गेल्या काही वर्षांपासून मेनस्ट्रीम म्हणवणारा मीडिया उथळ बातम्या दाखवत असल्याची तक्रार केली जात आहे. २०१७ मध्ये ही तक्रार ‘इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये’ इथपर्यंत येऊन ठेपली आहे. स्पर्धेच्या युगात न्यूज इंडस्ट्रीमध्ये अग्रभागी राहण्यासाठी न्यूजच्या ब्लॅक प्रॅक्टिसेस सुरू असतात, हे आता काही लपून राहिलेलं नाही. त्यामुळे मीडियाच्या उथळतेऐवजी आपण टीव्ही का व कशासाठी बघतो याची उत्तरं आधी स्वत:हून तपासून बघितली पाहिजेत, त्यानंतर न्यूज चॅनेल बघण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करता येईल. जामिया मिलिया विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या वेबपेजवर यासंदर्भात काही रिसर्च पेपर्स प्रकाशित करण्यात आले आहेत. त्याचा ढोबळमानानं निष्कर्ष काढला तर, सुमारे ६० ते ७० टक्के सहभागी केवळ मनोरंजन म्हणून टीव्हीवरच्या बातम्या पाहत असतात. असाच काहीसा रिसर्च देशातील बऱ्याच विद्यापीठांत असण्याची शक्यता आहे. यातून सामान्य माणूस टीव्ही का पाहतो, याची उत्तरं मिळू शकतात. याच निष्कर्षाच्या आधारे टीव्ही इंडस्ट्रीवाले कंटेंट तयार करतात. मग ते इंटरटेनमेंट असो वा न्यूज चॅनेल, दोन्हींना हाच नियम लागू होते.
सहा वर्षांपूर्वी म्हणजे मे २०११मध्ये औरंगाबादमध्ये ‘दिव्य मराठी’ हे मराठी वर्तमानपत्र सुरू झालं. वर्तमानपत्र सुरू होण्याच्या आधी किमान सात-आठ महिने वर्तमानपत्राचे मालक नवीन वर्तमानपत्रामध्ये वाचकांना काय हवंय याबद्दल सर्वेक्षण करत होते. सर्वेक्षण पार पडल्यानंतर नवं कोरं वर्तमानपत्र बाजारात दाखल झालं. लोकांनी हातोहात ते घेतलं. याआधी ‘लोकमत’चं आगमनही असंच काहीसं झाल्याचं ऐकिवात आहे. मात्र, इलेक्ट्रॉनिक मीडियात असं सर्वेक्षण झाल्याचं माझ्या माहितीत नाही. ‘IBN’ ग्रूप मराठी न्यूज इंडस्ट्रीमध्ये येताना प्रशिक्षित कर्मचारी घेऊन आल्याचं सर्वांनाच माहिती आहे. हाच पॅटर्न अजूनही मराठी न्यूज इंडस्ट्रीत वापरला जातो.
भारतात मीडिया सुरू झाला त्या वेळी विशिष्ट हेतू आणि उद्देश होता. आता मात्र, तो उद्देश राहिलेला नाहीये. त्यामुळे अलिकडची माध्यमं इन्फोटेनमेंट अर्थात माहितीरंजनाकडे (माहिती + मनोरंजन) वळली आहेत. त्यानुसार प्रिंट वा इलेक्ट्रॉनिक माध्यमं बातम्यांचा मजकूर देत असतात. २० पानी वर्तमानपत्रात महत्त्वाची बातमी देण्याऐवजी एखाद्या रंजक बातमीनं कॉलम भरला जातो. त्याचप्रमाणे बुलेटीनच्या थर्ड सेगमेंटमध्ये सॉफ्ट बातमीच्या नावानं उथळ बातमी देऊन वेळ मारून नेली जाते. रविवार किंवा शासकीय सुट्टीच्या दिवशी बातम्यांची न्यूजरूमला वानवा असते. यावेळी जुन्या बातमीला नवा साज चढवून रंजक आणि भडकपणे सादर केलं जातं. कधी कुत्र्यांचा रॅम्प वॉक, तर जंगलात रात्रीच्या अंधारता नुसता फिरणारा बिबट्या बुलेटिनचे सेगमेंट भरायला उपयोगी पडतात. तर कधी अशा बातम्या पहिल्या सेगमेंटला चालवल्या जातात. काही नमुने पाहुया.
एका मराठी सिनेमात एका झाडावर सिनेमाची काही दृष्यं चित्रीत झाली होती. या झाडाची फांदी पडल्याचा फोटो स्थानिकांपैकी कुणीतरी सोशल मीडियावर टाकला. हा फोटो काही दिवसांपूर्वी बुलेटिनची मोठी बातमी झाला होता. ही बातमी १७ जानेवारी २०१७ला मराठीतले सर्व न्यूज चॅोल्स दाखवत होते. त्याच दिवशी सांगलीमध्ये बहुजन क्रांती मोर्चा निघाला होता. तुलनेनं सांगलीतला मोर्चा फांदीच्या बातमीपेक्षा नक्कीच मोठा होता. मात्र, फांदीच्या बातमीनं मोठी जागा त्या दिवशी व्यापून टाकली होती.
मार्च २०१७चा तिसरा आठवडा शिवसेनेचे ‘सँडल मार’ खासदार रविंद्र गायकवाड यांची एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण चॅनेल्सच्या बातम्यांचा मुख्य विषय होता. कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानं एअर इंडियानं खासदार महोदयांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं होतं. त्यामुळे खासदार रेल्वेमार्गे उस्मानाबादकडे निघाले. या दरम्यान, एका मराठी न्यूज चॅनेलनं खासदारांची परदेशी कुत्री मालकाची आतुरतेनं वाट बघत आहेत, अशा आशयाच्या बातमीसाठी चॅनेल्लस सुमारे तीन मिनिटं खर्च केली. याच काळात यासंदर्भात अजून एक बातमी सर्वच चॅनेल्सवर झळकली. मीडियाला टाळण्यासाठी गायकवाड आपल्या डुप्लिकेटसोबत फिरत असल्याची ही बातमी होती. एका फोटोवर ही बातमी चॅनेलनं पिटली. मुळात फोटोशॉप वापरून व्हायरल झाल्याचा हा फोटो होता.
मे महिन्याच्या १५ तारखेला चॅनेलवर पुण्याची ‘महत्त्वाची बातमी’ झळकली. पुण्यातलं कुठल्या तरी एक मिठाईचं दुकान दुपारी १ ते ४ बंद ऐवजी आता नियमित सुरू राहणार अशी ही बातमी होती. तसं पाहिल्यास या बातमीत विनोदाशिवाय कसलाच अर्थ व मजकूर नव्हता, मात्र सर्वच मराठी न्यूज चॅनेल्सनं या बातमीला ‘मोठी बातमी’ म्हणून ट्रीट केलं. केवळ बातमीच दाखवली नाही तर राज्यातली महत्त्वाची हॅप्पनिंग म्हणून बातमीला सादर करण्यात आलं. प्रिंट मीडियानंदेखील या बातमीला बरीच जागा दिली.
या तिन्ही बातम्यासंदर्भात सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली. उथळ बातम्या दाखवल्यावरून न्यूज चॅनेल्सना नेटीझन्सनी चांगलंच धारेवर धरलं. खिल्ली उडवणारे काही नमुने...
असाईनमेंटला फांदी तुटल्याची बातमी पडली कशी, मेलबॉक्स just nowची नोटीफिकेशन झळकवत होता.
'अरे, आपल्याकडेही फांदीची बातमी आली' म्हणत डेप्युटी न्यूज एडिटर ओरडला.
‘ताजी करा लवकर ताजी!’ त्याचा सहाय्यकही ओरडला.
इकडे बुलेटीन प्रोड्यूसर त्याच्या सहाय्यक बुलेटीन प्रोड्यूसरला सूचना करत म्हणाला 'हातावरचं बाकी सगळं सोड, फांदीची बातमी तेवढी कर!'
सहाय्यक बुलेटीन प्रोड्यूसर काँग्रेस-सपा महागठबंधनची ब्रेकिंग करत होता, त्यानं मुव्ह होऊन फांदी घेतली. मनातच 'च्युत्या साले' म्हणत कामाला लागला.
बुलेटीन प्रोड्यूसरनं पीसीआरला कमांड दिली... 'चालू बातमीवर थांब, एक ताजी देतोय, या बातमीवर खेळायचंय...'
'रिपोर्टर किंवा डिरेक्टरचा फोनो जोडून देतो प्लेट टाका!' असाईनमेंट हेड बोलला. काही सेकंदातच असाईनमेंटहून आवाज आला 'फोन लागत नाही प्लेन बातमी घ्या'. त्यावर बुलेटीन प्रोड्यूसर ओरडला.
'फोनो लागत नाही तर बातमीवर खेळायचं कसं?'
'फांदी ज्याच्या शेतात पडली त्याचा फोनो मिळतो का बघा, कोणी प्रत्यक्षदर्शी मिळतोय का बघा...' बुलेटीन प्रोड्यूसरनं सूचनावजा आदेश जारी केला..
पलिकडून व्हर्च्युअल टीव-टीव करणारी रिपोर्टर बोलली, ‘अरे, 'सोशल मीडिया सेलिब्रिटीचा घ्या फोनो? नंबर टाकते!’
फोनो लावणारा जाम वैतागला होता. तिकडे स्डुडिओत अँकर चालू बातमीचे साठ-एक शब्द तीन-तीनदा वाचून कंटाळली होती. पीसीआरपुढे काय करायचं सांगा' वारंवार म्हणत होता. तर बुलेटीन प्रोड्यूसर फोनो शिवाय बातमी न घेण्यावर ठाम होता... इकडे सहाय्यक बुलेटीन प्रोड्यूसर ताजी गरमा-गरम बातमी तयार करून खेळ बघत बसला.
अखेर फोनो लागलाच नाही. फांदीची 'ताजी' बातमी विथ फोनो ऑन एअर जाता-जाता थांबली होती. यामुळे असाईनमेंटची मेहनत वायफळ गेल्याचं दु:ख साजरा करत होते. इकडे सहाय्यक बुलेटीन प्रोड्यूसरचा 'भ्येंच्योद साले कुठले सगळाच च्युतियापा आहे' म्हणत त्यानं महागठबंधन कंटीन्यू केलं...
पुढचे दोन तास फांदी प्रतिस्पर्धी चॅनेलवर दिसली नसल्यानं 'ताजी खाली सरकली'.
दोन तासानंतर फांदी पुन्हा प्रतिस्पर्धीकडे 'ऑन एअर' आली. मठ्ठ न्यूजरूम पुन्हा जागं झालं.. यावेळी सहाय्यक बुलेटीन प्रोड्यूसरची शिफ्ट संपली होती. ऑफीसमधून बाहेर पडता-पडता फांदी त्याच्या कानावर आदळली..
आता सहाय्यक बुलेटीन प्रोड्यूसर आवाज चढवून ओरडला...
‘अरे, बेक्रिंग घ्या.., ब्रेकिंग...’
फोनोही घ्या, एक्सपर्ट मिळतो का तेही बघा'? त्याचा आवाज अचानक वाढला होता..
साला पांचट कुठले म्हणत, तो इतक्यात न्यूजरूमच्या बाहेर सुसाट पळाला होता...
(डिसक्लेमर : पोस्ट पूर्णत: काल्पनिक असून चालत्या फिरत्या लोकांचा याचा काहीएक संबध नाहीये.)
दुसरं उदाहरण
(अन) स्पॉन्सर्ड बातमीचं चीप ब्रेकिंग
आपली बातमी टीकरला पाहून चितळेंनी चॅनलमध्ये संबधितांना फोन केला(?). यानंतर बातमीचं चित्रच बदललं. रात्री उशीरा बातमी न्यूजरूमला पडली होती. त्यामुळे बातमी फक्त टीकरला गेली. डेव्हलप न झाल्यानं डेप्युटी न्यूज एडिटरनं मॉर्निंग शिफ्टवाल्यांना झापलं. काही वेळात बातमी एक्सप्रेससारखी धावू लागली. टिकर, वेब, सोशल मीडियाला सूचना गेल्या. पाहता पाहता बातमी मोठी झाली.
तूर खरेदीची बातमी दानवेंच्या बरळण्यानं कधीचीच बाद झाली होती. विरोधकांचा रेटा कमी झाल्यानं याची 'साल्या'ची व्हॅल्यू संपण्यात जमा झाली होती. कपिल मिश्राची नौटंकी चघळून चोथा झाल्यानं न्यूज व्हॅल्यू संपली होती. रोहतकची सामूहिक बलात्कार आणि हत्येची बातमी राज्याच्या (राजकीय) 'इंट्रेस'ची नसल्यानं घेतलीच नव्हती. ट्रिपल तलाकचं न्यूज एजेंसीच्या स्पॉन्सर्डशिपकडून काहीच येत नव्हतं. परिणामी राज्यात कडक बातमीचा अभाव होताच. त्यामुळे मॉर्निंग शिफ्टचा प्लॉन #चितळे ठरला. सहाय्यकांना प्रोड्यूसरनं पुन्हा एकदा सूचना देऊन बाकीच्या बातम्या फक्त तयार करुन ठेवायला सांगितलं. त्यामुळे सहाय्यक बुलेटीन प्रोड्यूसर सांगकाम्या म्हणून की बोर्ड पळवत होते.
फोना-फोनी करत बातमीला फुगवणं सुरू झालं. ३० वर्षापूर्वीचं नियमीतचा रिटेलर स्टुडिओबाहेरच होता. त्या गेस्ट म्हणून स्टुडिओत आणण्यात आलं होतं. तर पुण्यातून लाईव्ह लिंक मस्ट करण्यात आली होती. स्थापनेपासूनचं ग्राफीक, क्रोनोलॉजी, एक्सपर्टचे दोन-तीन फोनो प्लेट तयार होतं. पहिला अख्खा सेगमेंट बातमीवर खेळायचं होतं. प्लेन लाईव्ह मिळत असल्यानं सातला रिपोर्टरशिवाय कुणीच मिळालं नव्हतं. तर आठला एक दुधवाल्यानं बाईकवरूनच वन टू वन दिलं होतं. नऊसाठी मालकांपैकी कुणीतरी हवंच असं प्रेशर असाईनमेंटनं रिपोर्टर नावाच्या स्ट्रिंजरवर टाकलं होतं. त्यामुळे पुण्यातला स्ट्रिंजर वैतागला होता.
अगदी धडपडत तो सकाळीच डेक्कनला पोहचला होता. संभाजी पुलावरून तो कसा-बसा आता दुकानापर्यंत पोहचला होता. दुकान स्पष्ट दिसावं अशी ताकीद स्ट्रिंजरला देण्यात आली होती. इकडे नऊचं बुलेटीन ऑन एअरसाठी तयार होतं. पीसीआर आणि असाईनमेंटला सूचना देऊन बुलेटीन प्रोड्यूसर बाह्या चढवून बसला. इकडे पुण्यात मालक अजून आलाच नसल्यानं स्ट्रिंजरचं धाबं दणाणलं होतं. त्यामुळे त्यानं फोन करून टिपीकल पुणेकरांना कॅमेऱ्यासमोर आणलं होतं. त्यांना काय व कसं बोलायचं याच्या सूचना देऊन त्यानं पुन्हा एकदा हातातला बूम आणि कॉलर टाईट केला होता. अगदी रेटारेटीतही त्यानं चेहऱ्यावर हास्य आणत कानातल्या इपीत बुलेटीनची साईन ट्यूनकडे लक्ष लावलं होतं..
अनेक वेळा एका चॅनेलवर मोठी गंभीर बातमी सुरू असते, तर त्याच वेळी इतर चॅनेल उथळ बातमीवर खेळत असतात. असंच एक उदाहरण मी टीव्हीत असताना अनुभवलं होतं. नोटबंदी हा सरकारचा अलिकडचा सर्वांत मोठा निर्णय होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबरला जगातले मीडिया हाऊस अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सज्ज झाले होते. भारतातही एकूण सर्व माध्यमं मतमोजणीवर लक्ष ठेवून होते. बहुतेक न्यूज चॅनेल्सवर सकाळी सातचं बातमीपत्र अमेरिकेच्या अध्यक्ष निवडीच्या बातमीनं सुरू झालं. तर हजार आणि पाचशेच्या नोटा बंद केल्याची दुसरी मोठी बातमी होती. अर्थातच भारतातील चॅनेल्सवर नोटबंदी ही पहिली बातमी असण्याऐवजी दुय्यम बातमी झाली. हजारो मैल दूर असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाची बातमी ‘लीड स्टोरी’ म्हणून टीव्हीचे संच भल्या सकाळीच पॅनेल चर्चा करत होते. काही चॅनेल्स फक्त अमेरिकेतील सत्ताबदलाची शक्यतांवर गप्पाष्टकं करत होती. त्या काळी मी काम करत असलेलं एक चॅनेल अमेरिका आणि नोटबंदी दोन्ही बातम्यांवर लक्ष ठेवून होतं. अधून-मधून हिलरी क्लिंटन आणि डोनॉल्ड ट्रम्पवर बोलणारे टीव्ही स्टुडिओतील पाहुणे नोटबंदीवरही बोलत होते. यावेळी अँकरचं कसब पणाला लागत होतं. काही काळातच चॅनेलवर ‘नोटबंदी’च्या परिणामाची भयाणता दाखवण्यात आली. सुरुवातीला आम्हालादेखील या परिस्थितीची कल्पना आली नाही. बँका आणि एटीएम शासकीय आदेशानुसार बंद होते. खाजगी हॉस्पिटल्स जुन्या नोटा न स्वीकारण्यावर ठाम होते. त्यामुळे काही तासातच नोटबंदीची भयानता स्पष्ट जाणवू लागली. टोल नाक्यांनी जुन्या नोटा स्वीकारण्यास तात्काळ नकार दिला. त्यामुळे राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. बघता-बघता काही तासांतच नोटबंदीचा विदारक परिणाम जाणवू लागला. ही परिस्थिती बघून काहीअंशी आम्हाला नोटबंदीच्या बातमीवर राहिल्याचं समाधान वाटलं.
नोव्हेंबर २०१६च्या २० तारखेला काही ‘मराठी न्यूज चॅनेल्स’ मासा आणि सापाची झुंज दाखवत होते. दिवसभरात प्रत्येक चॅनेलवर ही बातमीवजा दृष्यं काही मिनिटं स्टे घेऊन टाईम स्लॉट भरवत होती. नोटा रद्दीकरणाला आठवडा उलटला होता. बँका आणि एटीएमसमोर तोबा गर्दी होती. तर दुसरीकडे हॉस्पिटलबाहेर उपचाराविना पेशंट तडफडत होते. मात्र, सर्व मराठी चॅनेल्स ही ‘अद्भुत’ दृश्यं वारंवार दाखवत होते. सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडीतला हा प्रकार कोणीतरी मोबाईल शूट करून वार्ताहर अर्थात टीव्हीच्या स्ट्रिजंरला पाठवला. सर्वच टीव्हीवाले या दृश्याला ‘एक्सक्लुसिव्ह’ म्हणून दाखवत होते. (सगळ्यांकडे असल्यावर ते एक्सक्लुसिव्ह कसं या प्रश्नाचं कोडं टीव्हीत दोन वर्षं काम करूनही मला उलगडलं नाही!) हे माझ्या पाहण्यातलं ताजं उदाहरण असल्यानं तेच दिलं.
