर्स व्यवसायाच्या उभारणीसाठी योग्य तंत्रज्ञानाची जुळवाजुळव आणि विक्रेत्यांशी सौहार्दापूर्ण संबंध प्रस्थापित करणं, या दोन गोष्टींची आवश्यकता असते. आम्ही दोघंही संगणकशास्त्राचे पदवीधर असल्यामुळे आमची तंत्रज्ञानाची बाजू भक्कम होती, पण कंपनी सुरू करणं, बँक खातं काढणं अशा प्रकारच्या मूलभूत गोष्टीच अवघड गेल्या. आम्ही एका अपार्टमेंटमध्ये ही कंपनी सुरू केली. त्यामुळे तिचा नोंदणीकृत पत्ता नव्हता. परिणामी बँका कर्ज द्यायला तयार नव्हत्या. लोकांना संचालक मंडळावर नियुक्त करणंसुद्धा अवघड गेलं. कारण ही कंपनी केवळ दोन व्यक्ती चालवत होत्या. त्यामुळे केवळ त्यांच्यावरच विश्वास ठेवण्याखेरीज गत्यंतर नव्हतं.
अर्चना शुक्ला : तुम्ही विक्रीसाठी पुस्तकांचीच निवड का केलीत?
बन्सल : मोठ्या इ-कॉमर्स व्यवसायाची उभारणी हे आमचं उद्दिष्ट होतं. पुस्तकविक्रीचा निर्णय हा आमच्या व्यूहात्मक रणनीतीचा भाग होता. पुस्तकांची किंमत कमी असते. त्यामुळे तुम्ही ग्राहकाच्या मनात ऑनलाईन पैसे भरण्यासाठी विश्वास जागवू शकता. जर आम्ही सुरुवातीलाच तीन-पाच हजार रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू विकण्याचा निर्णय घेतला असता, तर आमच्या नव्या ऑनलाईन कंपनीसाठी ते जिकिरीचं ठरलं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे, पुस्तकांवर कर आकारण्यात येत नाहीत. त्यामुळे त्यांची वाहतूक ही गोष्ट सोपी होती. तसंच कर वगैरे गोष्टींसाठी ऑडिटर नेमण्याची गरज भासत नाही. त्याचबरोबर पुस्तकांची मोडतोड वगैरे होण्याचा धोकासुद्धा नसतो. तुम्ही जे ऑर्डर करता, ते तुम्हाला मिळतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही पुस्तकांकडं वळलो.
अंकीत दुबे (प्रथम वर्ष, पीजीपीएम) : सुरुवातीला तुमच्या जवळच्या लोकांचा प्रतिसाद कसा होता ?
बन्सल : प्रोत्साहनात्मक! तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते! तुमच्या निर्णयांवर तेच प्रभाव टाकत असतं. कुटुंबातले जवळपास निम्मे सदस्य माझ्या बाजूने होते.
मारुशा मुझफ्फर (द इंडियन एक्स्प्रेस) : फ्लिपकार्टमध्ये अमलात आणलेले कुठले धडे तुम्ही अॅमेझॉनमध्ये गिरवले होते?
बन्सल : आम्ही अॅमेझॉनसाठी सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम करायचो. आमचं बहुतांश काम तंत्रज्ञानाशी संबंधित होतं. तिथं किरकोळ विक्री व्यवसायाशी आमचा कधी संबंध आला नाही. मात्र अॅमेझॉनच्या ग्राहककेंद्री वृत्तीनं आम्हाला प्रभावित केलं होतं.
निखिल सेठी (प्रथम वर्ष, पीजीपीएम) : पदवी मिळाल्यानंतर बहुतांश जण बँकिंग, सल्लागार कंपन्या किंवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्राकडे वळतात. खूप कमी जण उद्योजक बनतात.
बन्सल : या चित्रात बदल होईल, असं मला वाटतं. नवउद्योजकांच्या यशाच्या कहाण्या आता कानावर पडायला लागल्या आहेत. जेव्हा अर्थव्यवस्था आणखी कात टाकेल, तेव्हा स्टार्ट-अप सुरू करण्याच्या संधीसुद्धा वाढतील. तेव्हा अनेक जण उद्योगांकडे वळल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल.
श्रीनिवासन सत्यमूर्ती (प्रथम वर्ष, पीजीपीएम) : फ्लिपकार्टच्या ग्राहकांसोबतच्या संवादनीतीनं कालानुरूप कसं वळण घेतलं ?
बन्सल : आमचा ग्राहकांसोबतचा संवाद सुरुवातीपासून कायमच पारदर्शक राहिला आहे. ऑर्डर नोंदवल्यापासूनच ग्राहकाशी आमचा संवाद सुरू होतो. या संवादात सुधारणा करण्याचा सतत प्रयत्न करतो, पण आमच्या मूलभूत संवादधोरणात काही बदल झालेला नाही.
निकेश महाजन ( प्रथम वर्ष, पीजीपीएम) : नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करणं कमी जोखमीचं असल्याचं आपण कुठल्या आधारावर म्हणालात?
बन्सल : मी जर मोठ्या कंपनीत नोकरी करत राहिलो, तर काहीही शिकू शकणार नाही, हे मला त्या वेळी उमगलं आणि करिअरमध्ये उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी स्टार्ट अप सुरू करण्यात कमी धोका असल्याचीही जाणीव झाली. जर मी भविष्याचा अल्पकालीन विचार केला असता, तर नोकरीत मिळणारा चांगला पगार माझ्यासाठी पुरेसा होता. मी तेच करत राहिलो असतो, पण दीर्घकालीन भविष्याकडे नजर ठेवून मी व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला.
निखिल सेठी (प्रथम वर्ष, पीजीपीएम) : तुमचं बिझनेस मॉडेल बव्हंशी अॅमेझॉनवर आधारित आहे; आणि आता अॅमेझॉनही भारतात आलं आहे. त्यामुळे तुमची व्यूहनीती बदलली का ?
बन्सल : आमच्या भूमिकेत फारसा बदल घडला नाही. आम्ही स्वतःला वाढवण्याचा आणि ग्राहकांना संतुष्ट ठेवण्याचा प्रयत्न करतो. जर आम्ही आमच्या ब्रँडची चांगल्या पद्धतीनं उभारणी केली, जर आम्ही ग्राहकांना समाधानी ठेवलं, तर आम्ही भविष्यात नक्कीच यशस्वी होऊ.
नवनीत गुप्ता ( द्वितीय वर्ष, पीजीएचआर) : तुमच्या व्यवसायावर पायरसीचा किती परिणाम झाला आहे ?
बन्सल : पायरसीमुळे भारतात संगीत आणि चित्रपट क्षेत्राची फारशी वाढ झालेली नाही, पण डिजिटल क्षेत्राच्या वाढीमुळे पुढच्या काही वर्षांत पायरसीचा प्रश्न निकालात निघेल.
श्रीराम वासीरेड्डी (प्रथम वर्ष, पीजीपीएम) : आता स्टार्ट अप कंपन्यांची परिस्थिती आहे, ती पाहता तुम्हीही फ्लिपकार्ट विकणार का?
बन्सल : अजिबात नाही! फ्लिपकार्टला अतिशय मोठी कंपनी बनवण्याचं आमचं ध्येय आहे. अशा प्रकारची संधी आयुष्यात एकदाच येत असते.
उन्नी राजन शंकर ( द इंडियन एक्स्प्रेस) : ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ पर्याय निवडणार्या ग्राहकांचं प्रमाण किती आहे ? तसंच ही संकल्पना मूळची भारतीय आहे का?
बन्सल : ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ ही संकल्पना अजिबात पाश्चिमात्य कल्पना नाही. उदाहरणार्थ, चीन आणि दक्षिण अमेरिकासुद्धा रोखीनं व्यवहार करणार्या अर्थव्यवस्था आहेत. तरुणाई जरी कार्डनं व्यवहार करण्याला प्राधान्य देत असली, तरी बव्हंशी लोक रोखीनेच व्यवहार करतात. भारतातसुद्धा हे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे इ-कॉमर्स व्यवसायालासुद्धा याच मार्गानं जायला हवं. ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चा पर्याय निवडणार्यांचं प्रमाण जवळजवळ ६०-६५ टक्के आहे. ते भविष्यात ७५ ते ८० टक्क्यांवर जाईल.
