अजूनकाही
मागील वर्षी ‘बालभारती’च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भल्या मोठ्या भिंतींवर अर्थवाही चित्रं काढताना ‘बालभारती’शी जवळून संबंध आला आणि एका नव्या विश्वाशी पुन्हा परिचय झाला. लहानपणी ‘बालभारती’ची पुस्तकं वापरताना झालेल्या संवादानंतरची ही पहिलीच वेळ होती. या वर्षी ‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तकांसाठी सार्थ मुखपृष्ठं करण्याची सुंदर संधी मिळाली आणि त्यासोबत काही लाख मुलांपर्यंत चित्रांच्या माध्यमातून पोहोचण्याची अनोखी भेट! माणसाच्या दृश्य संवेदना नकळत महत्त्वाची भूमिका निभावत असतात. आपल्याला जर संपन्न दृश्य अनुभव लहानपणापासूनच मिळाले तर सौंदर्यदृष्टीचा विकास उत्तम प्रकारे होऊ शकेल. ही समृद्धी मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी एक छोटासा मार्ग म्हणजे पुस्तकांची मुखपृष्ठं. आजही महाराष्ट्रात असे काही दुर्गम भाग आहेत, जिथं मुलांच्या हातात पाठ्यपुस्तकांखेरीज इतर कुठलीही पुस्तकं क्वचितच पडतात.
पाठ्यपुस्तकासाठी मुखपृष्ठाचा दोन अंगांनी विचार करता येतो. एक म्हणजे- पुस्तकात जे जे आहे त्याचं प्रातिनिधिक स्वरूप दिसावं यासाठी पुस्तकातील घटक वापरून केलेलं चित्र. आणि दुसरं म्हणजे- आतील आशय आधार म्हणून न घेता पुस्तकामुळे साध्य होणाऱ्या हेतूवर आधारित नवीन विचार चित्रातून व्यक्त व्हावा म्हणून केलेलं स्वतंत्र चित्र.
‘बालभारती’तील ज्येष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बोलून दुसऱ्या पद्धतीने काही मुखपृष्ठ करायचा निर्णय झाला. उपलब्ध वेळेचा विचार करता तीन मुखपृष्ठांची जबाबदारी घेणं शक्य होतं. त्याप्रमाणे सातवी मराठी, नववी मराठी व इंग्रजी अशी पुस्तकं निश्चित केली. पुस्तकाचं उद्दिष्ट, मुलांवर त्याचा होणारा परिणाम आणि संपूर्ण महाराष्ट्रात किती वैविध्यपूर्ण जीवनशैली जगणाऱ्या मुलांच्या हातात ही पुस्तकं जातात हे जाणून घेऊन काम सुरू केलं. सर्व मुलामुलींना त्यांच्या संदर्भकक्षेतून चित्राशी जोडलेपण वाटावं, असं आव्हानात्मक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं.
सातवीसाठी विषय निश्चित होता - ब्लू मॉरमॉन हे राज्य फुलपाखरू. निसर्ग समजून घ्यायची विशेष गोडी असल्यामुळे ब्लू मॉरमॉनची आधीपासूनच थोडी माहिती होती. काही तज्ज्ञ अभ्यासक आणि मित्रमैत्रिणींच्या मदतीनं अचूक माहिती शोधून काढली आणि विद्यार्थ्यांना आवडेल असा एक छोटा निबंध त्यावर लिहिला. ही माहिती पुस्तकातील क्यू आर कोड मार्फत वाचकांनाही उपलब्ध होऊ शकते. हे मुखपृष्ठ करणं चित्रकार म्हणून माझ्यासाठी अतिशय आनंददायी होतं. हिरव्यागार झाडीवर बसलेल्या या ब्लू मॉरमॉन नामक नीलपऱ्या वेगवेगळ्या बाजूंनी कशा दिसतात याचे संदर्भ शोधले. ब्लू मॉरमॉनची अळीसुद्धा फार देखणी असते म्हणून मलपृष्ठावर तिलाही जागा केली. सगळीच फुलपाखरं सगळीकडेच दिसत नाहीत. त्यांचे विशिष्ट अधिवास असतात. त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे ठराविक झाडांवर ती मकरंद पिण्याकरता बसतात. स्थानिक जैवविविधतेचं महत्त्व यातून अलगद मुलांपुढे ठेवावं असाही यात छुपा हेतू होता.