दुसरं उदाहरण म्हणजे, २०१७च्या नवीन वर्षात बंगळुरूमध्ये मुलींच्या विनयभंगाची घटना घडली होती. ही घटना ‘ऑन कॅमेरा’ देशातील सर्व न्यूज चॅनेल्स आणि वेबसाईटनं दाखवली. दृश्यात काहीजण मुलींचा अवयवांना छेडताना स्पष्ट दिसत होतं. ‘ट्रीट’ करून टीव्ही चॅनेल्स वारंवार हा व्हिडिओ दाखवत होते. दोन दिवस ही दृश्यं टीव्हीच्या स्क्रीनवर महिलांच्या इज्जतीचे धिंडवडे काढत होते. कुठल्याही चॅनेलला समस्त महिला जातीची अब्रूची लक्तरं काढत आहोत, याची कसलीच जाणीव झाली नाही. या घटनेच्या एकूण मीडियाच्या रिपोर्टिंगवर ‘दी हूट’ या मीडिया इथिक्सवर चर्चा करणाऱ्या संस्थेनं सविस्तर लेख लिहला. या लेखात न्यूज पेपर्स आणि वेबसाईटलाही संस्थेनं धारेवर धरलं आहे. अहवालात मीडिया रिपोर्टिंग महिलांच्या लैंगिक छेडछाडीला उद्दिपीत करणारी असल्याचं संस्थेनं म्हटलंय. पीडित मुलींना चॅनेलनं पुन्हा भीतीच्या सावटाखाली आणल्याचं रिपोर्टमधून सांगण्यात आलं होतं.
एक अन्य घटना इथं नमूद कराविशी वाटते. २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. या दिवशी मॉर्निंग बँडला सर्व न्यूज चॅनेल्स योगावर लाईव्ह होते. भाजपनं योग दिनाला मेगा इव्हेंट घोषित केल्यानं सरकारचा मोठा निधी या ‘योग डे’वर खर्च केला गेला. काही ठिकाणी मीडियाला स्पॉन्सरशिपही मिळाली होती. अनेक ठिकाणी बॉलिवुड सेलिब्रिटींना योगासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. जॉगिंग आणि वेस्टर्न आऊटफीट घातलेल्या बॉलिवुड सेलिब्रिटींनी चॅनेल्सची मोठी सेंगमेंट भरून गेली. सकाळचा हा डोळस इव्हेंट रात्री बाराच्या बुलेटीनलाही ताजा म्हणून प्ले होत होता. अशी दृश्यं ‘लोकांना बघायला आवडतं’ या वाक्याखाली सर्रास खपवली जातात.. यावर टीव्हीचा २० वर्षं अनुभव असलेले प्रोड्यूसर नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणतात- “सेक्स आणि ग्लॅमर लोकं बघतात, टीव्हीवर सेक्स दाखवता येत नाही, मग आम्ही ग्लॅमर दाखवतो. सेलिब्रिटींची कुठलीही फालतू बातमी केवळ व्हिज्युअल्समुळे बघितली जाते. हॉट व्हिज्युअल रिमोटची गती आपोआप थांबवतात.” माझ्या न्यूज चॅनेलच्या दोन वर्षाच्या कारकिर्दीत ‘लोकांना हे खरंच आवडत असावं का?’ याचा शोध मी सतत घेत होतो. लोकांना आवडण्याच्या नावाखाली कोणतीही थोतांड बातमी दर्शकांच्या माथी जबरी मारली जाते, हे मला थोड्याच काळात कळालं होतं.
न्यूज चॅनेल्सनी दैनंदिन बातम्यांच्या बाबतीत दर्शकांचा अभिप्राय मागवला तर माझी खात्री आहे की, सुमारे ९० टक्के पत्र ‘हे असं काहीही दाखवू नका!’ असा आशयाची पत्रं असतील. यासंदर्भात दिल्लीतील ‘मीडिया स्टडी ग्रुप’ या संस्थेनं केलेलं सर्वेक्षण धक्कादायक आहे. ग्लॅमर आणि उप्स मोमेंटच्या नावाखाली सेलिब्रिटी महिलांवर चॅनेल्स ऑन एअर लैंगिक अत्याचार करतात आणि यावर कुणीही आक्षेप नोंदवत नाही, हे फारच क्लेशकारक असल्याचं सर्वेक्षणात नोंदवण्यात आलंय. टीव्ही न्यूजच्या या बदलत्या वृतीवर बरीच वर्षं न्यूज चॅनेल्समध्ये काम करणारे गिरीश अवघडे म्हणतात, “मूळातच हा न्यूज शो बिझनेस झाला आहे. त्यामुळे बहुतेकदा टीव्हीवर जे बोल्ड असतं, ते अनेकदा दाखवलं जातं. दर्शकांना टीव्हीवर अशी ‘कलरफुल’ दृश्यं बघायला आवडतं, परिणामी अशा बातम्यांकडे दर्शकांचा कल वाढला आहे. पॅनल डिस्कशनलाही प्रेझेंटेबल फेस ही सुप्त संकल्पना आहेच. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर अतिसूक्ष्म स्वरूपातील पॉर्न कंटेंटची गरज न्यूज चॅनेल्सना भासू लागलीय हे वास्तव आहे.”
न्यूज चॅनेल्सचे अँकर आता नाटकीयतेनं बातम्या वाचू लागले आहेत. प्राईम टाईमला अनेक न्यूज अँकर ओरडून दर्शकांचे लक्ष वेधण्याचे उपक्रम करत असतात. कितीही सुमार विषय असला तरी अँकर देशातला गंभीर विषय म्हणून त्याच्याकडे पाहतो. परिणामी अँकर सहभागी पाहुण्यांना अपमानीतही करतो. टीव्हीएफ या यू ट्यूब चॅनेलनं ब्रेकिंग न्यूजचं विडंबन केलंय. ‘मंगला हुई मांगलिक’ नावाचा हा शो १९ सप्टेंबर २०१७ पर्यंत १ कोटी ८ लाख १६ हजार ५८५ लोकांनी पाहिलाय. या शोमध्ये बातमी मोठी करण्यासाठी जर्नलिझम इथिक्सला कसं थाब्यावर बसवण्यात येतं, याची सविस्तर उकल करण्यात आली आहे. चॅनेलची अँकर सोशल मीडियाचा आधार घेऊन विषय फुगवते.
कुठलीच ब्रेकिंग नसल्यानं ‘टेबल न्यूज’ लिहिण्याचं नियोजन केलं जातं. यासाठी व्यावसायिक लेखकांना ‘स्टोरी टेलिंग प्रेझेटेशन’साठी बोलवण्यात येतं. मंगल ग्रहाच्या वाढत्या प्रकोपामुळे देशातील हजारो मुलींचं लग्न रखडलं आहे. याचं कारण वैज्ञानिकांनी मंगलयानचा केलेला प्रवास याच रागातून मंगल ग्रहानं कुंडलीत प्रवेश करून मुलींचं लग्न रोखलं, या काल्पनिक स्टोरीला अंधविश्वास, धर्म आणि राजकारणाची फोडणी देऊन सजवलं जातं. ट्रेंडिग टॉपिक, अंधविश्वास, भीती, मास अपील, अनिश्चितता आणि सेक्स या टुल्सना घेऊन क्रिस्पी न्यूज स्टोरी बनवली जाते.
या न्यूज स्टोरीच्या पॅनेल डिस्कशनसाठी विकतचे चर्चात्री बोलवले जातात. टीव्हीवर बोलण्यासाठी राजकीय प्रवक्ते, बॉलिवुड नट-नट्या, सामाजिक कार्यकर्ते आणि धर्मगुरू सप्लाय करणाऱ्या दलालाकडून आगाऊ रकमा देऊन चर्चात्री हायर केले जातात. न्यूज आणि पॅनेलमधून स्टोरी सजवली जाते.
खरी मजा आहे, या शॉर्ट फिल्मच्या पॅनेल डिस्कशनमध्ये; चर्चेत कोणाला बोलू द्यायचं, कोणाची खरडपट्टी काढायची, कोणावर गलिच्छ आरोप करायचे हा पॅनेल प्रोड्यूसर इपी म्हणजे कानातल्या माईकमध्ये अँकर आणि प्रमुख पाहुण्यांना सांगत असतो. यातून पॅनेलच्या चर्चेत वाद घालून ट्विटर ट्रेंडिंग वाढवलं जातं. वाढते ट्रेडिंग टॉपिक बघून जाहिरातदारांची मागणी वाढते. अखेर चॅनेलचा हेतू साध्य होतो आणि मोठ्या कमाईतून सर्वांना बढती मिळते. ही शॉर्ट फिल्म जरी काल्पनिक असली तरी रोजच्या टीव्ही चर्चा यापेक्षा वेगळी नसते.
