अजूनकाही
१.
एक नोट डिझाइन करावी म्हणते...
कुणाची स्टाईल कॉपी करू?
साल्वादोर दालीची बरी राहील?
ओघळलेल्या घड्याळांप्रमाणे वितळून ओघळलेला गांधी नोटेवर पसरेल
की गांधीऐवजी टाकून द्यावा दालीच्या मनातला
युद्धाचा चेहरा?
आणि व्हॅन गॉगच्या गव्हाच्या शेतीतली काही कणसे फराट्यांसारखी मधेमधे
किंवा बटाटे खाणारे काळेपांढरे हात!
की पिकासोच्या आसवं ढाळणाऱ्या स्त्रीप्रमाणे रंगीबेरंगी चिमटलेला
दुभंग गांधी असू दे मध्यभागी?
आणि ग्युएर्निकाचे भस्मरंगी नाझीयुद्धदृश्य पार्श्वभूमीवर?
गाय नि गाढवंही असतील त्यात...
की उण्यापुऱ्या शतकापूर्वी काझिमिर मालेविचने काढलेल्या
काळ्या चौरसासारखी असू दे नोट...
शतवाटांनी तडकलेला
शून्यातून शून्याकडचा प्रवास...
मग एक की दोन अंकावर असू देत कितीही शून्ये
कदाचित् सोपी जाईल छपाईला...
दालीचं ओघळणारं घड्याळ, व्हॅन गॉगचे बटाटे खाणारे काळे पाढंरे हात आणि पिकासोची आसवं ढाळणारी स्त्री
२.
रियाझ म्हणाला
तुमची नोटेवरची कविता वाचून
मला गांधी एडवर्ड मंचच्या ‘स्क्रीम’मधल्या रंगरेषेसारखे किंचाळताना दिसले.
बरोबर आहे.
व्याकूळ वेदना उमटू शकते कुठल्याही मनातून
पण कदाचित् नाही किंचाळणार कुणीही...
गांधीसुद्धा...
आताशा किंचाळणारे रंग आणि गोडगुलाबी रंग
सरमिसळ होत राहते...
सोपे नसते रंगरेषांतून असे किंचाळी फोडणे
मृत्यूनंतरही जगाला हादरवत रहाणारी किंचाळी की किंकाळी?
तशा तर कितीएक किंकाळ्या जिरवल्यात आम्ही.
पशूंच्या शिंगामागून डोकावणारे परशू
होतात कुंचले रक्तरंगात भिजून कॅन्वास चिताडणारे...
त्या रंगरेषांतून ऐकू येतात ते जयजयकार.
Not a SCREAM, Riyaz, No scream...
शिवाय एडवर्ड मंच होता स्वदुःखमग्न चित्रकार
इथे जमतात सारे दुसऱ्यांची दुःखे 'साजरी' करणारे रंगविक्ये
इथे किंकाळी नाही, रियाझ...
इथे डीज्जे! ढोलही...
लेखिका मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागाच्या संचालक आहेत.
mugdhadkarnik@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Arhna Pendse
Fri , 18 November 2016
सणसणीत भाष्य!