अजूनकाही
ज्येष्ठ जलतज्ज्ञ यांच्या ‘वाल्मीकिरामायणा’वरील प्रवचनांचे पुस्तक नुकतेच साकेत प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले. शेकडो वर्षांपासून भारतीय जनमानसाच्या मनावर राज्य करणारी रामकथा चितळे यांनी मूळ स्वरूपात आजच्या संदर्भात सांगितली असल्याने तरुण पिढीलाही हे पुस्तक रोमांचक वाटेल. या पुस्तकाला चितळे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा संपादित अंश…
ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके यांचे ‘गीतरामायण’ आकाशवाणीवर १९५६-५७मध्ये ऐकले होते. पुण्यात बाळशास्त्री हरदासांची रामायणावरील व्याख्याने ऐकायला मिळाली. नंतर त्याचे पुस्तकात रूपांतर झाले, तेही वाचायला मिळाले. ‘भारतीय संस्कृती’ या साने गुरुजींच्या पुस्तकात वर्णन केलेले सीतेचे व्यक्तिमत्त्व माझ्या मनावर विशेष ठसलेले होते. एकंदरीतच रामायणातील अनेक व्यक्तिरेखा बराच वेळ मनात घोळत राहिल्या. शिवाय या सर्वांची सामाजिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमी नेमकी कशी होती आणि तत्कालीन भारताचे भौगोलिक, ऐहिक, प्रशासकीय, तंत्रवैज्ञानिक चित्र त्या काळात नेमके काय होते, याबाबतचे कुतूहल मनात होतेच.
महर्षी वाल्मीकींचे संस्कृत भाषेतील रामायण हा ऐतिहासिक दृष्टीने सर्वांत जुना, प्रमाणभूत ग्रंथ होय. तो मुळातून वाचल्याशिवाय या सर्व व्यक्तिरेखांचा उलगडा होणार नाही, म्हणून १९५८मध्ये मी तो ग्रंथ विकत घेतला. केवळ मूळ संस्कृत श्लोक असणारा, अनुवाद नसलेला हा ग्रंथ १००० छापील पृष्ठांचा आहे, हे पाहून आधी तर मन दडपले. केवढा मोठा हा वाङ्मयीन ठेवा! काशीच्या पंडित पुस्तकालयाने प्रकाशित केलेली ही प्रत होती. नंतर नोकरीतील बदल्यांमध्ये ही प्रत माझ्याबरोबर ४५ वर्षे सोबत राहिली. जसजसा वेळ मिळेल तसतसे त्यांतले सर्ग मुळांतून वाचत वाचत मी समजावून घेतले. भगीरथाची कथा, अहल्येची कथा, शबरीची कथा या लहान मुलांसाठी लिहिलेल्या गोष्टी पूर्वी अनेकदा वाचलेल्या होत्या, पण त्यांतील वर्णनांपेक्षा व रामायणावरील इतर लिखाणांमध्ये प्रतिबिंबित झालेल्या कथावस्तूंपेक्षा मूळ वाल्मीकी रामायणातील सर्गांमधल्या या घटनांचे विवरण खूपच वेगळा अर्थबोध घडवणारे आहे, हे हळूहळू लक्षात आले. वाल्मीकींनी लिहिलेल्या रामायणाच्या मांडणीत श्रीरामांभोवती फिरणार्या कौटुंबिक कथेव्यतिरिक्त तत्कालीन सामाजिक माहितीचे, राज्यव्यवहाराच्या पद्धतीचे, ऐहिक समृद्धीचे व तात्त्विक विश्लेषणांचे अनेक पैलू (उदा. नगररचना, महामार्गांची बांधकामे, कोषव्यवस्था) गुंफण्यात आले आहेत, हे जाणवले.
वाल्मीकींनी या कथांची मूळ ग्रंथात केलेली मांडणी मला अधिक उद्बोधक वाटली. मूळ ग्रंथातील तपशील अगदी प्रारंभीच्या सर्गापासूनच तेजस्वी विचारधारेत गुंफलेला आहे, हे जाणवले. त्यातील दशरथ, कौसल्या, सुमित्रा, कैकयी, सीता, तारा, सुग्रीव, अंगद, जटायू, हनुमान, विभीषण, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ही रामाव्यतिरिक्तची सगळीच व्यक्तिमत्त्वेसुद्धा किती उदात्त व ओजस्वी आहेत, हे जाणवले. सीतासुद्धा दूरचित्रवाणीवरच्या मालिकांमधील चित्रणासारखी मुळुमुळू रडणारी नाही, तर थेट रामाशी व लक्ष्मणाशीही धिटाईने वादंग घालणारी आहे, रावणाला तर सतत निर्भयपणे खडसावणारी आहे. लोकांमध्ये रूढ असलेल्या रामकथेमधील सीतेपेक्षा मुळात ती फार वेगळी आहे, हे उमगले.