टीव्ही चॅनेल्समध्ये न्यूज आणि कंटेंट रायटर भरण्याच्या जाहिराती अलिकडे मोठ्या प्रमाणात निघत आहेत. चॅनेल्समध्ये सब एडिटरऐवजी कंटेंट रायटरचं नवं पद तयार झालं आहे. कंटेंट रायटरचं काम असतं बातमीला फुलवून सजवून रुचकर बनवणं. अशा न्यूज स्टोरी हिंदी चॅनेल्समध्ये रात्री नऊ दहानंतर लावल्या जातात. या न्यूज स्टोरींचा फुल टीआरपी असतो. टीव्हीचा टीआरपी मोजणाऱ्या बार्क संस्थेचं रेटिंग पाहिल्यास अशा न्यूज स्टोरी चालवणाऱ्या चॅनेल्स आणि त्या शोचा टीआरपी मोठा असतो. मुळात हा रेटिंग काढणारं परिमाण चुकीचं असल्याची टीका अनेक टीव्ही अभ्यासकांनी केली आहे. काही ठराविक टीव्ही संचावरून टीआरपी मोजण्याच्या या परिमाणामुळे जाहिरातीचं गणित ठरलेलं असतं. काही प्रमाणात या रेटिंगवर विश्वास ठेवला तर दर्शकांना खरंच टीव्हीत हलके-फुलके विषय बघायला आवडतात, हे अलीकडच्या काही संख्यात्मक संशोधनातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे दर्शकांना उथळ बातम्या बघायला आवडतात, हा निष्कर्ष काही प्रमाणात तंतोतंत लागू होतो. परिणामी मागणी तसा पुरवठा या बाजाराच्या नियमाप्रमाणे उत्पादन तयार होत आहे.
वर उल्लेखित केलेल्या याच निष्कर्षाखाली टीव्हीवर उथळ मजकूर प्रसारित करण्यासाठी आपला जास्त वेळ खर्ची करतात. तीन सेंगमेंटच्या न्यूज रनडाऊनमध्ये शेवटचं सेगमेंट सॉफ्ट असावं असा आदर्श नियम आहे. कारण गंभीर वातावरण हलकं करायला एखादी पॉझिटिव्ह किंवा शिक्षित करणारी न्यूज असावी लागते. २०-२५ मिनिटं गंभीर बातम्या पाहून मेंदूवर आलेला ताण सॉफ्ट न्यूजनं हलका होतो, हा मानसशास्त्रीय निष्कर्ष आहे. मात्र, या सेंगमेंटमध्ये अलीकडे सॉफ्ट न्यूजच्या नावाखाली उथळ बातम्या देण्याचं प्रमाण वाढलं आहे. याच बातम्या मेन मीड स्टोरी म्हणून डे ड्राईव्ह केल्या जातात. अगदी अलिकडचं उदाहरण म्हणजे ऑगस्ट महिन्यात पत्रकार गौरी लंकेशची हत्या झाली. एका पत्रकाराची हत्या ही मीडियासाठी मोठी बातमी होती. पण मीडियानं या बातमीकडे दुर्लक्ष करत बाबा राम रहीमच्या रंजक कथा दर्शकांना देऊ केल्या. गुरमीत बाबाच्या न्यूज स्टोरीत क्राईम, सेक्स, इंटरटेन्मेंट, धर्म, अंधविश्वास, अनिश्चिततेची फोडणी होती. त्यामुळे बाबाच्या शिक्षेनंतरही बाबाचे किस्से न्यूज अँकर सांगत सुटले होते. हनीप्रीत आणि बाबा, साध्वी आणि बाबा, सिनेमा आणि बाबा इत्यादी विषय टीव्हीनं सातत्यानं दाखवले.
आयसिसचा दहशतवादी बगदादीबाबत असाच प्रकार सुरू असतो. वरील सर्व परिमाणं न्यूज चॅनल्सनी बगदादीच्या बातमीतही लागू केली. ११ जुलै २०१७ला भारतीय मीडियानं बगदादीला पुन्हा एकदा ठार मारलं. काही चॅनेल्सनी रात्री प्राईम टाईम काळात यावर पुन्हा आपल्या जुन्या रनडाऊनची स्क्रीप्ट जोरजोरात वाचून दाखवली. काहींनी जुने विशेष शो रिराईट करून पुन्हा टेलिकास्ट केले. यापूर्वीही कित्येकदा मीडियानं बगदादी मारला आहे. तरीही दर दोन-चार महिन्यानं तो पुन्हा जिवंत होऊन भारतीय मीडियासाठी उपलब्ध होतो. यावर ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार म्हणतात,“बगदादीला पुन्हा-पुन्हा मारणं ही भारतीय मीडियाची गरज बनली आहे. त्यांनी आयसिस व दहशतवादाची भीती सामान्य दर्शकांच्या मनात तयार केली. त्यामुळे त्यांच्या दर्शकांना अशा बातम्या वारंवार लागतात. त्यामुळे ते चॅनेल दर चार महिन्यांनी बगदादीला मारून विशेष शो करत असतात.”
.............................................................................................................................................
नवनवीन पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
इतरांपेक्षा आपलं चॅनेल वेगळं भासवण्यासाठी गंभीर आणि हार्ड स्टोरींना रंजक बनवून प्रेझेंट केलं जात आहे. यातून सर्वच चॅनेल एकसारखाच न्यूज कंटेंट प्रसारित करत आहेत. त्यामुळे अशा न्यूज स्टोरी लिहिणाऱ्या लेखकांची गरज चॅनेल्सना भासू लागली आहे. मराठीत असे प्रयोग काही अंशी सुरू झाले आहेत. दुसरे म्हणजे टीव्हीवर बघणाऱ्यांचं अटेंशन क्रिएट करणारे अँकर जास्त लोकप्रिय ठरत आहेत. त्यामुळेच अलीकडे ओरडणारे आणि नाटकीय निवेदन करणारे अँकर वाढले आहेत. इंग्रजी मीडियातला एक अँकर नुसता ओरडण्यासाठी प्रसिद्ध आहे.
टीव्ही मीडियातली दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे टीव्ही सुटेबल चेहरा. अर्थात हा चेहरा गोरा असावा असा नियम आहे. अशा वेळी नुसते चांगले दिसणारे कंटेंटलेस चेहरे टीव्हीची फ्रेम बळकावत आहेत. यात मुलींना अधिक प्राधान्य दिलं जातं. अशा दिसायला सुंदर अँकर थर्ड शिफ्टला रात्री उशीरापर्यत काम करतात. रात्री दहानंतर अनेक टीव्ही चॅनेल्सवर अशा सुंदर मुली बातम्या वाचताना दिसतात.
काही वर्षांपूर्वी न्यूज इंडस्ट्रीत एका प्रयोगानं खळबळ उडाली होती. या चॅनेलनं अँकर म्हणून स्टुडिओत सुंदर दिसणाऱ्या नाट्यशास्त्राच्या मुली भरल्या होत्या. दिसायला गोऱ्या असलेल्या या मुली टेलिप्रॉम्टरवर बातम्या वाचत होत्या. आता त्या बऱ्याच तरबेज झाल्या आहेत. चॅनेलमध्ये जितक्या गोऱ्या अँकर जास्त तितका टीआरपी वाढणार, असं कथित गणित मार्केटचं आहे. रंग आणि कडव्या भाषिक अस्मिता असणाऱ्या दाक्षिणात्य राज्यातही न्यूज अँकर म्हणून गोऱ्या मुलींनाच पसंती दिली जाते. वर्षभरापूर्वी एका संपादकानं सावळी आणि जुजबी दिसणाऱ्या एका मुलीला अँकर म्हणून उभं केलं. दुसऱ्याच दिवशी मॅनेजमेंटनं संपादकाला याचा जाब विचारला. कारणादाखल जाहिरात संस्थांना ही मुलगी नको असल्याचंही सांगून टाकलं. काही दिवसांत ही सावळी न्यूज अँकर टीव्हीवरून गायब झाली. चांगल्या दिसणाऱ्या मुली एखादा गंभीर विषय सादर करताना भांबावून जातात. प्रसंगी बाळबोध स्क्रीन प्रेझेंटेशन करतात. तरीही चॅनेलवर असा सुमार कंटेंट असेलले चेहरे लोकप्रिय आहेत.
एकूणच न्यूज चॅनेल इंडस्ट्रीबद्दल विचार केला तर बातमीविरहीत मजकूर दर्शकांना बघायला आवडतो असा निष्कर्ष काढता येऊ शकतो. एखादा तर्कहीन विषय घेऊन दिवसभर तोच दाखवणं असे प्रकार सर्रास सुरू आहेत. दिवसभर टीव्ही पाहिला तरी दर्शकांना आपण काय पाहिलं याची उजळणी करता येत नाही. जगबुडी, राष्ट्रवाद, बगदादी, बाबा राम रहीम अशा बातम्यांना फुल टीआरपी मिळतो. याउलट राज्यसभा टीव्ही, एनडीटीव्ही, इपीक, हिस्टरी, नॅशनल जिओग्राफीक चॅनल उत्तम माहिती व मजकूर देऊनही व्हिवरशीप पॅटर्नमध्ये मागे पडतात. ही चॅनेल्स एका तासात एका पुस्तकाएवढी माहिती देतात. पण दर्शक रंजक व उथळ कार्यक्रमांना पसंती देतात. काही वेळा तासनतास टीव्ही बघूनही दर्शकांना हाती काहीच लागत नाही, त्यामुळे आपण गंडवलो गेलो अशी भावना तयार होते. कदाचित वेग हा पिढीचा मॉडेल बनलाय. त्यामुळे हाती काहीच उरलं नसलं तरी नुसतं चैन म्हणून जगण्याची प्रवृत्ती वाढली आहे. ही प्रवृत्ती बलदंड असं मटेरिअल मार्केट कॅश करत आहे. त्यामुळे उथळता व माहितीरंजन येणारच.
.............................................................................................................................................
लेखक कलीम अजीम ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.
kalimazim2@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment