अजूनकाही
‘काळानुसार सर्व काही बदलत जातं’ असं म्हणतात. मग त्याला पत्रकारितेचं क्षेत्र तरी कसं अपवाद असेल? गेल्या काही वर्षांत पत्रकारिताही खूप बदलली आहे, हे पत्रकारितेतून निवृत्त झालेल्यांना, सध्या पत्रकारितेत काम करणाऱ्या आणि पत्रकारितेशी संबंधित असणाऱ्या सर्वच घटकांना प्रकर्षानं जाणवत आहे. भारतात अगदी सुरुवातीपासून पत्रकारिता हे व्रत (वसा) आहे, अशा अर्थानं पत्रकारितेकडे पाहिलं जातं. आजही पत्रकारितेकडे त्या दृष्टीनं पाहणारे असंख्य लोक आहेत. पत्रकारितेमध्ये काम करणारे बरेच जण या व्रताला जागणारेही आहेत. मात्र आता ही संख्या झपाट्यानं कमी होताना दिसत आहे. याचं मुख्य कारण इतर उद्योगधंद्यांप्रमाणे पत्रकारितेलाही आता व्यावसायिकतेच्या नावाखाली धंद्याचं स्वरूप आलं आहे. त्यात पुन्हा 'फिल्मी पत्रकारिता' म्हटली तर चित्रपटउद्योग हाच आता एक चांगला धंदा होऊन बसला आहे. पैसा गुंतवण्याचं एक साधन अनेकांना चित्रपट उद्योगामुळे मिळालं आहे. त्यामुळे त्याच्याशी निगडित असलेली ‘फिल्मी पत्रकारिता’ही आता पूर्णपणे 'धंदेवाईक' झाली आहे, असं म्हटलं तर ते फार धाडसाचं ठरणार नाही.
खरं तर 'मोहमायानगरी' ही चित्रपटसृष्टीची पहिल्यापासून ओळख. या ग्लॅमरस दुनियेत टिकून राहायचं असेल तर प्रसिद्धी हवीच. त्यामुळे अगदी सुरुवातीपासून चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांना प्रसिद्धीची गरज असते. हाताच्या बोटांवर मोजता येणारे कलाकार वगळता सर्वच कलाकारांना प्रसिद्धीचा हव्यास होता. आणि एकेकाळची 'फिल्मी पत्रकारिता' त्यांची प्रसिद्धीची गरज इमाने-इतबारे पूर्ण करायची. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमंही फार कमी होती. प्रामुख्यानं मुद्रित माध्यमांवर अधिक भर होता. त्यामुळे ज्यांना चित्रपटसृष्टीची माहिती होती आणि चित्रपटविषयक लेखनाची आवड होती, अशाच पत्रकारांचा 'फिल्मी पत्रकारिते'त दबदबा होता. त्या काळात 'गॉसिपिंग' हे 'प्रसिद्धी' मिळवण्याचं (वा देण्याचं) एक प्रमुख 'तंत्र' होतं आणि काही फिल्मी पत्रकार या तंत्राचा खुबीनं वापर करण्यात फारच महशूर होते. देवयानी चौबळ यांचं नाव त्यामध्ये आघाडीवर होतं. मात्र आता काळ एवढा बदलला आहे, की आता सेटवर, बाह्यचित्रीकरणाच्या वेळी आणि पत्रकार परिषदांमध्येदेखील इतकं 'खुल्लमखुल्ला' वातावरण असतं की, 'गॉसिपिंग'मध्ये सांगता येणाऱ्या काही गोष्टी आता अनेकदा सगळ्यांच्या समोर खुलेआम घडत असतात. शिवाय पूर्वी 'गॉसिपिंग' तंत्राचा 'शिडी' म्हणून वापर करता येत असे, मात्र आता 'शिडी' म्हणून इतर अनेक 'तंत्रा'चा आणि 'अंगा'चा वापर केला जातो. त्यामुळे साहजिकच 'गॉसिपिंग'चं तंत्र आता बाजूला पडलं आहे. अर्थात काही वाहिन्या या तंत्राचा आपला टीआरपी रेट वाढवण्यासाठी अजूनही वापर करत आहेत.
फिल्मी पत्रकारितेमध्ये महत्त्वाचे बदल होण्याचं मुख्य कारण म्हणजे माध्यमांमध्ये वेगानं होत गेलेले बदल. पूर्वी फक्त दैनिकं, साप्ताहिकं, मासिकं व अन्य नियतकालिकांमधून चित्रपटविषयक वृतान्त प्रसिद्ध व्हायचे. खास चित्रपटविषयाला वाहिलेली 'रसरंग'सारखी लोकप्रिय साप्ताहिकंदेखील त्या काळात होती. हिंदीमध्ये 'मायापुरी' तर इंग्रजीत 'स्क्रीन'सारखं साप्ताहिक व 'फिल्मफेअर'सारखी मासिकं आघाडीवर होती. बाबुराव पटेल यांच्यासारख्या संपादकांनी आपल्या 'फिल्म इंडिया'द्वारे चित्रपटसृष्टीत वेगळाच दबदबा निर्माण केला होता. त्यामुळे तत्कालीन कलावंतांना आपल्याविषयी वा आपल्या चित्रपटांविषयी प्रसिद्ध झालेला मजकूर 'वाचण्या'खेरीज पर्याय नव्हता.
साठच्या दशकानंतर हिंदी चित्रपटसृष्टीवर असलेलं दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद यांचं 'गारुड' हळूहळू कमी होत गेलं. कारण अनेक नवीन कलाकारांचा उदय झाला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत मन्वंतर घडू पाहत होतं. आणि हिंदीप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीनंही कात टाकली होती. मराठी चित्रपट 'तमाशा'च्या कोशातून बाहेर पडला होता. महेश कोठारे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे आदी नवीन तरुण कलावंत मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवण्यात यशस्वी झाले होते.
त्या काळात कोणत्याही चित्रपटाची प्रसिद्धी करताना पत्रकारांशी दोनदा 'संवाद' साधला जायचा. पहिल्यांदा चित्रपट कोणता आहे, त्याचं अंतरंग कसं आहे आणि तो केव्हा प्रदर्शित होणार आहे याची माहिती सांगण्यासाठी म्हणून खास पत्रकार परिषद आयोजित केली जायची. आणि त्या पत्रकार परिषदेला निर्माता-दिग्दर्शकांसह चित्रपटातील प्रमुख कलावंत आणि तंत्रज्ञ उपस्थित असायचे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पत्रकार परिषद व्हायची.
त्यानंतर जेव्हा चित्रपट प्रदर्शित व्हायचा त्या दिवशी चित्रपटाच्या 'प्रिमिअर' नंतर पुन्हा पत्रकारांसाठी हॉटेलमध्ये 'साग्रसंगीत' पत्रकार परिषद व्हायची. पत्रकारांनी चित्रपट पाहिलेला असायचा. त्यामुळे दिग्दर्शक-कलावंतांवर प्रश्नांची भरपूर सरबत्ती व्हायची. पत्रकार परिषद 'साग्रसंगीत' असल्यामुळे अनेकांचे 'मूड' वेगवेगळे असायचे. शिवाय स्वतःला तज्ज्ञ समीक्षक म्हणवून घेणारे काही पत्रकार चित्रपटाची अक्षरशः 'चिरफाड' करायचे, मात्र तरीही त्यामध्ये कोठेही कटुता नसायची. कारण चित्रपटातील चुका खुल्या मनानं मान्य करायची दिग्दर्शकाची त्या वेळी तयारी असायची.
मात्र हल्लीच्या काळात कोणत्याही चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी शक्यतो एकच पत्रकार परिषद होते. तीही झाली तर. अन्यथा त्याचीही गरज आता काहीजणांना भासत नाही. कारण अनेकदा निर्मात्यांकडे प्रसिद्धी व मार्केटींगसाठी 'बजेट'च शिल्लक राहत नाही. अनेक चित्रपटांची हवी तशी प्रसिद्धीच होत नाही. त्यामुळे असे चित्रपट कधी लागून जातात तेही कळून येत नाही. निर्माता किंवा 'प्रॉडक्शन हाऊस' आर्थिकदृष्ट्या सक्षम असलं तर हल्ली चित्रपटाचा 'प्रिमिअर'ही कधी कधी आयोजित केला जातो अथवा 'प्रेस शो' ठेवला जातो. मात्र चित्रपट पाहिल्यानंतर पुन्हा पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधणं आता जवळपास बंद झाले आहे. कारण चित्रपट पाहिल्यानंतर निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं धाडस वा चुका कबूल करण्याचा 'मोठेपणा' नव्या दिग्दर्शकांकडे असेलच याची हल्ली कोणाला खात्री देता येत नाही. आम्ही जे पडद्यावर दाखवलं आहे, तेच योग्य आणि 'अंतिम सत्य' आहे, असा ठाम आग्रहीपणा अनेक नव्या दिग्दर्शकांकडे दिसून येतो.
समीक्षणामध्ये चित्रपटाची कितीही चिरफाड केलेली असली तरी संबंधित दिग्दर्शक फारसा मनावर घेत नाही. कारण त्यानं ते समीक्षण वाचलेलं असेलच याची हमी कोणीही देऊ शकत नाही. जरी वाचलेलं असलं तरी मोठ्या मनानं ते त्याच्याकडून स्वीकारलं जाईल याचीही खात्री देता येत नाही. शिवाय चित्रपटाचा धंदा अशा समीक्षणांवर चालत नाही, हेही अनेकांना (त्या समीक्षकांसह) माहीत असतं.
पुण्यात मात्र काही चित्रपट रसिक 'समीक्षण' वाचूनच चित्रपट पाहायला जातात, ही वस्तुस्थिती आहे. अर्थात हे प्रमाण तसं खूप कमी आहे. काही चित्रपट समीक्षक मराठी चित्रपटांवरील प्रेमापोटी हात राखून टीका करतात. कारण मराठी चित्रपटसृष्टीला आलेले चांगले दिवस पुढेही टिकून राहावेत, अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असते, ही वस्तुस्थिती नजरेआड करून चालणार नाही. परंतु आता पहिल्यासारखे चांगले समीक्षकही राहिले नाहीत, हेही तेवढंच खरं.
शिवाय आता चित्रपटाची समीक्षाही 'धंदेवाईक' झाली आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी वृत्तपत्रांनी वा अन्य प्रसिद्धी माध्यमांनी सुरू केलेला 'पॅकेज'चा नवीन फंडा. हल्ली संबंधित चित्रपटाचं 'पॅकेज' डील झालं, तरच त्याला पूर्वप्रसिद्धी आणि नंतर समीक्षणांसह प्रसिद्धी दिली जाते. मात्र अशा वेळी समीक्षण लिहिताना चित्रपट 'टुकार' असला तरी नाईलाजानं त्याला झुकतं माप द्यावं लागतं. कारण संबंधित वर्तमानपत्राच्या मार्केटिंग विभागाची तशी अपेक्षा असते आणि व्यवसायापोटी ती अपेक्षा पूर्ण करणं क्रमप्राप्त ठरतं.
एखाद्या चित्रपटाचं जर 'पॅकेज' डील झालं नाही तर त्याला पूर्वप्रसिद्धी मिळेलच याची आता कोणीही हमी देऊ शकत नाही. इतकंच काय त्या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेची (संबंधित वर्तमानपत्राचा बातमीदार हजर असूनही) चार ओळीची बातमीदेखील प्रसिद्ध होऊ शकत नाही. मग तो चित्रपट कितीही चांगला वा गाजणारा असला तरीही त्याला पूर्वप्रसिद्धी वा नंतरही कसलीच प्रसिद्धी दिली जात नाही.
यासंदर्भात एक उदाहरण पुरेसं बोलकं आहे. केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चाललेल्या 'सैराट’ या चित्रपटाबाबत पुण्यातील एका प्रमुख वर्तमानपत्रामध्ये एक ओळही छापून आली नव्हती. कारण त्या चित्रपटाचं 'पॅकेज' डील झालेलं नव्हतं. चित्रपट उद्योगाप्रमाणेच पत्रकारितेलाही कसं 'धंदेवाईक' स्वरूप प्राप्त झालं आहे हे यावरून कळून येतं.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हल्ली स्थानिक पातळीवरही इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांचा सुळसुळाट झाल्यामुळे निर्माता-दिग्दर्शक, तसंच कलाकारांचंही मुद्रित माध्यमांकडे नाही म्हटलं तरी दुर्लक्ष होतं. पत्रकार परिषदांमध्ये हल्ली त्याचं प्रत्यंतर वारंवार येतं. पत्रकार परिषद संपली न संपली की, कलाकारांसमोर इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांच्या प्रतिनिधींचा गराडा पडतो आणि त्यांना मुलाखती दिल्यानंतर कलावंत लगेच निघून जाणं पसंत करतात. त्यामुळे कलावंत आणि पत्रकारांमधील पहिल्यासारखा सुसंवाद हल्ली फारसा राहिलेला नाही असं खेदानं म्हणावं लागेल. आपल्या चित्रपटाची बातमी व आपली मुलाखत इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांवर आली की, कलावंतांनाही कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. कारण हल्ली वाचायला कोणाला वेळ आहे? त्यामुळे पत्रकार परिषद घेऊन एखाद्या चित्रपटाची 'हवा' करण्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांवरील एखाद्या कार्यक्रमात आपल्या चित्रपटाची 'हवा' करण्याकडे (भले त्याचा खर्च जास्त असला तरी) निर्माता- दिग्दर्शकांचा अधिक कल असतो.
.............................................................................................................................................
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
पत्रकारितेमधील 'फिल्मी पत्रकारांची' संख्याही आता हाताच्या बोटावर मोजता येईल इतकी कमी झाली आहे. पत्रकारांच्या नवीन पिढीमध्ये चित्रपटाच्या अभ्यासाची गोडी असणारे पत्रकार अभावानंच आढळतात. त्यामुळे पूर्वी पत्रकार परिषदांमध्ये समर्पक संवादाची जी देवाणघेवाण चालायची, ती आता दिसेनाशी झाली आहे. नवख्या पत्रकारांच्या डोळ्यासमोर तर नट-नट्यांबरोबर फोटो काढणं (त्यामध्ये 'सेल्फी' आलीच) आणि तो फेसबुकवर टाकणं एवढाच पत्रकार परिषदेचा मुख्य हेतू असतो. त्यांच्या या 'सेल्फिश' वृत्तीमुळे हल्ली पत्रकार परिषदांमध्ये काही 'राम' राहिला नाही. कारण कधी एकदा पत्रकार परिषद संपते आणि आपण कधी एकदा नट-नट्यांबरोबर फोटो काढतो असं या पत्रकारांना झालेलं असतं. त्यामुळे नंतर त्यांची फोटोसाठी झालेली 'भाऊगर्दी' अनेकदा किळसवाणी ठरते. अर्थात संबंधित चित्रपटाचे कलाकारही नाईलाजानंच त्या फोटोसेशनला तयार झालेले असतात. कारण पत्रकारांना कोण कशाला नाराज करेल?
याशिवाय अनेकदा हे नवखे पत्रकार काहीही प्रश्न विचारून (कारण चित्रपटांबाबत अभ्यास करतो कोण?) स्वतःची नाही, मात्र ज्यांना पत्रकारितेची चाड आहे, अशांनाही खाली मान घालायला लावतात. पुण्यात 'कट्यार काळजांत घुसली' या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेल्या एका नवख्या महिला पत्रकारानं अगदी सर्वांत शेवटी दिगदर्शकाला ''तुम्ही या चित्रपटाला 'कट्यार काळजांत घुसली' असंच नाव का दिलं? असा प्रश्न विचारला. त्यामुळे साहजिकच दिग्दर्शकाबरोबर सारेच अवाक झाले. मात्र दिग्दर्शकांनी 'नाटकाचंही तेच होतं' असं सांगून वेळ मारून नेली. मात्र त्या महिला पत्रकाराचं 'कट्यार'बाबत किती अगाध ज्ञान होतं, हे यानिमित्तानं उघड झाल्यामुळे पत्रकारितेचंही हसं झालं.
दुसऱ्या एका चित्रपटासंबंधीच्या पत्रकार परिषदेत ज्याच्या नावावर 'धुमधडाकेबाज' असे पन्नास-साठ चित्रपट आहेत, अशा लेखकाला एका नवख्या पत्रकारानं 'तुमचा हा लेखक म्हणून पहिलाच चित्रपट आहे काय? असा प्रश्न विचारला. बिचाऱ्या त्या लेखकाला आपलं तोंड लपवणं कठीण झालं. थोड्याच वेळात तो लेखक पत्रकार परिषदेमधून दिसेनासा झाला. एका 'अज्ञानी पत्रकारा'च्या प्रश्नामुळे त्यानं स्वतःलाच असं शासन करून घेतलं.
अतिशय 'बोल्ड' भूमिका करून अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या एका 'बिनधास्त' मराठी अभिनेत्रीनं मात्र असाच विचित्र प्रश्न विचारणाऱ्या एका पत्रकाराला 'तुम्ही आधी माझ्या चित्रपटांची नावं माहीत करून घ्या' अशा स्पष्ट शब्दांत समज देऊन चांगलंच फटकारलं होतं.
चित्रपटांच्या प्रसिद्धीचं काम पाहणारा 'पी. आर.' हा चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आणि पत्रकारांमधील 'दुवा' मानला जातो. मात्र त्यालाही आता व्यावसायिकतेनं झपाटलं आहे. येनकेनप्रकारे चित्रपटाला प्रसिद्धी कशी मिळेल याकडेच त्याचं अधिक लक्ष असतं. त्यामुळे पत्रकार परिषदांना चार चांगले अभ्यासू पत्रकार येण्यापेक्षा भाऊगर्दी करणारी जास्तीत जास्त 'टाळकी' कशी येतील, या गोष्टीलाच तो जास्त प्राधान्य देतो.
थोडक्यात हल्ली 'फिल्मी पत्रकारिता' पूर्णपणे धंदेवाईक झाली आहे. त्यामुळे पूर्वीसारखी चित्रपटांबाबत 'आस्था' राहिली नाही. 'कालाय तस्मे नमः', दुसरं काय!
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment