अजूनकाही
एक पावसाळी कुंद सकाळ. वातावरणात एक उदासपण भरून होतं. पुण्यातल्या बोट क्लब रोडवरच्या एका उच्चभ्रू सोसायटीच्या बाहेर मी आणि रसिका उभे होतो. माझ्या नेहमीच्या प्रॉब्लेमप्रमाणे मी वेळेच्या खूप अगोदर येऊन पोहोचलो होतो. पुण्यातल्या ट्रॅफिकनं आमचा आज चांगल्या प्रकारे अपेक्षाभंग केल्यानं आम्ही लवकरच पोहोचलो होतो. आम्ही त्या सोसायटीच्या प्रांगणात टाईमपास करण्याचा प्रयत्न केला. पण ये-जा करणारे सोसायटीचे लोक विचित्र नजरेनं आमच्याकडे बघत होते. शेवटी भीड बाजूला सारून मी वेळेच्या अगोदरच फ्लॅटची बेल वाजवली. घड्याळात बघितलं, दिलेली वेळ यायला अजून वीस मिनिटं होतीच. दरवाजा एका छोट्या गोडुल्या मुलीनं उघडला. मी 'शिर्के आहेत का?' अशी विचारणा करताच भुरकन आत पळाली आणि हाताला धरून शिर्केनाच बाहेर घेऊन आली. मला सर्वप्रथम शिर्केना ओळखताच आलं नाही. एकेकाळी धाडधिप्पाड असणारे शिर्के आता बऱ्यापैकी उतरले आहेत. पण हातात हात घेऊन त्यांनी तो दाबताच, या माणसाची ताकद काय असेल याचा अंदाज आला. शिर्केंच्या पत्नी गार्गी शिर्केही घरात होत्या. त्या या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नी असल्या तरी, त्यांची स्वतःची अशी मजबूत ओळख आहे. त्या स्वतः सरकारी नोकरीमध्ये आहेत आणि पीएच.डी. होल्डर आहेत. अनेक राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्या भाषणं द्यायला जातात. 'अर्थातच मला माझ्या नवऱ्याचा अभिमान आहेच, पण स्वतःची ओळख असणंही महत्त्वाचं असतं,’ मृदूपणे हसून त्यांनी सांगितलं. मग त्यांचं अंगावर येणार आदरातिथ्य सुरू झालं. पण मला त्यांच्याशी गप्पा मारण्यात जास्त रस होता. इतक्या वर्षांपासून ते कुठं राहत आहेत? रोहा, दापोली का पनवेल? त्यांनी काम करणं इतकं कमी का केलंय? पुरस्कार सोहळ्यात किंवा अजून तत्सम कार्यक्रमांमध्ये ते अनुपस्थित का असतात? आणि कित्येक. आमच्या झालेल्या गप्पा प्रश्न-उत्तरं या पारंपरिक प्रकारात शब्दबद्ध करायचा प्रयत्न केला आहे. खऱ्या अर्थानं ही मुलाखत नाही. एका फ्लोमध्ये झालेल्या आमच्या गप्पा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रश्नांचा क्रम काय असावा, किती प्रश्न विचारावेत, कुठले प्रश्न विचारावेत याच काहीही प्लॅनिंग नव्हतं. त्यामुळे ही प्रश्नोत्तरं विस्कळीत स्वरूपात वाटण्याची शक्यता आहे. वाचकांनी कृपया गोड मानून घ्या.
प्रश्न - मी कालच पुन्हा 'सरकार' सिनेमा पाहत होतो. त्यात तुम्ही प्रमुख खलनायक होतात. पण ते एकदम शेवटी कळतं.
शिर्के - मी 'सरकार'चं शूटिंग इनमीन दहा दिवसात संपवलं होतं. पण रामूनं माझी थोडी फसवणूक केली. एकतर संपूर्ण स्क्रिप्ट वाचायला दिली नाही. मला स्वतःला चित्रपटाचा शेवट काय असेल याची कल्पना नव्हती. मला रामूनं शूटच्या शेवटच्या दिवशी सांगितलं की, माझा रोल मुख्य व्हिलनचा आहे म्हणून. अगोदरच माझा रोल प्रमुख खलनायकाचा आहे असं सांगितलं असतं तर त्याला मला जास्त पैसे द्यावे लागले असते ना?
मला रामूनं गिरीश ओकांचा आवाज त्यांच्या परवानगीशिवाय त्याच्या एका सिनेमात वापरल्याचं आठवलं. गुणवत्ता वेगळी गोष्ट असते आणि नीतिमत्ता वेगळी.