कुंती नावाचं सुंदर पांढऱ्या फुलांचं स्थानिक झाड या फुलपाखराला आवडतं. कुंतीच्या झाडाची संदर्भ छायाचित्रं शोधून तशीच चित्रात वापरायची ठरवली. पण नुसतंच झाडं, पानं, फळं, फुलपाखरं दाखवण्याचा पाठ्यपुस्तकाशी कसा संबंध जोडायचा हेही विचारात घ्यायला हवं होतं. मग पांढऱ्या फुलांच्या जागी छोटी छोटी पांढरी पुस्तकं दाखवली; जणू फुलपाखरं पुस्तकांतूनच मकरंद शोषून घेत आहेत. आतील पानावर तपकिरी रंगाच्या अनेक छटांनी तयार केलेली पार्श्वभूमी म्हणजे चिखल आहे. फुलपाखरं क्षार शोषून घेण्यासाठी चिखलावर तसंच शेणावरही बसतात, हा छोटासा बारकावा यातून पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.
चित्राची शैली पाहून काही मुलामुलींना या प्रकारे चित्र काढून बघावंसं वाटलं, तर त्यातूनही काही नव्या चैत्रिक गोष्टी ते शिकू शकतील. प्रचंड मोठ्या प्रमाणावर छपाई होणाऱ्या या पुस्तकांत प्रत्यक्ष केलेलं चित्र आणि छापलेलं चित्र यांत थोडा फरक जरी पडला असला तरी, चित्रात वापरलेल्या असंख्य रंगछटा, ब्रश स्ट्रोक्सचे बारकावे छान छापले गेले आहेत. चित्रकाराच्या हातून चित्र छपाईसाठी गेलं की, काही तांत्रिक बंधनांमुळे थोडा फरक पडतोच.
सातवीतल्या मुलांना या चित्रांतून वेगळंच काही वाटू शकतं. ते हळूहळू समजून घेईनच. काही शाळांतील मुलांनी मुखपृष्ठ आवडलं म्हणून मला पत्र पाठवल्याचं त्यांच्या शिक्षकांनी नुकतंच कळवलंय. आता खूप उत्सुकता आहे मुलांना वाटलेलं समजून घ्यायची.
नववीसाठी वेगळा विचार करणं गरजेचं होतं, कारण ती मुलंमुली काही लहान नसतात. त्यांना खरोखर काहीतरी नवं देणं हा हेतू मनाशी ठरवला होता. इंग्रजीच्या मुखपृष्ठावर भली मोठी पुस्तकं एकावर एक ठेवलेली आणि सर्वांत वरचं पुस्तक उघडलेलं दाखवलं. पुस्तकांच्या वर आकाशात उडत, पंख फुटलेली टीन एजर मुलगी आणि मुलगा उत्सुकतेनं पुस्तकांत डोकावून पाहताना दाखवली. त्यांच्या हातांच्या मुद्राही अभिव्यक्तीपूर्ण दाखवल्या. ही मुलं कोणी गोरी-गोमटी काल्पनिक मुलं नसून अगदी आपलीच वाटतील अशी साधे कपडे घातलेली, काळी-सावळी मराठी मुलं आहेत. त्यांच्या रंगीत पंखांत आलेलं बळ, उंच उडण्याची क्षमता असलेलं प्रत्येक मूल, पुढच्या शिक्षणासाठी असणारं इंग्रजी अभ्यासाचं अतुलनीय महत्त्व, इंग्रजी भाषेमुळे तयार होणारा मोठा अवकाश, आयुष्यात येणारी हिरवाई आणि तरीही इंग्रजीचं दडपण न वाटून घेता सहज शिकण्याची एक भाषा, अशा विविध विचारांना रंगा-रेषांत कैद करणं जमलं आहे का हे मुलं सांगतीलच. विद्यार्थ्यांना खरोखरच चित्रात स्वतःला पाहायला प्रोत्साहन मिळेल आणि आवश्यकतेप्रमाणे बदल करायला स्फूर्ती मिळेल अशी आशा आहे.
नववी कुमारभारतीच्या मराठी पुस्तकाचं मुखपृष्ठ अजून वेगळ्या विचारानं करायचं होतं. गोंड चित्रशैलीत चित्रकार वर्षानुवर्षं एक सुंदर चित्र काढतात - हरणाच्या शिंगांतून आलेलं झाड. ही कल्पनाच किती सुंदर आहे! हीच कल्पना थोडी अभिजात पद्धतीने मांडायची असं ठरवलं. गोंड शैली चित्राकरता न वापरता वेगळ्या पद्धतीनं चित्र काढायचं ठरवलं. अंगावर ठिपके असणारं, वास्तववादी चित्रणाच्या खूप जवळ जाणारं, डौलदार हरीण मागे वळून पाहताना दाखवून त्याच्या शिंगांतून छानसं झाड आलेलं आहे. झाडाच्या फांद्याही डौलदार दिसाव्यात म्हणून टोकाकडे थोड्या वलयाकार वक्र केल्या. या झाडाला हिरवी आणि लाल पानं आहेत. हे झाड फळाफुलांनी न बहरता पुस्तकांनी बहरलं आहे. ही पुस्तकं कोऱ्या पानांची आहेत, कारण प्रत्येक मूल स्वतःच्या आवडी-निवडीप्रमाणे, गतीप्रमाणे स्वतः काहीतरी त्यातून घडवणार आहे, यावर विश्वास ठेवणारं हे चित्र आहे.
विद्यार्थ्यांना पुस्तकांबद्दल विशेष गोडी वाटावी, मुखपृष्ठाच्या चित्रांतून व्यक्त होणाऱ्या आशयाबद्दल उत्सुकता वाटावी आणि त्यातून विचारांना प्रोत्साहन मिळावं यासाठी वेगळी चित्रं करण्याचा प्रयत्न केला आहे. जिथं पुस्तकं आणि चित्रं दोन्हीही दुर्मिळ आहेत, अशा भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा विचार विशेषत्वानं करून काहीतरी वेगळं समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शहरी आणि ग्रामीण दोन्हीकडील मुलामुलींना ही मुखपृष्ठ आवडतील अशी आशा वाटते.
हरणाच्या शिंगातून झाड हे माझं लाडकं चित्र आहे आणि आत्तापर्यंत अनेक ठिकाणी भिंतींवर मी ते काढलं आहे. ते पाहून खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया मुलं देतात. एक मुलगा म्हणाला होता, "अरे, आता या हरणाला सावली शोधायला कुठे जायलाच नको की!" एका मुलीनं उत्स्फूर्तपणे चित्रातल्या हरणाला शेजारचं गवत तोडून चारा म्हणून खाऊ घातलं. एकजण म्हणाला, "हरणाने बिया खाल्यामुळे शिंगातून झाड आलं असेल बहुदा." अशा असंख्य नव्या प्रतिक्रियांची मीही वाट बघते आहे. चांगलं, आशयघन चित्र ही मुलांच्या सर्जनशीलतेला घातलेली प्रभावी साद असते. त्यातून तयार होणारी कल्पक वलयं खूप ओलावा निर्माण करतात आणि त्यातच रुजतात सर्जनाची बीजं!
लेखिका चित्रकार आहेत.
abha.bhagwat@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Bhagyashree Bhagwat
Fri , 30 June 2017
निव्वळ अप्रतिम!