अजूनकाही
पत्रपंडित गोविंद तळवलकर यांचं २१ मार्च २०१७ रोजी निधन झालं. त्यानंतर त्यांच्याविषयी अनेकांनी लेख लिहिले. तो ओघ अजूनही थांबलेला नाही. नुकत्याच बाजारात दाखल झालेल्या काही दिवाळी अंकांमध्येही तळवलकर यांच्याविषयीचे लेख आहेत. हे सर्व लेख तळवलकरांचं थोरपण, मोठेपण, त्यांचा दबदबा यांविषयी सांगतात. त्यातले काही माझ्यावर तळवलकरांचा कसा लोभ होता, त्यांनी कसं मला खास ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये बोलावून घेतलं, मी त्यांच्या किती जवळ होतो वगैरे एवढंच सांगण्यासाठीही लिहिलेलेही लेख आहेत. या ‘तळवलकर भक्ती’मुळे तळवलकरांचं नेमकं मराठी पत्रकारितेला योगदान काय, याची फारशी स्पष्ट कल्पना आजच्या विशी-पंचविशीतल्या पिढीला येत नाही. शिवाय तळवलकर हे सर्वगुणसंपन्न आणि खरोखरच महान होते, असं बहुतेकांनी ठरवून टाकल्यामुळे त्यांच्यापासून काहीएक प्रेरणा, अभ्यास-व्यासंगाची दीक्षा घेण्याऐवजी त्यांची भीतीच वाटण्याची शक्यता आहे.
एखाद्या व्यक्तीला आधीच्यांनी ‘देव’पण दिलं की, नंतरच्या पिढीच्या वाट्याला फक्त नमस्कार करण्याचंच काम येतं. तसं होऊ नये, तळवलकरांचंच तर नक्कीच होऊ नये, म्हणून तळवलकरांचं मूल्यमापन करण्याचा हा प्रयत्न आहे. यातील फक्त मुकेश माचकर यांचा लेख नव्यानं लिहून घेतलेला आहे. बाकीचे तिन्ही लेख लेखकांच्या पूर्वपरवानगीने पुनर्मुद्रित केले आहेत. नव्यानं इतके चांगले लेख कुणी लिहू शकेल असं आम्हाला वाटलं नाही किंवा त्यांच्यापर्यंत आम्ही वेळेत पोहोचू शकलो नाही. मात्र इथं पुनर्मुद्रित केलेले लेख वाचकांना सहजासहजी मिळणार नाहीत.
दिनकर गांगल यांचा लेख ‘रूची’च्या मे २०१७च्या अंकातून घेतला आहे, तर निखिल वागळे आणि मंगला आठलेकर यांचे लेख तळवलकरांच्या निवृत्तीनंतर दै. महानगरमध्ये प्रकाशित झाले होते. ते लगोलग नंतर ‘रूची’मध्येही पुनर्मुद्रित करण्यात आले. इथं ‘रूची’मधून ते घेतले आहेत. म्हणजे दोन लेख तळवलकरांच्या निवृत्तीनंतर प्रकाशित झालेले आहेत, तर एक लेख त्यांच्या निधनानंतर. एक लेख मात्र खास या अंकासाठी लिहून घेतलेला आहे. गेल्या २०-१२ वर्षांत तळवलकरांचं तटस्थ मूल्यमापन करणारे एखाद-दुसरा अपवाद वगळता हे एवढेच लेख आहेत.
तळवलकरांविषयी त्यांची थोरवी सांगणारेच लेख इतरत्र प्रकाशित झाले म्हणून ‘अक्षरनामा’वर त्यांच्यावर जाणीवपूर्वक टीका करणारे लेख छापण्याचा आगाऊपणा केला आहे, असं कुणाला वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ‘तळवलकर – एक मूल्यमापन’ या परिसंवादाबाबतची भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. तळवलकरांच्या सहवासात आलेल्या, त्यांच्यासोबत काम केलेल्या किंवा त्यांच्या संपादकीय कारकिर्दीत ‘महाराष्ट्र टाइम्स’हे वर्तमानपत्र नियमित वाचणाऱ्या कुणाच्याही लेखात त्यांच्या कामाचा समग्र आढावा येऊ शकत नाही, आलेला नाही आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, कार्याचे सर्वच पैलू त्यातून उलगडले जाऊ शकत नाहीत, गेलेले नाहीत.
दुसरा त्यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा असा की, तळवलकर हे मराठीतले थोर संपादक होते, आहेत आणि राहतील. त्यांची जागा येत्या काही वर्षांत तरी कुणाला घेता येईल असं वाटत नाही. अर्थात तळवलकरांचा काळही आता राहिलेला नाही, त्या काळची पत्रकारिताही राहिलेली नाही. त्यामुळे ‘प्रति-तळवलकर’ निर्माण होण्याची शक्यता दुरापास्तच आहे. अशा ‘लिजंड’ संपादकाचं काहीसं तटस्थ, परखड मूल्यमापन व्हायला हवं, एवढीच यामागची भूमिका आहे. तळवलकर मराठी पत्रकारितेच्या संदर्भात एक अतुलनीय नाव राहणार आहे. त्यामुळे त्यांचं पुन्हा पुन्हा मूल्यमापन होणं गरजेचं आहे. त्यातून त्यांचं योगदान नेमकंपणानं जाणून घ्यायला मदत होईल. त्यांच्याबाबत काळाच्या ओघात निर्माण झालेले गैरसमज, दंतकथा, भाकडकथा दूर होऊ शकतील. इतर लेखकांकडून कळत-नकळत झालेले अन्याय दूर व्हायला मदत होईल.
.............................................................................................................................................
नवनवीन पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
लोकोत्तर व्यक्ती मरणोत्तर आणखी मोठ्या होतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल बढाया मारण्याचे, त्यांच्याविषयी दंतकथा तयार करण्याचे आणि त्या व्यक्तीच्या निमित्ताने स्वत:चं नसलेलं श्रेष्ठत्व मिरवण्याचं काम काही मतलबी लोक करत असतात. त्यांच्या मनसुब्यांना थोडीफार टाचणी लावावी आणि आजच्या-उद्याच्या तरुण पत्रकारांना तळवलकर नेमकेपणानं समजून घेता यावेत, त्यांच्याविषयी नुसता ‘नमस्कारतुल्य’ धसका न वाटता, त्यांच्यापासून काहीएक प्रेरणा घेता यावी, हा एकमेव हेतू असलाच तर या आगावूपणामागे आहे.
व्यक्ती-चिकित्सेकडे आपल्याकडे- विशेषत: महाराष्ट्रात फारच कद्रूपणानं पाहिलं जातं. व्यक्तिस्तोमाचे देव्हारे माजवण्याचं काम मात्र इमाने-इतबारे केलं जातं. अनेकदा व्यक्ती-चिकित्सेच्या नावाखाली हेत्वारोप केले जातात आणि त्यामुळे तसं लेखन करणाऱ्यांकडेही पूर्वग्रहानं पाहिलं जातं. या परिसंवादातल्या लेखांबाबत मात्र तसं होणार नाही, होऊ नये. कारण तळवलकर, त्यांचा काळ आणि त्यांचं कर्तृत्व हे नीट समजून घेऊन त्यांकडे तटस्थपणे पाहणारे हे लेख आहेत. त्यातील दोन त्यांच्या माजी सहकाऱ्यांनी लिहिले आहेत, तर वागळे यांनी तळवलकरांची पत्रकारिता जवळून पाहिलेली आहे. आठलेकर यांचा लेख पूर्णपणे तळवलकरांच्या मुलाखतीवरच आधारित आहे.
तळवलकर यांच्याविषयी पूर्ण आदर व्यक्त करत हे चारही लेख लिहिले गेले असल्यानं त्याकडे त्याच पद्धतीनं पाहिलं जाईल अशी अपेक्षा अनाठायी ठरू नये, ठरणार नाही, असं वाटतं.
.............................................................................................................................................
तळवलकर – एक मूल्यमापन
१) भाग्यवान तळवलकर - मुकेश माचकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/1385
२) ‘मटा’, ‘मौज’, ‘माणूस’ आणि तळवलकर (पूर्वार्ध) - दिनकर गांगल
https://www.aksharnama.com/client/article_detail/1384
‘मटा’, ‘मौज’, ‘माणूस’ आणि तळवलकर (उत्तरार्ध) - दिनकर गांगल
https://www.aksharnama.com/client/article_detail/1383
३) तळवलकरांची मनमानी - मंगला आठलेकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/1382
४) तळवलकर यांचा तुच्छतावाद - निखिल वागळे
https://www.aksharnama.com/client/article_detail/1381
.............................................................................................................................................
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Bhagyashree Bhagwat
Mon , 23 October 2017
khankanit!