प्रश्न - 'सरकार' हिट झाल्यानंतर तुमच्या कारकिर्दीला बूस्टर डोस मिळेल असं वाटलं होतं, पण तसं काही झालं नाही.
शिर्के - मलाही अपेक्षा होत्याच, पण मला कामच मिळालं नाही. इंडस्ट्रीमध्ये राहण्यासाठी स्वतःचं मार्केटिंग करण्याची जी कला लागते ती माझ्या अंगी नाही. स्वतः जाऊन कुणाकडे काम मागणं मला कधीच जमलं नाही. आणि का ते माहीत नाही, पण कोणी निर्मात्या-दिग्दर्शकांनीही मला त्यांच्या सिनेमासाठी अॅप्रोच केलं नाही.
प्रश्न - तुमचं मुंबईतलं वास्तव्य कमी असतं म्हणून तुम्ही या लोकांच्या रडारच्या बाहेर गेला असण्याची शक्यता आहे का?
शिर्के – हो, माझ्या पत्नीच्या नोकरीच्या स्वरूपामुळे तिच्या सतत बदल्या होत असतात. माझ्या पत्नीनं माझ्या कारकिर्दीमध्ये, आयुष्यातल्या चढ-उतारांमध्ये माझी नेहमी साथ दिली आहे. एका अभिनेत्याचं आयुष्य हे अनेक वेळा आर्थिकदृष्ट्या अस्थिर असतं. पण मला त्या अस्थिरतेची झळ माझ्या पत्नीच्या नोकरीमुळे फारशी लागली नाही. मग तिच्या नोकरीच्या कामात तिला पाठिंबा देणं हे माझं कर्तव्य समजतो. गेल्या काही वर्षांपासून माझं वास्तव्य मुंबईत कमी आणि रोहा, दापोली आणि पनवेल इथंच जास्त आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुमचा चेहरा एका ठराविक वर्तुळात सतत दिसत राहणं महत्त्वाचं असतं. माझं तसं गेल्या काही वर्षांत झालं नाही.
प्रश्न - तुम्हाला तुमचं पहिलं गाजलेलं नाटक 'टूरटूर' लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे मिळालं असं बोललं जात हे खरं आहे का?
शिर्के – हो, लक्ष्मीकांतमुळेच मला हे नाटक मिळालं. या नाटकापूर्वी मी कधीच कॉमेडी हा प्रकार हाताळला नव्हता. त्यामुळे एवढ्या दिग्गज लोकांसोबत स्टेज शेअर करताना मला खूप भीती वाटत होती. पण लक्ष्मीकांतनं आणि टीमनं मला बरंच सांभाळून घेतलं. मला माझ्या अभिनयाच्या मर्यादा माहीत आहेत. प्रत्येक अभिनेत्याला आपल्या मर्यादा माहीत असणं आवश्यक असतं. माझ्या मर्यादांसकट मी 'टूरटूर'ला शंभर टक्के दिलं. त्यामुळं तो रोल मला जमला.
प्रश्न - लक्ष्मीकांत बेर्डे आणि तुमची मैत्री खूप घनिष्ट होती असं ऐकून आहे.
शिर्के - लक्ष्मीकांत म्हणजे लाख माणूस. माझ्या व्यवसायिक आयुष्यामध्ये आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये त्याचं स्थान खूप महत्त्वाचं होतं. त्याची आठवण आल्याशिवाय अजूनही एकही दिवस जात नाही. लक्ष्मीकांत फिल्मच्या सेटचा प्राण असायचा. नुसता धुमाकूळ. तब्येतीनं खायचा आणि खिलवण्याचा त्याला मोठा शौक. मोठा रॉयल माणूस.
प्रश्न - लक्ष्मीकांत बेर्डेच्या अकाली जाण्याचा तुमच्यावर बराच परिणाम झाला असेल.
गार्गी शिर्के - खूप परिणाम झाला होता यांच्यावर. त्यांनी त्या काळात काम करणं बरंच कमी केलं होतं.
शिर्के - लक्ष्मीकांत शेवटच्या काळात असुरक्षिततेच्या भावनेनं वेढून गेला होता. भरत जाधवसारख्या नव्या नटांचं आगमन होत होतं. नवीन नटांच्या स्पर्धेत आपण टिकू का अशी भीती त्याला वाटत असावी. सर्वच अभिनेते असुरक्षिततेच्या भावनेनं पछाडलेले असतात. लक्ष्मीकांतनं मात्र या असुरक्षिततेमुळे स्वतःच्या तब्येतीकडे प्रचंड दुर्लक्ष केलं. खाण्या-पिण्याकडे खूप दुर्लक्ष केलं. खरं तर लक्ष्मीकांत एवढा टॅलेंटेड होता की, त्यानं एवढं असुरक्षित वाटून घेण्याची फारशी आवश्यकता नव्हती. त्याच्या जाण्यानं माझ्यासारख्या अनेक लोकांचं वैयक्तिक नुकसान झालं हे खरं.
प्रश्न - तुम्ही म्हणता तसं असुरक्षितता हा कुठल्याही नटाच्या आयुष्याचा भागच असतो. तुम्ही या असुरक्षिततेशी कसं डील करता?
शिर्के - माझ्या कपाळावर जितकं लिहिलं आहे, तेवढं मला मिळणार याची मला खात्री असते.
गार्गी शिर्के - यांचा देवावर खूप विश्वास आहे. रोज दिवसातला एक-दीड तास ते पूजा-अर्चा करण्यात घालवतात. खंडोबावर त्यांची खूप श्रद्धा आहे. त्यामुळे कारकिर्दीत अनेक चढ-उतार येऊनही यांना फारशी असुरक्षितता आली नसावी.
प्रश्न - तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही अमिताभ बच्चनसोबत त्याच्या कारकिर्दीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तब्बल चार चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तुमचा बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
शिर्के - बच्चन म्हणजे आपला आब राखून राहणारा इसम. म्हणजे सेटवर तो इतर कलाकारांशी हसून-खेळून बोलतो, हास्य विनोद करतो. पण हे करताना तो स्वतःची एक स्पेस पण ठेवतो. शॉट देऊन झाला की, तो बऱ्याचदा आपल्या कोषात निघून जातो. 'अग्निपथ' चित्रपटात एक मोठा चिखलातला फाईट सीन होता. त्या सीनचं शूटिंग तब्बल दहा दिवस चाललं होतं. सिनेमाचा दिग्दर्शक मुकुल आनंद होता. मुकुल म्हणजे काळाच्या पुढचा दिग्दर्शक. 'अग्निपथ' हा किती चांगला सिनेमा होता हे लोकांना आता कळत आहे. तर या शूटिंगच्या दरम्यान माझा एक छोटा अॅक्सिडेंट झाला आणि माझ्या डोळ्याच्या बाजूला व्रण उमटला होता. मी सेटवर शूटिंगसाठी रिपोर्ट करण्यासाठी गेलो असताना बच्चन यांनी माझी जखम बघितली. त्यांनी मला जवळ बोलवलं आणि माझ्या त्या जखमेबद्दल विचारणा केली. 'एवढी जखम होऊन शूटिंगसाठी का आलास?' अशी विचारणा केली. मी त्यांना म्हणालो की, आता शूटिंग कॅन्सल झालं तर तुमच्या तारखा पुन्हा मिळणार नाहीत म्हणून मी तसाच आलो शूटिंगला. तर बच्चन यांनी निर्मात्याला आणि दिग्दर्शकाला बोलावून सांगितलं की, दिपकची जखम बरी होईपर्यंत शूट कॅन्सल करा. माझ्या तारखांची काळजी करू नका. मी पुन्हा देतो. बच्चन यांचा नम्रपणा आणि सुसंस्कृतपणा सगळ्यांनीच शिकण्यासारखा आहे.
मी अभिषेक बच्चनसोबतही काम केलं आहे. तोही आपल्या वडिलांसारखाच नम्र आहे. अभिनयही चांगला आहे. वडिलांशी होणाऱ्या तुलनेने त्याच्यावर थोडा अन्याय होतो असं मला वाटतं.
प्रश्न - तुमच्या कारकिर्दीतला अजून एक माईलस्टोन रोल म्हणजे 'तिरंगा' सिनेमामधला प्रलयनाथ गेंडास्वामीचा रोल.
शिर्के - दिग्दर्शक मेहुल कुमारशी माझी जुनी ओळख. त्यानं मला रोलसाठी अॅप्रोच केलं तेव्हा मी लगेच होकार दिला. मला राजकुमार यांच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा होती. ती या सिनेमाच्या निमित्तानं पूर्ण झाली. राजकुमारही तसे सेटवर फारसे कुणामध्ये फारसे मिसळायचे नाहीत. पण एके दिवशी त्यांनी मला बोलावून, ‘तू चांगलं काम करतोस’ अशी पाठीवर कौतुकाची थाप दिली. मला तेव्हा फार आनंद झाला होता. आजही पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीच्या सुमाराला हा सिनेमा टीव्हीवर येतोच. प्रेक्षकांच्या मनात माझी आठवण जागृत ठेवण्याचं काम हा सिनेमा करतो.
प्रश्न - अजय फणसेकरच्या 'रात्रारंभ' सिनेमातला रोल पण खूप वेगळा होता.
शिर्के - त्या भूमिकेला दोन शेड होत्या. प्रभावळकरांच्या कल्पनेतला जो माझा रोल होता, तो एकदम डॅशिंग होता आणि प्रत्यक्षातला रोल एक पापभिरू भोळ्या इसमाचा होता. या परस्परविरोधी भूमिका करायला मजा आली होती. यासंबंधी महत्त्वाची आठवण म्हणजे दस्तुरखुद्द नसिरुद्दीन शाह यांनी माझ्या या भूमिकेचं कौतुक केलं होतं.
प्रश्न - रील लाईफ आणि रियल लाईफमध्ये फरक न करू शकणाऱ्या आपल्या समाजात नॉर्मली खलनायकी भूमिका करणाऱ्या लोकांना बरेच त्रास सहन करावे लागतात. उदा. निळू फुले कुठल्या घरी गेले की, त्या घरातल्या बायका त्यांच्यासमोर यायला घाबरत. तुम्हाला असे काही अनुभव आले आहेत का?
शिर्के - आपल्याकडे लोकांवर रील इमेजचा प्रभाव असतो हे खरंच. पण मला चांगले अनुभव आहेत खूप. ‘एक शून्य शून्य’ मालिका गाजल्यावर लोक मला पोलीस ऑफिसरच समजू लागले होते. अनेकदा कुठेही भेटलेले पोलीस हवालदार मला सॅल्यूट करायचे. खूपदा टोलनाक्यावर लोक मला बघताच पैसे न घेताच गाडी सोडून देतात. लोकांचं प्रेम मिळालं खूप.
प्रश्न - इतकी वर्षं इंडस्ट्रीमध्ये काम करून तुमचा माध्यमांमधला वावर इतका कमी कसा काय?
शिर्के - मी जसं काम मागण्यासाठी कुणाकडे जात नाही, तशी माझी मुलाखत घ्या म्हणूनही कुणाकडे जात नाही. खरं सांगायचं तर पत्रकारांना माझी मुलाखत घेण्यात फारसा रस नसावा. मी काही स्टार मटेरियल नाही, त्यामुळे असेल कदाचित. मी एकदा पीआरओ नेमला होता. पण त्याला काही त्याचं काम काही जमलं नाही. मग मी पण पीआरओ लोकांच्या भानगडीत पडलो नाही. पण त्यातून झालं काय की, माझ्याबद्दल बरीच चुकीची माहिती पसरत गेली.
गार्गी शिर्के - एका ठिकाणी तर शक्ती कपूर हा यांचा मेव्हणा आहे अशी माहिती दिली आहे. ही माहिती खूप चुकीची आहे.
दीपक-गार्गी शिके आणि रसिका उदगीरकर
प्रश्न - तुम्ही इतकी वर्षं इंडस्ट्रीमध्ये आहात. तुमचे जवळचे मित्र कोण आहेत?
शिर्के - लक्ष्मीकांत बेर्डे होता. डॅनी माझा खास मित्र आहे. रणजितही जवळचा मित्र. माझी मैत्री खलनायकी भूमिका करणाऱ्यांशीच होते बहुतेक वेळा.
प्रश्न - सध्याचा मराठीमधला प्रॉमिसिंग अभिनेता कोण वाटतो तुम्हाला?
शिर्के - जितेंद्र जोशी. त्याचं 'काकण' आणि 'व्हेंटिलेटर'मधलं काम मला खूप आवडलं होतं.
प्रश्न - तुम्ही मराठीमध्ये आणि हिंदीमध्येही काम केलं आहे. या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो?
शिर्के - हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक संघटितपणा आहे. पैसे जास्त मिळतात. मराठी इंडस्ट्रीमध्ये तुलनेने एक विस्कळीतपणा जाणवतो. पण मराठी इंडस्ट्रीमध्ये आता बरेच सकारात्मक बदल जाणवत आहेत हे खरं.
प्रश्न - तुम्ही गेल्या काही वर्षांमध्ये एकदम निवडक भूमिका करत आहात. काम कमी करण्याचं काही विशेष कारण?
शिर्के - निवडक भूमिका वगैरे काही नाही. मुळात मला भूमिकाच मिळत नाहीयेत. प्रॉडक्शन हाऊसमध्ये कामं करणारे पोरं-पोरी मला ओळखतच नाहीत. त्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या भूमिकाच कमी झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बी. पी. सिंग यांनी मला घेऊन एक पायलट एपिसोड शूट केला. तर प्रॉडक्शन हाऊसच्या लोकांनी बी.पी. सिंग ला सांगितलं की, ‘हे कोण अंकल आहेत? यांच्या जागी कुणीतरी तरुण अभिनेत्याला घ्या.’ त्या पोरांना मी कोण आहे हे पण माहीत नव्हतं. बी. पी. सिंगसारखा इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षं घालवलेला सिनियर माणूस, पण या सिस्टमसमोर हतबल आहे. शेवटी तो रोल गेला हातातून. आताही माझ्या हातात सांगण्यासारखं काहीही काम नाही.
प्रश्न - मोठ्या पडद्यावर किंवा छोट्या पडद्यावर तुमचं न दिसणं समजू शकतो, पण पुरस्कार सोहळे आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्येही तुम्ही दिसत नाहीत?
शिर्के - मी जात नाही तिथं. कारण तिथं गेलं की, आपण इंडस्ट्रीमधून हळूहळू बाहेर फेकलो जातो आहोत, ही जाणीव खूप त्रास द्यायला लागतो. म्हणजे तुम्ही माझ्या आजूबाजूलाच फिरा असं माझं म्हणणं नाही किंवा माझ्यावरच लक्ष द्या असं म्हणणं नाही, पण किमान माझ्या वयाचा आणि अनुभवाचा आदर तरी ठेवा. आमच्या काळी कुणी सीनियर माणूस आला की, आम्ही उठून उभे राहायचो. आता तसा सन्मान द्यायची पद्धत संपत आली आहे. आपण आऊटडेटेड होत चाललो आहोत की, काय ही भावना त्रास देते.
गार्गी शिर्के - यांना रोज अनेक कार्यक्रमांची आमंत्रणं येत असतात. पण हे जात का नाहीत याचं मला आश्चर्य वाटायचं. शेवटी मीच एकदा जोरजबरदस्ती करून त्यांना एका कार्यक्रमाला घेऊन गेले. तिथं आम्हाला शेवटच्या ओळीत कोपऱ्यातल्या दोन जागा दिल्या होत्या. अनेक ज्युनियर लोकांची सरबराई चालू असताना आमच्याकडे कुणाचं लक्षही नव्हतं. इतके लोक आले पण यांना ‘हॅलो’ म्हणायलाही कुणी आलं नाही. मलाच यांना इथं का घेऊन आले याचा पश्चाताप झाला. मान खाली घालून आम्ही परत आलो. तेव्हा मला कळलं की, हे कार्यक्रमाला का जात नाहीत ते.
.............................................................................................................................................
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
बऱ्याच 'ऑफ द रेकॉर्ड' गप्पा मारल्यावर मला जाणवलं की, आपण या माणसाचा बराच वेळ घेतला आहे. आता निघायला हवं. बऱ्याच गोष्टी तरी बोलायच्या राहून गेल्या. 'गुंडा'चं तर नावच त्यांना आठवत नव्हतं. कांती शाहची फिल्म म्हणताच त्यांची बत्ती जळाली. पण त्या सिनेमाबद्दल बोलण्यास ते फारसे उत्सुक दिसले नाहीत. थोडा अजून आग्रह केला असता तर कदाचित बोलले पण असते. शिर्के रसिकाशी बोलत होते. तेव्हा त्यांचं लक्ष नसताना गार्गी शिर्के मला म्हणाल्या, “तुमच्या यांच्यावर लिहिलेल्या लेखाची प्रिंट आउट काढून ठेवली आहे त्यांनी. नेहमी काढून वाचत बसतात. त्यांच्याबद्दल कुणी लिहिलंच नाही आतापर्यंत इतकं." मला एकाच वेळेस आनंद झाला आणि विषादही वाटला. त्यांचा निरोप घेऊन आम्ही बाहेर आलो, तेव्हा दोघंही गॅलरीमध्ये उभं राहून आमच्याकडे बघत होते. सकाळी भरून आलेलं आभाळ आता मोकळं झालं होतं. मस्त सूर्यप्रकाश पडला होता. मी गाडीला किक मारली आणि निघालो तेव्हा बाल्कनीमधून शिर्केनी हात हलवून निरोप दिला. पहिल्या असणाऱ्या पण नक्कीच शेवटची नसणाऱ्या भेटीचा छान समारोप झाला होता.
.............................................................................................................................................
लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.
amoludgirkar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Swapnil Suryavanshi
Tue , 01 January 2019
मस्तच लिहिलय तुम्ही..
ADITYA KORDE
Mon , 23 October 2017
त्यांची वेटीलेटर मधली छोटीशी भूमिकाछान होती. फार चटका लाऊन गेली. तसेच ENCOUNTER मधली देखील...अतिशय उत्तम लेख ....