उन्नी राजन शंकर : तुमची आणि सचिन बन्सल यांची भेट कशी झाली?
बन्सल : आम्ही दोघेही चंदीगढचे. एकाच कॉलेजमध्ये आणि एकाच वर्गात शिकलो. बंगळुरूमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी सुरू केल्यानंतर आम्ही रूममेट म्हणून राहिलो. तेव्हापासूनच आमच्या मैत्रीची सुरूवात झाली.
फणीकुमार वर्मा (प्रथम वर्ष, पीजीपीएम) : स्टार्ट अप म्हणून सगळ्यात मोठं आव्हान इतरांनी दखल घेण्याचं असतं. फ्लिपकार्टनं ते कसं पेललं?
बन्सल : सुरुवातीला मित्रमंडळींच्या माध्यमातून माऊथ पब्लिसिटी झाली. त्यानंतर आम्ही ब्लॉग्सच्या माध्यमातून काही ग्राहक मिळवले. तसंच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमुळे काही लोक फ्लिपकार्टकडे वळले.
शिवानी नंदा ( द्वितीय वर्ष, पीजीएचआर) : तुमच्या गुंतवणूकदारांना तुम्ही कसं आश्वस्त केलं? तुम्ही त्यांच्यासमोर यशस्वी भविष्याचं स्वप्न रंगवलं की, स्वतःचं ध्येय सांगितलं?
बन्सल : तुम्हाला दोन्हीही गोष्टी कराव्या लागतात. पहिल्या दिवसापासूनच आपल्याला कुणी अर्थपुरवठा करत नाही. कॉलेजमधून दोन वर्षांपूर्वी बाहेर पडलेल्या दोघांना कुणी लाखो रुपये का देईल? जास्तीत जास्त ग्राहक मिळवायचे, कंपनी ब्रेक-इव्हनला आणायची आणि नंतर गुंतवणूकदारांकडे जाऊन ‘आपण भविष्यात किती मोठे होऊ शकतो’, हे दाखवायचं, हाच आमचा प्रयत्न होता. तुम्हाला त्यांना तुमचं ध्येय विकावं लागतं आणि तुम्ही काहीतरी करत असल्याचं दाखवावं लागतं.
मानसी म्हेत्रस (द्वितीय वर्ष, पीजीएचआर) : फ्लिपकार्टची भविष्यकालीन योजना काय आहे? दुसर्या देशांमध्ये जाण्याचा विचार आहे का?
बन्सल : आम्ही दुसर्या देशांच्या बाजारपेठेकडे मात्र पाहत नाही. कारण भारत ही स्वतःच एक प्रचंड बाजारपेठ आहे. इथं दहा कोटी लोक इंटरनेट वापरतात. कुठल्याही देशाच्या लोकसंख्येपेक्षा हा आकडा नक्कीच जास्त आहे. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणं, हाच योग्य निर्णय आहे.
अर्चना शुक्ला : पुस्तकं आणि चित्रपट मोठ्या प्रमाणात डिजिटल स्वरूपात येत आहेत. आयपॅड आणि किंडल अशा उत्पादनांपासून तुमच्या व्यवसायाला धोका आहेत, असं वाटत नाही का ?
बन्सल : आमच्याकडे डिजिटल व्यूहनीती तयार आहे. ज्या वेळी बाजारपेठ डिजिटलकडे झुकेल, फ्लिपकार्टसुद्धा तिकडे वळेल.
श्रीराम वासीरेड्डी (प्रथम वर्ष, पीजीपीएम) : तुम्हाला ई-कॉमर्स क्षेत्रात काहीतरी करायचं होतं आणि स्टार्ट अप हा त्याच्यासाठी एक पर्याय होता किंवा तुम्हाला जे करायचं होतं, त्याच्यासाठी स्टार्ट अप हा प्लॅटफॉर्म होता का?
बन्सल : कंपनी सुरू करायची होती, पण आम्हाला केवळ तंत्रज्ञानाबद्दलच माहिती होती. इंटरनेटबाबत फारच कमी समजत होतं. भारतीय बाजारपेठेसाठीसुद्धा आम्हाला काहीतरी करायचं होतं. आमच्या अभ्यासानुसार आम्ही ई-कॉमर्सकडे वळायचं ठरवलं. सुरुवातीला अशा प्रकारची कंपनी सुरू करणं अवघड वाटलं. कारण अशी कंपनी यशस्वी करण्यासाठी बर्याच गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे आम्ही वस्तूंची तुलना करणारी वेबसाईट सुरू केली. त्यामुळे तुम्ही घरबसल्या वेगवेगळ्या वस्तू व त्यांच्या किंमतींची माहिती मिळवून योग्य निर्णय घेऊ शकता. त्यासाठी २००७मध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व इ-कॉमर्स वेबसाईट्सचा आम्ही अभ्यास केला. त्या वेळी भारतात नवा इ-कॉमर्स ब्रँड नसल्याची आम्हाला जाणीव झाली आणि मग आम्ही इ-कॉमर्समध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. कारण त्याला भवितव्य होतं!
विधी वर्मा ( द्वितीय वर्ष, पीजीपीएम) : तुम्ही विक्रीची सुरुवात पुस्तकांपासून केली. कारण ती ‘टच अँड फील’ उत्पादनं नव्हती, पण तशा प्रकारात मोडणारी मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू विकण्याची किमया कशी साधलीत?
बन्सल : विकल्या जाणार्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं प्रमाण कधीच कमी नव्हतं. जगभरच इ-कॉमर्समध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू विकल्या जाण्याचं प्रमाण जास्त आहे. त्या पाठीमागे दोन-तीन कारणं आहेत. एक म्हणजे निवड. तुम्ही मोबाईलच्या दुकानात गेलात, तर तुम्हाला फार तर २०-३० मॉडेल्स पाहायला मिळतील. फ्लिपकार्टवर मात्र कुठल्याही वेळी सर्वच्या सर्व मॉडेल्स उपलब्ध असतात. तसंच आम्हाला अनुकूल असणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे किंमत! इलेक्ट्रॉनिक स्टोअरपेक्षा आमच्याकडची किंमत कायम कमी असते.
निखिल सेठी (प्रथम वर्ष, पीजीपीएम) : समजा, अॅमेझॉनकडे दुर्लक्ष केलं, तरी भविष्यात भारतात तुम्हाला कुठल्या प्रकारच्या स्पर्धेचा सामना करावा लागेल असं वाटतं?
बन्सल : अनेक इ-कॉमर्स कंपन्यांशी आम्हाला स्पर्धा करावी लागेल. आम्ही आताच काही नव्या कंपन्या सुरू होताना पाहतो आहोत, ज्या भविष्यात विस्तारणार आहेत.
अर्चना शुक्ला : पाच-सहा वर्षांपूर्वी फ्लिपकार्टला यश मिळवणं शक्य नव्हतं, कारण इंटरनेट वापरणारे लोक खूप कमी होते आणि केवळ त्यांच्या भरवशावर इ-कॉमर्स व्यवसाय तगणं अवघड होतं, असं तुम्हाला असं वाटतं का? त्यामुळे तुमच्या कल्पनेबरोबरच तुम्ही तुमच्या यशाचं श्रेय इथं तयार झालेल्या इंटरनेटकेंद्री व्यवस्थेला द्याल का?
बन्सल : पाया योग्य असल्यामुळे ही प्रगती झाली, असं मला वाटतं. तसंच भारतात इ-कॉमर्स करता येऊ शकतं, हे फ्लिपकार्टने सिद्ध केलं. ती वेळसुद्धा तितकीच महत्त्वाची होती. जे आम्ही २००७मध्ये केलं, ते २००१मध्ये केलं असतं, तर आम्हाला यश मिळू शकलं नसतं.
जिग्याशू शुक्ला (द्वितीय वर्ष, पीजीएचआर) : फ्लिपकार्टचं नोकरभरतीचं धोरण काय आहे? कुशल मनुष्यबळ आकृष्ट करणं आपल्याला अवघड जातं का?
बन्सल : होय. आम्ही काही लोक पाहिले आहेत, ज्यांनी आमची ऑफर नाकारली, कारण त्यांच्या सासवांना त्यांनी आमच्यासाठी काम करणं पसंत नव्हतं. त्यामुळे आम्हाला त्या व्यक्तीला, त्याच्या पालकांना किंवा सासवांना आश्वस्त करावं लागायचं. स्टार्ट अप कंपन्या पगार देतील की नाही, या विषयी या पालकांना शंका असायची. हे मिथक अजूनही अस्तित्वात आहेच, पण आता त्यात बदलही घडतो आहे.
जया चौबे (प्रथम वर्ष, पीजीपीएम) : सांगितलेल्या वेळेच्या दोन दिवस अगोदर फ्लिपकार्ट पुस्तकं पोहोचवतं. ही एक व्यूहनीती आहे का?
बन्सल : आम्ही दोन-तीन दिवसांचा बफर कालावधी ठेवण्याचा प्रयत्न करतो. वेळेवर मात करत ग्राहकांना खूश करण्याची आमची धडपड असतेच.
अनुप्रिया अस्थाना (प्रथम वर्ष, पीजीपीएम) : वैविध्यपूर्ण उत्पादनांची विक्री तुम्ही कशी सुरू केलीत? त्यासाठी योग्य वेळ कशी निवडलीत?
बन्सल : आम्ही पुस्तकांपासून सुरुवात केली. लोक तुम्हाला ओळखायला लागतील आणि तुमच्यावर विश्वास ठेवतील, अशा पद्धतीने ब्रँडची बांधणी करण्याच्या दिशेने आम्ही काम करत होतो. जेव्हा ते घडत गेलं, तेव्हा आम्ही छोट्या पातळीवर वेगवेगळ्या उत्पादनांच्या विक्रीकडे वळायला सुरुवात केली. सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आम्ही एकदमच विकायला सुरुवात केली, असं झालं नाही. आम्ही मोबाईल फोनच्या विक्रीपासून सुरुवात केली आणि त्यातून इलेक्ट्रॉनिक वस्तू विकण्यासाठी नेमक्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते, याचा अभ्यास करत गेलो.
अर्चना शुक्ला : तुमची प्रेरणा नेमकी काय होती? पैसे मिळवणं की कंपनी उभी करणं की आणखी काही?
बन्सल : ‘शिकणं’ ही सगळ्यात मोठी प्रेरणा होती. इतर लोक काहीतरी करत होते आणि त्यात समाधान मिळवत होते. जेव्हा तुम्ही नोकरीत असता, तेव्हा ठरावीक मर्यादेपर्यंतच समाधान मिळतं. आमची भूक मात्र जास्त होती.
अर्चना शुक्ला : नवउद्योजकांना काय सल्ला द्याल?
बन्सल : भारतात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संधींची रेलचेल आहे. जर तुम्ही स्टार्ट अप सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ आहे, पण गृहकर्ज घेऊ नका. ते तुमच्या उद्योजकीय कौशल्यांना मारून टाकतं. तुम्ही त्यातून कधीच बाहेर पडू शकत नाही.
हेमंत चावला (प्रथम वर्ष, पीजीपीएम) : सुरुवातीच्या काळात तुमचं लक्ष्य काय होतं?
बन्सल : ‘नफा’ हे आमचं सुरुवातीचं लक्ष्य कधीच नव्हतं. कारण आम्ही दीर्घकालीन भविष्याचा विचार करत होतो. ब्रेक-इव्हन पॉइंटवर येण्याचा उद्देश साध्य करण्यासाठी पहिल्या दोन वर्षांमध्ये अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणं, हेच आमचं लक्ष्य होतं.
मूळ इंग्रजी मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा - http://indianexpress.com/article/news-archive/web/this-is-the-best-time-for-a-startup-but-dont-take-a-home-loanthat-kills-entrepreneurship/https://goo.gl/wpB92g
(‘इंडियन एक्सप्रेस’च्या ‘आयडिया एक्सचेंज’ या कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या मुलाखतीचा अनुवाद. या कार्यक्रमात एक्सप्रेसच्या पत्रकारांबरोबरच त्यांच्या पत्रकारितेचं शिक्षण देणाऱ्या संस्थेतील विद्यार्थ्यांचाही समावेश असतो. त्यामुळे मुलाखत सांघिक पद्धतीने घेतली जाते.)
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment