फोगाट नावाची अफाट यशोगाथा
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
सानिया भालेराव
  • ‘आखाडा’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि फोगाट कुटुंब
  • Fri , 06 January 2017
  • ग्रंथनामा Booksnama आखाडा – ऑथराइज्ड बायोग्रफी ऑफ महावीर फोगाट Akhada : The Authorized Biography of Mahavir Singh Phogat महावीर फोगाट Mahavir Phogat गीता फोगाट Geeta Phogat बबिता फोगाट Babita Phogat

पहिल्यांदा महावीरसिंह फोगाट यांचं नावं कानावर आलं ते गीता फोगाटने कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकलं तेव्हा. तेव्हापासूनच त्यांच्याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. सौरभ दुग्गल या क्रीडा पत्रकाराने महावीर सिंह फोगाट यांच्यावर चरित्र लिहायला सुरवात केली असं ऐकिवात आलं आणि ते पुस्तक कधी एकदा हातात पडतं असं झालं. काही माणसांचा संघर्ष, कष्ट, जिद्द हे शब्दांच्या पलीकडचे असतात. तसंच काहीसं महावीर यांचं आहे.  ‘आखाडा – ऑथराइज्ड बायोग्रफी ऑफ महावीर फोगाट’ हे पुस्तक महावीर फोगाट या कुस्तीपटूच्या वेडाची, जिद्दीची आणि शौर्याची कहाणी आहे. सौरभ दुग्गल यांचं खरतर हे पहिलंच पुस्तक. ते हिंदुस्थान टाईम्सचे चंदिगढमधील विशेष प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. ऑलंम्पिकमधील वेगवेगळे क्रीडा प्रकार हे त्याचं आवडतं क्षेत्र. त्यांनी हिंदुस्थान टाईम्ससाठी  २०१०चे कॉमनवेल्थ गेम्स आणि २०१२ चे लंडन ऑलम्पिक कव्हर केले. त्यांना हरियाणामधील क्रीडाक्षेत्र आणि वित्तीय, सामाजिक बदल आणि महिला सक्षमीकरण यांचा अभ्यास करण्यासाठी २०१५ साली UNDP फेलोशिप मिळाली आहे. त्यांचे महावीर यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे जेव्हा हे चरित्र लिहायचे ठरले, महावीरही लगेचच तयार झाले. मी एक पत्रकार आहे, लेखक नाही पण तरीही महावीर यांची ही गोष्ट नक्कीच लोकांपर्यंत पोहोचावी असं मला वाटलं आणि म्हणून मी हे पुस्तक लिहायला घेतलं, असं दुग्गल म्हणतात.

फोगाट परिवार हरियाणामधील भिवानी तालुक्यातल्या बलाली या छोट्याश्या खेड्यातला. हरियाणामधली उत्तरेकडची, भिवानीसारखी गावं सर्वांत कमी स्त्री-पुरुष प्रमाणासाठी आणि जास्तीत जास्त स्त्रीभ्रूण हत्येसाठी कुप्रसिद्ध आहेत. तिथं आपल्या मुली एक दिवस अव्वल कुस्तीपटू होतील आणि देशासाठी सुवर्णपदक मिळवतील, हे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महावीर फोगाटांना कुणी वेडा ठरवलं असतं तर वावगं ठरणार नाही. त्यांची पत्नी दया शोभा कौर आणि आई या दोघींनाही सर्व मुलीच असल्याचं दुःख होतं. त्याचं दुःख महावीर यांनी कधीच केलं नाही. उलट नुकत्याच जन्मलेल्या तान्ह्या गीताला सर्वप्रथम हातात घेताच ‘ही मुलगी एकदिवस नक्कीच नाव काढेल’ असं भाकीत महावीर यांनी केलं होतं. महावीर सिंह त्यांच्या वडिलांप्रमाणेच कुस्तीपटू होते. त्यांचं लहानपण, कब्बडीविषयी असलेलं वेड आणि त्यानंतर कुस्तीच्या आखाड्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अतिशय रोमांचक शब्दांत या पुस्तकामध्ये मांडला आहे.

या पुस्तकातून महावीर एक माणूस म्हणून आणि वडील म्हणून खूप जवळून अनुभवायला मिळतात.  मुलींबरोबर खेळणारे, मजा मस्ती करणारे महिवीर पुढे कडक गुरूच्या भूमिकेत शिरले ते कायमचेच. त्यांनी मुला-मुलींना कुस्तीचे पाठ देण्यास सुरुवात झाली ती २००० सालच्या ऑलम्पिक गेम्समुळे. हरियाणा शासनाने २००० सालच्या ऑलम्पिक गेम्समध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे १ करोड, ५० लाख आणि २५ लाख रुपये देण्याचे जाहीर केले. त्याचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले. कर्णम मल्लेश्वरीला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आणि तिला २५ लाखाचा चेक देताना गर्दीमध्ये उभ्या असलेल्या महावीर सिंह यांना सुवर्ण आणि सिल्वर पदक आपल्या देशातल्या कुणालाच मिळू शकलं नाही याचं फार वाईट वाटलं. तेव्हाच त्यांनी ठरवलं की आपल्या गावातून कुस्तीसाठी अशा खेळाडूंना तयार करायचं जे ऑलंम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक घेऊन येतील. मग त्यांनी आपल्या चारही मुलांना कुस्तीचे धडे द्यायला सुरू केली. पहाटे चार वाजता उठून सर्व कसरती करून मग कुस्तीचे डावपेच त्यांना शिकवत असत. शाळा संपल्यानंतर परत ट्रेनिंग सुरू. त्यांच्या मुली गीता, बबिता, रितू, भावाचा मुलगा राहुल, हरविंदर, मुलगी विनेश यांच्याकडून महावीर सिंह दिवस-रात्र कुस्तीचा सराव करून घेत असत. फक्त शाळेतच काय तो आराम त्यांना मिळायचा. मुलांपेक्षा या मुलींमध्ये जास्त कौशल्य आणि प्रयत्नांमध्ये सातत्य त्यांना दिसून आलं आणि गीता (वय वर्ष १२), बबिता (११) आणि रितू व विनेश (प्रत्येकी ६ वर्षं) यांचं संपूर्ण आयुष्य कुस्तीच्या आखाड्याभोवती गुंफल्या गेलं ते कायमचंच.

मुलींना कुस्तीसारख्या पुरुषांचे वर्चस्व असलेल्या खेळामध्ये उतरवणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. त्या काळात खेड्यातल्या लोकांच्या मानसिकतेला धक्का देणाऱ्या अनेक गोष्टी महावीर सिंह यांनी केल्या. मुलींचे केस छोटे ठेवणं, मुलांप्रमाणे त्यांच्याकडून अंगमेहनत, कसरती करून घेणं, पुरुष पेहेलवानांच्या समवेत दंगल लढण्यासाठी त्यांना आखाड्यात उतरवणं, घरच्या लोकांना आपल्या या वेडामध्ये सहभागी करून घेणं, अशा कित्येक अवघड गोष्टी त्यांनी केल्या. त्याचं वर्णन पुस्तकामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीनं केलं आहे.

मुलगी आणि मुलगा यात कोणताही भेद न मानणाऱ्या त्यांच्या विचारशैलीमुळे त्यांना  सामाजिक रोषाला सामोरं जावं लागलं, पण ध्येयाने पछाडलेल्या महावीर यांना काही दिसत होतं ना काही ऐकू येत होतं. त्यांनी मुलींकडून कसून मेहनत करून घेतली आणि  २००३ सालच्या एशियन केडेट चॅम्पियनशिपमध्ये गीताला सुवर्णपदक मिळालं. गावकऱ्यांचा दृष्टिकोन बदलण्यास सुरुवात झाली. हळूहळू बबिता, रितू आणि विनेश यादेखील विविध स्पर्धांमध्ये पदकं जिंकायला लागल्या आणि फोगाट बहिणींनी मग मागे बघितलंच नाही. गावकऱ्यांनी केलेली थट्टा, पुरुष कुस्तीपटूंबरोबर दंगल लढवताना मारलेले टोमणे, मुलींसाठी पोषक आहार पुरवताना आलेल्या अडचणी, आखाडा बनवताना घेतलेले कष्ट आणि लोकांनी दिलेला त्रास हे सर्व विसरून महावीर सिंह आजही मुलींना तेवढंच कठीण प्रशिक्षण देत आहेत.

हे सर्व करत असताना त्यांनी कुठेही मुलींच्या शिक्षणाबाबत तडजोड केली नाही. त्यांच्या चारही मुली पदवीधर आहेत आणि त्यांच्या लहान्या दोन मुलीही शिकत आहेत. भाऊ वारल्यानंतर विनेशला तितक्याच ममत्वाने वाढवणारे आणि गुरू म्हणून कुठलीच हयगय न करणारे महावीर सिंह विलक्षण माणूस आहेत. एक कडक गुरू म्हणून त्यांनी घातलेली शिस्त आणि आपल्या मुली  मनाने व शरीराने कडक आणि मजबूत व्हाव्या यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत अवर्णनीय आहे. या संदर्भातील एक दोन प्रसंग तर कमालीचे आहेत.

जिथे मुलींचं आयुष्य हे फक्त चूल आणि मुल इथपर्यंत मर्यादित होतं, तिथे आज कुस्तीसारख्या खेळात पारंगत होण्यासाठी पालक मुलींना प्रशिक्षण देऊ इच्छितात हे महावीर सिंह यांचं यश आहे. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर सिंह हे आजही आपल्या मुलींना आणि गावातल्या इतर मुला-मुलींना आखाड्यात मोफत प्रशिक्षण देतात. आतापर्यंत फक्त सहा महिला कुस्तीपटूंना अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. त्यात गीता, बबिता आणि विनेश या तीन फोगाट बहिणींचा समावेश आहे. अपार कष्ट,  झोकून देणारी जिद्द,  सातत्य,  कठोर मेहेनत आणि स्वप्न पूर्तीचा ध्यास हेच आयुष्य मानून जगलेल्या महावीर सिंह फोगाट या विलक्षण माणसाची ही गोष्ट आहे. ज्याने मुलगा-मुलगीमध्ये फरक केला नाही, मुलींसाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावलं, स्वतःतल्या बापाला मागे ठेवून गुरू बनून वेळप्रसंगी कठोर बनून मुलींना कसदार खेळाडू बनवलं. वडिलांच्या हेकेखोर स्वभावामुळे कुस्तीमध्ये उतरलेल्या या फोगाट बहिणींना आज कुस्ती सोडा म्हटलं तरी त्या सोडणार नाहीत. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर कुस्तीशिवाय त्या आपल्या आयुष्याचा विचारही करू शकत नाहीत.

बलाली गावाच्या वेशीवर स्वागत करण्यासाठी उभारलेल्या कमानीवर लिहिण्यात आलेल्या गौरवोद्गारांना बघून एका माणसाच्या अखंड जिद्दीमुळे या खेड्यातल्या लोकांच्या दृष्टिकोनामध्ये आणि मागासलेल्या विचारांमध्ये कसा बदल झाला हे वाखाणण्याजोगं आहे. त्या कमानीवर लिहिलं आहे- “आंतरराष्ट्रीय महिला पेहेलवान गीता, बबिता, विनेश आणि रितू फोगाट यांच्या बलाली गावात आपलं स्वागत आहे.” ज्यांचं अस्तित्वच या जगातून पुसून टाकावं अशा मतापासून ते त्यांचं नावं गावाच्या वेशीवर गौरवण्यापर्यंतच्या या प्रवासामध्ये महावीर सिंह फोगाट यांचा मोलाचा वाटा आहे. एका असामान्य वेडाने झपाटलेल्या माणसाच्या आयुष्याची ही कहाणी नक्कीच वाचण्यासारखी आणि गौरवण्यासारखी आहे.

‘Akhada- authorized biography of Mahavir Singh Phogat’ - Saurabh Duggal, Publisher: Hachette India, pages – 232, MRP – 250.

 

saniya.bhalerao@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......