हनुमानाचे उन्नत, कर्तबगार आयुष्य तर अचंबित करणारेच आहे. म्हणून रामायणातल्या कांडांना बालकांड-अयोध्याकांड-अरण्यकांड-किष्किंधाकांड अशी स्थलकाल-विशिष्ट नावे दिल्यानंतर हनुमानाने लंकाबेटावर जाऊन सीतेचा शोध घ्यायचे जे अतुलनीय कुशलतेचे काम केले, त्याचे वर्णन सांगणारे सर्ग ‘सुंदरकांड’ या अगदी वेगळ्या धाटणीच्या गौरवास्पद नावाखाली वाल्मीकींनी आणले आहेत. ते सारे सर्ग वाङ्मयीनदृष्ट्याही अतीव ‘सुंदर’ आहेत. हनुमानाला श्रीरामांप्रमाणेच स्वतंत्र देवत्व का मिळाले, याचा उलगडा करणारे हनुमानाच्या कर्तबगारीचे तपशील त्यात आहेत. पुढे उत्तरकांडात हनुमानाचे पूर्वचरित्र व त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचे अधिक बारकावे आणखी विस्ताराने आले आहेत. तेही थक्क करणारे आहेत.
विभीषणाच्या धीरोदात्त, नीतिप्रिय वागण्याचा प्रभाव सुंदरकांडापासून जाणवायला लागतो. आजही श्रीलंकेत बुद्धमंदिरांमध्ये त्याची विनम्र मूर्ती ठेवून, त्याला देवत्वाजवळचे स्थान बहाल करून, त्या देशाचा राष्ट्रीय पुरुष म्हणून आदराचा मान कशामुळे दिला गेला आहे याचे उत्तर वाल्मीकी रामायण वाचताना युद्धकांडात हळूहळू सापडत जाते.
ताटकाचे (त्राटिकीचे) पूर्ववृत्त, मारीच राक्षसाचे जीवनवृत्त, रावणाचे व लंकेतील इतर राक्षसांचे पूर्ववृत्त या गोष्टी सामान्यत: विस्ताराने सांगण्यात येत नाहीत. त्यामुळे राक्षसी प्रवृत्ती केव्हा व कशा निर्माण होतात, बळावतात, अनियंत्रित होतात याचा सामाजिक व मनोवैज्ञानिक उलगडा पारंपरिक श्रीरामकथांमधून होत नाही. श्रीरामांना विश्वामित्रांनी केलेले मार्गदर्शन, त्यांनी श्रीरामांना भेट म्हणून दिलेली शस्त्रे, अस्त्रे, यांवरही रामकथांच्या विवेचनातून सामान्यतः पुरेसा प्रकाश पडत नाही. रामलक्ष्मण वल्कले परिधान करून असले, तरी सीता सालंकृत वनात गेली होती. तिच्या वस्त्रालंकारांची पेटी सोबत घेऊन रामलक्ष्मण व सीतेचे अरण्यातील प्रवास झाले होते. रामाच्या शोधासाठी निघालेल्या भरताच्या सैन्याबरोबर कौसल्या व सुमित्रा यांसह कैकयीसुद्धा होती. गुह राजाने श्रीरामांना आदरपूर्वक गंगा ओलांडण्यास मदत केली होती; पण रामशोधासाठी ससैन्य जाणाऱ्या भरताला मात्र गंगाकिनारी प्रथमत: प्रतिबंध केला आणि भरताच्या सद्हेतूबद्दल खात्री पटल्यावरच गंगेची नाकेबंदी उठवली होती. चित्रकुटावर रामभरत संवाद झाला, तेव्हा तो संवाद ऐकण्यासाठी तेथे वानप्रस्थी ऋषी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी त्यांच्या मध्यस्थीतून व वसिष्ठांच्या सूचनेवरून भरताला रामाविनाच अयोध्येला परत जावे लागले. तेथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या सामूहिक विचारमंथनातून मोठ्या राजनैतिक पेचाची सोडवणूक झाली. रामकथेतील हे चोखंदळ बारकावे इतरांना सांगावेत असे मला नेहमी वाटे.
राक्षसी प्रवृत्ती कशा उत्पन्न होतात, कशा वाढतात, अनियंत्रितपणे का व कशा पसरतात आणि त्यामुळे सर्वसाधारण समाजासाठी त्या किती उपद्रवकारक व भयकारक ठरतात, याचा उलगडा वाल्मीकींनी शेवटी, उत्तरकांडात केला आहे. त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टीने केलेले या प्रक्रियांचे विश्लेषण वाचकाला विचारमग्न व्हायला लावते. विनाशकारी आसुरी प्रवृत्तीचा केंद्रबिंदू असलेल्या रावणाचा पराभव निर्णायक व अभूतपूर्व तर होताच; पण त्या प्रवृत्तीच्या इतर पारंब्याही श्रीरामांना लक्षपूर्वक नष्ट कराव्या लागल्या होत्या. पूर्वेकडील बिहार-बंगालपासून थेट वायव्येकडील तक्षशिलेपर्यंत ‘रामराज्याची’ सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी त्या एकेका प्रदेशात स्वतःच्या भावांना व पुतण्यांना पाठवून श्रीरामांनी हे घडवून आणले होते. त्यामुळे अयोध्येप्रमाणेच सुस्थिर व ऐहिक भरभराटीचे आयुष्य त्या प्रदेशांच्याही वाट्याला आले.
भारताला रामराज्याच्या दिशेने वाटचाल करारची असेल, तर कोणत्या नीतिमूल्यांचा पाठपुरावा करावा लागेल व व्यवहारकुशलतेचा अवलंब कसा करायला हवा, या घटकांवर रामायण वाचताना प्रकाश पडत जातो. तसेच उत्तरेतील केकयांचे राज्य असणाऱ्या जम्मू प्रदेशापासून थेट श्रीलंकेपर्यंत गेल्या सात हजार वर्षांपूर्वीपासून एकाच प्रकारच्या सांस्कृतिक मुशीत सारा भारतीय समाज कसा घडला होता, त्याचेही दर्शन घडते. इतकेच नव्हे, तर भारताबाहेर पूर्वेकडे व्हिएतनामपर्यंतच्या भूगोलाचा किंवा आफ्रिकेतील मेरू पर्वतापलीकडील घनदाट कोंगोपर्यंतच्या भूभागाचा, उत्तरेत स्कंदप्रदेशापर्यंतच्या समाजस्थितीचा व दक्षिणेत मलेशिया-इंडोनेशियापर्रंतच्या भूवैशिष्ट्यांचा वाल्मीकींनी दिलेला तत्कालीन परिचय आपल्याला आश्चर्यचकित करतो. सुग्रीवाने सीताशोधासाठी चारही दिशांना सैन्य पाठवले, त्या वेळी सुग्रीवाने सैन्याला दिलेल्या सूचनांच्या माध्यमांतून हा सारा भूगोल आपल्यासमोर उभा राहतो.
मूळ संस्कृत भाषेतील ग्रंथात वाल्मीकींनी दिलेल्या या तपशिलांपर्यंत रामायणाचा सामान्य वाचक व श्रोता सर्वसाधारणपणे पोहोचत नाही. म्हणून हे सारे एकदा सलगपणे सर्वांना सांगावे, असे मला रामायण वाचताना नेहमी वाटत राही. मी गीतेवर प्रवचने द्यावीत, अशी सूचना प्रा. डॉ. अरुणराव अष्टपुत्रे, माधवराव कुलकर्णी व भास्करराव धारूरकर यांनी मिळून औरंगाबादच्या टिळक नगरमधील बालाजी मंदिरातर्फे जेव्हा माझ्यासमोर ठेवली, तेव्हा त्याऐवजी भारतीय सामूहिक कर्तबगारीचा व सांस्कृतिक एकतेचा आलेख असलेला वाल्मीकीचा ‘रामायण’ हा ग्रंथ प्रवचनांमधून सर्वांसमोर मांडावा, असा पर्याय मी त्यांच्यासमोर ठेवला. मंदिरातील व्यवस्थापनाने तो आनंदाने स्वीकारला. मंदिराच्या धार्मिक समितीतर्फे या ८८ प्रवचनांचे प्रा. डॉ. अरुणराव अष्टपुत्रे यांनी न कंटाळता, न चुकता, शेवटपर्यंत नियमाने ध्वनिमुद्रण केले. त्यामुळे ती प्रवचने पुन्हा ऐकण्याची सोय झाली; पण त्यापाठोपाठ त्या प्रवचनांचे लिखित शब्दांकन होऊन ते वाचकांना चिंतन-मननासाठी ग्रंथरूपात उपलब्ध व्हावे, अशी मागणी सुरू झाली. त्याला प्रतिसाद म्हणून प्रवचनांचे हे लिखित रूपांतील संकलन आता प्रकाशित होत आहे.
रामायणावर आधुनिक, वैज्ञानिक, भौगोलिक, ऐतिहासिक संदर्भात अजून खूप संशोधन व्हायला वाव आहे. तपशीलवार संशोधनाअभावी माझ्या अल्पमतीस जेवढे सकृद्दर्शनी समजले, त्याचा उपरोग करून प्रवचनांची मांडणी केली आहे. यापुढे जसजसे अधिक माहिती व विश्लेषण उपलब्ध होत जाईल, तसतसा रामायणाचा अधिक डोळस आस्वाद यथाकाल घेता येऊ शकेल, अशी आशा करू या.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment